04 March 2021

News Flash

उत्सव : दिन दिन दिवाळी…

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे.. दुकाने नवीन कपडय़ांनी सजू लागतात, सेल सुरू होतात. वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाडय़ांच्या मोठमोठय़ा जाहिराती प्रसिद्ध होऊ  लागतात अन् चाहूल लागते ती दिवाळीची. आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत –

‘दिन दिन दिवाळी,

गाई म्हशी ओवाळी

गाई-म्हशी कुनाच्या,

लक्षुमनाच्या.

लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा

दे माई खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी.!’

मराठी पिढय़ान् पिढय़ा या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात. आणि अजूनही मराठी कुटुंबातील लहान बाळाच्या हातात फुलबाजा देऊन त्याची दिवाळी याच गाण्याने साजरी केली जाते.

तसा शहरी जीवनात आपल्याशी गाई-म्हशींचा संबंध कधी येत नसूनही शहरातली मराठी दिवाळी सुरू होते, ती याच गाण्याने, असं का? आणि मुळात गाई-म्हशी आणि दिवाळीचा काय संबंध?

आपण दिवाळी का साजरी करतो याचं गुपित या लोकगीतात दडलंय.!

तर, शहरात अत्यंत थाटामाटात व झगमगाटात आपण साजरी करत असलेल्या श्रीमंत दिवाळीची मुळं आपल्या ग्रामीण संस्कृतीत, गावाकडच्या मातीत रुजलेली आहेत.  आपल्यासाठी दिवाळी म्हणजे नवीन कपडे, फटाके, फराळ, कंदील आणि चार-सहा दिवसांचा आनंद एवढाच तपशील असतो, तर गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षांतही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो. आपल्या इतर सर्व सणांप्रमाणेच दिवाळी हे आपल्या प्राचीन व समृद्ध ‘कृषिसंस्कृती’चं आपल्याला देणं आहे.

पावसाळा संपून दसऱ्याला नवीन पिकांची कापणी झालेली असते.. नवीन पिकांच्या राशी खळ्यात सांडलेल्या असतात.. अशाच वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यात, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, दिवाळी हा सण येतो. घरात नव्याने आलेल्या धान्यरूपी दौलतीची व ती ज्यांच्यामुळे प्राप्त झाली त्या गोधनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘दिवाळी’ सण साजरा करण्याची सुरुवात आपल्या ‘कृषिसंस्कृती’त प्राचीन काळी झाली. भूमातेने भरभरून दिलेल्या पिकातून स्वत:च्या वापरापुरतं धान्य घरात ठेवून जास्तीचं धान्य विकलं जायचं व त्यातून आलेल्या पैशातून घरबांधणी, घरदुरुस्ती, घराची रंगरंगोटी, घरच्या लक्षुमीला एखादा सोन्याचा डाग व घरातील सर्वासाठी नवीन कपडे केले जायचे, घरात गोडधोड केलं जायचं, एखादी नवीन बैलजोडी खरेदी केली जायची. ही प्रथा आपण शहरातही अद्याप जिवंत ठेवलीय. शहरात दिवाळीच्या निमित्ताने आपण फराळाचे पदार्थ करतो, घराला रंग काढतो, एखादी महागडी वस्तू किंवा दागिने घेतो, शहरात बैलजोडीऐवजी गाडी घेतली जाते.. या प्रथेचं मूळ आपल्या प्राचीन कृषिसंस्कृतीत सापडतं.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दिव्यांचे महत्त्व जगातील सर्वच मानवी संस्कृतीत आढळतं. अग्नीच्या शोधानंतर पशूच्या पातळीवर जगणारा आदिम मानव खऱ्या अर्थाने ‘मानव’ म्हणून उत्क्रांत झाला असे म्हटले तर चुकणार नाही. अग्नी हे मनुष्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत माणसाच्या जीवनातील बाळाच्या जन्मापासून ते चितेवर दहन होईपर्यंतचे सुख-दु:खाचे सर्वच प्रसंग अग्नीच्या साक्षीनेच साजरे होतात. दिवाळी हा कृषिसंस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा सण आणि या महत्त्वाच्या सणादिवशी दिव्यांचा लखलखाट होणं अगदी स्वाभाविक आहे. दिवाळीत दिव्यांचं महत्त्व आहे ते त्या अर्थानेच. अग्नीने मनुष्याच्या दैनंदिन व सांस्कृतिक जीवनात एवढं महत्त्वाचं स्थान का प्राप्त केलं, यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहिण्याचा मानस आहे.

ग्रामीण संस्कृतीतूनच शहरी संस्कृती उदयाला आल्यामुळं गावाकडची दिवाळी शहरातही आली. मात्र शहरीकरणाच्या वेगात दिवाळीचं रूपडं साफ पालटून तो एक शहरी इव्हेन्ट झाला. असं असलं तरी शहरातल्या दिवाळीची सुरुवात आज हजारो वर्षांनंतरही ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी..’ याच  गाण्यानं होते. गावातून आलेल्या चाकरमान्यांनीच शहर वसवलं असल्याने त्यांच्याबरोबरच गावातलं गाणं शहरी जीवनात आलं, काळाच्या ओघात त्याचा अर्थ मागे पडला मात्र ते शहरातही पक्कं रुजलं.

शहरातल्या घाईगर्दीत आपण अनेक गोष्टींसाठी शॉर्टकट्स शोधत असताना मूळ उद्देश अपरिहार्यपणे बाजूला पडत असतो, तसंच दिवाळीचंही झालं. हा सण किंवा कोणताही सण आपण का साजरा करतो हेच आपण काळाच्या ओघात विसरून गेलो; परंतु आपल्या मूळ संस्कृतीची मुळे इतकी घट्ट असतात, की ती त्यांची ओळख, त्यांचं आपल्याशी असलेलं सख्खं नातं कोणत्या न कोणत्या रूपाने टिकवून ठेवत असतात. आपलं ग्रामीण संस्कृतीशी असलेलं तेच नातं ‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ या गाण्यातून चिवटपणे टिकून राहिलेलं दिसतं. अर्थात प्रांताप्रांतानुसार हा सण साजरा करण्यात वेगळेपणा जरूर असतो मात्र मूळ सण शेतीचाच हे सत्य त्यात असतंच.

दिवाळसणाची सुरुवात ‘वसुबारस’पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. एकूण सहा दिवसांचा हा सोहळा. आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील आत्यंतिक महत्त्वाचा सण.

वसुबारस

‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ धन असा होतो, वसुधा म्हणजे पृथ्वी म्हणजे जमीन म्हणजे एका अर्थाने दौलतच. या जमिनीतून धान्यरूपी धन प्राप्त होतं आणि ‘बारस’ हा शब्द द्वादशी या तिथीसाठी ग्रामीण भागात सर्रास वापरतात. बारस या शब्दात ‘पाडस’ किंवा ‘वासरू’ शब्दाची किंचितसी छटा आहे. ‘वसुबारस’ म्हणजे सवत्सधेनु (गाय आणि वासरू) यांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी गावाकडे गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतात. वरील गाण्यात गाई-बैलाच्या रक्षणासाठी वाघाशी पंगा घेण्याची देखील तयारी दाखवली आहे ती गोधनाच्या कृतज्ञतेपोटीच.! दुधदुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग व शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची कृतज्ञता पूजा. गोठय़ातील गोधन, म्हशी आणि बैल, शेळ्या-मेंढय़ा हीच शेतकऱ्याची खरी धनदौलत. या गोधनाची कृतज्ञता पूजा म्हणजे वसूबारस. दक्षिण कोकणात या दिवशी गोठय़ात शेणाच्या गवळणी व श्रीकृष्णाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्यांची पूजा केली जाते. विशेष म्हणजे या दिवशी घरातल्या स्त्रियांना गोठय़ातलं कोणतंही काम करण्याची परवानगी नसते. ही आपल्या ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना आहे. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला व त्याची कृतज्ञता म्हणून असे केले जात असावे हे निश्चित.

नंतरचा दिवस उजाडतो तो धनत्रयोदशीचा. शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन.! ‘धान्य’ हा शब्द धन या शब्दातूनच उत्पन्न झाला असावा अशी कल्पना केल्यास ती चुकीची ठरू नये. ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असतं. या नवीन नवीन धान्याची पूजा करण्याचा दिवस ती धनत्रयोदशी. शहरात आपण या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, घरातील सोनं-नाणं यांची पूजा करतो.  नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही फार मोठे महत्त्व आहे. शहरात गुजराती-मारवाडय़ाच्या सहवासाने या दिवसाला सर्रास ‘धनतेरस’ असं म्हणू लागलेत अलीकडे.!!

आयुर्वेदाचा उद्गाता धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्यजन या दिवशी धन्वंतरीची जयंती साजरी करतात.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे ‘नरकचतुर्दशी’. आपल्यासारख्या चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस. बहुजनांच्या ‘पहिल्या आंघोळी’चा तर महाजनांच्या ‘अभ्यंगस्नाना’चा हा दिवस. नरकासुर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ असे नाव पडले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. कोकणातल्या ग्रामीण भागात या दिवशी नवीन भातापासून तयार केलेल्या पोह्य़ांचे विविध पदार्थ बनवण्याचा रिवाज आहे. तर शहरात फराळाच्या विविध प्रकारात झाले.

शहरात या दिवशी सुगंधी उटणे, सुवासाचा साबण लावून आंघोळ करतात. देवळात जाऊन देवदर्शन करून आल्यावर एकत्र बसून फराळ करतात. हा दिवस येणाऱ्या व जाणाऱ्या विक्रमसंवताचा संधीकालातला दिवस. सरते वर्ष भरभराटीचं, समृद्धीचं गेलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची कृषीसंस्कृतीची ही प्रथा होती. कृष्ण व नरकासुराच्या कथेचा साज त्यास खूप नंतर चढवण्यात आला असावा.

चौथा दिवस सरत्या वर्षांचा शेवटचा दिवस. अश्विन वद्य अमावास्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस. गावाकडे या दिवशी गोठय़ातील गो-धनाची, शेळ्या-मेंढय़ांची पूजा केली जाते. तर शहरात लक्ष्मी म्हणजे पैसा-सोनं-नाणं हेच असल्याने त्यांची पूजा करतात. व्यापारीजन त्यांच्या चोपडय़ांचे पूजन या दिवशी करतात.

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. आणखी एक प्रथा गावाकडे आणि शहरातही आवर्जून पाळली जाते ती म्हणजे या दिवशी घरी-दारी-गोठय़ात स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी झाडू विकत घेतात. झाडूला साक्षात लक्ष्मी मानून, तिच्यावर पाणी शिंपडून, तिला सवाष्ण लक्ष्मी मानून तिची हळद-कुंकू वाहून मनोभावे पूजा करतात व नंतरच घरात वापरण्यास सुरुवात करतात. स्वच्छतेच्या ठिकाणीच लक्ष्मीचा वास असतो ही श्रद्धा या प्रथेमागे असते.

नंतरचा दिवस पाडव्याचा. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. प्रतिपदा या शब्दाचं गावरान बोलीतलं स्वरूप म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द! ग्रामीण भागात या दिवसाला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा सर्वाधिक महत्त्वाचा दिवस. याच दिवशी वामनाने बळीला पृथ्वीवरून पाताळात ढकलले अशी पुराणकथा आहे. खरंतर ते एक रूपक असावं. खरी गोष्ट, या देशातील मूळ शेतीसंस्कृती व नंतरच्या काळात उदयाला आलेल्या इतर संस्कृतींमधील झगडय़ात, शेतकऱ्याला व शेतीला दुय्यम स्थान मिळण्यास सुरुवात झाली, ही आहे.  समाजव्यवस्थेच्या शीर्षस्थानी असणारा शेतकरी नंतरच्या काळात दुय्यम (पाताळ) स्थानी ढकलला गेला, त्याची सुरुवात या दिवशी झाली असावी असा अर्थ यातून काढला जाऊ शकतो. ‘दिन दिन दिवाळी..’ या लोकगीतातली शेवटची ओळ, ‘इडा-पिडा टळो, बळीचं राज्य येवो’ अशी आहे व याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘इडा (इला)’ म्हणजे जमीन आणि बळी म्हणजे शेतकरी. जमिनीला आपल्या संस्कृतीत अन्नदेवता म्हटलंय. जमिनीवरील संकट टळून बळी म्हणजे शेतकरी राजा झाल्याशिवाय हा देश समृद्ध होणार नाही हाच संदेश यातून दिला जातो. सध्या झालेल्या शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवरून याची जाणीव आणखी तीव्र होते.

वामनाने जरी बळीला पाताळात ढकललं असलं तरी हा देश व या देशातील शेतकरी हजारो वर्षे उलटूनही बळीला अद्याप विसरलेला नाही हेच यातून सिद्ध होतं. या दिवशी विक्रमसंवत सुरू होतं. शहरी व्यापाऱ्यांचं किंवा उत्तर भारतातल्या लोकांचं नवं वर्ष या दिवशी सुरू होतं. व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या, कीर्द-खतावणीच्या चोपडय़ा या दिवशी नवीन हिशोबासाठी सज्ज होतात. पाडवा हा साडेतीन मुहुर्तामधला ‘अर्धा’ शुभमुहूर्त आहे. शहराकडे या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायची प्रथा काही समाजात आहे. ही प्रथा का पडली त्याचा उलगडा होत नाही.

आता येतो दिवाळीचा शेवटचा म्हणजे ‘भाऊबीजेचा’ दिवस.

कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. जर काही कारणाने बहिणीच्या घरी भाऊ  जाऊ  शकला नाही अथवा तिला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ  समजून ओवाळते. इथे मला नागपंचमीची आठवण होते. आपल्या संस्कृतीत बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी नागपंचमीचा उपवास करते. हिंदू संस्कृतीत नागाला भाऊ  मानलं गेलं आहे. चंद्र व नाग दोन्ही शेतीसाठी उपयुक्त आहेत. भाऊबीज साजरी करण्यामागे शेती संस्कृतीत हाच उद्देश आहे. शेतीसाठी उपकारक असणाऱ्या चंद्राचे औक्षण बहीणरूपी धरती करते हा अर्थ भाऊबीजेचा आहे.

भाऊबीजेच्या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो असंही म्हणतात. नाग हा यमाचाच अवतार म्हटला तर सुरुवातीची गोष्ट पटते.

असे हे दिवाळीचे सहा  दिवस. उभ्या हिंदुस्थानात हे पाच दिवस मोठय़ा आनंदाने साजरे केले जातात. या सणाचं खरं स्वरूप बघायचं तर मात्र गावाकडची वाट धरावी लागेल. निसर्गपूजा, धरतीची कृतज्ञता मानण्याचे हे सहा दिवस. कृषी संस्कृतीने आपल्याला दिलेली ही अनमोल ठेव आहे. पौराणिक कथांचे संदर्भ खूप नंतरच्या काळात या सणावर चढवले गेले असावेत. दिवाळी हा खऱ्या अर्थाने ‘कृषी उत्सव’ आहे. ग्रामीण संस्कृतीने बांधलेली निसर्गाची ही महापूजा आहे.

ही दिवाळी आपल्याला सुख-समृद्धीची, भरभराटीची जाऊन आपली सारी स्वप्नं साकार व्हावी, ही शुभेच्छा!!
गणेश साळुंखे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:21 am

Web Title: diwali 2016
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : मसूर व तुरीच्या दाण्याचे कटलेट
2 रुचकर – शॉपिंग विशेष : आलू कचोरी
3 रुचकर – शॉपिंग विशेष : मठरी
Just Now!
X