News Flash

सुट्टी विशेषांक : करा जादू

दोन सारख्या आकाराच्या पिना घेऊन त्यात दोन वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवा. त्या दोनपैकी एका पिनचे टोक पॉलिश पेपरवर घासून बोथट करा.

जादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावतो. हे सहा पत्ते त्यांच्या हातात देतो.

भूपेश दवे – response.lokprabha@expressindia.com

न बघता रंग ओळखणे
प्रयोग : जादूगार प्रेक्षकांच्या हातात दोन सारख्या, पण वेगवेगळ्या रंगाचे दोन मणी लावलेल्या पिन देतो. पाठमोरा उभा राहून प्रेक्षकांना कोणत्याही एका रंगाचा मणी असलेली पिन त्याच्या हातात द्यायला आणि दुसरी लपवून ठेवायला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांकडे वळून त्याच्या मुठीतल्या पिनकडे न बघता क्षणात त्या पिनमध्ये असलेल्या मण्याचा रंग ओळखतो. हे पाहून प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.

गुपित पूर्वतयारी : दोन सारख्या आकाराच्या पिना घेऊन त्यात दोन वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवा. त्या दोनपैकी एका पिनचे टोक पॉलिश पेपरवर घासून बोथट करा.

प्रयोग करते वेळी प्रेक्षकाला त्यांच्या आवडीचा रंग जादूगाराच्या हातात देऊन दुसरी पिन लपवायला सांगा, पिन हातात मिळाल्यावर प्रेक्षकांकडे तोंड करा. म्हणजे हात मागच्या बाजूला जातील, आता पिन मागे हळूच उघडून अलगद तपासा की ते टोक अणकुचीदार आहे की बोथट. त्यानुसार मण्याचा रंग सांगा, आणि हातात मागे धरलेली, उघडलेली पीन हळूच बंद करून टाका


पेपर क्लिपची जादू

प्रयोग :

जादूगार आपल्याजवळील किंवा प्रेक्षकाकडील एक नोट घेऊन तिची घडी घालतो. नंतर नोटेला दोन बाजूला दोन पेपर क्लिप्स लावतो आणि त्यानंतर नोटेची दोन्ही टोकं पकडून जोरात खेचतो. तर दोन्ही क्लिपा उडतात. पण खाली पडताना एकमेकीत अडकलेल्या असतात.

गुपित :

कोणतीही नोट घेऊन (लहान मुलांनी सरावासाठी त्या आकाराचा कागद वापरावा) फोटोत दाखविल्याप्रमाणे लांबीच्या दिशेने ‘झेड’ आकाराची घडी घालावी. दोन पेपर क्लिप नोटेच्या दोन टोकांना लावा. (फोटोप्रमाणे लावा) आता नोटेची (कागद) दोन्ही टोके हातात धरून खेचा. नोट खेचल्याने क्लीप हवेत उघडतील आणि आपोआपच एकमेकात अडकलेल्या दिसतील.


वय ओळखणारे पत्ते

सोबतच्या सहा चित्रांत विविध अंक लिहिलेले आणि पत्ते दाखविले आहेत.

प्रयोग : जादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावतो. हे सहा पत्ते त्यांच्या हातात देतो. त्यापैकी ज्या पानावर प्रेक्षकाचे वय लिहिलेले असेल ती पाने जादूगार स्वत:ला देण्यास सांगतो. प्रेक्षकाने पाने दिल्यानंतर ती न बघता जादूगार अचूकपणे त्याचे वय सांगतो. ते ऐकून प्रेक्षकांना कुतूहल वाटते.

गुपित : या प्रयोगात जेव्हा प्रेक्षक जादूगाराच्या हातात पत्ता देतो, तेव्हा ते घेताना जादूगार त्या प्रत्येक पानावरच्या पहिल्या अंकाची बेरीज करतो. ही बेरीज म्हणजेच प्रेक्षकाचे वय असते.


रुमालात काडी मोडून जोडणे

प्रयोग :

जादूगार काडय़ापेटीतील एक काडी घेऊन सर्वाना तपासायला देतो. नंतर प्रेक्षकांपैकी एकाला रुमालात ठेवलेल्या काडीचे दोनतीन तुकडे करायला सांगतो आणि मंत्र पुटपुटल्यावर आश्चर्यकारकरीत्या काडी पूर्वीप्रमाणे सरळ झालेली असते.

गुपित :

प्रयोगाआधी रुमालाच्या एका बाजूच्या शिवणीत (फोटोप्रमाणे) एक काडी लपवून ठेवलेली असते. प्रेक्षकांना दाखवलेली काडी रुमालात टाकताना ती सफाईदारपणे हातात पकडावी आणि आधी लपवून ठेवलेल्या काडीचे तुकडे प्रेक्षकांद्वारे करवून घ्यावे. नंतर रुमाल बाजूला करताना हळूच हाताखाली धरलेली सरळ काडी पुन्हा काढून प्रेक्षकांना दाखवावी. तुटलेल्या काडीचे तुकडे शिवणीतच राहतील. रुमाल परत खिशात ठेवून द्यावा.


जादुई काडीपेटी

प्रयोग :

जादूगाराकडे दोन रिकाम्या काडय़ापेटय़ा असतात. तो प्रेक्षकांना कोणतीही पेटी उचलून हलवायला सांगतो तर कोणताही आवाज येत नाही. पण ज्या क्षणी जादूगार ती काडेपेटी आपल्या हातात घेऊन मंत्र म्हणत हलवतो तर त्या काडीपेटीतून घुंगरांचा आवाज येतो.

गुपित :

प्रयोग दाखवण्यापूर्वीच आपल्या मनगटाच्या थोडं खाली दोरीच्या किंवा रबरबॅण्डच्या सहाय्याने एक घुंगरू बांधून ठेवावे. आवाज करायचा असेल तेव्हा घुंगरू बांधून ठेवलेल्या हाताने काडेपेटी हलवावी. घुंगराचा आवाज येऊ लागतो. तो प्रेक्षकांनी दिलेल्या काडेपेटीतून येत असल्यासारखा वाटतो.

संख्येची गंमत

प्रयोग :

जादूगार प्रेक्षकांपैकी एकाला बोलावून पानावर एक चार अंकी संख्या लिहिण्यास सांगतो. नंतर लगेचच मागच्या बाजूला एक पाच अंकी संख्या भविष्यवाणी म्हणून लिहून ठेवतो. आता प्रेक्षकाला अगोदर लिहिलेल्या संख्येखाली दुसरी एक चारअंकी संख्या लिहायला सांगतो. त्या दोन संख्याखाली जादूगार एक संख्या लिहितो. आणखी एका प्रेक्षकाला त्या खाली एक चारअंकी संख्या लिहायला सांगतो आणि शेवटी जादूगार आपली एक संख्या लिहितो. जादू म्हणजे त्या पाचही संख्याची बेरीज भविष्यवाणी म्हणून लिहिलेल्या संख्येशी जुळते.

गुपित :

अ) प्रथम प्रेक्षकास चार अंकी संख्या लिहिण्यास सांगावी उदा. ३७९२, तर आता त्या संख्येच्या आधी २ हा अंक लिहून (२३७९२) येणाऱ्या संख्येतून २ हा अंक वजा करावा (२३७९०) आणि तो भविष्यवाणी उत्तर म्हणून लिहावे. नंतर प्रेक्षकांनी समजा २३६८ लिहिले तर त्याखालील जादूगाराचे आकडे असे असावेत की प्रेक्षकाच्या दुसऱ्या संख्येची आणि जादूगाराच्या संख्येची बेरीज ९९९९ अशी येईल, थोडक्यात काय तर प्रेक्षकाच्या संख्येतील प्रत्येक अंक ९ तून वजा करून लिहावा. या संख्येखाली पुन्हा एकदा प्रेक्षकाने संख्या लिहावी आणि शेवटी पुन्हा जादूगाराने त्याची संख्या लिहिताना आधीप्रमाणेच ९ तून वजा करून लिहावी. उदा.

प्रेक्षकाची संख्या ३७९२

प्रेक्षकाची संख्या २३६८

जादूगार संख्या   ७६३१

प्रेक्षकाची संख्या ४२७०

जादूगाराची संख्या ५७२९

उत्तर           २३७९०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 1:02 am

Web Title: do it yourself magic
Next Stories
1 तरल सुरांचा तारा
2 आजच्या नजरेतून.. आंबेडकर आणि लोकशाही
3 निमित्त : सायकलची ‘रुपेरी’ गोष्ट
Just Now!
X