– सुनिता कुलकर्णी

नुकत्याच साजऱ्या झालेल्या फादर्स डे ला वेगवेगळ्या मुलांनी केलेलं आपल्या बापाचं कोडकौतुक पहायला वाचायला मिळालं. पण दिएगो हा एक असा बाप आहे की त्याने त्याचं कर्तव्य चोख बजावलं आहे पण त्याच्या मुलांना काही त्याचं कोडकौतुक नाही. पण ते आहे बाकीच्यांना, म्हणजे माणसांना. ८०० मुलांना जन्माला घातल्यानंतर आता हे काम थांबवून दिएगो महाशय निवृत्तीसाठी इक्वाडोरमधल्या इस्पानोला या बेटावर रवाना झाले आहेत. त्यांचा जन्मही याच बेटावर झाला होता आणि आता ते उरलेलं शंभर वर्षांचं रिटायर्ड लाईफही याच बेटावर घालवणार आहेत.

होय, बरोबर आहे, दिएगोला ८०० च्या आसपास मुलं आहेत आणि ही मुलं जन्माला घालायला तो कारणीभूत झाला हेच त्यांचं कर्तुत्व आहे. असं जगायला मिळायला दिएगो काही माणूस नाही, तो आहे कासव. चेलेनॉइस हुडेन्सिस ही त्याची प्रजाती. ही प्रजाती फक्त इक्वाडोरमध्येच आढळते. पण १०० वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे ती नष्ट व्हायच्या मार्गावर होती. असं मानलं जातं की १९२८ च्या सुमारात दिएगो आणि आणखी दोन नरांना अवैध मार्गाने अमेरिकेत नेण्यात आलं होतं. पण ही चोरटी वाहतूक पकडली गेली आणि दिएगो योग्य यंत्रणेच्या हातात गेला. पण त्याची प्रजाती कोणती हे समजत नव्हतं. डीएनए टेस्टमधून त्याचं मूळ कळायला १९६५ हे वर्ष उजाडावं लागलं. तो इक्वाडोरमधल्या बेटांवरचा वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रचंड आकाराच्या कासवांपैकी होता. तिथे तर या प्रजातीच्या फक्त १२ मादी शिल्लक होत्या. मग इक्वाडोरमधल्या गालापागोस कन्झर्व्हन्सीने या प्रजातीच्या कासवांचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत १९७६ मध्ये दिएगोला आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना मादींसह सांताक्रूझ येथील बेटावर ठेवण्यात आलं. आता या प्रजातीची जगात २००० कासवं आहेत आणि त्यातल्या ४० टक्के कासवांचं पितृत्व एकट्या दिएगोकडे आहे. दिएगोबरोबर असलेल्या इ फाईव्ह नावाच्या कासवाने तर दिएगोहून २० टक्के जास्त पिल्लं दिली, पण त्याच्या तुलनेत दिएगोला जास्त प्रसिद्धी मिळाली. कारण इ फाईव्ह तुलनेत बुजरा तर दिएगो जास्त खेळकर होता. दिएगोचं वजन ८० किलो आहे. तो ९० सेटीमीटर लांब आहे. त्याने स्वत:चं शरीर ताणलं तर त्याची उंची पाच फूट भरते.

तिसऱ्या इ थ्री ने एकही पिल्लू दिलं नाही.
दिएगो आणि इ फाईव्हच्या कर्तृत्वामुळे आता अमेरिकेत सांताक्रूझ इथं चार्ल्स डार्विन रीसर्च स्टेशनमध्ये एकाची तीन कासव केंद्रं झाली आहेत. दिएगोकडे अजूनही प्रजननाची क्षमता आहे. पण आता त्याला अमेरिकेतून निवृत्ती देण्यात आली आहे. आता त्याला आणि आणखी १५ कासवांना इक्वाडोर इथं इस्पानोला या त्यांच्या मूळ बेटावर नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात येईल. अर्थात हे बेट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींचं आगर असल्यामुळे दिएगोला काही काळ क्वारंटाइन केलं जाईल आणि मग या बेटावर सोडलं जाईल. यामुळे सांताक्रूझ इथल्या गालापोससारख्या आधुनिक बेटावरच्या वनस्पतींची बिजं दिएगोच्या माध्यमातून इस्पानोलावर जाऊ नयेत याची खबरदारी घेतली जाईल.