खरेदी करणं हा अनेकांसाठी आवडीचा विषय असतो. पण कमी पैशांमध्ये तुमची सगळी खरेदी झाली तर?.. कोणाला आवडणार नाही? पण यासाठी आवश्यक आहे ती बार्गेनिंगची कला. हे जमलं की तुमचं काम झालंच म्हणून समजा.

दिवाळी दीड आठवडय़ावर येऊन ठेपलीय. एव्हाना काहींची खरेदी झाली असेल, तर काही अजूनही ऑफिस, कॉलेज अशा काही कारणांमुळे खरेदीपासून दूर असतील. त्यातच बजेटची चौकट आहेच मानगुटीवर बसलेली. वेळ आणि बजेट या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांभाळत खरेदी करावी लागणार, असा विचार तुम्ही करीत असालच. पण फिकर नॉट! तुम्ही फार ब्रॅण्डेड कपडे, वस्तू वापरणारे नसाल आणि तुम्हाला कमी वेळात जास्तीत खरेदी करायची असेल तर जिथे राहताय तिथल्या स्ट्रीट शॉपिंगचा पर्याय निवडा आणि खरेदीला निघा. तिथे तुम्हाला कमी किमतीत मनसोक्त खरेदी करता येईल. कशी? उत्तर सोप्पंय; बार्गेनिंग! हे कौशल्य सगळ्यांमध्ये असतंच असं नाही. पण ते जमूच शकत नाही असंही नाही. खरेदीला गेल्यावर बार्गेनिंग करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला खरेदीतलं सगळं समजतं आणि कोणत्या वस्तूची खरी किंमत किती हेसुद्धा आपल्याला चांगलंच माहीत असतं असं दर्शवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावर झळकायला हवा. असं झालं तर मग तुमची खरेदी एक नंबर झालीच म्हणून समजा!

सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं; खरेदी करताना सोबत कोणाला नेताय याचा नीट विचार करा. कारण तुम्ही बार्गेनिंग करणार असाल तर तुमच्यासोबत असणारी व्यक्ती कंटाळायला नको. कारण ती कंटाळली आहे हे दुकानदाराने हेरलं तर तुम्हाला काहीच बार्गेनिंग करता येणार नाही. अशा वेळी तुम्हाला आवडलेली वस्तू दुकानदार म्हणेल त्या किमतीत घ्यावी लागेल किंवा त्या वस्तूचा त्याग करावा लागेल. त्यामुळे सोबत कोणाची हवी हा महत्त्वपूर्ण विचार व्हायलाच हवा. स्ट्रीट शॉपिंग म्हटलं की भुवया उंचावतील कदाचित. पण तसं नाही. स्ट्रीट शॉपिंग म्हणजे रस्त्यावर असणारे स्टॉल्स हेच येत नाही तर तिथली छोटी दुकानंही येतात. या दुकानांमधल्या कपडय़ांची किंमत त्यांनी जास्त सांगितली तरी तिथे किंमत कमी केली जाते. त्यामुळे स्ट्रीट शॉपिंगचा पर्याय उत्तमच आहे. पण यात एक लक्षात घ्यायला हवं, अशाच दुकानात जा जिथे ‘फिक्स्ड रेट’ असं लिहिलेलं नसेल. अशी पाटी असलेल्या दुकानात बार्गेनिंगला अजिबात वाव मिळणार नाही.

आवडलेली वस्तू खरेदी करायची हे आधी मनात निश्चित करा आणि त्यानंतरच तिची किंमत दुकानदाराला विचारा. तो जितकी किंमत सांगेल त्याच्या पाव आणि अध्र्या भागाजवळ जाईल इतक्या किमतीने तुम्ही ती विकत घ्यायला तयार आहात, असं सांगा. म्हणजे उदा. ७०० रुपयांची वस्तू २००-२५० ला देतो का म्हणून विचारा. तुमचा हा प्रस्ताव ऐकून दुकानदार त्याला मोठ्ठा धक्का बसल्यासारखा चेहरा करेल. पण त्याचा तो अभिनय असेल, हे समजून घ्या. त्याच्या त्या चेहऱ्याला भुलू नका. तरी सुरुवातीला तो दुकानदारही थोडी किंमत कमी करेल. पण ती फार कमी नसेल. त्यामुळे आणखी थोडं अडून बसा. तुम्ही सुरुवात त्या सांगितलेल्या किमतीच्या पाव भागापासून केली तरच तुम्ही थोडं वाढवून त्याच्या अध्र्या किमतीपर्यंत जाल. असं केल्याने त्याला सांगता येईल की, ‘मी माझ्या बजेटच्या दुप्पट किमतीत आता ती वस्तू घ्यायला तयार झाली आहे.’ यावरही तो थोडी घासाघीस करेल. मग त्याच्या समाधानासाठी दहा-वीस रुपये इकडेतिकडे करून त्याला ठरलेली किंमत द्यायची आणि दुसरं दुकान गाठायचं. अशा प्रकारे तुम्हाला आवडलेली वस्तू तुम्हाला अध्र्या किमतीत मिळेल. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची. एखादा टॉप, कुर्ता, जीन्स, पर्स असं काहीही तुम्हाला कितीही आवडलं, तुम्ही त्या वस्तूच्या कितीही प्रेमात पडलात तरी ते दुकानदाराला अजिबात दर्शवायचं नाही. कारण तुम्हाला ते आवडलंय आणि तुम्ही ते घेणारच हे जर दुकानदाराला समजलं तर तो फार बार्गेनिंग करणार नाही. इथे तुमचा तोटा होऊ शकतो. हे बार्गेनिंग करताना कुठे जास्त बार्गेनिंग करता येईल याची माहिती काढून मगच तिथे जा; म्हणजे तुमचा वेळ वाचेल.

एखादी वस्तू तुम्हाला प्रचंड आवडली आहे आणि तुम्हाला ती हवीच आहे तर वेगळी शक्कल लढवावी लागेल. तुम्हाला हवी त्या हव्या त्या किमतीत तो द्यायला तयार नसेल तर तो कितीला द्यायला तयार आहे याचा अंदाज बांधा. तो अगदीच नखरे करीत असेल तर तुम्हाला तो सांगतोय त्या किमतीत घेणं शक्य नाही, असं सांगून दुकानातून बाहेर पडायचं नाटक करा. तुम्हाला ती वस्तू आवडली तर आहे पण तुमच्या बजेटमुळे तुम्हाला ती घेता येत नाही, असा आविर्भाव चेहऱ्यावर आणत दुकानातून बाहेर पडायचं नाटक करा. बाहेर पडेस्तोवर तो तुम्हाला हमखास परत बोलावणारच. तुम्ही परत दुकानात गेलात तर तो पुन्हा तोच सांगतोय त्या किमतीत थोडं इकडेतिकडे करणार. मग तुम्ही म्हणायचं, ‘तुम्ही बोलावलंत म्हणून परत आले. नाही तर मी तुम्हाला माझं बजेट आधीच सांगितलं आहे. मला हवं त्या किमतीत द्या नाही तर मी जाते.’ हे एकदम सौम्य आवाजात बोलायचं. मग तो दुकानदार ते देतो. काही दुकानदार अडूनही बसतात. पण याचा अंदाज घेऊन आपणही एखादं पाऊल पुढे जायला हरकत नाही. बार्गेनिंग करताना थोडी नौटंकीबाजी चालते.

बार्गेनिंग करताना एखादी गोष्ट जास्त फुलवून सांगता यायला हवी. उदा. एखाद्या दुकानात गेलात आणि एखादी वस्तू घ्यायची ठरवली. पण तो दुकानदार एकाच किमतीला अडून बसलाय. अशा वेळी त्याला पटवायचं हे त्या वेळी आपल्या आयुष्यातलं ते सगळ्यात मोठं ध्येय वाटतं. त्यावेळी थोडी डायलॉगबाजी करायची. ‘मी नेहमी याच दुकानात येते. मागच्या महिन्यात इथून घेतलेला कुर्ता माझ्या मैत्रिणीला आवडला तर तीही याच दुकानात आली होती. आणि आता तुम्ही असं करताय. आता एक चांगली वस्तू घेतली तर मी पुन्हा इथेच येणार ना. दुसरीकडे कशाला जाईन. पण जाऊ दे. आता पुढच्या वेळी या दुकानात यायचं की नाही हे ठरवावं लागेल मला.’ असं काहीसं बोलल्यावर तो किंमत जरा तरी कमी करेल. तुम्हालाही थोडी तडजोड करावी लागेल. त्या दुकानातून बाहेर पडताना त्याचं व्हिजिटिंग कार्ड वगैरे आहे का ते विचारा. असेल तर त्यांच्याकडून तीन-चार मागा. त्यांना सांगा की तुमच्या ओळखीत कोणाला लागलं तर देईन. असं केल्याने तुम्ही त्यांच्या लक्षात राहाल. पुढच्या एखाद्या वेळी कसली तरी छोटीच खरेदी करण्यासाठी त्याच दुकानात जा. म्हणजे तुम्ही त्यांच्या लक्षात आहात की नाही ते तुम्हाला समजेल. यामुळे तुमची ओळख वाढेल आणि ते बार्गेनिंगसाठी तुम्हाला पुढे फायद्याचं ठरेल. ही ओळख वाढवताना कोणत्याही दुकानदाराला भैया, दादा, काका, अंकल असं शक्यतो संबोधू नका. यामुळे त्याचा इगो दुखावला जाण्याची शक्यता जास्त आहे. पण जर एखादा दुकानदारच तुम्हाला ताई, दीदी असं म्हणत असेल तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ‘तुम्ही मला ताई, दीदी म्हणताय मग आता माझ्यासाठी थोडीही किंमत कमी करणार नाही का?’, अशा प्रकारचा डायलॉग मारून त्या संधीचा फायदा घ्या.

खरेदी करताना बरीच दुकानं फिरावी लागतील या हिशेबाने बाहेर पडा. एका दुकानात गेलात, आवडलेली वस्तू घेतली आणि निघालात असं फार क्वचित होतं. असं झालं तरी अशा ठिकाणी बार्गेनिंगला वाव नसतो. बार्गेनिंग करायचं तर चार दुकानं फिरावी लागतात. कोणत्या दुकानात कोणती वस्तू किती रुपयाला आहे याची माहिती काढून त्यातलं नेमकं कोणतं दुकान गाठायचं हे ठरवता येतं. यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले पूर्ण मार्केट एकदा फिरून या. कोणत्या दुकानात काय मिळतंय, कुठे चांगलं मिळतंय, साधारण किमती काय आहेत याचा अंदाज त्या पहिल्या फेरीतून येईल. एखाद्या दुकानात बार्गेनिंग करताना ‘त्या तिकडच्या दुकानात तर यापेक्षा स्वस्त आहे. पण मी नेहमी याच दुकानात येते म्हणून इथे आले. तर तुम्ही इतके महाग विकताय!’ असं सांगता येतं. पण असं बोलल्याने दुकानदार असं म्हणू शकतो, ‘पण आमची क्वालिटीसुद्धा चांगली आहे.’ त्यावर आपण म्हणायचं, ‘क्वालिटी दोन्हीकडची सारखीच आहे. पण आपली ओळख म्हणून मी तिथे जाऊनसुद्धा परत इथेच आले.’ अशी थोडी बोलबच्चनगिरी केली की तुमचं काम झालंच म्हणून समजा.

खरेदी करायला जाताना पुष्कळ सुट्टे पैसे जवळ असू द्या. सध्या पेटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरेमुळे सगळं सोपं झालं असलं तरी स्ट्रीट शॉपिंगसाठी कॅशसोबत सुट्टे पैसेही जवळ ठेवावेत. सगळ्याच दुकानांमध्ये कार्ड स्वाइप करण्याची सोय असेलच याची खात्री नाही. त्यामुळे पैसे जवळ असलेले बरे. दुसरं म्हणजे एखादी वस्तू आवडली पण सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याचा तोटा तुम्हाला जास्त होण्याची शक्यता असते. उदा. तुम्ही एखादा कुर्ता ४७० रुपयांना विकत घेतलात. तुम्ही ५०० रुपये दुकानदाराला दिले. पण त्याच्याकडे ३० रुपये सुट्टे नाहीत. तुम्ही आणि तो सुट्टय़ा पैशांसाठी कुठेही जाणार नाही. अशा वेळी तुम्हाला ती वस्तू ५०० रुपयात घ्यावी लागेल नाही तर त्या वस्तूचा त्याग करावा लागेल. म्हणजे दोन्हीकडून तोटा तुमचाच आहे. सुट्टे जवळ ठेवण्याचा आणखी एक फायदा आहे. बार्गेनिंग करत करीत तुम्ही ४६० रुपयांवर आणि दुकानदार ४८० रुपयांवर थांबला तर अशा वेळी तुम्ही ठरवलेली रक्कम म्हणजे ४६० रुपये सुट्टय़ा पैशांमध्ये दुकानदाराला द्या. म्हणजे त्याच्याकडून पैसे परत येण्याचा प्रश्नच नाही. सुट्टे पैसे त्या दुकानदाराच्या हातात देऊन तुम्ही तिथून निघू शकता. अर्थात तिथून पळून जायचं नाही. तर ‘हे इतके बरोबर आहेत. पुढच्या वेळी मी इथेच येणार’ असं गोड बोलून निघायचं.

दुकानदाराला भावनाप्रधान बोलण्यात अडकवायचं असेल तर आणखी एक आयडियाची कल्पना आहे. बार्गेनिंग करत असताना दुकानदार फार झिकझिक करत असेल तर त्याच्यासमोर आणखी एक डायलॉगबाजी करता येईल. ‘आम्ही शिकतोय अजून. बघा आम्हाला एवढाच पॉकेटमनी मिळालाय. तेवढय़ात सगळं बसवायचंय. अजून सगळी शॉपिंग व्हायची आहे,’ असं सांगितल्यावर दुकानदार कदाचित तुमच्याकडे बघून हसेल. पण त्याला हसू द्या. तुमचा फायदा होत असेल तर त्याने हसलं तरी तुमचं काही बिघडत नाही. अर्थात हे सगळं करताना तुम्ही ‘विद्यार्थी’ सारखे दिसत आहात का याची खात्री बाळगा. नाही तर दुकानदार बार्गेनिंगच काय पण तो त्या वस्तूच्या मूळ रकमेलाही ती वस्तू विकेल की नाही शंकाच आहे. स्ट्रीट शॉपिंग करताना वेळसुद्धा पाळा. तुम्ही एकदम संध्याकाळी गेलात तर एक तर तिथे खूप गर्दी असेल आणि दुसरं म्हणजे दिवसभर त्यांचा बिझनेस चांगला झाला असेल, मग अशा वेळी तुम्ही संध्याकाळी जाऊन तिथे बार्गेनिंग होईलच असं नाही. कारण दिवसभर बिझनेस चांगला झाल्यामुळे संध्याकाळी अगदीच कमी झाला किंवा झालाच नाही तरी दुकानदारांना तसा फारसा फरक पडणार नाही. सकाळी साधारण अकरा साडेअकराच्या सुमारास अशी मार्केट सुरु होतात. त्या वेळी गेलात तर एक म्हणजे दिवसाची सुरुवात म्हणून कोणी बार्गेनिंग करणार नाही; आणि दोन; पहिलं गिऱ्हाईक आहात आणि ‘बोहनी’ करताय असं दुकानदाराला सांगितल्यास तुम्ही म्हणाल त्या किमतीत तो तुम्हाला हव्या त्या वस्तू विकेलही. पण या झाल्या शक्यता. दुपारी साडेबारा ते साधारण चार-साडेचार या वेळेत चांगलं बार्गेनिंग होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे जमल्यास हीच वेळ गाठा.

थोडक्यात काय, तर खरेदी करणं हा अनेकांसाठी उत्सव असतो. या उत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर बार्गेनिंग जमायला हवं. कमी वेळात कमी पैशांत जास्त खरेदी करायची असेल तर बार्गेनिंगशिवाय पर्याय नाही. बार्गेनिंग ही एक कला आहे. ही तुमच्यात असली तर उत्तमच. पण नसली तरी ती तुमच्याच नक्की आणता येईल. गरज आहे ती फक्त गोड बोलण्याची, थोडासा अभिनय करण्याची, बोलबच्चनगिरी करण्याची आणि डायलॉगबाजी करण्याची; मग तुम्ही त्या दुकानदाराला बिनधास्त विचारू शकता, ‘क्या बॉस.. देने का बोलो ना!’
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com /@chaijoshi11