डॉ. अनिकेत सुळे हे सध्या होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. तसेच ते खगोलशास्त्र ऑलिम्पियाडचे एशिया पॅसिफिक रीजनचे प्रमुख म्हणूनदेखील काम पाहतात, भारतातील खगोल भौतिकी आणि खगोलशास्त्र या विषयातून ऑलिम्पियाडसाठी निवडल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संपूर्ण जबाबदारी ते समर्थपणे पेलत आहे, याचीच परिणती म्हणून गेल्या काही वर्षांत भारताचा खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमधील कामगिरीचा आलेख कमालीचा उंचावेला दिसतो. त्याचबरोबर ते उत्तम  संशोधकही आहेत. त्यांनी २००३ साली आयआयटी, मुंबई येथून फिजिक्स विषयात एम.एस्सी. पदवी पूर्ण केली. नंतर लगेचच काही कंपन्यांतून आलेली नोकरीची संधी नाकारून महाविद्यालयात शिकविण्याचे काम केले. त्यानंतर त्यांनी जर्मनीमधील पोट्सडॅम विद्यापीठातून सोलार फिजिक्स विषयात डॉक्टरेट संपादन केली. त्यांचा विषय होता मॅग्नेटो-हायड्रोडायनामिक्स सोलार इंटिरिअर. त्यानंतरही त्यांनी बाहेरच्या देशात पोस्ट डॉक्टरेट न करता आपल्याच देशात मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्रामध्ये पोस्ट डॉक्टरेट म्हणून रुजू झाले. स्वत:चे संशोधनकार्य सुरू ठेवतानाच त्यांनी नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र विषय शिकविण्यास सुरुवात केली. संशोधनातील त्यांची वाटचाल या विषयावर त्यांच्याशी बातचीत झाली तेव्हा सध्याच्या संशोधन क्षेत्रातल्या भारतातील संधी याबद्दलही त्यांनी त्यांचे मत मांडले.

डॉक्टर-इंजिनीअर न होता संशोधक व्हायचं हे लहानपणीच ठरवलंत का या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. सुळे सांगतात की, संशोधक होणं हे असं ठरवलं जातच नाही. ती आवड निर्माण होण्यासाठी, तशी परिस्थिती तुमच्या आसपास हवी. त्यातून त्या विशिष्ट अशा विषयाची आवड निर्माण व्हायला हवी. ती माझ्या बाबतीत खगोल मंडळामुळे निर्माण झाली. पाचवीत असताना वेगळं काही तरी म्हणून खगोलमंडळात जाण्यासाठी सुरुवात केली. त्या विषयाची गोडी लागत गेली. पुस्तकं वाचली, आकाशनिरीक्षण केले. या सगळ्यांनंतर साधारण बारावी संपेपर्यंत या विषयाबद्दल विशेष आवड मनात निर्माण झाली होती आणि मी मनाशी नक्की ठरविलं होतं की मेडिकल किंवा इंजिनीअरिंग या क्षेत्रात मला जायचं नाही. मी फक्त मूलभूत विज्ञानातच करिअर घडविणार. त्यानुसारच त्या काळी उत्तम अशा रुईया महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. तीन र्वष पदवी पूर्ण करतानाच मी एनजीपीई (नॅशनल ग्रॅज्युएट फिजिक्स एक्सामिनेशन), एनपीटीएससारख्या राष्ट्रीय स्पर्धामध्ये स्कॉलरशिप मिळविली. त्यातूनच या विषयाबद्दलची आणि विशेषकरून संशोधनाबद्दल आवड मनात निर्माण झाली.

lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?

परंतु फक्त अभ्यास एके अभ्यास हा मंत्र कधीच मनाशी न बाळगता परफॉरिमग आर्ट्स आणि अभ्यासेतर कार्यक्रमातही मी हिरिरीने सहभागी व्हायचो. खरं तर तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खऱ्या अर्थाने घडवत असतं. तसंच काहीसं माझ्या बाबतीत रुईया महाविद्यालयात असताना झालं, सोबतची मित्रमंडळी आणि ग्रुप अतिशय उत्तम असाच होता. ज्यामुळे मला विषय समजून घेण्यात नेहमीच रस वाटत आला.

त्यानंतर लगेचच आयआयटी मुंबईमध्ये एम.एस्सी.साठी सहभागी झालो. त्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये कंपन्यांनी रिक्रूट केलं होतं. परंतु त्या दिशेने जाण्यापेक्षा खगोलशास्त्रात संशोधन करण्याचं मनाशी पक्कं ठरवलं होतं. तशी संधीदेखील मिळाली. आणि मी जर्मनीच्या पोट्सडॅम विद्यापीठात संशोधनाला सुरुवात केली. तिथूनच डॉक्टरेट मिळविली. संशोधनासोबतच शिकविण्यातही मला विशेष रुची होती आणि पोस्टडॉक्टरेट करताना संशोधनाची आवडही जपता येणार होतीच. म्हणूनच मी बाहेर कुठे न जाता होमी भाभा विज्ञान शिक्षा केंद्रामध्ये रुजू झालो. इकडे खगोलशास्त्र या माझ्या आवडीच्या विषयात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी घ्यायला लावणं ही मोठी जबाबदारी आहे. ती पार पाडताना मला नेहमीच आनंद वाटतो.

सध्याच्या पिढीला संशोधनाकडे वळण्यासाठी भारतात भरपूर संधी उपलब्ध असल्याचं डॉ सुळे सांगतात. मात्र मूलभूत विज्ञान ही आवडीने करण्याची गोष्ट आहे. पण ती शाळांमधून घोकून घोकून करवून घेतली जाते, असे ते नमूद करतात. याबद्दल अनिकेत सुळेंनी एक उत्तम उदाहरण दिले. एकदा एका शाळेच्या वर्गात बाईंनी प्रश्न विचारला की विजेची बटणे नेहमी प्लास्टिकची का असतात? त्यावर एका मुलाने उत्तर दिले ‘आपल्याला शॉक लागू नये म्हणून ती प्लास्टिकची असतात.’ तेव्हा शिक्षिकेने त्याला समजावलं की अरे, असं नाही सांगायचं. आधी म्हणायचं की प्लास्टिक हा विद्युतरोधक पदार्थ आहे. खरंतर बटणं प्लास्टिकची असण्याचं वैज्ञानिक कारण त्या मुलाला कळलं होतं. परंतु शैक्षणिक व्यवस्था आपल्याकडील विद्यार्थ्यांना पाठांतरात अडकवून टाकते आणि तीच चौकट  मोडण्याचा प्रयत्न आम्ही ऑलिम्पियाडची तयारी करवून घेताना करत असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विषय अवगत होईल. हीच तयारी विद्यार्थ्यांच्या बाबतीत शालेय स्तरावर करून घेण्यात आली तर मूलभूत विज्ञानाची गोडी असणारे विद्यार्थी आपोआपच निर्माण होतील व या विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला नक्कीच पाहायला मिळेल.

संशोधनातील भारतात उपलब्ध असणाऱ्या संधींबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की या बाबतीत भारताची सद्य:स्थिती गेल्या काही वर्षांच्या तुलनेने कमालीची सुधारलेली पाहायला मिळते. आज देशात मूलभूत विज्ञानाचे शिक्षण देणाऱ्या आयसर, सीबीएस, टीआयएफआर अशा महत्त्वाच्या संस्था आहेत जेथे बारावीनंतर लगेचच मूलभूत विज्ञानाचे शास्त्रोक्त धडे विद्यार्थ्यांना गिरविता येऊ शकतात. शिवाय भारतात मूलभूत विज्ञानासाठी दिली जाणारी स्कॉलरशिपची रक्कमही बरीच आहे, जेणेकरून लोक मूलभूत विज्ञानाकडे आकर्षति होऊ शकतील. तसेच  आयआयटी, एनआयटीसारख्या संस्थाही तंत्रज्ञानासोबतच मूलभूत विज्ञानाला प्राधान्य देताना दिसतात. या साऱ्यांखेरीज बीएआरसी, डीआरडीओ, एनसीएल आयुका एनसीआरए यांसारख्या जगमान्य संशोधिका भारतात उपलब्ध आहेत. या संधी सध्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. शिवाय झपाटय़ाने होणारी तंत्रज्ञानातील प्रगती हेदेखील संशोधन क्षेत्रात होणाऱ्या प्रगतीचं द्योतक आहे, ज्यातून मूलभूत विज्ञान आणि संशोधनातील अनेक संधी नजीकच्या काळात उपलब्ध होऊ शकणार आहेत. याबद्दल उदाहरण देताना डॉ. सुळे खगोलशास्त्राचेच उदाहरण देतात. काही वर्षांपूर्वी खगोलशास्त्र करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रात संधी उपलब्ध नव्हत्या, परंतु आता एनआयटी, आयसरसारख्या संस्थांमध्ये खगोलशास्तर हा विषय कार्यान्वित आहे व त्यासाठी प्राध्यापकांची नितांत आवश्यकता आहे. परंतु  म्हणून सगळ्यांनीच मूलभूत विज्ञान आणि संशोधनाकडे वळावे असाही त्याचा अर्थ नाही. विषयाची आवड आहे, त्याबद्दल पडणारे प्रश्न व जिज्ञासा विद्यार्थ्यांला त्या विषयाकडे वळायला प्रवृत्त करत असेल तरच संशोधनाकडे वळावे, असा सल्लाही डॉ. सुळे यांनी दिला.
प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com