26 February 2021

News Flash

शाक्त तंत्रमार्ग आणि चौसष्ठ योगिनी

त्याला एक सहज पटेल असे उत्तर देता येणे शक्य आहे, की गौराई येतात त्या धनधान्याच्या समृद्धीचा आशीर्वाद घेऊनच.

भारतीय समाजाच्या मानसिकतेला रुचेल असा शक्तिउपासनेचा आचारविधी नवरात्राच्या रूपाने शाक्तांच्या विविध संप्रदायात रुजला. न रुचणारे आचारविधी मात्र प्रचलित नतिकतेच्या कल्पनांमध्ये न बसल्याने गुप्ततेच्या पडद्याआड गेले.

गणपतीबाप्पा आणि गौराईंची आराधना पूर्ण होऊन त्यांना निरोप दिला की पूर्वजांच्या स्मरणासाठीचा पंधरवडा, आणि त्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे. लोकपरंपरेच्या या क्रमातील मूळ दुवा देव-पितरांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आणि मंगलाची कामना करणे हा आहे. त्याचबरोबर सर्वात आधी विघ्नहर्ता गणेश, त्यानंतर आपल्या अस्तित्वाचे कारण बनणारे पूर्वज आणि त्याच अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी अमंगलाचा विनाश करण्यास सज्ज असलेले शक्तिस्वरूप देवीरूप हा आराधनेचा क्रमही भारतीय लोकमानसात रुजलेल्या ताíककतेला धरूनच आहे. गौराईंना महालक्ष्मी म्हणूनही संबोधले जाते. गौराई याही देवीस्वरूपच. मग देवीरूपाच्या दोन पलूंचे पूजन असे अंतर राखून का, असा प्रश्नही एखाद्या चौकस आणि आधुनिक विचारसरणीच्या व्यक्तीच्या मनामध्ये उमटू शकतो.

त्याला एक सहज पटेल असे उत्तर देता येणे शक्य आहे, की गौराई येतात त्या धनधान्याच्या समृद्धीचा आशीर्वाद घेऊनच. ज्येष्ठा आणि कनिष्ठा म्हणून येणाऱ्या या दोघी बहिणींचे लोकसंस्कृतीशी, विशेषत: कृषीसंस्कृतीशी असलेले नाते कुठल्याही पौराणिक शास्त्रांपेक्षा किती तरी प्राचीन आहे. स्त्रियांच्या  आचारधर्मातून ते जपले गेले आहे. या दोघी  बहिणींमधील एक पार्वतीचे रूप मानले जाते. दुसरी तिची बहीण-सखी आहे. ‘‘गौराई आमची बाळाई, सकरूबा आमचा जावई’’, हे पार्वती-गौरी-महालक्ष्मीचे शंकराशी असलेले नाते लोकगीतांमधून स्पष्ट होते. पार्वतीचे भूमातास्वरूप असणे हेही सर्वमान्य आहे. पुन्हा इथे लक्षात येते की पार्वती, शंकर ही पौराणिक दैवते. भरव-क्षेत्रपाळ आणि जोगेश्वरी ही लोकपरंपरेतील दैवते. मुळात ही दोन्ही दैवते शिवारासह असणाऱ्या गावसीमेचे रक्षण करणारी. भरव आणि जोगेश्वरीचे गामदैवत म्हणून महत्त्वाचे असणारे स्थान आजही अबाधित असलेले दिसते. या दैवतांना पौराणिक परंपरेत सामावून घेताना त्यांचे शंकर-पार्वती या पौराणिक दैवतांशी सात्मीकरण झाले, हेही स्पष्ट आहे. अशा प्रकारे सात्मीकरण होताना पौराणिक परंपरेत भरवाला शिवाचे अंशरूप म्हणून मान्यता दिली गेली. पर्यायाने जोगेश्वरीला पार्वतीचे अंशरूप म्हणून मान्यता मिळणे, हे ओघाने आलेच.

नवरात्रातील देवीपूजनाचेही दोन पदर अत्यंत स्पष्ट आहेत. घटपूजनाच्या स्वरूपातील देवीपूजनाचे प्रत्यक्ष आचारविधी हे गौराईंच्या पूजनाप्रमाणेच फलदायिनी, ऐश्वर्यदायिनी भूमातेचे किंबहुना तिच्या सर्जनशक्तीचे आहेत. पौराणिक आचारविधींमध्ये प्राचीन लोकधर्मातील घटपूजन होते तसेच स्वीकारले गेले आणि त्याला मंत्रांची जोड दिली गेली, अशी शक्यता अधिक वाटते. नवरात्राची अधिष्ठात्री देवता मात्र योद्धय़ाच्या रूपातील दुर्गा किंवा स्थलमानानुसार मान्यता पावलेली एखादी देवी असते. त्या देवीला पौराणिक मिथकांमध्ये स्वतंत्र स्थान असले तरी अंतत: ते दुग्रेशी जोडलेले असते. त्या अनुषंगाने देवीच्या प्रतिष्ठापित मूर्तीच्या पूजनाचे मंत्रासह होणारे विधी हे पौराणिक असतात. पूर्णत: स्त्रियांच्या आचारविधीतून जपल्या गेलेल्या गौराईंच्या पूजनाला मंत्रतंत्रांची जोड कधी मिळाली नाही. मुळातच मंत्रतंत्रावर अधिक भर देणाऱ्या पौराणिक धर्मात पुरुषांनी करावयाच्या आचारविधींना महत्त्व असते. स्त्रियांच्या आचारधर्माला त्यात फारसे महत्त्व मिळाले नाही. साहजिकच गौराईंचा उत्सव आणि नवरात्राचा उत्सव हे एकमेकांशी अंतर राखून असलेले दिसतात.

लोकाचार आणि लोकपरंपरेचा मागोवा घेत या स्पष्टीकरणांमध्ये जाणवणाऱ्या विरोधाभासांचा विचार केला तर काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. लोकधर्मातील प्रचलित दैवते आणि आचारविधी पौराणिक शास्त्रांच्या चौकटीत बसवताना, त्यांच्याभोवती मिथके गुंफली गेली. त्यांच्या मूळ उपासनापद्धतीला मुरड घालून, मंत्रांसहित असलेल्या उपचारांना महत्त्व मिळत गेले. त्यातून संप्रदायविशिष्ट उपासना पद्धत निर्माण होत गेली असावी. गणेशाच्या उपासनेभोवती गुंफला गेलेला गाणपत्य संप्रदाय असो वा देवीची तिच्या विविध रूपात उपासना करणारे संप्रदाय असोत, त्यांचे संप्रदायविशिष्ट विधी शास्त्रांमध्ये बांधले जाणे हे साधारणपणे नवव्या-दहाव्या शतकापासून सुरू झाले. परंतु लोकाचारामध्ये या दैवतांच्या पूजनाला त्याही आधीच्या काळापासून स्थान होते, याबद्दल दुमत नाही. गणपतीचे यक्ष म्हणून असलेले आद्यरूप आणि देवीचे लोकमाता-लोकदेवता-लक्ष्मीआई म्हणून सुरुवातीपासून लोकाचारात असलेले अधिष्ठान आणि नंतर त्यांच्या दैवतरूपाचे उन्नयन होत होत त्यांच्या सांप्रदायिक स्वरूपाला प्राप्त झालेले महत्त्व, यामागचा इतिहास स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी केलेला आहे. हा अनेकपदरी, बहुस्तरीय इतिहास समजून घेणे भाविकांच्या दृष्टीने बऱ्याचदा महत्त्वाचे नसते. कधी कधी ते मनातील श्रद्धेला न रुचणारेही असते.

09-hirapur-lp

दैवतपरंपरांच्या इतिहासाच्या खोलात शिरायचे, कारण भाविकांना विशेषत: कामनापूर्तीसाठी एखाद्या दैवताची उपासना करणाऱ्या श्रद्धावंतांना असत नाही. परंतु एकाच दैवताभोवती काळाच्या ओघात वाढत गेलेले भिन्न भिन्न संप्रदाय, त्या संप्रदायांचे भिन्न तत्त्वज्ञान यांचा विचार करणाऱ्या अभ्यासकांना मात्र त्यामागील इतिहास धुंडाळण्याखेरीज पर्याय नसतो. नवरात्राच्या निमित्ताने शक्तीची उपासना करणाऱ्या शाक्त संप्रदायांचा विचार करू लागलो, की सर्वप्रथम लक्षात येणारी गोष्ट म्हणजे नवरात्र हा मूलत: कुलाचाराच्या स्वरूपातील आहे. उत्सवाचे स्वरूप त्याला नंतर आले. नवरात्राचा कुलाचार पिढय़ान्पिढय़ा ज्या कुटुंबांमधून पाळला जातो, ती सर्वच कुटुंबे शाक्त संप्रदायाचे अनुयायी असतात असे नाही. समाजातील अनेक जाती-जमाती देवीचे नवरात्र साजरे करतात. म्हणजेच नवरात्राचा उत्सव फक्त शाक्तांशी संबंधित आहे, असे म्हणता येणार नाही. तरीही कुलाचाराच्या स्वरूपातील नवरात्राचा सांधा त्याच्या मुळाशी असलेल्या सृजनाच्या संकल्पनेमुळे शक्तिउपासनेशी जुळणे फारसे कठीण नव्हते. भारतीय समाजाच्या सर्वसाधारण मानसिकतेला रुचेल असा शक्तिउपासनेचा आचारविधी नवरात्राच्या रूपाने शाक्तांच्या विविध संप्रदायात रुजला, विकसित झाला. शाक्त संप्रदायातील न रुचणारे अनेक आचारविधी मात्र प्रचलित नतिकतेच्या कल्पनांमध्ये न बसणारे ठरले आणि म्हणून गुप्ततेच्या पडद्याआड गेले. त्यामध्ये चौसष्ट योगिनींच्या पूजाविधींचा समावेश होतो असे म्हणावे लागेल.

शाक्त आणि शैव संप्रदाय

शाक्त आणि तांत्रिक एकच असावेत अशी समजूत बऱ्याचदा आढळून येते. तसेच शिव आणि शक्ती यांच्यातील सान्निध्यामुळे शाक्त आणि शैव संप्रदायातील फरकही रोजच्या व्यवहारात फारसा जाणवत नाही. प्रत्यक्षात तसे नाही. शाक्त संप्रदायात शक्ती हे परमदैवत मानले जाते. तर शैव संप्रदायात शिव हे परमदैवत शक्तीला गुरुस्थानी असते. प्रत्येक  संप्रदायाच्या परंपरेत विशद केलेला साधनेचा मार्ग म्हणजे ‘तंत्रमार्ग’. शैव तंत्र, शाक्त तंत्र, गाणपत्य तंत्र, सौर्य तंत्र, वैष्णव तंत्र आणि बौद्ध तंत्र असे तंत्रमार्गाच्या परंपरेची विभागणी केली जाते. शाक्त तंत्रमार्गात शक्ती ही विश्वाचे आदिकारण मानलेली आहे आणि त्या अधिकारात तिची दहा गुणरूपे आणि त्यांची साधना याला महत्त्व आहे. या दहा गुणरूपांना महाविद्या असे म्हटले जाते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : काली, तारा, शोडषी, भुवनेश्वरी, भरवी, छिन्नमस्ता, धूमवती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. या सर्वाचे सविस्तर वर्णन देवीमाहात्म्य, देवीभागवत या ग्रंथांमध्ये मिळते. काळाच्या ओघात तांत्रिक आणि शाक्त या संज्ञा बऱ्याचदा समानार्थी म्हणून वापरल्या गेल्या, असे दिसते.

देवीभागवताच्या नवव्या स्कंधात देवी आणि प्रकृती या संकल्पनांची सांगड घातलेली आहे. सर्व देवांचे अंश एकवटून त्यापासून देवी निर्माण झाली, अशी कथाही त्यात आहे. मात्र तरीही ती पूर्णत स्वतंत्र, कोणत्याही देवाच्या आधिपत्याखाली नसलेली, अशी आहे. किंबहुना देव हे देवीचे कृपाभिलाषी आहेत. देवी म्हणजेच आदिम आणि अंतिम सत्य-परब्रह्म या विचारावर शाक्त संप्रदायांची सद्धान्तिक पीठिका आधारलेली आहे. देवी स्वतच म्हणते की जेव्हा प्रलय होतो तेव्हा तिचे स्वरूप ना स्त्रीचे, ना पुरुषाचे; ती केवळ ब्रह्मरूपाने उरते. मायेसहित ब्रह्म असे तिचे अस्तित्व आहे. शाक्त परंपरेत माया मिथ्यारूप नसून ती सर्जनशील शक्ती आहे. मायेमुळेच शक्तितत्त्वाला देवीरूपे धारण करणे शक्य होते. शाक्तमतामध्ये देवीरूपाप्रति उत्कट भक्तीचे, संपूर्ण शरणागतीचे माहात्म्य आहे. ब्रह्मस्वरूपातील शक्तितत्त्वाचे दोन पलू आहेत : मायाशक्ती आणि चित्शक्ती. मायाशक्तीच्या आधारे ती तीन गुणरूपांमधून ती प्रकट होते : सात्त्विक स्वरूपातील महालक्ष्मी, राजसिक स्वरूपातील महासरस्वती आणि तामसिक स्वरूपातील काली. चित्शक्तीच्या स्वरूपातील तिचे अस्तित्व मात्र निर्गुण असते. शाक्त तंत्रमार्गाचे अंतिम ध्येय सगुणाकडून निर्गुणाकडे जाणे हेच आहे.

शक्ती आणि शिव या दैवतांच्या उपासनेची परंपरा खूप प्राचीन असल्याचे, तसेच ती वेदपूर्व असल्याचे मानले जाते. नंतरच्या काळातील त्यांचे संप्रदायविशिष्ट स्वरूप मात्र वैदिक आणि अवैदिक या दोन्ही परंपरांना सामावून घेत स्वतंत्रपणे विकसित होत गेले. शाक्त आणि शैव संप्रदायांमध्ये तत्त्वभेदांना आणि त्यानुसार असणाऱ्या आचारविधींना अनुसरून अनेक पंथोपपंथ निर्माण झाले हे खरे असले तरी हठयोगाशी त्या सर्वाचेच नाते आहे. योगिक परिभाषेमध्ये ‘ह’ म्हणजे स्त्रीतत्त्व आणि ‘ठ’ म्हणजे पुरुषतत्त्व. या दोन तत्त्वांच्या, म्हणजेच शक्ती आणि शिव यांच्या एकात्मिकतेचा अनुभव प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे हठयोग. मानवी शरीर हे वैश्विक रचनेची प्रतिकृती आहे; स्त्रीतत्त्व आणि पुरुषतत्त्व दोन्हीही प्रत्येकाच्या शरीरात असतात, हे योगमार्गातील प्रमुख तत्त्व आहे. त्या दोन्हींच्या एकत्व पावण्यातून परमानंदाची अनुभूती प्राप्त होते. शिवतत्त्व म्हणजेच परमतत्त्व सहस्रारचक्रामध्ये वसते आणि शक्तीचा म्हणजेच वैश्विक सृजनशीलतेचा वास सर्परूपी कुंडलिनीच्या रूपात मूलाधार चक्रात असतो. ती तिथे सुप्त स्वरूपात असते. सुप्त स्वरूपातील कुंडलिनी जागृत करून, शिव आणि शक्तीचे एकत्व साधणे, हे तांत्रिक हठयोगाचे अंतिम साध्य मानले जाते. हठयोगामध्ये शरीर आणि शरीरधर्माला परमार्थाच्या मार्गातील अडथळा न मानता, शिव आणि शक्तीचे एकत्व साधण्याचे साधन मानलेले आहे. योगासने हा हठयोगावर आधारलेल्या साधनेची प्राथमिक पायरी होय. हठयोगाच्या साधकांना योगी असे म्हटले जाते.

शाक्त तंत्रमार्गात हठयोगाच्या स्त्री-साधकांना अतिशय महत्त्वाचे स्थान होते. त्यांना योगिनी असे म्हटले जाई. शाक्त तंत्रमार्ग गूढ आचारविधींवर आधारलेला असून, त्या मार्गाचे पूर्ण ज्ञान असलेल्या काही योगिनी गुरुपदालाही पोचलेल्या होत्या. एवढेच नव्हे तर अशा योगिनी-गुरूकडून दीक्षा मिळण्याला खूप महत्त्व होते. काही अभ्यासकांच्या मते तंत्रमार्गाचे तत्त्वज्ञान, आचार आणि मूíतविज्ञान यांना आकार देण्यात योगिनी-गुरूंचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी ध्यानधारणेच्या नव्या पद्धतींची ओळख करून दिली, नवीन आचारविधी सुरू केले. त्यांच्या शिष्यगणांच्या दृष्टीने त्या पवित्र ज्ञानाचा ठेवा जतन करणाऱ्या दिव्य स्त्रिया होत्या.

मरकडेय पुराणातील ‘देवीमाहात्म्य’ शाक्त तत्त्वज्ञानाचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. असे असले तरी देवीमाहात्म्य हा स्वतंत्र ग्रंथ नसून तो मरकडेय पुराणाचा भाग आहे. ते साधारणपणे पाचव्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान रचले गेले, असे मानले जाते. बाराव्या शतकामध्ये शक्तीच्या सगुण नामरूपांच्या केवळ संकल्पनाच नव्हे तर त्यावर आधारलेले मूर्तीविज्ञानही विकसित झाले होते. त्यामध्ये तिच्या सौम्य आणि रौद्र अशा दोनही प्रकारच्या रूपांचा समावेश होता. आठव्या ते चौदाव्या शतकापर्यंतच्या कालखंडात देवी उपासनेला खूपच प्राधान्य प्राप्त झाले होते असे दिसते. त्याच सुमारास देवी भागवत पुराण रचले गेले. देवी भागवतातील देवीचे रूप प्रामुख्याने असुरांचे मर्दन करणाऱ्या योद्धय़ाचे आहे. परंतु तिच्यामध्ये शृंगारिकता आणि विश्वजननीचे करुणामयी रूपही सामावलेले आहे. ती देवांचीही माता आहे. अशा रीतीने भारताच्या इतिहासातील ज्याला मध्ययुगीन कालखंड म्हटले जाते त्या कालखंडात शक्तीचे परमदेवता म्हणून असलेले अधिष्ठान प्रबळ झाले होते आणि त्याबरोबरीने शाक्त संप्रदायांचे अनुसरण वाढीला लागले होते असे दिसते.

चौसष्ट योगिनी

भारतातील मध्ययुग हे सरंजामशाहीच्या उदयाचे होते. या काळात तंत्रमार्ग आणि त्यावर आधारलेल्या आचारविधीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याचे प्रतििबब मंदिरस्थापत्यातही उमटलेले दिसते. शृंगाराचे ठळकपणे रेखाटन करणाऱ्या शिल्पांची बहुलता हे काही मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण बनले. मध्य प्रदेश आणि ओडिशा येथील मंदिरांच्या शिल्पशैलीमध्ये ही बाब प्रकर्षांने निदर्शनास येते. खजुराहोच्या मंदिरातील शृंगारशिल्पे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारची शिल्पे मंदिरांच्या िभतींवर का कोरली असतील, या संदर्भात विद्वानांनी वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एका मतप्रवाहानुसार या शिल्पांचा संबंध शाक्त संप्रदायांच्या गूढ तांत्रिक विधींशी असावा. यातील काही विधींमध्ये स्त्री-पुरुष संभोगाकडे जीवन्मुक्त होण्याच्या मार्गातील एक तंत्र म्हणून पाहिले गेले. त्यामागील प्रेरणा केवळ शारीरिक कामपूर्ती ही नसून, लौकिक अस्तित्वाच्या सीमा ओलांडून देवीच्या अलौकिक रूपाशी एकत्व साधणे, ही आहे. चक्रपूजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विधींमध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यामधील स्त्रीला विशेष महत्त्वाचे स्थान असे. पुरुषाच्या दृष्टीने त्याची जोडीदार ही प्रत्यक्ष शक्तीचा, देवीचा अंश असे. वामाचारी किंवा कौल या नावाने हा मार्ग ओळखला गेला. ‘कौल’ ही संज्ञा ‘कुल’ या संज्ञेपासून तयार होतो. तंत्रमार्गाची दीक्षा घेतल्यानंतर दीक्षित अनुयायी देवीच्या कुलाचा सदस्य बनतो. म्हणून त्याला ‘कौल’ म्हटले जाते. देवीच्या कुलात समाविष्ट झालेल्यांचा संप्रदाय तो ‘कौल संप्रदाय’. ‘मि तंत्र’ आणि ‘समय तंत्र’ असे आणखी दोन संप्रदाय आहेत. तीनही संप्रदायांची सद्धान्तिक बठक एकच असली तरी मि तंत्र आणि समय तंत्राचे पूजाविधी हे अधिक अमूर्त पातळीवरचे आहेत.

इतर संप्रदायांमध्ये स्त्री आणि देवी यांना दुय्यम स्थान दिले जाते, याचा उल्लेख तांत्रिक ग्रंथ करतात. तांत्रिक आचारातील अत्यावश्यक आचारांना पंच मकार असे म्हटले जाते. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मथुन हे ते पंच मकार होत. शाक्त संप्रदायाची दीक्षा घेतलेल्या प्रत्येकासाठी या पंच मकारांचे आचरण अत्यावश्यक समजले जाते. या सर्व गोष्टी परंपरागत रूढींनी निषिद्ध मानलेल्या होत्या. त्यामुळे शाक्त संप्रदायांनी त्यांचे विधी आणि आचरण यांच्यासंबंधी पूर्णत गुप्तता बाळगली असावी. शाक्त विचारानुसार िलग, जात यांवर जीवन्मुक्तता प्राप्त होण्याची योग्यता अवलंबून नाही. ती प्रत्येकामध्ये उपजत असते. विरक्ती, वैराग्य आणि तप या तीन तत्त्वांपेक्षा यंत्र, मंत्र आणि योग यांना शाक्त तंत्रात प्राधान्य दिले गेले. त्यायोगे अनेक सिद्धी प्राप्त होतात असे मानले जाते. ज्यांना सिद्धी आणि ज्ञान प्राप्त आहे, अशा शाक्त संप्रदायातील स्त्रियांना ‘योगिनी’ असे म्हटले जाई. त्यांना गुरुपद प्राप्त होई. असा एक समज आहे, की सिद्धी प्राप्त झालेल्या योगिनींना त्यांच्या इच्छेनुसार रूप धारण करणे शक्य असे. शिल्पांमध्ये विविध प्राण्यांचे शिर असलेल्या योगिनीमूर्ती आढळतात. गौण दैवतांच्या प्रकारातील शिवाच्या गणांशी त्यांचे साम्य आढळते. योगिनी केवळ स्वत:चेच रूप बदलू शकत असे नाही. त्या इतरांनाही प्राण्यांच्या रूपात परिवíतत करू शकत. अशा प्रकारच्या सिद्धी प्राप्त असलेल्या योगिनींबद्दल जनमानसात भीतिजन्य कुतूहल निर्माण झाले नसते, तरच नवल म्हटले पाहिजे.

देवीने स्वत:च्या शरीरातून निर्माण केलेल्या योगिनीचे एक योगिनीचक्र तयार झाले, असे उल्लेख पुराणांमध्ये आहेत. काही ग्रामदेवींचे उन्नयन होऊन त्यांनाही या योगिनीचक्रात स्थान मिळाले असावे. गुरुपद प्राप्त झालेल्या काही योगिनींना देवीरूप म्हणूनही मान्यता मिळाली असावी आणि त्यांचा समावेशही  योगिनीचक्रात झाला असावा. सर्वसाधारणपणे योगिनीचक्रातील योगिनींची संख्या चौसष्ट मानली जाते. ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, ऐंद्री, चामुंडा आणि चंडिका या अष्टमातृकांमधील प्रत्येक मातृकेपासून आठ, अशा चौसष्ट योगिनी निर्माण झाल्या अशी परंपरा अकराव्या शतकापर्यंत रूढ झाली होती.  परिणामी मातृकामंडल आणि योगिनीचक्र या संज्ञा मूलत:  भिन्न असल्या, तरी एकमेकींना पर्यायी संज्ञा म्हणून वापरल्या जाऊ लागल्या. दुसऱ्या परंपरेनुसार वर नमूद केलेल्या अष्टमातृकांच्या जोडीला महालक्ष्मी ही नववी मातृका आहे. नवमातृकांपासून एकूण एक्क्याऐंशी मातृका निर्माण झाल्या, असे ही परंपरा सांगते.

चौसष्ट योगिनींच्या नावाची यादी सर्वसाधारणपणे अशी आहे : १. बहुरूपा २. तारा ३. नर्मदा   ४. यमुना ५. शांती ६. वारुणी  ७. क्षेमंकरी ८. ऐंद्री ९. वाराही १०. रणवीरा ११. वानरमुखी १२. वैष्णवी १३. काळरात्री १४. वैद्यरूपा १५. चíचका १६. वेताळी १७. छिन्नमस्ता १८. वृषवाहना १९. ज्वाला कामिनी २०. घटवारा २१. कारकाली २२. सरस्वती २३. विरूपा २४. कावेरी २५. भालुका २६. नारसिंही २७. वीरजा २८. विकटानना २९. महालक्ष्मी  ३०. कौमारी ३१. महामाया ३२. रती ३३. करकरी ३४. सर्पस्या ३५. यक्षिणी ३६. वैनायकी ३७. िवध्यवासिनी ३८. वीरकुमारी ३९. माहेश्वरी ४०. अंबिका ४१. कामायिनी  ४२. घटवारी ४३. स्तुती ४४. काली ४५. उमा ४६. नारायणी ४७. समुद्रा ४८. ब्राह्मिणी ४९. ज्वालामुखी ५०.  आग्नेयी ५१. अदिती ५२. चंद्रकांती ५३. वायुवेगा ५४. चामुंडा ५५. मुरती ५६. गंगा ५७. धूम्रवती ५८. गांधारी ५९. सर्वमंगला ६०. अजिता ६१. सूर्यपुत्री ६२. वायुवीणा  ६३. अघोरा ६४. भद्रकाली

ही नावांची यादी प्रत्येक ग्रंथात समानच असेल असे नाही. अष्टमातृकांपासून चौसष्ट योगिनींच्या निर्मितीसंदर्भातील पौराणिक परंपरेप्रमाणेच अष्टभरवांपासून चौसष्ट भैरव निर्माण झाली अशी परंपरा आहे. लेखाच्या सुरुवातीलाच क्षेत्रपाळ भरव आणि जोगेश्वरी/योगेश्वरी यांच्यातील नात्याचा उल्लेख केला होता. चौसष्ट योगिनींच्या सोबतीने त्यांच्या चौसष्ट जोडीदार भरवांच्या नावांची यादीही मिळते.

चौसष्ट योगिनी मंदिरे

योगिनी ही संकल्पना लोकधर्मातील डाकिणी, जाखिणी या संकल्पनांशी निगडित आहे. डाकिणी, जाखिणी यांची देवतास्वरूपातील ठाणी नेहमीच गावशिवाराच्या सीमेवर असतात. स्मशानाशी त्यांचे जवळचे नाते असते. त्यांनी गाव-वसाहतीच्या आत येऊ नये, अशीच गावकऱ्यांची इच्छा असते. त्या भयकारी, संकटकारी म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांनी लोकांना त्रास देऊ नये म्हणून त्यांना नवेद्य दाखवला जातो. मात्र त्यांच्या पूजेसाठी पौराणिक मंत्रांचा वापर केला जात नाही. जी काही पूजा करायची असते ती स्त्रियाच पार पाडतात. महाराष्ट्रातील लोकदेवतांमध्ये या वर्णनाशी साधम्र्य असणाऱ्या देवता म्हणजे सात आसरा, जाखाई, जोखाई, मरिआई या होत. या देवतांची मंदिरे नसतात; ओटे असतात. त्यांवर छप्पर नसते. लोकधर्मातील अशा प्रकारच्या देवता आणि योगिनींचे सात्मीकरण त्यांच्या साम्यदर्शी गुणधर्मामुळे झाले असावे. या दृष्टीने पाहिले तर एक गोष्ट विशेषत्वाने लक्षात येते, की चौसष्ट योगिनींच्या मंदिरांवरही छप्पर नसते. मध्ययुगामध्ये तंत्रमार्गावर आधारलेल्या शाक्त संप्रदायांना समाजाच्या सत्ताधारी वर्गाकडून पैसा प्राप्त झाल्यामुळे चौसष्ट योगिनींच्या मंदिरांची निर्मिती  झाली, तरी त्यांवर छप्पर बांधले गेले नाही. चौसष्ट योगिनींचे लोकधर्माशी असलेले निकटचे नाते कदाचित यासाठी जबाबदार असेल.

मध्ययुगात बांधलेल्या चौसष्ट योगिनींच्या चार मंदिरांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. त्यांपकी दोन ओडिशात आणि दोन मध्य प्रदेशामध्ये आहेत. ओडिशातील भुवनेश्वरजवळ हिरापूर आणि बालनगीर जिल्हय़ातील राणीपूर-झरियल, तसेच मध्य प्रदेशातील खजुराहो आणि भेडाघाट येथे ही मंदिरे आहेत. ही मंदिरे साधारणपणे नवव्या-दहाव्या शतकात बांधलेली आहेत. या मंदिरांमध्ये असलेल्या चौसष्ट योगिनींच्या मूर्तीमध्ये स्थलपरत्वे काही बदलही आढळतात. उदाहरणार्थ हिरापूर येथील योगिनी मूर्ती या उभ्या असलेल्या आहेत. त्यातील प्रत्येकीबरोबर तिचे वाहन दाखवलेले आहे. परंतु राणीपूर-झरियल येथील सर्व मूर्ती नृत्य करताना दाखवल्या आहेत. भेडाघाट येथील सर्व मूर्ती ललितासनात बसलेल्या आहेत. एक मात्र निश्चित की त्या मूर्तीची लक्षणे शृंगारिकतेकडे झुकणारी नाहीत. ‘द ट्रिब्यून’ या दैनिकाच्या ३० एप्रिल २००० रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात विद्या दहेजिया यांची विमला पाटील यांनी घेतलेली मुलाखत आहे. त्यात त्यांनी योगिनीपूजेमध्ये चौसष्ट आऱ्या असलेले चक्र हे तांत्रिक चिन्ह महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. या चक्रातील प्रत्येक आरी हे एकेका योगिनीचे प्रतीक असे. या मूर्ती शृंगारिक नाहीत, कारण योगिनी संप्रदायात संभोग हे पारमाíथक ज्ञानप्राप्तीचे साधन मानलेले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

योगिनी मंदिरे सहसा मनुष्यवस्तीपासून दूर, डोंगरमाथ्यावर बांधलेली असतात. त्यांची स्थापत्यशैली ही इतर मंदिरांपेक्षा वेगळी असते. वर्तुळाकृती बाह्य़ िभत असलेल्या या मंदिरांना बंदिस्त करणारे छप्पर किंवा कळस नसतात. त्यामुळे  मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र उजेड पोचू शकतो. इतर भारतीय मंदिरांचा अविभाज्य असलेले गर्भगृह, सभागृह हे घटकही दिसत नाहीत. वर्तुळाकार बाह्य़ िभतीच्या बाहेरील बाजूस कोणत्याही प्रकारची सजावटीसाठी कोरलेली शिल्पे दिसत नाहीत. मात्र िभतीची आतील बाजू कोनाडय़ांमध्ये असलेल्या योगिनींच्या सुरेख मूर्तीनी संपूर्णपणे व्यापलेली दिसते. अनेकदा योगिनींचे शिर मांजर, हत्तीण, घोडी, म्हैस, हरिणी यांसारख्या प्राण्यांचे असते. या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव (प्राण्याचे शिर असलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावरील भावसुद्धा) सौम्य असतात. अनेक अलंकारांनी त्या सजलेल्या असतात. वर्तुळाच्या मध्यभागी शिव-भरवाचे मंदिर असते. शिव-भरवाचे मध्यभागी असलेले मंदिर हा योगिनी मंदिरांचा आवश्यक घटक आहे. मात्र इथे शिव-भरवाचे स्थान योगिनींच्या स्थानापेक्षा दुय्यम असते. इथे येणारा साधक-भक्त हा देवीचा भक्त असे, शिवाचा नव्हे.

मध्ययुगात या मंदिरांना लाभलेला राजाश्रय नष्ट झाल्यानंतर या मंदिरांना उतरती कळा लागली. या मंदिरांबद्दल, विशेषत: तेथील पूजाविधींच्या गूढतेमुळे तसेच योगिनींना प्राप्त असलेल्या सिद्धींच्या दंतकथांमुळे त्यांचा संबंध अपरिहार्यपणे जादूटोण्याशी जोडला गेला. त्यामुळे समाजातील सर्वसामान्यांच्या मनात योगिनी मंदिरांबद्दल भीतीची भावनाच अधिक असावी. वर्तमानकाळात हिरापूर येथील मंदिरात पूजेसाठी जाणाऱ्या सर्वसाधारण भाविकांचा हेतू महामायेची पूजा करणे, हा असतो. प्रवेशद्वाराच्या समोर असलेल्या योगिनीमूर्तीला महामायेच्या मूर्तीचे स्थान आहे. त्या एकाच मूर्तीवर रेशमी लाल वस्त्राचे आच्छादन दिसते. तिची पूजा केलेली दिसते. माघ महिन्यात, वर्षांकाठी एकदा महायज्ञ केला जातो. त्याबरोबर कीर्तन प्रवचनाचा कार्यक्रमही असतो. नित्यपूजेमध्ये दाखवला जाणारा नवेद्य शाकाहारी असतो. मात्र दर मंगळवारचा आणि नवरात्रातील नवेद्य मांसाहाराचा असतो.

थोडक्यात सांगायचे तर तांत्रिक शाक्त संप्रदायाचा फारसा मागमूस आता इथे दिसत नाही. असे असले तरी ग्रामस्थांच्या मनामधील देवीरूपी योगिनींच्या सिद्धिसामर्थ्यांबद्दल असलेल्या समजुती पूर्णपणे विस्मरणात गेलेल्या नाहीत.  हिरापूरच्या योगिनी दररोज रात्री अजूनही गावाभोवती संरक्षक वर्तुळ काढतात, असे लोक मानतात. १९९९ साली ओरिसात आलेल्या भयानक चक्रीवादळाची पूर्वसूचना देण्यासाठी त्या रात्रभर घोडय़ावर बसून गावात फिरत होत्या, अशी समजूत आहे. दुलादेई या स्थानिक देवीची वार्षकि मिरवणूक योगिनी मंदिराला भेट देऊन माघारी फिरते. हिरापूरचे हे उदाहरण एकमेव आहे असे म्हणता येणार नाही. भारतात देवीच्या उपासनेला महत्त्व देणारी अनेक स्थाने आहेत. तिथे देवीच्या भक्तीला महत्त्व असलेले दिसते. देवी आणि तिच्याभोवती असलेल्या दुय्यम देवी किंवा देवीच्या सेविकांची भक्तिभावाने पूजा केली जाते. त्या कोपल्या तर भक्तांवर संकटे येतील, असे भयही सर्वाच्या मनात असते. यावरून शाक्तांच्या तंत्रमार्गावर आधारलेले गूढ विधी नेहमीच्या व्यवहारातून वगळले गेले, तरी ते पूर्णत: पुसले गेले नाहीत. त्यांच्या पूजाविधींमध्ये पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण शरणागती ही दोन तत्त्वे अत्यंत महत्त्वाची होती. भक्तीवर आधारलेल्या आजच्या पूजाविधींचे मूळ तंत्रमार्गातील या तत्त्वांवर आणि देवीस्वरूप पावलेल्या योगिनींच्या मंत्रसामर्थ्यांबद्दल असलेल्या भयामध्ये असावे, असे म्हणता येईल.
डॉ. शुभांगना अत्रे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:30 am

Web Title: devi poojan
Next Stories
1 शक्ती- शाक्त संप्रदायातील!
2 माझी माय सरसोती
3 महाभारत आणि पुराणांतील रेणुका
Just Now!
X