स्मरण

प्रतिभा वाघ – response.lokprabha@expressindia.com

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
vidya balan express adda
Video: विद्या बालन व प्रतीक गांधी यांची ‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या निमित्तानं खास मुलाखत, पाहा LIVE
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे अधिष्ठाता तसंच प्रसिद्ध दिवंगत चित्रकार प्रा. प्रल्हाद अनंत धोंड यांच्या  जलरंगातील चित्रांचं प्रदर्शन ११ जून रोजी जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू होत आहे. हे प्रदर्शन १७ जूनपर्यंत असेल. त्यानिमित्त-

दिवंगत चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड म्हणजेच धोंडसर. विद्यार्थ्यांचे प्रा. धोंड आणि धोंडमास्तर आणि सगळ्यांचे भाई!

समुद्रावर अपरंपार प्रेम करणाऱ्या ‘भाईंचा’ समुद्र हा परममित्र, तत्त्वज्ञ सखा आणि गुरू होता. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘समुद्राच्या लाटांची दुरून येणारी गाज ऐकली की वाटते जणू समुद्र स्वत:च मला काळाच्या स्पंदनांची आणि जीवनाच्या कोलाहलाची सतत आठवण करून देतो आहे. पाण्यात मुक्तपणे फिरणारे मासे, जसे कोळ्याच्या जाळ्यात अडकतात तसेच आपणही निसर्गाच्या ठरावीक मर्यादेपुढे जाऊ शकत नाही. ते पुढे म्हणतात, ‘‘मी अशी नाती शोधतो आहे की ज्यात आपुलकी असेल आणि जी नव्याने निसर्ग आणि मानवाला जोडतील.’’ निसर्गापासून दुरावत चाललेल्या माणसांकरिता एक महत्त्वाचा संदेशच जणू भाई देतात, असे वाटते!

धोंडसरांचा जन्म, रत्नागिरीचा, ११ डिसेंबर १९०८ सालचा. लहानपणीच वडील वारल्यामुळे सरांचे मामांकडे मालवणला प्राथमिक शिक्षण झाले. कलाशिक्षक मामांकडून तसंच टोपीवाला हायस्कूलमध्ये ‘पेडणेकर’ मास्तरांकडून त्यांना कलासंस्कार मिळाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर १९३० साली त्यांच्या काकांनी त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यावेळी सॉलोमन डीन होते, पण ते काही काळासाठी युरोपला गेल्यामुळे एम. व्ही. धुरंधर डीनची जबाबदारी सांभाळत होते. त्याकाळी विद्यार्थ्यांचे काम पाहून प्रवेश दिला जाई. भाईंना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला ते त्यांचे काम चांगले म्हणूनच!

१९३१ मध्ये म्हणजेच भाईंनी प्रवेश घेतल्यावर पुढच्याच वर्षी मुंबई सरकारच्या बचत योजनेतर्फे नियुक्त केलेल्या थॉमस कमिटीने, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टवर होणाऱ्या खर्चात कपात म्हणून हे स्कूलच बंद करावे असा प्रस्ताव मांडला होता. त्याला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात धोंड यांनी धोपेश्वरकर यांच्याबरोबर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन ही योजना सरकारला रद्द करण्यास भाग पाडले.

जे.जे.मध्ये शिकत असताना अनेक चित्रकारांचा प्रभाव भाईंवर पडला. त्यात होते रावबहादूर धुरंधर तसेच भाईंचे गुरू, अनंत आत्माराम भोसले, जे कमीत कमी रंग आणि कुंचल्यांच्या मर्यादित फटकाऱ्यामध्ये अप्रतिम चित्र करीत. भित्तिचित्रे, व्यक्तिचित्रे आणि रचनाचित्रे ही त्यांची खासियत. ते पाश्चात्त्यांपेक्षा ३० वर्षे पुढे होते, असे भाई त्यांच्याविषयी सांगत. जे. जे.मधील प्रिन्सिपॉल ग्लॅडस्टन सॉलोमन यांचाही प्रभाव भाईंवर होता. सॉलोमन सुवर्णपदक विजेते, साहित्यिक आणि कवी होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थी उदयपूरच्या शैक्षणिक सहलीला गेले होते. उदयपूर महालाच्या पाश्र्वभूमीवर सर्व विद्यार्थी दिवसभर चित्र करीत होते. फार तपशीलवार काम चालले होते. त्यावेळी सॉलोमन यांनी सर्वाना प्रश्न केला, ‘तुम्हाला इलस्ट्रेटर व्हायचे आहे की पेंटर?’ भाईंनी उत्तर दिले, ‘चित्रकार’. त्यावर सॉलोमन म्हणाले, ‘मग तो क्षण पकडायला शिका आणि बारकाव्यात न जाता चित्रातून वातावरण उभे करा’ भाईंनी पुढे आयुष्यभर हाच कानमंत्र लक्षात ठेवला. आणि ‘चित्रातील वातावरणनिर्मिती’ हे त्यांच्या चित्राचे वैशिष्टय़ बनले. त्यांच्या ‘सागर चित्रांमध्ये’ घोंघावणारा वारा, आदळणाऱ्या लाटा, मऊशार वाळू हे सारे फक्त डोळ्यांना दिसत नाही तर मनाला जाणवते. आपण प्रत्यक्ष तिथेच आहोत असे वाटते. हेच भाईंच्या चित्रांचे यश आहे.

आपण फक्त ‘सागरचित्रे’ रंगवावीत हा त्यांचा विचार पक्का झाला तो एका घटनेमुळे. १९३४ साली ‘रॉयल कलोनियल आर्ट सोसायटी ऑफ लंडन’ यांनी मुंबईत, रॉयल अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेतलेल्या चित्रकारांचे एक प्रदर्शन ‘तस्मानिया’ नावाच्या बोटीवर भरवले होते. महान जलरंगचित्रकार ‘रुसेल फ्लिंट’ यांची चित्रेही यात होती. एकाच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारांनी काढलेली ती चित्रे पाहून भाईंच्या मनात आले की, आपल्याला समुद्र हा विशेष आवडतो. मग आपण फक्त ‘सागरचित्रे’ म्हणजेच ‘सी स्केप’च का रंगवू नयेत? मालवणचा संपूर्ण किनारा त्यांच्या डोळ्यासमोर आला. हाच आपल्या चित्रांचा विषय असे त्यांनी मनाशी पक्के ठरविले आणि आयुष्याच्या अंतापर्यंत हजारो ‘सागरदृश्ये’ चित्रित केली.

प्रारंभी प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन काम करणारे चित्रकार धोंड नंतर नंतर प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन आपल्या वहीत तेथील दृश्यांची स्केचेस करून निसर्गदृश्य पूर्ण करीत. कधी कधी नॅशनल जिओग्राफिकमधले आवडलेले निसर्गदृश्य, ते स्मरणाने कागदावर चित्रित करीत परंतु ती नक्कल नसे तर त्या चित्राला आधुनिकतेचा स्पर्श असे. ‘मला आधुनिकवादी मंडळींविषयी आकस नाही. पण आपल्या परंपरेला विसरून एखाद्या ‘ईझम’च्या मागे लागणे ही एक सोपी पळवाट आहे,’ असे त्यांचे मत होते. आपल्या चित्रनिर्मितीचे तंत्र दुसऱ्यांना दाखवण्यास अनेक कलावंत तयार नसतात. पण चित्रकार धोंड यांची प्रात्यक्षिके मात्र सर्वाना मनमुराद पाहायला मिळत. मोठाल्या फ्लॅट ब्रशने अथवा स्पंजने ते जलरंगाची जी किमया कागदावर साधत, जी हुकमत रंगावर गाजवत त्याला तोड नसे. त्यांची फक्त निळ्या रंगातील चित्रे कधीही एका रंगसंगतीतील वाटत नसत.

त्यांनी २००० साली केलेले त्यांच्या हयातीतील शेवटचे पेंटिंग. त्यात खूप कमी रंग, आहेत. मोजकेच काम आहे. मावळतीनंतर दूरवर चाललेली शिडाची बोट ती खास शैलीतील धवलरेषा, मोजकी माणसे. जणू, त्या बोटीला निरोप देताहेत! ती बोट निरोप घेते आहे!

चित्रातील घनाकाराचे महत्त्व पटल्यामुळे, आपल्या चित्रातून धोंड सर झाडे दाखवत ती घनाकारात! स्पंजने भरपूर पाणी कागदावर सोडायचे. पाण्याचा आवाका सांभाळत जमीन, समुद्र साकारायचा, एक एक रंग पसरू द्यायचा, हे झाल्यावर झाडे, होडय़ा, माणसे अशा आकृत्या काळसर, करडय़ा छटेत चटकन ब्रशने ठेवून द्यायच्या की झाले चित्र तयार! हे करत असतानाच एक पांढरी रेषा इथून तिथे पसरलेली दिसते. कधी कधी ती वीज असेल, तर कधी पाण्याची धार, तर कधी क्षितिजरेषा. रंगकाम करता करता भाई एकदम स्फूर्तीचा झटका येऊन ती पांढरी रेषा करीत आणि त्यांच्या चित्रातील खरी गंमत आहे ती सफाईदारपणे सोडलेली पांढरी रेषा.. ती धवल रेषा.

१९५८ साली जे. जे.चे अधिष्ठाता असताना त्यांनी ‘मॉडर्निझम’चा सखोल अभ्यास केला. मॉडर्निझममुळे विद्यार्थ्यांमध्ये एक गैरसमज मूळ धरू लागला होता आणि तो म्हणजे, ‘काहीही केले तरी चालते.’ तो दूर करण्याचा धोंडसरांनी प्रयत्न केला. इम्प्रेशनिझम तत्त्वप्रणाली, धोंडसरांच्या विचारांशी जुळणारी होती. म्हणूनच ‘जे काम कॅमेरा एका फटक्यात करतो ते चित्रकारांनी करण्यात गंमत नाही. चित्रात चित्रकाराचे स्वत:चे वैशिष्टय़, शैली हवी,’ असे ते म्हणत.

भाईंच्या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणजे सहजता, ताजेपणा. पाण्याने ओथंबलेले ढग, नजरेस जाणवणारा वाळूचा पोत, समुद्रावरील वारा आणि कमीत कमी फटकाऱ्यातून साकारलेल्या मनुष्यकृती ही त्यांच्या चित्रांची वैशिष्टय़े आहेत. जलरंगाखेरीज ऑइल पेस्टलमध्येही त्यांनी केलेले ‘मुंबई इन अर्ली ५०’, कोलकातामध्ये असताना, बंगाली शैलीचा प्रभाव असलेले जलरंग आणि शाईमधील ‘झाडाचे चित्र’, करडय़ा रंगातील ‘बोरा बाझार’ या चित्रांचा उल्लेख करावासा वाटतो. ‘समुद्राचे बदलणारे विभ्रम’ त्यांनी चित्रित केले.

१९३४ साली धोंडसरांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षक प्रशिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी नुसते घोटीव सुंदर रेखाटन करणारे शिक्षक निर्माण न करता आधुनिक दृष्टी असलेले कलाशिक्षक निर्माण करणे त्यांना महत्त्वाचे वाटले. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. पुढे १९५८ साली ते जेजेचे अधिष्ठाता झाले. या आपल्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी तेथील आजवर चालत आलेल्या शिस्तीच्या नावाखालील अयोग्य प्रथांना मुरड घातली. विद्यार्थ्यांना स्वत:च्या शैलीप्रमाणे कला आविष्कृत करण्याचे स्वातंत्र्य दिले. कारण चित्रकला विषयात पंतोजींची शिस्त असू नये अशा मताचे सर होते. ‘‘कला ही चर्चा करण्याचा विषय नसून, जाणिवेचा, भावनात्मक अनुभवाचा विषय आहे. एवढेच नाही तर बुद्धिवादी प्रक्रिया आहे,’’ असे ते म्हणत. त्यांनी अभ्यासक्रमात कलेचा इतिहास, मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र हे विषय समाविष्ट केले. ‘‘माझे सहकारी कलाशिक्षक मला डीन किंवा प्राचार्य म्हणून ओळखत नाहीत तर ‘धोंडमास्तर’ म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. या हाकेत काहीतरी जादू आहे.’’ असं ते म्हणत असत.

जेजे स्कूलमधून बाहेर पडणारा चित्रकार एकांगी स्वरूपाचा राहू नये म्हणून काही उपक्रम राबवले. उदा. पं. रविशंकर यांच्या सतारवादनाचा कार्यक्रम. चित्रकलेच्या शिक्षणाला अन्य कलांचा पूरक अभ्यास व्हावा, कलांचे आंतरसंबंध यातून उलगडले जावेत, ही त्यामागची भूमिका होती. आजही ही परंपरा सुरू आहे. कालांतराने सहभोजन ही संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. त्यामुळे विविध क्षेत्रांतील नामवंताचे येण्याने, विचारांची देवाणघेवाण झाली. जनसंपर्क वाढला. त्यावेळचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या इच्छेनुसार शासनातर्फे दिले जाणारे साहित्य पुरस्कार जेजेमध्ये दिले जाऊ लागले. जे. कृष्णमूर्तीची व्याख्याने जे. जे. स्कूलच्या हिरवळीवर होऊ लागली. त्याचवेळी चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले जाई. त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळू लागला.

धोंडसरांनी चित्रकला शिक्षकाची रूढ प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न केले. १९९० साली ३० वर्षांच्या सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरव केला. त्यांच्या कलाकृतींची अनेक प्रदर्शने भरली. जाणकारांनी गौरव केला. रशिया, काबूल, अंकारा, चीन इथेही त्यांना प्रसिद्धी मिळाली. सॅनफ्रॅन्सिस्को, बर्लिन, म्युनीच येथील नामवंत व्यक्तींनी त्यांची चित्रे संग्रही ठेवली. रशियातील स्टॅलीनग्राडमध्ये, महाराष्ट्र एक्झिबिशन विंगमध्ये त्यांच्या चित्रांना अग्रक्रम मिळाला. अमेरिकेतील कलासंग्रहकांनी त्यांची चित्रे विकत घेतली. मुंबईत वयाच्या ९१ व्या वर्षी भरवलेल्या प्रदर्शनात नवीन चित्रे होती. निसर्गाची ओढ, प्रेम त्यांच्या शरीरात, मनात पूर्णपणे भिनली असल्यामुळे आजही त्यांची चित्रे विलक्षण वाटतात. ताजेपणा आश्चर्यचकित करतो.

वयाच्या ९१व्या वर्षीच्या प्रदर्शनावेळी ‘केरळ’च्या निसर्गसौंदर्यावर आधारित पुढील चित्रप्रदर्शन करण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. पण २१ एप्रिल २००१ ला वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे देहावसान झाले.

‘सौंदर्यनिर्मितीत परमेश्वराचे अस्तित्व आहे,’ असे धोंडसर म्हणत. त्यांच्या या दृष्टिकोनाला समृद्ध कल्पकतेची जोड मिळाली होती. त्यांच्याकडे निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती होती आणि उत्स्फूर्तपणे चित्ररचना करण्याचे ज्ञान होते. म्हणूनच त्यांची कला, पाश्चात्त्य शैली, तंत्र आणि आधुनिकतेच्या नावाखाली सुरू झालेल्या उथळपणाच्या आघातांना तोंड देत खंबीरपणे टिकून राहिली. त्यांची चित्रे दृश्यात्मक मोहकतेपेक्षा पारंपरिक सौंदर्य आणि कुंचल्यांच्या फटकाऱ्यांमुळे अधिक आनंद देतात. चित्रांमधून ते निसर्गामधील केवलाकारांच्या हळुवारपणाचा शोध घेत आहेत, असा भास होतो, तर चित्रातील अ‍ॅक्वा मशीन आणि कोबाल्ट ब्ल्यूच्या निळाईमुळे जणू वैश्विक वास्तव आणि सार्वभौमत्व प्रतिबिंबित होत असे. निसर्ग आणि मानवाला जोडणारी नवी नाती शोधण्याचा भाईंचा प्रयत्न त्यांच्या सागरदृश्ये आणि निसर्गचित्रातून नक्कीच सफल झाला आहे. या चित्रकलेतील ‘अगस्ती’ना मनोभावे वंदन.