News Flash

कथा : कर्तव्य

दादासाहेब सरदेशमुखांना आज अगदी कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते.

दादासाहेब सरदेशमुखांना आज अगदी कृतकृत्य झाल्याचे समाधान लाभले होते. गेले साताठ महिने ते सतत टेंशनमध्ये होते. आजच माधवी व मधुकर उटीला रवाना झाले होते. जातेवेळी माधवीच्या चेहऱ्यावरील हास्याची खळी पाहून ते मनोमन सुखावले होते.

दादासाहेबांना दोन मुलगे. पहिला माधव व दुसरा मधुकर. दोघेही इंजिनीयर होते. दादासाहेबांची पिढीजात श्रीमंती होती. शेतीभाती भरपूर बागायत जमीनही होती. स्वत: दादासाहेब उच्चविद्याविभूषित होते. चांगल्या सरकारी नोकरीत त्यांची उभी हयात गेली होती. वरिष्ठ पदावरील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतीभातीत लक्ष घातले होते. दादासाहेबांना सुधाताईंसारखी उत्तम गृहिणी असलेली सहचारिणी लाभली होती.

आलिशान बंगला, गाडी, नोकरचाकर काय नव्हते दादासाहेबांकडे? ऐश्वर्य ओसंडून जात होते. दादासाहेबांचा संसार अगदी सुखाचा होता. दोन मुले. दोघेही अत्यंत सालस व हुशार होते. दोघांनीही परीक्षेत कधीही पहिला नंबर चुकवला नाही. दादासाहेब व सुधाताईंना मुलीची खूपच हौस होती. पण ती काही त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नव्हती. तेवढीच उणीव दादासाहेबांच्या जीवनात होती.

माधव व मधुकर यांच्या वयात दोन वर्षांचेच अंतर होते. दोघेही भाऊ मित्रासारखे होते. दोघेही इंजिनीयरिंगची परीक्षा उत्तम तऱ्हेने पास झाले होते.

दादासाहेबांनी आधीच ठरवल्याप्रमाणे दोघाही मुलांना नोकरीच्या क्षेत्रात न ढकलता त्यांच्यासाठी कारखाना उभारून दिला होता. आता तो उत्तम रीतीने चालवून दाखवण्याची जबाबदारी मुलांची होती. मुलांनीही ती जबाबदारी उत्तम तऱ्हेने पार पाडून दाखवली होती. गेल्या २/३ वर्षांतील कारखान्याच्या ताळेबंदातील आकडेच तसे सांगत होते.

कारखान्याच्या वाढत्या व्यापात मुले गुरफटून गेली होती. मुले कारखान्यात व दादासाहेब शेतीत रमले असले तरी सुधाताईंनी मात्र माधवच्या लग्नाची दादासाहेबांमागे सारखी भुणभुण लावली होती. मग दादासाहेबांनी स्थळ पाहायचे ठरवून त्यांनी आपल्या मित्रमंडळींना पाठवून माधवची पत्रिका, फोटो इ. सर्व माहिती पाठवली होती.

अपेक्षेप्रमाणे भरपूर स्थळे चालून आली. पण ऊठसूट मुली पाहायला जाणे दादासाहेबांच्या स्वभावात नव्हते. आलेल्या फोटोंतून त्यांचे मित्र विनायकराव यांच्या धाकटय़ा कन्येचा फोटो त्यांना आवडला. देखणी, माधवला अनुरूप असणारी सुलभा त्यांना व सुधाताईंना पसंत होती. माधवला फोटो दाखवून त्याचे मत विचारले असता, ‘‘तुम्हीच काय ते ठरवा’’ असे उडते उत्तर देऊन तो घाईघाईने निघून गेला. चाणक्ष दादासाहेबांना त्याची पसंती समजायला वेळ लागला नाही.

पुढच्या पंधरा दिवसांत मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होऊन त्याच बैठकीत लग्नाची सुपारी फुटली. बघता बघता लग्न झाले.

सून घरी आली. सुधाताईंना सुनेला कुठे ठेवू अन् कुठे नको असे होऊन गेले. लग्नानंतर सुलभाचे नाव माधवने ‘माधवी’ ठेवले होते. लक्ष्मीनारायणासारखी माधव-माधवीची जोडी शोभत होती. माधवी त्या घराशी लवकरच समरस झाली. सुधाताईंनी तिच्या हाती घरातील सर्व सूत्रे सोपवून त्या निवांत झाल्या.

माधवीला घरकामाची गोडी होती. तशीच तिला बागकामाचीही आवड होती. सुंदर सुंदर फुलांची रोपे आणवून बागेचे स्वरूप पार बदलून टाकले. दादासाहेब व सुधाताईंना वेळच्या वेळी औषधे देणे, वेळच्या वेळी त्यांच्या जेवणखाण्याची ती काळजी घेत असे. त्यांच्या आवडीनिवडी जपत असे. रोजचे टपाल पाहणे, गोड बोलून गडी-माणसांकडून कामे करून घेण्याची तिला कला अवगत होती. माधवीविना त्या घराचे पानही हलेनासे झाले.

दादासाहेब व सुधाताईंची मुलीची इच्छा माधवीच्या रूपाने पूर्ण झाली. रात्री सर्व मंडळी एकत्र यायची. एकत्र जेवण आटोपल्यावर गप्पाटप्पा होत. रमीचेही २/४ डाव होत. माधव-मधुकर कारखान्यातील किस्से सांगायचे. कारखान्यातील काही प्रश्न असले तरी माधवीचे मत विचारात घ्यायचे. माधव-माधवीच्या लग्नाला ७/८ महिने होत आले होते.

एक दिवस त्या हसऱ्या घरावर दु:खाची वीज कोसळली. माधव काही कामासाठी आपल्या गाडीने पुण्याला गेला होता. कामे आटोपून रात्री परत येताना माधवच्या गाडीला सुसाट येणाऱ्या ट्रकने उडवले होते. गाडीचा चेंदामेंदा होऊन माधव जागेवरच गेला होता.

हा आघात मोठा होता. सारे घर दु:खात बुडून गेले. सुधाताईंच्या डोळ्यातून पाणी हटेना. माधवी तर सुन्न होऊन बसली. बागेतील फुले पार कोमेजली. मधुकर वेडापिसा झाला. कोणाचेही कशातच लक्ष लागेना. दादासाहेबांवर हा वज्राघातच होता.

पण कर्तव्य कोणाला चुकले आहे का? कारखान्याच्या कामगारांचा प्रश्न होता. अनेक कामे ठप्प झाली होती. दादासाहेबांनी स्वत:ला सावरले. मधुकरला कारखान्यात लक्ष घालायला लावले. पूर्ववत घरातील कामे चालू झाली, पण त्या घराचे चैतन्य हरवले ते हरवलेच.

सुधाताईंनाही समजावून त्यांना माधवीकडे लक्ष देण्यास बजावले. माधवीला बोलते करायचा ते दोघे प्रयत्न करीत होते. माधवीचे दु:ख प्रचंड होते.

माधवीचे वडील विनायकराव माधवीला माहेरी न्यावयास आले, पण तिने जावयास नकार दिला. पोरीची अवस्था पाहून विनायकरावांना भडभडून आले. पोरीच्या सुखी संसाराला नियतीचीच नजर लागली असे त्यांना वाटले.

माधवीची अवस्था पाहून दादासाहेबांनी मनाशी काही निश्चय केला. सुधाताईंशी विचारविनिमय केला. दोघांनी माधवीसमोर प्रस्ताव ठेवायचा ठरवून माधवीला बोलावून घेतले. माधवी येताच तिला बसायला सांगून ते म्हणाले, ‘‘माधवी, तू आमची सून असलीस तरी आम्ही तुला मुलगीच मानले आहे. मुलीचे सुख तू आम्हाला भरभरून दिले आहेस. आम्ही तुझे आई-बापच आहोत. तुझ्या भवितव्याची आम्हाला काळजी लागली आहे. जे घडायला नको ते घडले. पोटचा मुलगा गेल्याने आमची काय अवस्था झाली ते तू पाहतेच आहेस. एक जीव निघून गेला, पण इतरांचे- तुझे काय? एवढे सारे आयुष्य तू कसे जगणार? विचार कर मुली, तुझ्यामुळे घर हसरे झाले होते तसेच ते पूर्वीसारखे हसतेखेळते ठेव. तुझीच आम्हाला चिंता आहे. आमचे असे किती आयुष्य राहिले आहे? तुला सुखी पाहूनच डोळे मिटू. माधवीने त्यांना असे अभद्र न बोलण्याबद्दल विनवले. मग पोरी आमच्या प्रस्तावाचा विचार कर. आमच्या मधुकरशी विवाह कर. तुझी इच्छा नसेल तर तसे सांग. आम्ही दुसरे स्थळ पाहून तुझे लग्न लावून देऊ.

माधवी एकदम हडबडून गेली. मात्र सुधाताईने माधवीला जवळ घेऊन मुली, आमच्या मुलीचे असे झाले असते तर आम्ही हाच विचार केला असता. कोणताही निर्णय असो, विचार करून घे! पण तुझे आयुष्य वाया जाणे आम्हाला सहन होणार नाही.

त्याच रात्री दादासाहेब व सुधाताईंनी मधुकरजवळ हा विषय काढला. माधवीला मुलीच्या ठिकाणी आम्ही मानतोय. तिला आधार देणे आपले कर्तव्य आहे. जर तुम्हा दोघांनाही हे मान्य नसेल तर मात्र मी तिचे कन्यादान नक्कीच करणार. दोघेही एकमेकांशी बोला. घराचे सौख्य टिकवा.

दादासाहेब एवढय़ावरच थांबले नाहीत. त्यांनी विनायकरावांना बोलवून त्यांचेही मत घेतले. दोनच दिवसांनी माधवी-मधुकरने विवाह करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली व दादासाहेबांनी वैदिक पद्धतीने त्यांचा घरगुती विवाह करून दिला. व आजच ते दोघे उटीला रवाना झाले.

दादासाहेबांचा बंगला पुन्हा हसू लागला. बागेतील फुले बहरू लागली. दादासाहेब, सुधाताई व विनायकराव या सर्वाचेच दडपण नाहीसे झाले.

माधवच्या फोटोकडे त्यांचे लक्ष गेले. फोटोतला माधव त्यांच्याकडे समाधानाने पाहत होता. दादासाहेबांचे डोळे पाण्याने भरून आले. ते एका फार मोठय़ा कर्तव्यातून मुक्त झाले होते.
विलास पाटणेकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:17 am

Web Title: duty
Next Stories
1 कथा : डबक्यातले इंद्रधनुष्य
2 कथा : आठवणींच्या हिंदोळ्यावर…
3 कथा : नवं नातं
Just Now!
X