News Flash

वाचन फराळ : स्वागत दिवाळी अंकांचे

वैचारिक अंकांची आपली परंपरा ‘वसा’ने या वर्षीही सुरू ठेवली आहे.

नव्या व्यवस्था संक्रमित न झाल्याने देशाची प्रगती कशी रोडावली याचा वेध घेणारी, पोलीस आयुक्त महेश भागवत, आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर, राजकीय विश्लेषक दादूमियां, गिरीश लाड, भारतकुमार राऊत, केशव उपाध्ये,  डॉ. मीना वैशंपायन, अजय कौल यांची लेखमाला ‘हेमांगी’चे वैशिष्टय़ ठरावे. मुंबई मेट्रो रेल्वे कॉपरेरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका आश्विनी भिडे यांचा ‘मुंबईची दुसरी जीवनवाहिनी’ हा लेख मुंबईकरांना एक नवा दृष्टिकोन देईल. याखेरीज डॉ. उमा विरूपाक्ष कुलकर्णी, संजीवनी खेर, सुषमा शालिग्राम, डॉ. योगेंद्र पी. त्रिवेदी, राजू रावळ, अपर्णा लव्हेकर, दिलीप चावरे, अ‍ॅड. शफी काझी, गौरी कुलकर्णी आदींचे लेख वाचनीय आहेत. पं. शौनक अभिषेकी, पं. संजीव अभ्यंकर, राणी वर्मा, पं. आनंद भाटे, नरेश उमप, सावनी शेंडे, यांचे ‘महावृक्षाच्या सावलीत’ हे हृद्य मनोगत आणि गीतकार गुलजार, गायिका आशा खाडिलकर, सौंदर्यवादी जगदीश खेबूडकर यांच्यावरील लेख वाचनीय आहेत. ‘अस्तंगत होणारा फॅमिली डॉक्टर’ या विषयावरील डॉ. सुभाष बेंद्रे, डॉ. सुजाता आणि डॉ. संतोष वाघ यांचे लेख रुग्णांना अंतर्मुख करतील. गुंतवणूकतज्ज्ञ विनायक कुलकर्णी, डॉ. केशव सखाराम देशमुख यांचे लिखाण आहे.
हेमांगी ; संपादक : प्रकाश कुलकर्णी; किंमत : रु. १५०/-.

सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा आणि त्यात उभारलेले किल्ले हे महाराष्ट्राचं वैशिष्टय़ं. त्याच्याशी नातं सांगणारा किल्ला हा अंक दर वर्षी नित्यनेमाने आणि अत्यंत देखण्या स्वरूपात निघतो. अत्यंत उत्तम कागद, छपाई, मांडणी आणि उत्कृष्ट फोटो या सगळ्यामुळे हा अंक फक्त वाचनीयच नाही तर बघणीयसुद्धा असतो. या वेळच्या अंकात गोनिदांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या दुर्गभ्रमणाच्या आठवणी जागवल्या आहेत. अभिजीत बेल्हेकर यांच्या गडपुरुष या लालित्यपूर्ण लेखातून. महाराष्ट्रातील तसंच महाराष्ट्राबाहेरील किल्ल्यांवर वाचकांकडून मागवलेल्या लेखांमधून हरिश्चंद्रगड, चितोडगड, इंग्लंमधील वार्विक कॅसल हे लेख आहेत. चित्रकार शरद तावडे यांनी राजगडाची चित्रं सजवली आहेत. संदीप वडस्कर यांनी सुधागडची छायाचित्रं काढली आहेत. सीमांतिनी नूलकर यांचा वारुळ एक अभेद्य किल्ला वाचनीय आहे. डॉ. यशवंत पाठक यांनी संत आणि दुर्ग यांचं नातं उलगडलं आहे. डॉ. सचिन जोशी यांचा दुर्गाचे जीपीएस हा लेख वेगळा आहे. अमोल सांडे यांनी वावसंस्कृती या लेखातून अहमदाबादमधल्या विहिरींची दुनिया उलगडून दाखवली आहे. याशिवाय डॉ. दिलीप बलसेकर यांचा शिवराई, संदीप ताकदीर यांचा साल्हेर आणि प्राची परांजपे यांचा तिकोनावरचा लेख आवडेल असा आहे.
किल्ला; संपादक : रामनाथ आंबेरकर; किंमत : रु. ३००.

वैचारिक अंकांची आपली परंपरा ‘वसा’ने या वर्षीही सुरू ठेवली आहे. यंदाच्या अंकात वर्षभर ज्याच्यामुळे वातावरण ढवळलं गेलं. त्या रोहित वेमुलाच्या आईची, राधिका वेमुलाची कहाणी सांगितली आहे, लता प्रतिमा मधुकर यांनी. गुजरातमधल्या दलित आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या जिग्नेश मेवाणीची दास्ता सुबोध मोरे यांनी रेखाटली आहे. सुरेश सावंत यांनी ‘संघाचे आव्हान आंबेडकर आणि..’ हा लेख लिहिला आहे. सध्या महाराष्ट्रभर घोंघावत असलेल्या मराठा मोर्चाच्या वादळाचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. या आंदोलनाचं विश्लेषण प्रताप आसबे यांनी मराठा आंदोलन, असंतोष आणि बहुजनवादी चळवळीची दिशा या लेखात केलं आहे. जयंत पवार यांची एक सुन्न दुपार आणि बाबू भंगारवाल्याची वखार ही कथा वाचनीय आहे. चंद्रकांत भोजाळ यांनी कामतानाथ यांच्या घर या मूळ हिंदी कथेचा घर अनुवाद केला आहे. याशिवाय मुकुंद कुळे, समर खडस, रझिया पटेल, शशिकांत सावंत, शिल्पा शिवलकर, प्रतिमा जोशी, गंगाधर म्हात्रे, प्रशांत रुपवते, रसिक राणे, राज असरोंडकर, राही श्रुती गणेश यांचेही योगदान आहे.
वसा; संपादक : प्रभाकर नारकर; किंमत : रु. १२०.

कुटुंबाची परिपूर्ण दिवाळी असं या अंकाचं ब्रीद आहे. अंकात वेगवेगळे विषय हाताळले आहेत. विशेष लेख या विभागात आत्महत्या या विषयाचे विविध पैलू हाताळले आहेत. आजच्या नैराश्यपूर्ण, ताणतणावाच्या जीवनात आत्महत्यांचं वाढतं प्रमाण पाहता या विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी अंकात चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. त्याला डॉ. शुभांगी पारकर, डॉ. मनोज भाटवडेकर, रमेश झवर, डॉ. आशुतोष नाडकणी, सृष्टी गुजराथी यांनी हातभार लावला आहे. गिरिजा कीर, विजय साखळकर, माधवी कुंटे, गुरुनाथ तेंडुलकर, शैलजा कामत, अरुण सावळेकर, रा. भा. लिंगायत यांच्या कथा आहेत. याशिवाय माध्यमांचे विचार आणि धन- हेमंत देसाई, चीन आणि भारत- विनायक कुळकर्णी, निलिकाश प्रधान, आशा कबरे मटाले, प्रीती खरे, पद्माकर कार्येकर यांचे लेख वाचनीय आहेत. सेवाव्रती व्यक्ती आणि संस्था या विभागात प्रमोद तेंडुलकर, संपदा वागळे, नवीन काळे यांनी विविध संस्था- व्यक्तींची माहिती दिली आहे. बळी लवंगारे यांची व्यंगचित्रे आणि निवडक कवींच्या कविता अंकात आहेत.
संस्कारदीप; संपादक : प्रमोद तेंडुलकर; किंमत : रु.  ८०.

दिवाळीच्या सुट्टीत बच्चे-कंपनीसाठी वाचनखाद्य दडलंय ‘छोटय़ांचा आवाज’ या दिवाळी अंकात. या दिवाळी अंकाच्या ‘बाल-कुमारांसाठी अफलातून धम्माल’ या टॅगलाइननुसारच यामधील लेख आहेत. भरपूर कथांचा खजिना यामध्ये असून कवितांचा संग्रहही यामध्ये आहे. कथांचे विषय वेगवेगळे आहेत. देशभक्ती, प्राणीप्रेम, वृक्षप्रेम, कष्टाचे महत्त्व, परीकथा अशा अनेक विषयांच्या कथा या अंकात आहेत. ‘चतुर बिरबल’, ‘मैत्री’, ‘आमची बाग’, ‘मस्त भ्रमंती’, ‘जगावेगळं बारसं’, ‘आराम हराम है’, ‘काय बोलतात ही मोठी माणसं’, ‘चॉकलेटचा बंगला’ अशा अनेक मनोरंजक कथा यामध्ये आहेत. या कथांच्या अधेमधे कथाचित्रे, हास्यचित्रे, कोडी, जादू असं सगळं आहे. त्यामुळे बच्चेकंपनींसाठी हा अंक म्हणजे मेजवानी ठरलीय. गमतीशीर कोडी हे या अंकाचं खास आकर्षण आहे. तर एका रेषेतून साकारलेली चित्रेदेखील लक्ष वेधून घेणारी आहे. या दिवाळी अंकातील विशेष आकर्षण म्हणजे यातील चित्रं. ही चित्रं इतकी बोलकी आणि सुंदर आहेत की त्यातूनच वाचक कथेशी जोडला जातो.
छोटय़ांचा आवाज; संपादक : वैशाली मेहेत्रे; किंमत : रु. ८०.

विनोदी साहित्य, चारोळी, ग्राफिटी, वात्रटिका, विनोदी कविता, हास्यचित्रमालिका, कथाचित्रे यासाठी ‘हास्यानंद’ हा खुसखुशीत दिवाळी अंक उत्तम पर्याय आहे. यामधील हास्यचित्रे अतिशय बोलकी आहेत. ही हास्यचित्रे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मनोरंजन विश्व यातल्या घडामोडींवर भाष्य करतात. माणसाच्या रोजच्या आयुष्याशी ते संबंधित असल्यामुळे वाचकांना ते जवळचं वाटतं. ‘प्रेममंत्र’, ‘वय मोठं खोटं ‘खोटं’’, ‘मंगळावर आलू. जमिनीवर भालू.’, ‘बाजीराव जेव्हा महिला दिन साजरा करतात’, ‘तदेव लग्नम्’, ‘हुबेहूब’, ‘मोठेपण देगा देवा’ यांसारख्या अनेक कथा तर ‘आदर्श पती’, ‘कधी-कधी’, ‘लोक’, ‘लवकर ‘लव्ह’कर’, ‘बदल’ अशा अनेक कविता या अंकात समाविष्ट केल्या आहेत. या अंकाचं मुखपृष्ठही अतिशय सूचक आहे. कथांच्या अधेमधे हास्यचित्रमालिकांचा समावेश आहे. या हास्यचित्रमालिकांमध्येही विविध विषयांवर भाष्य केलं आहे. दिवाळीच्या फराळासारखा हा अंकही अतिशय खुसखुशीत आणि चवदार आहे. विनोदी साहित्य वाचकप्रेमींसाठी ‘हास्यानंद’ हा अंक जणू दिवाळीची भेटच आहे.
हास्यानंद; संपादक : वैशाली मेहेत्रे; किंमत : रु. १३०.

विनोदी साहित्याचा आणखी आनंद ज्यांना घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी ‘ऑल दि बेस्ट’ हा अंक उत्तम पर्याय आहे. या अंकात विनोदी कविता, लेख, कथा, हास्यचित्रमालिका, व्यंगचित्र, वात्रटिका असं सगळंच आहे. नावाजलेल्या व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र हे या अंकाचं प्रमुख आकर्षण आहे. तसंच हास्यचित्रमालिकाही वाचकांचं लक्ष वेधून घेतात. कथा, कवितांच्या अधेमधे विनोद, वात्रटिका, ग्राफिटींचा समावेश आहे. कथा चित्रे हा काही वाचकांच्या अतिशय आवडीचा विषय असतो. या अंकातील कथा चित्रे या वाचकांच्या लक्षात राहील अशी आहेत. चित्रांच्या माध्यमांतून मांडलेल्या कथा सगळ्यांनाच आवडतात. या अंकातील कथाही वाचकांना नक्कीच आवडतील. या अंकामध्ये साधारण ३० विनोदी कथा तर ११ कविता आहेत. वात्रटिका, व्यंगचित्र, हास्यचित्रमालिका यांमुळे अंक आकर्षक वाटतो. एकूण विनोदी वाचायला आवडणाऱ्यांसाठी हा अंक म्हणजे चांगला पर्याय आहे.
ऑल दि बेस्ट; संपादक : वैशाली मेहेत्रे; किंमत : रु. १३०.
प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2016 2:02 pm

Web Title: diwali anka
Next Stories
1 स्मरण : लिनॅअस – सजीवसृष्टीच्या वर्गीकरणाचा प्रणेता 
2 परंपरा : प्राणीशीर्षी देवता
3 संस्कृती : कबीरांची गौळणसदृश पदे
Just Now!
X