00-navratri-logo-lpदुर्गापूजेला धार्मिक, पारंपरिक आणि ऐतिहासिक संदर्भही आहे. वैदिक काळात देवीला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते, पण मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील संशोधनावरून वेदपूर्वकाळापासून शक्तिउपासना प्रचलित असल्याचे सिद्ध होते.

‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Loksatta editorial Today marks the 40th anniversary of India successful Siachen Digvijaya campaign Operation Meghdoot
अग्रलेख: सियाचीनचा सांगावा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥’

अखिल विश्वातील मंगलरूप जे जे आहे त्यातील मांगल्यरुपिणी, प्राणिमात्राचे शाश्वत कल्याण करणारी, सर्व पुरुषार्थ साध्य करून देणारी, शरणागतांना आश्रय देणारी गौरवर्णी देवी नारायणी हिचे स्तवन म्हणजेच नवरात्रातील देवीची आराधना होय. दुर्गापूजा म्हणजे देवीची- शक्तीची पूजा. ‘या देवि सर्वभूतेषु मातृरुपेन संस्थित:’ अशा पूज्य भावनेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शंकर यांनी अमंगलाच्या विनाशार्थ आपल्या तेजातून साकारलेले त्रलोक्यव्यापी स्त्रीरूप म्हणजे दुर्गादेवी. असुरमर्दिनी आणि मातृरुपिणी तसेच धनधान्य व सुखसमृद्धी प्रदायिनी म्हणून विविध रूपांमध्ये देवीचे आपल्याकडे श्रद्धेने पूजन केले जाते. या श्रद्धेची परिणती म्हणजे नवरात्रात केली जाणारी दुर्गापूजा- स्त्रीशक्तीची पूजा.

असे म्हणतात की, फार पूर्वी आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. असे मानले जाते की सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा मनुष्यप्राण्याच्या अस्तित्वाशिवाय पृथ्वीवर चेतना निर्माण होणार नाही याची ब्रह्मदेवांना कल्पना होती आणि म्हणून त्यांनी मातीची एक मूर्ती बनवली व आपल्या दैवी शक्तीने ती सजीव केली. ती स्त्री होती. या पृथ्वीवरचा पहिला मनुष्यप्राणी म्हणजे स्त्रीच होती हा याचा अर्थ. स्त्रीदेवतेच्या सामर्थ्यांचा सर्वप्रथम साक्षात्कार घडवून आणणारी आद्य देवता म्हणजे आदिती. या संदर्भात

ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील ‘आदिती द्यो’ने सुरू होणारे १५५ वे सूक्त पाहता येईल. गौतम राहूगणा हे वैदिक ऋ षी ‘वांगाभृणी’ या स्त्रीचा उल्लेख करताना म्हणतात, ‘स्त्री हीच सर्व काही आहे. आदि- अंत, अंतरिक्ष, माता- पिता, पुत्र, विश्वदेव, पंचजन, भूत आणि भविष्यातही तीच आहे. त्यामुळेच आपल्या पुराणकथांमध्ये स्त्रीच्या कर्तृत्वाचे उल्लेख करताना तिला ‘आदिशक्ती’ असे संबोधन दिल्याचे आढळते. देवकुलातील सर्व देव संकटात सापडले किंवा असुरांचा नि:पात करण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न थकल्यावर त्यांनी ‘आदिशक्ती’कडेच धाव घेतल्याचे अनेक प्रसंग पुराणात आहेत.

आपल्या पुराणातील कथा सांगतात, की महिषासुर नावाच्या राक्षसाने दहा हजार वर्षे तपश्चर्या करून निर्माणशक्तीला म्हणजे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून अमरत्वाचा वर मागितला. ‘तुला अमर होता येणार नाही’ असे ब्रह्मदेवांनी सांगितल्यावर, ‘मला स्त्रीच्या हातून मरण येऊ दे’ असे महिषासुराने मागणे मागितले. त्यावर ब्रह्मदेवांनी अर्थातच ‘तथास्तु’ म्हटले. असे मानले जाते की तपश्चर्या करून मिळवलेली प्रचंड शक्ती महिषासुराने राक्षस निर्माण करण्यासाठी उपयोगात आणली. या राक्षसांच्या दुष्टपणामुळे पृथ्वीवर सर्वत्र अराजक माजले. त्यामुळे विश्वातील सर्व कल्याणकारी शक्तींना एकत्र येण्याची आवश्यकता निर्माण झाली. महिषासुराला स्त्रीच्या हातून मरण येणार असल्याने सर्व देवतांनी पार्वतीमातेची आराधना करून आपआपल्या सर्व शक्ती तिच्या ठायी एकवटल्या. पार्वतीमातेने दुर्गेचे उग्र रूप धारण केले व  प्रत्येक देवतेचे एक एक आयुधे स्वीकारले. दुर्गेचे अठरा हात म्हणजे महिषासुरासारख्या दुष्ट आणि बलाढय़ शक्तीच्या विरोधात तिने उचललेली अठरा शस्त्रे आहेत. सिंहावर आरूढ होऊन दुर्गेने गर्जना करताच तिच्याभोवती असंख्य स्त्रियांचे सैन्य जमा झाले. या स्त्रियांचे संघटन बांधून दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस वेगवेगळे अवतार घेऊन युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध करून निर्णायक विजय मिळवला, असे सांगितले जाते. या सर्वज्ञात कथेचा संदर्भही नवरात्रीला आहेच.

आपल्याकडील सर्व सण आणि धार्मिक परंपरा ऋ तुचक्राशी निगडित आहेत. त्यामुळे निसर्गचक्राच्या गतीमुळे होणाऱ्या बदलांचे परिणामही महत्त्वपूर्ण ठरतात. आश्विन महिन्यात ऋ तुबदल होत असतो. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याआधीचा हा संधिकाल असतो. बृहत्संहितेनुसार सूर्य आणि इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांचा प्रभाव हा माणसाच्या आयुष्यावर तसेच इतर मनोव्यवहारावरही पडत असतो. हीसुद्धा एक प्रकारची शक्तीच असते. म्हणूनच वर्षभरातील हा नऊ दिवसांचा कालावधी उपासनेसाठी महत्त्वपूर्ण मानला गेला आहे.

22-durga-lp

वर्षांऋ तूची सांगता होताना नवी शक्ती निर्माण झालेली असते. तिच्या परावर्तनासाठी नवरात्रीच्या उपासनेला असाधारण महत्त्व आहे.

अश्विन महिन्यात नवरात्रीच्या काळात करावयाची शक्तीची उपासना एरवीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात. ती पद्धत अशी- घरातील देव्हाऱ्यात देवीची प्रतिमा किंवा टाक असतो. तो तेथून उचलून वेगळ्या पाटावर ठेवतात. नऊ दिवस ही प्रतिमा किंवा टाक तेथून न हलवता तेथेच पुजला जातो. बाजूला पाण्याने भरलेल्या कलशावर विडय़ाची पाने व नारळ ठेवतात. त्यानंतर कलशाच्या सर्व बाजूंना शेतातील काळी टाकून त्यात गहू पेरतात. पाणी दिले की गव्हातून अंकुर फुटतात. कलशावरील नारळाला झेंडूची माळ बांधलेली असते. त्याच्या बाजूला समई आणि निरंजन तेवत असतात. या काळात आदिशक्ती भगवतीचे गुणवर्णन करतात किंवा देवीसप्तशतीचे पाठ करतात. तांब्यावर नारळ ठेवून, सिद्ध केलेला कलश हा मानवी देहाचे प्रतीक आहे. सर्व प्रकारच्या शक्ती या कलशात विद्यमान आहेत, असे मानले जाते. जणू देहरूपी कलशच देवीपुढे मांडला जातो. योगशास्त्राचा अभ्यासही या नऊ दिवसांतच करायचा असतो. शरीररूपी कलशच योगरूपी अग्नीत भाजून शुद्ध करायचा आहे, असे येथे गृहीत धरतात. कलशाभोवती उगवलेल्या गव्हातून फार मोठय़ा शक्ती मिळतात. असा सावलीत वाढलेला गहू आणि त्याचा रस हे फार उत्तम शक्तिवर्धक औषध समजले जाते. जुने त्वचेचे विकार, मूतखडा, दातांचे रोग, पोटदुखी, अस्थमा, वार्धक्य असे अनेक विकार या गहू रोपरसाने बरे होतात. ऋ तुमानानुसार विश्वातील अनेक शक्तींचा आरोग्यवर्धनासाठी उपयोग करून घेण्याची आपल्या आयुर्वेदाची आणि धर्मशास्त्राची परंपरा आहेच! देव्हाऱ्यात रात्रंदिवस दिवा तेवत ठेवल्याने शक्तीच्या उपासनेला वेगळाच अर्थ प्राप्त होतो. तेजाच्या समोर बसून तेजच मागायचे असते.

नवरात्रात ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणून आपण देवीची उपासना करतो. ‘महि’ म्हणजे मन आणि ‘षा’ म्हणजे जसे. मनरूपी असुर शरीराचा ताबा घेतो आणि त्यातील चांगल्या गोष्टीचे निर्दालन करतो. त्या मनावर विजय मिळवून देण्याची प्रेरणा आपल्याला उपासनेतून मिळते. त्यामुळेच शक्तीच्या उपासनेसाठी नवरात्रीचा उत्सव केला जातो. कारण ‘शक्ती’ नसेल, तर ‘शिवा’चाही ‘शव’ होतो आणि म्हणूनच या चराचरामध्ये ‘शक्ती’ला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. लक्ष्मीमंत्रामध्ये सामथ्र्य, पराक्रम आणि प्राण हे शक्तीचे तीन अर्थ सांगितले आहेत. शक्तीची तीन रूपे आपल्याला परिचित आहेत. ‘महाकाली’ (तमोगुणी), ‘महालक्ष्मी’ (सत्त्वगुणी) आणि ‘महासरस्वती’ (रजोगुणी) या तीनही रूपांच्या उत्पत्तीची कथा ‘मरकडेय पुराणा’तील सप्तशतीत दिलेली आहे. तिचा सारांश असा, लढण्याचे सर्व प्रयत्न संपल्यावर देवांनी दुर्गा, लक्ष्मी व पार्वती या स्त्री-देवतांकडे धाव घेतली. त्या वेळी आदिशक्तीने अभिवचन दिले आणि सांगितले की, ‘‘जेव्हा दैत्य- दानव तुम्हाला उपद्रव देतील, तेव्हा मी अवतार घेऊन त्यांचे निर्दालन करेन.’’

नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा उत्सव, असा आपण साधा सरळ अन्वयार्थ मांडतो. ‘नऊ’ या अंकाला अध्यात्मशास्त्रात असाधारण महत्त्व आहे. एकपेशीय जीवापासून मनुष्यशरीराची रचना होऊन मातेच्या उदरातून बाहेर येण्यासाठी लागणारा कालावधी नऊ महिने नऊ दिवस आहे. माणसाला कोणतीही सवय लागण्यासाठी नऊ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. उपास्य देवतेची भक्ती नऊ प्रकारे करता येते. श्रवणम्, कीर्तन, विष्णुस्मरणं, पादसेवनम्, अर्चनम्, वन्दनम्, दास्यम्, संख्य आणि आत्मनिवेदनम्, यातून साकार होणारी भक्ती ‘नवविधा’ आहे. गणितात आणि शक्तितंत्रात नऊ हा अंक परिपूर्ण मानला गेला आहे. कारण नऊ या अंकाची कितीही पट केली तर येणाऱ्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज ही नऊच भरते. (जपमाळ १०८ मण्यांची असते हे

त्याचे कारण.) त्यामुळे नऊ हा  शक्तिउपासनेत श्रीशक्तिरुप दर्शविणारा सर्वात मोठा आणि म्हणूनच महत्त्वाचा अंक मानला गेला आहे.

नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते. पहिल्या दिवशी ‘शैलपुत्री’ म्हणजे तिच्या मूळ रूपाची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी ‘ब्रह्मचारिणी’ म्हणजे ब्रह्मपद देणारी, तिसऱ्या दिवशी ‘चंद्रघंटा’ म्हणजे नावाप्रमाणेच शांतचित्त- आत्मबळ प्रदान करणारी, चौथ्या दिवशी ‘कूष्मांडा’ म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी, पाचव्या दिवशी ‘स्कंदमाता’ म्हणजे यशस्विनी, सहाव्या दिवशी ‘कात्यायनी’ म्हणजे पालनपोषणकर्ती, सातव्या दिवशी ‘कालरात्री’ म्हणजे सर्वसंहारक, आठव्या दिवशी ‘महागौरी’ म्हणजे नवयौवना आणि नवव्या दिवशी ‘सिद्धीदात्री’ म्हणजे सकल मनोरथ पूर्ण करणारी म्हणून दुर्गेची पूजा केली जाते. या संदर्भात एक श्लोक आहे. तो असा –

‘प्रथम शैलपुत्रीच  द्वितीयं ब्रह्मचारिणी॥

तृतीयं चंद्रघंटेति  कुष्मांडेति चतुर्थकम्॥

पंचमं् स्कंदमातेती षष्ठमं कात्यायिनीति च।

सप्तमं कालरात्रीती  महागौरीतिचष्टिमम्॥

नवमं सिद्धीदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता:।’

नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रात्री या शक्तीच्या उपासना काळात देवीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. रणांगणावर युद्धासाठी उभ्या ठाकलेल्या देवीचे केवळ उग्ररूपच डोळ्यांसमोर आणायचे नसते, तर त्याबरोबरच तिचे शांतिरूप, श्रद्धारूप, बुद्धिरूप, मातृरूप आणि त्याचबरोबर स्फूर्ती देणारे चेतनारूपही मनात साठवायचे असते.

दुर्गापूजेला धार्मिक संदर्भ जसा आहे, तसाच पारंपरिक आणि ऐतिहासिक संदर्भही आहे. वैदिक काळात देवीला फारसे महत्त्व दिले गेले नव्हते, पण मोहेंजोदारो आणि हडप्पा येथील संशोधनावरून वेदपूर्वकाळापासून शक्तिउपासना प्रचलित असल्याचे सिद्ध होते. इंद्र, वरुण, वसू, मित्र, अग्नि यांसारख्या प्रभावी पुरुषदैवतांची आर्य उपासना करीत असत. सृजनासाठी ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’ यांची सारखीच आवश्यकता असते, हे लक्षात आल्यावर आर्यानी आदिती, उषा, सरस्वती यांची उपासना सुरू केली. त्याचबरोबर इला, अलक्ष्मी, श्रीवली या अनार्याच्या देवतांचा त्यांच्यावर  प्रभाव पडला. काही काळानंतर अनार्याच्या देवता आर्याच्या देवतांशी एकरूप झाल्या आणि त्यांची एकच देवता ‘दुर्गा’ झाली. नंतर दुर्गा ही देवी उमा, पार्वती, अंबिका, रुद्रानी या नावाने ओळखली जाऊ लागली. महादेव म्हणजे शिव हा वेदपूर्वकालीन देव असावा. बौद्ध काळात देवदेवतांचे माहात्म्य कमी झाले आणि त्याच वेळी शक्तीच्या धार्मिक व परंपरागत पूजेत इतर प्रथांचा समावेश झाला.

इतिहास सांगतो, की भारतवर्षांत शक्तिउपासनेची परंपरा अतिप्राचीनआहे. कथा, दंतकथा, लिखित आणि मौखिक रूपातून ती व्यक्त होत आली आहे. अगदी आदि शंकराचार्यानीही आदिमातेच्या शक्तीचे अधिष्ठान मान्य केले होते. प्रभू रामचंद्रांनी दुर्गादेवीचे पूजन करून तिचा आशीर्वाद घेतला आणि नंतर रावणाचा वध केला. सद्गुणाने दुर्गुणावर विजय मिळविण्याचे ते प्रतीक होते. आजही नवरात्राची सांगता झाल्यावर दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जाते त्याचे हेच कारण आहे. परंपरा, इतिहास यांच्याबरोबर आशयघन प्रतीकात्मकताही नवरात्रीशी आणि दुर्गापूजेशी निगडित आहे, ती अशी!
भालचंद्र गुजर – response.lokprabha@expressindia.com