उत्स विशेष
शमिका वृषाली – response.lokprabha@expressindia.com
श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रतवैकल्ये केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. कृष्ण हा ईश्वर, ज्येष्ठ राजनीतिज्ञ, गोपिकांचा सखा अशा अनेक स्वरूपांत प्रसिद्ध आहे. या कृष्णाच्या प्रेमात न पडणारे विरळच आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र कृष्णभक्त सापडतातच. याचे प्राचीन उत्तम उदाहरण म्हणजे हेलिडोटोरस. हेलिडोटोरस हा इंडो ग्रीक राजाचा राजदूत भागभद्र या शुंग राजाच्या दरबारात कार्यरत होता. विदिशा येथील इसवी सनपूर्व पहिल्या शतकातील स्तंभ शिलालेखात ग्रीक राजदूत हेलिडोटोरस हा स्वत:ला ‘भागवत’ म्हणवून घेतो. यावरूनच कृष्णभक्तीची परंपरा ही किती जुनी असावी हे लक्षात येते. ग्रीकही कृष्णाच्या प्रेमातून अलिप्त राहू शकले नाहीत. गोकुळाष्टमी या सणाच्या निमित्ताने आपण याच कृष्णतत्त्वाची उपासना करतो. म्हणूनच या सणाचे निमित्त साधून याच कृष्णाशी निगडित असणाऱ्या एका ऐतिहासिक पलूचा आढावा घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्रिटिश आमदानीत अभ्यासकांनी रामायण व महाभारत तसेच इतर पौराणिक साहित्य या भाकडकथा आहेत म्हणून घोषित केल्या, ते साहजिकच होते. तत्कालीन विदेशी अभ्यासकांनी त्यांच्या संस्कृतीतील समाजरचनेनुसार किंवा त्यांच्या प्रादेशिक ऐतिहासिक मापदंडानुसार भारतीय इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. ज्या देशावर नेहमी परकीयांनी राज्ये केली, नेहमी परकीय आक्रमणे होत राहिली त्या भूमीत रामायण, महाभारत या केवळ कथाच असू शकतात असे प्रतिपादले जाऊ लागले, त्यामागची सत्यता पडताळून पाहण्यात आली नाही. यामधूनच मग  आर्य भारताबाहेरून आले (आर्यन थिअरी) यासारखी गृहितके मांडली गेली त्यातून अनेक यक्षप्रश्न निर्माण झाले. भारताचा इतिहास हा अ‍ॅलेक्झांडरपासून सुरू होतो असे मानले जाऊ लागले, परंतु या पार्श्वभूमीवर एक आश्चर्याची घटना घडली, ही घटना जगाचा इतिहास बदलणारी ठरली. असंस्कृत भारतीय इतिहासाला ‘सुसंस्कृत’ बनवणारी हडप्पा संस्कृती जगासमोर आली. जगात चार प्राचीन मानल्या जाणाऱ्या संस्कृतींत ही हडप्पा संस्कृती गणली जाऊ लागली. या संस्कृतीची अनेक स्थळे उघडकीस आली; यामध्येच गेल्या काही दशकांत एक महत्त्वपूर्ण स्थळ आपला संबंध या संस्कृतीशी दर्शवत होते; हे म्हणजे द्वारका. द्वारकेचा कृष्णाशी असलेला संबंध आणि त्याच वेळी हडप्पा संस्कृतीशी असलेला संबंध हा भारतीय पौराणिक संस्कृती व भारतीय इतिहास या दोन्ही गोष्टींना आत्मचिंतन करायला लावणारा होता. आज आपण श्रीकृष्णाच्या ज्या शहराला द्वारका म्हणून ओळखतो, त्या शहराचे जुने नाव द्वारिका. भारतीयांच्या जीवनात द्वारकेचे वेगळेच महत्त्व आहे. आपल्या संस्कारातून, मनातून कृष्ण जसा आपण वेगळा काढू शकत नाही तसेच द्वारकेचे अस्तित्व भारतीयांच्या संस्कारातून पर्यायाने इतिहासातून वगळता येत नाही. पौराणिक कथा म्हटल्या, कीत्यात तथ्य किती, हा प्रश्न नेहमीच उभा राहतो आणि भारतात तर हा प्रश्नच जटिल केला गेला आहे. एक तर या कथा भाकड ठरविल्या जातात किंवा त्यांचे सादरीकरण अद्भुत दैवीकरणाच्या आच्छादनात केले जाते. त्यामुळे या कथांच्या गíभताकडे साहजिकच दुर्लक्ष होते. ऐतिहासिक तथ्य हाताळत असताना कुठल्याही पुराव्याला कमी लेखून चालत नसते; म्हणूनच साहित्यिक पुरावा हादेखील इतिहासात तितकाच महत्त्वपूर्ण असतो. एखादे साहित्य मग ते धार्मिक असो किंवा अधार्मिक, ते तत्कालीन समाजाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यातील अद्भुततेचा किंवा लालित्याचा भाग वगळून त्याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे असते. तसेच महाभारत- द्वारका यांच्या संदर्भात झालेले आढळते. भारतीय धार्मिक संकल्पनेत महाभारत, कृष्ण, द्वारका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौराणिक साहित्यातून श्रीकृष्णाने वसवलेल्या द्वारकेविषयी भरभरून लिहिलेले आहे. आता ही द्वारका अस्तित्वात होती का, असा प्रश्न निर्माण होतो? गेल्या पन्नास वर्षांत झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनातून द्वारकेचे अस्तित्व सिद्ध झालेले आहे; परंतु याबरोबरच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dwarka ancient facts
First published on: 07-09-2018 at 01:00 IST