‘ए, छोटा भीम लाव ना, मला बघायचंय आत्ताच्या आत्ता..’ असं म्हणत आमच्याकडे आलेल्या त्या छोटय़ा पाहुणीने एकदम भीमावतारच धारण केला. ‘काय हिची नेहमीची कटकट. काय आवडतं त्या कार्टूनमध्ये या कार्टीला देव जाणे.’ तिची आई वैतागत पुटपुटत होती. मात्र त्या माऊलीचं कोण ऐकतंय. कार्टून लागल्या लागल्या तो छोटा भीम जणू काही गोंद लावल्यागत एका जागी चिकटून बसला. तोपर्यंत त्याला शांत ठेवण्यासाठी मी माझ्या कप्प्यातला पसारा बाहेर काढला होता. त्यात काही खेळणी सापडताहेत का ते शोधता शोधता अचानक मला मी काढलेलं एक चित्र सापडलं. डक टेल्सनामक कार्टूनमधल्या अंकल स्क्रूजचे. लहानपणीचे माझे सगळ्यात आवडते कार्टून. हा पसारा ना खरं तर आपल्याला वस्तू सहजपणे सापडाव्यात म्हणून आवरण्यासाठी काढतो पण होतं उलटंच. त्या इतस्तत: विखुरलेल्या गोष्टीतल्या आठवणीत आपण कधी हरवून जातो ते आपल्यालासुद्धा कळत नाही.

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आरामाचा संपूर्ण अ‍ॅक्शन प्लान तयार असायचा माझा. त्यात कार्टून बघणं म्हणजे प्लानचा आत्माच. पावरपफ गर्ल्सपासून पोपॉय ते डेक्सटर्सपर्यंत अगदी सर्वच्या सर्व. आणि या सगळ्याबरोबर फ्री असायचा आई-बाबांचा ओरडा आणि ताई-दादाबरोबरची रिमोटसाठीची भांडणं. आणि या सगळ्या परीक्षांमधून तावूनसुलाखून पडून विजयी मुद्रेने मी कार्टून बघायचे. मला सगळ्यात जास्त आवडणारं कार्टून होतं डकटेल्स. अंकल स्क्रूज आणि त्याची ती नातवंडं एकदम धमाल उडवून द्यायचे. माणसासारखा स्वभाव असलेली ही बदकं. प्रचंड श्रीमंत पण कमालीचा कंजूष असलेला स्क्रूज मॅकडक आणि त्याला नकोशी वाटणारी त्याची तीन खटय़ाळ नातवंडं आणि त्यांच्या अफलातून करामती. या अंकल स्क्रूजची स्वत:ची एक कोठडी असते, जिथे त्याची सारी संपत्ती साठवलेली असते. बाकी सगळ्याला नाकं मुरडणाऱ्या स्क्रूजला या कोठडीतल्या सोन्याच्या नाण्यात मनसोक्त डुंबायला मात्र आवडते. लहानपणी पैशाचं अप्रूप वाटण्याइतकी अक्कल नव्हती. मात्र त्याच्या नाण्यांमध्ये पोहोण्याचं, त्याच्याकडे असलेल्या खासगी विमानाचं, वैमानिकाचं, त्याच्या मालकीच्या संशोधकाचं आणि संशोधनांचे अप्रूप असायचं. त्याच्या आवाजाने आई-बाबा कायम कान विटण्याची तक्रार करायचे. मला मात्र ते माझे जानी दोस्त वाटायचे. बदकं नुसतं पाण्यात पोहत नाहीत, ते आपल्यासारखं बोलतात, चालतात आणि वागतातसुद्धा हे बघायलाच मजा यायची. त्यातले खलनायक तर अजूनच मस्त. बिगल्स बॉय्स किंवा ती चेटकीण जे सतत स्क्रूजच्या संपत्तीच्या मागे लागलेले असतात आणि प्रत्येक वेळी त्यांच्या प्लॅनमध्ये अपयशी ठरतात.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Unicorns List India ranks third
Unicorns List: अमेरिका व चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या स्थानावर
lonavala porn video maker arrested marathi news
लोणावळ्यात पॉर्न व्हिडीओ तयार करणारे टोळके गजाआड, अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करत होते व्हिडीओ

आजच्यासारखं प्रत्येक गोष्टीत तर्क-वितर्क लावून त्याचं लॉजिकल उत्तर शोधण्याचा तो काळ नव्हता आणि तशी गरजही नव्हती. आज मागे वळून पाहताना ‘कीप इट सिम्पल सिली’चा अर्थ आपसूकच कळतो.
प्राची साटम