रिओमध्ये दीपा कर्माकरला पदक मिळवता आले नसले, तरी तिची कामगिरी सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा अशीच आहे. अर्थात दीपाच नव्हे,  तर तिच्या राज्यात, त्रिपुरामध्ये अशा अनेक दीपा जिम्नॅस्टिकमध्ये देशाचं भवितव्य घडवण्यासाठी कसून तयारी करत आहेत. मुख्य म्हणजे ही सगळी दास्तान आत्ता सुरू झालेली नाही. साठच्या दशकापासून सुरू झालेल्या या जिम्नॅस्टिक वेडामागे एका लष्करी अधिकाऱ्याची दूरदृष्टी आहे.

पश्चिम त्रिपुराच्या खुमुलवंग या जिल्ह्य़ात १५ ऑगस्ट या दिवशी पाच ते अकरा या वयातले छोटे छोटे जिमनॅस्ट आपली नेहमीची प्रॅक्टिस करायला गेलेच नाहीत. त्याऐवजी ते त्यांचा कोच, त्यांचा मेंटर असलेल्या मोंटू देबनाहच्या लॅपटॉपवर नजर लावून बसले होते. कारण त्यांची दीपादीदी त्या दिवशी रिओमध्ये प्रोडय़ूनोव्हा हा कलात्मक जिम्नॅस्टिकमधला अवघड प्रकार सादर करणार होती. पण ते तेवढंच. त्यांच्या दीपादीदीचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर पुन्हा त्यांनी शिस्तीत रांग लावली आणि आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यांच्यातली सहा वर्षांची एक चिमुरडी प्रॅक्टिस करताना बीमवरून पडली. पण ती झटक्यात उठली आणि तिने हातपाय झटकले आणि पुन्हा पोझिशन घेतली.

आगरताळाहून ५० किलोमीटरवर खुमुलवंगच्या जंगलात असलेल्या या मोठय़ा, हवेशीर हॉलमध्ये असलेल्या केंद्रासारखी इतरही काही जिम्नॅस्टिक शिकवणारी केंद्रं त्रिपुरात आहेत. त्यांनी त्रिपुराला पुन्हा एकदा नवी ओळख द्यायला सुरुवात केली आहे.

खुमुलवंगमधला छोटी मुलं प्रात्यक्षिकं करताहेत हा मूळचा ज्युदोचा हॉल. २०१३ मध्ये त्रिपुरातील जिम्नॅस्टिकचे नवे जनक मानल्या जाणाऱ्या मोंटू देबनाह यांनी ताब्यात घेतला आणि तिथं जिम्नॅस्टिकचं प्रशिक्षण सुरू केलं. तिथं जिम्नॅस्टिकचे तीन वेगवेगळ्या अवघड प्रकारांचे बॅलन्स बीम्स आले. रोप िरंग्ज आल्या. दिल्लीहून विशिष्ट प्रकारचे व्हॉल्ट बोर्ड आणले गेले.

एका स्कूटरचे पार्ट्स एकत्र करून तयार केल्या गेलेल्या व्हॉल्ट बोर्डवर दीपा कर्माकरला कसं ट्रेनिंग दिलं गेलं त्याची आता मोठीच कहाणी झाली आहे. पण त्रिपुरामधल्या इतर जिम्नॅस्टसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी काही ती नवीन गोष्ट नाही. कारण त्यांना सगळ्यांनाच सतत सगळ्या प्रकारच्या अभावाला तोंड द्यावं लागलं आहे. अपुरी साधनं, अपुरा निधी, अश्मिता पालसारख्या १५ वर्षीय जिम्नॅस्टसाठी घरातली गरिबी हे सगळं त्यांच्यासाठी रोजचचं आहे.

दीपा कर्माकरनंतर आता अश्मिता पाल ही त्रिपुरामधली सगळ्यात गुणी जिम्नॅस्ट आहे. जुलैमध्ये टर्की इथं झालेल्या वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशीपमध्ये तिने भारताची कामगिरी उंचावली आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्येही तिची कामगिरी अत्यंत चमकदार आहे. टर्कीमध्ये तिने भलेही पदकं जिंकली नसतील पण तिथली तिची कामगिरी तांत्रिकदृष्टय़ा अत्यंत उत्कृष्ट होती असं तिचे कोच सांगतात. ती आता आगरताळा येथील विवेकानंद ब्यामगर या जिम्नॅस्टिक केंद्रामध्ये प्रशिक्षण घेते आहे. १९४७ मध्ये सुरू झालेलं हे केंद्र दीपा कर्माकरच्या घरापासून अगदी जवळ आहे.

हे जिम्नॅशियम एका खासगी क्लबने सुरू केलं आहे. दीपा कर्माकरने स्कूटरच्या पार्ट्सपासून बनवलेल्या ज्या व्हॉल्ट बोर्डवर प्रॅक्टिस केली तो व्हॉल्ट बोर्ड इथली तरुण मुलं मोठय़ा उत्साहाने दाखवतात. इथेच अश्मिता शाळा सुटली की रोज येऊन प्रॅक्टिस करते. दीपाच्या पहिल्यावहिल्या कोच सोमा नंदी आणि दीपाचे आताचे कोच तसंच सोमाचे पती बिश्वेश्वर नंदी हेच तिचेही कोच आहेत.

अश्मिताचे वडील अरुण पाल रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत आणि तिची आई शिल्पी इतरांच्या घरात घरकाम करते. तिचे आई-वडील दोघंही सांगतात, ‘आमच्या कमाईतल्या प्रत्येक पै आणि पैमधून आमच्या मुलीला उत्तम आहार मिळावा अशी आमची इच्छा असते. तसे पैसे पुरतच नाहीत, पण अंडी, हॉर्लिक्स हे सगळं तिला पुरेसं मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. खरं तर हे आमच्यासारख्या लोकांसाठी चैनीचं वाटावं असंच आहे, पण आम्ही तसा विचार करत नाही. हे सगळं आज मिळाल्यामुळे उद्या आमच्या मुलीचं भविष्य घडणार असेल तर आम्ही तो खर्च करू. आम्ही आमच्या मुलीला तिच्या अभ्यासात मदत करू शकत नाही. जिम्नॅस्टिकबद्दल तर आम्हाला फारसं काहीही माहीतही नाही. पण आमचा तिच्या कोचवर विश्वास आहे. दीपासुद्धा अश्मिताला शक्य असेल तेवढी मदत करत असते. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीला सांगितलं आहे, बाकी काहीही होवो, तू जिम्नॅस्टिकडे दुर्लक्ष करू नकोस.

33-lp-olympics-deepa-karmakar

‘जिम्नॅस्टिकडे दुर्लक्ष करायचं नाही’ हे वाक्य इथल्या घराघरात ऐकायला मिळतं. अर्थात ते दीपा कर्माकरच्या यशामुळे घडलेलं नाही. तर त्याआधीपासून, साठच्या दशकापासून आहे. इथल्या जवळपास प्रत्येक शाळेत जिम्नॅस्टिक सेंटर आहे. इथल्या पालकांच्या दृष्टीने गरिबीतून, असुरक्षिततेतून बाहेर पडण्याचा आणि चांगलं जीवन जगण्याचा तो एक मार्ग आहे.

‘यामागे अनेक कारणं आहेत.’ भारत किशोर देब बर्मन सांगतात. ते त्रिपुराचे पहिले जिम्नॅस्टिक स्टार आणि साठीच्या दशकातले जिम्नॅस्टिक चॅम्पियन. ते म्हणतात, ‘‘जिम्नॅस्टिक हा काही खेळातला सोपा प्रकार नाही. सुरुवातीची काही वर्षे तर अतिशय वेदनादायी असतात. पण त्याकडे त्या खेळाडूंनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी गुंतवणूक म्हणून बघावं लागतं. विवेकानंद ब्यामगरसारखी केंद्रं्र गरीब मुलांना विनामूल्य शिकवतात. काही केंद्रांमध्ये तर मुलांना संध्याकाळचं जेवणही मिळतं. आज हा खेळ खेळला तर त्यातून उद्या मुलांना पैसा मिळेल असा यामागे पालकांचा हेतू असतो.’’

अर्थात आगरताळा आणि जिम्नॅस्टिक्स हे नातं काही दीपापासून सुरू झालेलं नाही. ते त्रिपुरामध्येही सुरू झालेलं नाही. ही सगळी सुरुवात झाली ती पतियाळामध्ये. स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (साई)  नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स या संस्थेमध्ये १९६३ या वर्षी दलीप सिंह या लष्करी क्रीडा अधिकाऱ्याने एन. टी. तकैश्विली या रशियन जिम्नॅस्ट कोचकडून जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेतलं. पुढे सरकारने दलीप सिंह यांना आगरताळा इथं जिम्नॅस्टिक करू शकणारी मुलं आहेत का हे पहायला पाठवलं तेव्हा त्यांना हे प्रशिक्षण उपयोगी पडलं. बर्मन सांगतात, त्या काळात रशियातले जिम्नॅस्ट हे जगात सवरेत्कृष्ट होते. रशियन प्रशिक्षकाकडून दलीप सिंह शिकले होते की मुलांमध्ये टॅलंट असतं. ते ओळखता आलं पाहिजे आणि त्याला पैलू पाडले पाहिजेत. हीच रशियन पद्धत होती आणि ती दलीप सिंह यांनी त्रिपुरात आणली.

35-lp-olympics-deepa-karmakar

दलीप सिंह यांच्या आधी आणखी एका साई प्रशिक्षकांना त्रिपुरामध्ये पाठवण्यात आलं होतं. त्रिपुरा हे तसं दुर्गम राज्य. त्यामुळे त्यांनी काहीही न पाहता, कसलीही तसदी न घेता अहवाल देऊन टाकला होता की त्रिपुरामध्ये जिम्नॅस्टिक विकसित होऊच शकत नाही. मग त्रिपुराच्या तत्कालीन आणि पहिल्या मुख्यमंत्र्यांनी सचिंद्र लाल सिंग यांनी केंद सरकारला दुसरा कोच पाठवण्याची विनंती केली आणि मग दलीप सिंह आगरताळ्याला आले. पुढची दोन दशकं त्यांनी या खेळाची ओळख करून देण्यात, साधनसामग्री उभी करण्यात घालवली. त्यांनी तिथल्या जवळपास प्रत्येक घराचं दार ठोठावून मुलांना विवेकानंद केंद्रात जिम्नॅस्टिक शिकवायला पाठवण्याची विनंती पालकांना केली. जिम्नॅस्टिक शिकलं तर मुलांचं आरोग्य चांगलं होईल, त्यांना सरकारी नोकरी मिळेल, असं ते पालकांना पटवून द्यायचे.

३१ वर्षीय दलीप सिंग हरियाणाचे होते. ते इथल्या मणिपुरी मुलीच्या प्रेमात पडले. तिच्याशी लग्न केलं. पण ते तेवढेच त्रिपुराच्याही प्रेमात पडलेले होते. निवृत्तीनंतरच आपल्या मूळ गावी परत जायचं, तोपर्यंत नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्या काळात जिम्नॅस्टिक, विद्यार्थी, कोच हेच त्यांचं सर्वस्व झालेलं होतं.

पुढच्या दहा वर्षांमध्ये त्रिपुरामधल्या २४ जिम्नॅस्ट्सनी राष्ट्रीय पातळीवरची ६० पदकं मिळवली. ८०च्या दशकात सर्व राष्ट्रीय पदकांवर त्रिपुराचंच वर्चस्व होतं. जिम्नॅस्टिकमध्ये सात अर्जुन अ‍ॅवॉर्ड मिळवणाऱ्यांपैकी तीन त्रिपुरामधले आहेत आणि त्यातले दोन तर सिंग यांच्या केंद्रामधले आहेत. या केंद्राची तिसरी अर्जुन अ‍ॅवॉर्ड विजेती दीपा कर्माकर आपल्या यशाचं श्रेय तिचे कोच बिशेश्वर नंदी यांना देते. बिशेश्वर 34-lp-olympics-deepa-karmakarनंदी दलीप सिंह यांचाच वारसा सांगतात. या रीतीने त्रिपुरामधल्या जिम्नॅस्टिकमधल्या यशाचा प्रत्येक धागा दलीप सिंह यांच्यापाशीच येऊन पोहोचतो.

‘दलीप सिंह यांचं वैशिष्टय़ म्हणजे ते अत्यंत नि:स्वार्थी होते. आगरताळ्याला येणं, इथंच कायम रहायचा निर्णय घेणं, आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी सगळं आयुष्य घालणं, त्यासाठी सतत कार्यरत राहणं याला तुम्ही काय म्हणणार? हे निव्वळ जिम्नॅस्टिकच्या प्रेमापोटी त्यांनी केलं. त्यामुळे त्यातून त्यांनी आमच्यासाठी पाया घातला’ मोंटू देबनाथ सांगतात. ते दलीप सिंह यांचे विद्यार्थी. त्यांनी १९७५ मध्ये या खेळातलं दुसरं अर्जुन अ‍ॅवॉर्ड मिळवलं आहे.

इथं हा खेळ रुजवण्यासाठी दलीप सिंह यांनी कशी अपार मेहनत घेतली याचे अनेक किस्से त्यांचे हे विद्यार्थी मनापासून सांगतात. अर्थात या विद्यार्थ्यांसाठीही त्या काळात जिम्नॅस्टिक शिकणं, स्पर्धामध्ये भाग घेणं, पदकं मिळवणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण तो सगळा काळ उगाळत बसण्याऐवजी बर्मन सांगतात, ‘‘मी दीपाचा खेळ पहिल्यापासून पाहतो आहे. ती खरोखरच वेगळी आहे. जिम्नॅस्टिक आम्हीही केलं आहे. पण ती म्हणजे बावनकशी सोनं आहे. इतकं टॅलंट मी कुणातच पाहिलेलं नाही.’’

मोंटू देबनाथ यांचं म्हणणं खरंच आहे. आता दीपा आगरताळ्याला येते तेव्हा तिच्याभोवती गर्दी जमते. ती इथली सेलिब्रिटी आहे. पण बर्मनही त्यांच्या काळात सेलिब्रिटी होते. त्यांचं चरित्र शालेय पुस्तकांमध्ये समाविष्ट केलं गेलं होतं. हीच संधी आहे हे खऱ्या अर्थाने ओळखलं ते दलीप सिंह यांनी. त्यांनी मुलांना प्रेरित करण्यासाठी बर्मन यांना आगरताळ्यातील शाळाशाळांमध्ये नेलं आणि त्यांचा हा फॉम्र्यूला भलताच यशस्वी ठरला. मग त्यांनी सरकारला पटवून दिलं आणि आगरताळ्यात नेताजी सुभाष रीजनल कोचिंग सेंटर (एनएसआरसीसी) इथं जिम्नॅस्टिकला जागा मिळवून दिली. इथे शिकलेल्या मुलांनी मग भरभरून पदकं  मिळवली. मग राज्यात आणखी केंद्रं उभारली गेली. शाळांमधून तीन आठवडय़ांची शिबिरं घेतली गेली आणि तिथं नजरेत भरलेल्या मुलांना एनएसआरसीसीला पाठवलं गेलं.

बर्मन सांगतात, दलीप सिंह यांनी जिम्नॅस्टि रुजवण्याची प्रत्येक शक्यता पडताून पाहिली. अगदी कुठेही त्यांचे विद्यार्थी लोकांपुढे हा खेळ सादर करायचे. त्यातून या खेळाबद्दलची जागरूकता वाढत गेली. १९६८ मध्ये त्यांनी ‘साई’ला तसंच त्रिपुरा सरकारला पटवून दिलं आणि रशियन जिम्नॅस्ट्सच्या टीमला बोलावलं. त्या टीममधल्या दोघांनी ऑलिम्पिक पदकं मिळवली होती. त्यानंतर ७० मध्ये जर्मन जिम्नॅस्ट्स 36-lp-olympics-deepa-karmakarयेऊन गेले तर ८४ मध्ये चिनी जिम्नॅस्ट्स. त्यांनी सादर केलेल्या जिम्नॅस्टिकने सगळ्या आगरताळ्यावर कशी जादू केली होती ते आजही लोक सांगतात.

या सगळ्याच्या परिणामी जिमनॅस्ट्क्सि हा त्रिपुरामधला सगळ्यात लोकप्रिय खेळ ठरला. लोक आपल्या मुलांना घेऊन जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रांच्या पायऱ्या चढायला लागले. अशा वेळी दलीप सिंह यांनी एक अलिखित नियम केला. तो म्हणजे कुणालाही विन्मुख पाठवायचं नाही. हा खेळ सोपा नाही, पण म्हणून यातली गळती नैसर्गिक असायला हवी असं त्यांचं म्हणणं होतं. इथं जिम्नॅस्टिक शिकायला आले आणि नंतर ते सोडून वेट लिफ्टिंगमध्ये गेले आणि आता ‘साई’चे प्रशिक्षक आहेत असं उदाहरण म्हणजे दीपा कर्माकरचे वडील, दुलाल कर्माकर.

८० च्या दशकापर्यंत त्रिपुराने डझनभर राष्ट्रीय विजेते दिले. बर्मन आणि देबनाथ यांनी तर जिम्नॅस्ट्सची एक पिढीच घडवली. दीपाचे कोच बिश्वेश्वर नंदी यांनी पाच राष्ट्रीय चॅम्पियनशीप मिळवल्या आहेत. कल्पना देबनाथ यांनी अर्जुन अ‍ॅवॉर्ड मिळवलंय. १९७८ च्या सुरत नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये तर त्यांनी सगळी सुवर्णपदकं मिळवली होती. दलीप सिंह १९८७ मध्ये गेले आणि जिमनॅस्टि आणि राजनैतिकता (डिप्लोमसी) यांची सांगड घालायचं त्यांचं कौशल्यही त्यांच्याबरोबरच गेलं. त्यानंतर जिम्नॅस्टिमध्ये पदकं मिळत राहिली, पण ती शालेय पातळीवरची. बनश्री देबनाथचा १९९७ च्या कर्नाटक नॅशनल गेम्समधल्या सुवर्णपदकाचा अपवाद वगळता कुणीही फारशी चमकदार कामगिरी केली नाही. नव्वदीनंतर हे सगळं वातावरण आणखी थंडावलं. एक तर दलीप सिंह यांचे बरेच विद्यार्थी नोकऱ्यांमुळे त्रिपुराबाहेर गेले. १९७७ मध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी त्रिपुरामधल्या जवळजवळ ३५ जिम्नॅस्टना भरती करून घेतलं. त्यामुळे कोचची मोठी पोकळी निर्माण झाली. त्याचबरोबर नव्वदीच्या दशकात बेरोजगारी वाढली. खेळाडूंना नोकऱ्या मिळतील याची लोकांना शाश्वती वाटेना आणि ते खासगी नोकऱ्यांमध्ये शिरले आणि त्यामुळे खेळ ही दुय्यम गोष्ट झाली. पण आता दीपा कर्माकरमुळे त्रिपुरामधल्या जिम्नॅस्ट्क्सिने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.
अनिरुद्ध घोषाल
(द संडे एक्स्प्रेसमधून)

(अनुवाद- वैशाली चिटणीस) – response.lokprabha@expressindia.com

पदक हुकले, पण देशाचे मन जिंकले…

दोन आठवडय़ांपूर्वी सुरू झालेल्या ऑलिम्पिककडे सगळ्या भारतीयांचे लक्ष लागले होते. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंकडून पदक मिळवण्याच्या अपेक्षा होत्या. संपूर्ण देश त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव करीत होता. या खेळाडूंचे मनोबळ वाढवण्यासाठी सोशल साइट्सच्या माध्यमातून अनेक क्रीडाप्रेमी शुभेच्छा देत होते. देशात असे उत्साहाचे वातावरण असतानाच सेलेब्रिटी लेखिका शोभा डे यांनी आपल्या विधानाने एक वादळ निर्माण केले. ऑलिम्पिक सुरू होऊन चार दिवस होत नाहीत तोच शोभा यांनी ट्विटरवर ‘टीम इंडियाचे रिओ ऑलिम्पिकमधील लक्ष्य : रिओला जा. सेल्फी काढा. रिकाम्या हाताने परत या. पैसे आणि संधी याचा हा अपव्यय आहे’ या अर्थाचे एक ट्वीट केले. भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्यावर टीका करून त्यांचा आत्मविश्वास कमी करण्याचे वक्तव्य केल्यामुळे अनेक क्रीडाप्रेमी तसेच राजकारण, सेलेब्रिटींनी त्यांना खडे बोल सुनावले. दिवसभराच्या या ट्वीट, रीट्वीट आणि विरोध दर्शवणाऱ्या पोस्टच्या प्रकरणानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी सारवासारवही केली. ‘भारतीय खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीला भारतीय सरकार जबाबदार आहे,’ असे म्हणत त्यांनी त्यांच्या वक्तव्याची सारवासारव केली. असे सगळे असताना काही भारतीय खेळाडू मात्र त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रित करत होते. त्यापैकीच एक दीपा कर्माकर.

मूळची त्रिपुराची असलेली दीपा कर्माकर जिमनॅस्टिक्समधील एकेक टप्पा गाठत थेट ऑलिम्पिकपर्यंत पोहोचली. शोभा डेच्या वादग्रस्त विधानानंतर अवघ्या चार दिवसांमध्येच तिची अंतिम फेरीसाठी निवड झाल्याची बातमी आली. शोभा यांच्या वक्तव्याला मिळालेले हे सडतोड उत्तर होते. अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद साजरा करत भारतीयांनी दीपाला शुभेच्छाही दिल्या. अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे भारतीयांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या होत्या; पण दीपा कामगिरी कशी करेल, जिंकेल की हरेल, या विचारापेक्षा ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो’ या अर्थाच्या पोस्ट भारतीयांमधून फिरू लागल्या. अंतिम फेरीसाठी देशभरातून दीपावर शुभेच्छांचा वर्षांव होत होता.

शोभा डे यांच्या वक्तव्याचा निषेध करत खेळाडू, क्रीडाप्रेमी, राजकारणी, कलाकार अशा विविध स्तरांतून त्यांना विरोध झाला. नेमबाज अभिनव बिंद्राने ‘आपल्या अ‍ॅथलीटबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला हवा’ असे सुनावले, तर ‘तुमच्यासारख्यांची मानसिकता बदलल्यासच ऑलिम्पिकमधील चित्रही बदलेल,’ असे बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने सांगून त्यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवला. माजी हॉकीपटू विरेन रिस्क्वेन्हा यांनी तर अतिशय कडक शब्दांत सुनावले. ते म्हणाले, ‘सलग ६० मिनिटे हॉकी मैदानावर धावून बघा किंवा अभिनव, गगनप्रमाणे रायफल उचलून बघा. तुम्ही विचार करता त्यापेक्षा ते अधिक आव्हानात्मक आहे.’ ‘अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्न करणे हेच महत्त्वाचे’ अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी भारतीय खेळाडूंनाच प्रोत्साहन दिले. यापूर्वीही शोभा डे यांनी वडापाव, मराठी सिनेमांच्या प्राइम टाइम देण्यावरून वादग्रस्त विधाने केली होती. याशिवाय ‘१२-१५ तास मेहनत करा’, ‘विविध अडचणींना सामोरे जा’, ‘आर्थिक समस्यांना तोंड द्या’, ‘सकाळी सात वाजता उठा’, ‘मिळेल त्या अन्नात पोट भरा’, ‘विविध अडचणींवर मात केल्यानंतर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचून दाखवा’ असे अनेक सल्ले शोभा यांना अनेकांनी दिले. तसंच ‘डे बाय डे शोभा करून घेणे’, ‘स्वत:ची शोभा झाली’ अशा अर्थाचे अनेक ट्वीट्स, पोस्ट समाजमाध्यमातून फिरत होते.

अंतिम फेरीत जिंकल्यानंतर कांस्यपदकाची मानकरी दीपा ठरली असती, पण आपण भारताचे प्रतिनिधित्व करीत आहोत याची तिला जाण होती. म्हणूनच तिने अंतिम फेरीत पदक मिळू शकले नसल्याची खंत व्यक्त करीत तिने भारतीयांची माफी मागितली. एकीकडे शोभा डे यांनी भारतीय खेळाडू आणि भारतीय नागरिकांना दुखावणारे, संताप आणणारे वक्तव्य केले, तर दुसरीकडे दीपा कर्माकरने तिच्या कौशल्याने अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे भारतीयांच्या तिच्याकडून अपेक्षाही वाढल्या होत्या. पण देशवासीयांनो, मला माफ करा, मला पदक जिंकता आले नाही. मात्र मी पूर्ण प्रयत्न केले होते. जमल्यास मला माफ करा, असे दीपाने म्हटले आहे. मी दु:खी आहे. मात्र मी जेवढे शिकले तेवढे स्पर्धेच्या वेळी प्रत्यक्षात करू शकले, याचा मला आनंद आहे. शेवटी हा खेळ आहे आणि जय-पराजय त्याचा एक भाग आहे. आता माझे लक्ष्य २०२० चे ऑलिम्पिक असेल, असेही दीपाने सांगितले. माध्यम एकच, पण व्यक्त होण्याचे दोन प्रकार यानिमित्ताने बघायला मिळाले. एकीकडे भारतीय खेळाडूंची कामगिरी न बघताच शोभा डे यांच्या वक्तव्याने भारतीयांचा संताप ओढावून घेतला. दुसरीकडे अंतिम फेरीत पोहोचून चौथ्या क्रमांकाचे स्थान पटकवूनही कांस्यपदक न मिळाल्याची खंत व्यक्त करणाऱ्या दीपाच्या वक्तव्याने भारतीयांचे मन जिंकून घेतले.

यंदाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक व्हॉल्ट प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपा कर्माकरचे रविवारी झालेल्या अंतिम फेरीत कांस्यपदक थोडक्यात हुकले. दीपाला अंतिम फेरीत दोन प्रयत्नांत सरासरी १५.२६६ गुणांसह क्रमवारीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पण दीपाच्या या कामगिरीचे कौतुक देशभर होत आहे. दीपाने पात्रता फेरीपेक्षा अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम फेरीतील तिचे पदक हुकले असले तरी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स प्रकारात दीपा भारताची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
– चैताली जोशी