21 March 2019

News Flash

एकटय़ाने युरोप फिरताना…

युरोपने मला नेहमीच आकर्षित केले आहे.

पर्यटन विशेष
शहरांमधील ‘शांततामय’ गोंधळाचा, तिथल्या असाधारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, तिथल्या अनोख्या खाद्यसंस्कृतीचा, फुलांनी, पक्ष्यांनी बहरलेल्या हिरव्यागार मैदानांचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही युरोप पूर्णत: अनुभवले नाही असेच म्हणावे लागेल.

युरोपने मला नेहमीच आकर्षित केले आहे. संधी मिळाली तर तिथे पुन:पुन्हा जाण्यासही माझी काही हरकत नाही. सहा वर्षांपूर्वी मी माझ्या आईबरोबर स्वित्र्झलडमधल्या अनेक निसर्गरम्य शहरांचा आणि त्यानंतर पॅरिस आणि लंडनमधल्या विविध सौंदर्यस्थळांचा आनंद लुटला होता. आमची ती सफर एका पर्यटन कंपनीने आयोजित केली होती ज्यामुळे आमचा प्रवास खूप सोपा झाला होता; पण युरोपची सफर इतकी सोपी झाली तर त्यात मजा कसली? तुम्ही युरोपियन शहरांमधील ‘शांततामय’ गोंधळाचा, तिथल्या असाधारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, तिथल्या अनोख्या खाद्यसंस्कृतीचा, फुलांनी, पक्ष्यांनी बहरलेल्या हिरव्यागार मैदानांचा अनुभव घेतला नसेल तर तुम्ही युरोप पूर्णत: अनुभवले नाही असेच म्हणावे लागेल.

माझा चुलतभाऊ २०१६ साली डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे त्याची मास्टर्स डिग्री करण्यासाठी जाणार होता. त्याने मला आणि माझ्या आई-बाबांना तिथे येऊन राहण्याचे आमंत्रण दिले. मला तर तिथे जायचे होतेच, कारण डेन्मार्क हा युरोपमधील एक सुंदर स्कँडिनेव्हीयन देश आहे; पण अभ्यास आणि काही कामामध्ये अडकल्यामुळे मी लगेचच तिथे जाण्याचा प्लान अमलात आणू शकलो नाही; पण एक वर्ष सरले, माझी परीक्षा संपत आली आणि माझ्या परदेश दौऱ्याच्या इच्छेने पुन्हा एकदा उसळी घेतली.

मग काय? मी लगेचच माझ्या भावाला मेसेज केला, ‘अरे, मला तिथे यायचंय!’ पण, आता तोच इथे येणार होता. मला तर परीक्षा संपल्यावर कसेही करून तिथे जायचेच होते. ‘‘नो प्रॉब्लेम!’’ बाबा म्हणाले, ‘‘तूच तुझी ट्रिप प्लान कर आणि जिथे तुला जायचेय तिथे जा.’’

याहून अधिक चांगले काय असू शकते? माझ्या मनात अचानक खूप जागा आल्या. ‘नॉर्वे? की मग स्पेन? नको, पोर्तुगाल बरा! की मग टर्की?’ हे असे चालूच राहिले! आता पुढचा प्रश्न.. एकटा जाऊ की एखाद्या मित्राबरोबर? मी माझ्या काही मित्रांना विचारले; पण त्यांच्या नकाराने उलट माझी परदेश दौऱ्याची इच्छा अधिकच प्रबळ झाली आणि एकटा जाण्याबाबतचा माझा विश्वास आणखीनच दृढावला. माझी एक मैत्रीण नुकतीच १८ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर एकटीच जाऊन आली होती. तिच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि असा विचार केला की, एकटा जाऊन तिथल्या युथ हॉस्टेल्समध्ये राहून सर्व काही स्वत:हून केले तर नवीन मित्र बनवण्याची संधी मला मिळेल आणि स्वातंत्र्य म्हणजे काय ते खऱ्या अर्थाने उपभोगायला मिळेल!

बास! ठरले तर मग! मी एकटय़ानेच युरोपला जाण्याचे नक्की केले. मी, मी आणि फक्त मी! सुरुवात म्हणून मी नेदरलॅण्ड्स, जर्मनी आणि झेक रिपब्लिकची निवड केली. माझ्या मैत्रिणीने याच जागांचा दौरा केला होता आणि मीसुद्धा सुरुवातीला तिथेच जाण्याचे ठरवले. नंतर त्यात बेल्जियमदेखील शक्य आहे असे मला जाणवले, कारण ते नेदरलँड्सच्याच शेजारी आहे. सहलीची पूर्ण आखणी मीच केली, विमानाची तिकिटे बुक झाली, हॉस्टेल्स बुक केली आणि माझ्या त्या साहसी सफारीसाठी सिद्ध झालो! पण, माझ्या नशिबाने माझ्यावर आश्चर्यकारक सुखांचा वर्षांव करायचा ठरवला होता, कारण तेव्हाच माझा चुलतभाऊ इथे आला आणि त्याने मला हे चार देश करून झाल्यानंतर कोपनहेगनला येण्याचे आमंत्रण दिले. माझ्या आनंदाला जणू उधाणच आले. डेन्मार्कच्या त्या सुंदर राजधानीत जाण्याची संधी मला अनायासे मिळाली होती. माझ्या ट्रिपचा तो अनोखा क्लायमॅक्स असणार होता. आता माझी ट्रिप सहा दिवसांनी वाढली आणि माझ्याजवळ तब्बल २० दिवसांच्या प्रवासाचा कालावधी होता!

माझा हा सगळा प्रवास ऑगस्ट महिन्यात, गणपतीच्या सुट्टीत होणार होता आणि यापूर्वी कधीही पाहिली नसेन तितक्या उत्साहाने मी ऑगस्ट महिन्याची वाट बघत होतो! पॅकिंग, करन्सी एक्सचेंज सगळे करून झाले आणि मी एका वेगळ्या जगात पाऊल टाकायला तयार झालो!

शेवटी, तो दिवस आला! १५ ऑगस्ट २०१७, मी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवले आणि ब्रुसेल्स, बेल्जियमच्या दिशेने झेपावलो, जिथे मी १६ ऑगस्टच्या सकाळी पोहोचणार होतो.

युरोप (यूके आणि दक्षिणेकडचे काही देश वगळता) भारतापेक्षा साडेतीन तासांनी मागे आहे. म्हणजे मी ब्रुसेल्ससाठी मध्यरात्री उड्डाण केले असले तरी प्रत्यक्षात मी तिथे भल्या पहाटेच पोहोचलो, एकदम फ्रेश, फिट आणि उत्साहात! ‘एक अकेला’ सफरीसाठी जय्यत तयार!

ब्रुसेल्स, बेल्जियम

ब्रुसेल्स, बेल्जियमची राजधानी असलेले हे एक सुंदर शहर! मी तिथे फक्त एकच दिवस होतो, पण माझ्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले. मी ‘हॉप ऑन, हॉप ऑफ’ बस टूर घेतली जी युरोपला जाणारे पर्यटक सर्वसाधारणपणे घेतात. त्या टूरने मला शहरातल्या ग्रँड प्लेस, बॅसिलिका, मानेकन पीस, आटोमियम आणि अशा असंख्य आकर्षणांची सैर घडवली. ब्रुसेल्स प्रसिद्ध आहे ते तिथल्या फ्राइजसाठी आणि अर्थातच वेफल्ससाठी! हे पदार्थ एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्यापेक्षा त्याची मजा रस्त्यातल्या फूड व्हॅनमधून खाण्यातच जास्त येते! ब्रुसेल्समधील वाहतूक यंत्रणा फारच छान आहे. माझ्याकडे फक्त एकच दिवस होता, त्यामुळे मी मेट्रोतून जास्त फिरलो; पण मी तिथे बसेस, ट्राम्स आणि ट्रेन्स अशी स्थानिक वाहतुकीची साधनेसुद्धा पाहिली. बेल्जियममध्ये बहुतांशी बोलली जाते फ्रेंच भाषा.

त्यानंतर नंबर लागतो डच बोलणाऱ्यांचा. जर्मन अल्पसंख्य आहेत. इथे कृष्णवर्णीय आणि इस्लामिक स्थलांतरित मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे वांशिक विविधताही आढळते. निरनिराळ्या शब्दांचे आणि स्टेशन्सचे उच्चार गोंधळात टाकणारे असले तरी तिथले लोक मात्र मला समजून घेणारे होते. पुढचा स्टॉप.. अ‍ॅमस्टरडॅम!!

अ‍ॅमस्टरडॅम, नेदरलॅण्ड्स

नेदरलॅण्ड्सची राजधानी असलेले अ‍ॅमस्टरडॅम हे शहर ‘सिटी ऑफ बाइक्स’ म्हणून ओळखले जाते. या शहराशी माझी नाळ जोडली गेलीय असेच वाटले मला! नीरव शांतता, अतिशय सुंदर आणि सगळीकडे दिसणारे हसतमुख चेहरे! इथली माणसे खूप जिव्हाळ्याने वागणारी होती, सुंदर इंग्लिश बोलणारी आणि आतून एकदम निर्मळ!

अ‍ॅमस्टरडॅम ओळखले जाते ते व्हॅन गॉग, रीजक्स, (Rijksmuseum), न्यूअ कर्क (Nieuwe Kerk) आणि अर्थातच अ‍ॅन फ्रँक अशा जगप्रसिद्ध म्युझियम्समुळे! पण त्याशिवाय तिथे सुंदर मैदानेसुद्धा आहेत. एखादी संध्याकाळ शांततेत घालवण्यासाठी किंवा मित्रांबरोबर मस्त वेळ घालवण्यासाठी आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर रोमँटिक डेटचा आनंद लुटण्यासाठी एकदम योग्य! अ‍ॅमस्टरडॅममधील आर्किटेक्चर एकदम अनोखे आहे. प्रत्येक निवासी इमारतीची रचना एकसारखी आणि इमारतींना मजले तीनच! तेही लिफ्टशिवाय! शहराचा पुरातन आणि भव्य वारसा जतन करून ठेवणे हाच या आर्किटेक्चरचा मुख्य हेतू आहे आणि तोही कायद्याने राबवला जातो. अ‍ॅमस्टरडॅममधील कालवे आणि पूल म्हणजे इथली खासियत आहे आणि म्हणूनच इथे अनोख्या ‘हाऊस बोट्स’ दिसतात, ज्यात लोक राहतात. आजच्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये तसे हे महागच म्हणता येईल. प्रत्येक पर्यटकाने अ‍ॅमस्टरडॅममध्ये एकदा तरी बोट राइड घ्यायलाच हवी!

शहरातील वाहतुकीसाठी सायकल्सचा (ज्यांना बाइक्स म्हटले जाते) वापर प्रामुख्याने केला जातो. इथल्या लोकांसाठी त्या त्यांच्या ‘बेस्ट फ्रेण्ड्स’ असतात. एखादी महागडी गाडी घेण्यापेक्षा बाइकवरून प्रवास करून वजन कमी करणे लोकांना जास्त पसंत असते. ट्राम्स, बसेस आणि मेट्रो असलेली इथली वाहतूक यंत्रणा असाधारण आहे.

नेदरलॅण्ड्स हे हायनिकेन बीअरसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अ‍ॅमस्टरडॅममधल्या हायनिकेन ब्रुवरिला भेट ‘मस्ट’ आहे आणि हो, तिथे मासे खायलाही विसरू नका!

इथली प्रमुख बोलीभाषा डच आहे, पण बहुतांशी लोक दुसरी भाषा इंग्लिशसुद्धा छान बोलतात. नेदरलॅण्ड्स मला स्वत:ला खूपच आवडले ते इथल्या निर्मळ आणि प्रेमळ माणसांमुळे!

रोटरडम हे नेदरलॅण्ड्समधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. त्याच्या शहरी रूपामुळे ते अ‍ॅमस्टरडॅमपेक्षा खूप वेगळे दिसते. इथे औद्योगिक इमारती, गगनचुंबी इमारती, मोठे, रुंद रस्ते सारे काही आहे, जे अ‍ॅमस्टरडॅममध्ये तुम्हाला दिसणार नाही.

तरीही, इथल्या संग्रहालयासाठी आणि विस्तीर्ण मैदानांसाठी इथे जरूर भेट द्या आणि सेन्ट्रल स्टेशनजवळच्या ‘डूदोक’ रेस्टॉरंटमध्ये मिळणारा जगातला सवरेत्कृष्ट अ‍ॅपल पाय खायला विसरू नका! या शहरात फिरण्यासाठी ‘हॉप ऑन, हॉप ऑफ’ बसचा पर्यायच उत्तम!

बर्लिन, जर्मनी

बर्लिन, जर्मनी किंवा ‘डॉइशलॅण्ड’च्या राजधानीचे शहर हे माझ्या मते युरोपमधील सर्वात सुंदर शहर आहे. सांस्कृतिक वारसा, वास्तुशास्त्र या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये श्रीमंती दाखवणारे असे हे शहर आहे. महायुद्धात काही अंशी उद्ध्वस्त झालेले बर्लिन आता स्वत:ची सौंदर्यस्थळे मोठय़ा अभिमानाने जगाला दाखवतेय आणि जगभरातल्या पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतेय.

तसे बघितले तर इथल्या बऱ्याच गोष्टी महायुद्धाशी निगडित असल्यामुळे त्यांच्यात एकसुरीपणा आढळतो; पण मी मात्र काही दुर्मीळ आणि इतरांना माहीत नसलेल्या अशा सुंदर मैदानांचा आणि पुस्तकालयांचा आनंद इथे घेतला. युद्धात मृत झालेल्या माणसांची आणि नाझी साम्राज्यात मृत झालेल्या ज्यूंची बरीच स्मारके इथे बांधली आहेत. ती खरेच बघण्यासारखी आहेत आणि हो, या शहराचे प्रसिद्ध आकर्षण बर्लिन वॉल, जिच्यामुळे बर्लिनची विभागणी झाली, ती बघायला अजिबात विसरू नका.

इतर जागा आहेत – ज्यू म्युझियम, श्लोस शालरेट्ट्ेनबुर्ग,  (schloss charlottenburg), गेन्डार्मेस मार्केट, (gendarmen markt) कुल्टुअरफोरूम (kulturforum)

जर्मनीत जाऊन तुम्हाला ‘ब्राटवूर्स्ट’चा आस्वाद घ्यायलाच हवा. ही एक जर्मन सॉसेजची डिश आहे, शिवाय ‘करीवूर्स्ट’ ही आणखीन एक डिश ज्यात पोर्कचे तळलेले तुकडे करीबरोबर दिले जातात.

बर्लिनमधली वाहतूक यंत्रणा फारच छान आहे. बसेस, मुख्यत्वे ट्रेन्स आणि त्यांना मदत करणारी मेट्रो!

प्राग, झेक रिपब्लिक

प्राग! नावाप्रमाणेच रम्य! झेक भाषेत याचा उच्चार ‘प्राहा’ असा करतात. झेक रिपब्लिकची ही राजधानी. नैसर्गिक सौंदर्य आणि अनोखे असे आर्किटेक्चर यामुळे इथे बऱ्याच हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. इथल्या जादुई वातावरणाचा आनंद घ्यायला दर वर्षी लाखो पर्यटक प्राहाला येत असतात. इथल्या बऱ्याच टुरिस्ट ठिकाणांवरून एक दिवसाच्या टूर्स आयोजित केल्या जातात; पण माझ्या मते या सुंदर शहराचा अनुभव घ्यायचा असेल तर पायी जाणे उत्तम! तुम्हाला निश्चित आवडेल!

इथल्या वाहतूक यंत्रणेत मेट्रो, ट्राम्स आणि बसेस असतात. मेट्रोच्या तीन लाइन्स असतात. ए, बी, सी किंवा रेड, यलो आणि ग्रीन. प्राहामधल्या प्रत्येक ठिकाणी त्या जातात. प्रागमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणे आहेत, ‘ओल्ड टाऊन स्क्वेअर’, ‘प्राग कॅसल’ आणि ‘चार्ल्स ब्रिज’. इथले भव्य आर्किटेक्चर आणि नयनरम्य देखावा तुम्हाला कॅमेरा बाजूला ठेवूनच देत नाही. जगप्रसिद्ध अ‍ॅस्ट्रोनॉमिकल क्लॉक ओल्ड टाऊन स्क्वेअरच्या मागच्या बाजूला आहे.

इथे येऊन शॉपिंग करायचे ते झेक चॉकोलेट आणि टी शर्टसचे! बीफ खाणाऱ्यांसाठी इथल्या रस्त्यावर ‘गौलाश’ असा पदार्थ मिळतो आणि गोड खाणाऱ्यांसाठी Trdelnik. प्रागमध्ये तसे बरेच काही पाहाण्यासारखे आहे. डान्सिंग हाऊस, बोटॅनिकल गार्डन, पेट्रीन टॉवर आणि असे खूप काही!

झेक रिपब्लिकची अधिकृत भाषा ‘झेक’ आहे; पण बहुतांशी लोक ‘स्लोव्हाकीयन’ बोलतात, कारण पूर्वी हा देश झेकोस्लोव्हेकिया होता; पण आमच्यासारख्या पर्यटकांसाठी इंग्लिशचा वापर केला जातो.

मात्र इथे युरोज स्वीकारले जात नाहीत जसे इतर युरोपियन देशांमध्ये स्वीकारले जातात. त्यांचे स्वत:चे चलन आहे ‘झेक कोरुना’; पण तरीही काही ठिकाणी युरोज रोख स्वरूपात घेतले जातात.

सेस्की क्रूमलोव, झेक रिपब्लिक

झेक रिपब्लिकच्या दक्षिणेकडे अजून एक लोकप्रिय ठिकाण दिसते जे ‘सेस्की कृमलोव’ म्हणून ओळखले जाते. हे एक छोटेसे सुंदर गाव आहे. इथे या देशातील दुसरे मोठे कॅसल आहे आणि १३ व्या शतकात उभारण्यात आलेल्या या वास्तूला पूर्व युरोपच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. इथे एक सुंदर नदी वाहत असते. या नदीतून तुम्ही गावाचा नजारा बघू शकता. नदीच्या काठावर बरेच कॅफेज आणि हॉटेल्स आहेत. बोहेमियन दागिने आणि साबण विकत घेण्यासाठी आणि भरपूर फोटो काढण्यासाठी हे एक मस्त ठिकाण आहे! प्रागपासून हे ठिकाण गाडीने अडीच तासांच्या अंतरावर आहे. त्यामुळे एक दिवसाची टूर बुक आधीच केलेली बरी!

फ्रँकफर्ट, जर्मनी

फ्रँकफर्ट ही जर्मनीची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला खूप औद्योगिक, व्यावसायिक आणि मल्टिनॅशनल कंपनीज दिसतील आणि त्यात काम करणारी निरनिराळ्या देशांतील माणसेसुद्धा!

इथे पर्यटकांना तसे विशेष बघण्यासारखे काही नाही; पण अशा मोठय़ा दौऱ्यावर फ्रँकफर्टसारखे मोठे शहर तुमच्या यादीत लिहावेच लागेल. उंच इमारती, आधुनिक पूल आणि व्यावसायिक जागा या संपूर्ण शहरात तुम्हाला दिसतील. हिरवळ कमीच दिसते आणि दिसते तीसुद्धा मानवनिर्मित! जागतिकीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण!

जगप्रसिद्ध ऱ्हाईन नदी फ्रँकफर्टमधून वाहते आणि ती शहरातल्या निरनिराळ्या जागांमधून दिसते. हॉप ऑन हॉप ऑफ टूरचा एक दिवस इथे पुरतो!

म्युनिक, जर्मनी

तुम्ही जर्मनीला जाणार असाल तर म्युनिकला भेट द्यायला अजिबात विसरू नका! जर्मनीच्या दक्षिण भागातले हे शहर म्हणजे एक टाइमलेस वंडर आहे! दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रँकफर्ट हे शहर एक व्यावसायिक आणि आधुनिक शहर म्हणून वसवण्यात आले; पण म्युनिक मात्र त्याच्या मूळ स्वरूपातच वसवण्यात आले.

हे शहर इतके लोभसवाणे वाटते ते इथल्या माणसांमुळे! जर्मन्स हे गर्विष्ठ आणि उद्धट असतात हा गैरसमज म्युनिकला आल्यानंतर पूर्णत: दूर होतो. इथली माणसे खूप आपुलकीने वागतात आणि इंग्रजी संभाषण सहजपणे करतात. तुम्हाला हे शहर सोडून जावेसे वाटतच नाही. म्युनिकमध्ये फिरायचे असेल तर सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे. तशी मेट्रो आहेच, दिवसातून कितीही वेळा जा, एकदम मस्त प्रवास घडवून आणते! शहरात जगप्रसिद्ध ‘इटह म्युझियम’ आणि म्युझियमच्या बाजूलाच ‘इटह वेल्ट’ आहे. तिथे जाऊन या जर्मन कंपन्यांबद्दल भरपूर माहिती तर मिळतेच, शिवाय त्यांच्या गाडय़ांची आणि बाइक्सचीसुद्धा माहिती मिळते.

म्युनिकमध्ये जगातली सर्वात जुनी ब्रीवरी होफब्राऊहाऊस (HOFBRAUHAUS) इथे जरूर जा. एक गोष्ट माहितीय का तुम्हाला? जगातले सर्वात मोठे मैदान हे अमेरिकेतील सेन्ट्रल पार्क नसून ते आहे म्युनिकमधले ‘इंग्लिश गार्डन’! किती सुंदर पार्क आहे हे! इथे सायकलिंगचा स्वर्गीय आनंद मिळतो!

पर्यटकांसाठी म्युनिकमधील दुसरे आवडते ठिकाण म्हणजे ‘मेरीनप्लात्झ’. एका मोठय़ा प्रांगणात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, शॉपिंगची दुकाने, बीअर गार्डन्स आणि बरेच! इथे म्युझियम्सही खूप आहेत.

नॉयश्वानश्टाईन कॅसल, जर्मनी

नॉयश्वानश्टाईन (NEUSCHWANSTEIN) कॅसलला ‘स्लीपिंग ब्युटी कॅसल’ ऑफ डिस्ने किंवा ‘सिंड्रेला कॅसल’ असेही म्हणतात. जर्मनीच्या नैर्ऋत्य दिशेला फ्युजेन स्टेशनजवळ हा कॅसल आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला हा कॅसल जर्मन-ऑस्ट्रिया सीमेवर आहे.

म्युनिकपासून अडीच ते तीन तास अंतरावर असलेल्या या कॅसलपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेन आणि बस प्रवास करावा लागतो. खूप सुंदर देखावा दिसतो, या कॅसलच्या बाहेरून आणि आतही! तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या किल्लय़ांच्या गोष्टी आठवतात इथे आल्यावर! ही जागा डोंगरांनी वेढलेली असल्यामुळे हायकर्ससाठी इथे पर्वणी असते!

कोपनहेगन, डेन्मार्क

कोपनहेगन, तुमच्या डोळ्याचे अक्षरश: पारणे फिटेल अशी ही डेन्मार्कची राजधानी! डेन्मार्क हा एक स्कॅन्डीनेव्हियन देश आहे, जो नॉर्दन युरोपमध्ये आहे.

इथे बाइक हे सर्वाच्या आवडीचे वाहतुकीचे साधन आहे. प्रत्येक कुटुंबाकडे एक तरी बाइक असतेच. निखळ सौंदर्य आणि अतिशय स्वच्छ असे हे अनोखे कोपनहेगन! इतर चार देशांपेक्षा इथे सगळे थोडे महाग आहे.

कोपनहेगनमध्ये भेट देण्यासारखी ठिकाणे न्याहावन- (NYHAVN), दि लिटल मरमेड, दि ब्लॅक डायमंड, तिव्होली, ख्रिस्तीयानिया फ्री टाऊन, दि ऑपेरा, प्लानेटेरीयम, फ्रेडीअरीकबर्ग गार्डन (FREDYERIKSBERG GARDYEN), कोपनहेगन झू आणि असे बरेच काही!

माझ्या भावाबरोबर मी शहरभर सायकलवरून फिरलो! त्या थंड हवामानात मिळालेली ती ऊब हवीहवीशी वाटत होती. पण परतीचे वेध लागले होते.

बॅकपॅकिंग ट्रिपसाठी कशी तयारी करावी?

अशा गोष्टी ज्या तुमच्या बॅकपॅकिंग ट्रिपसाठी आवश्यक असतात (एयर टिकेट्स आणि व्हिसा व्यतिरिक्त)

१.     तुमच्या हॉस्टेल्सचं बुकिंग Hostelworld.com वर करा. ज्या हॉस्टेलला जास्त चांगले रिव्ह्य़ूज असतील आणि जे शहरातल्या मध्यवर्ती स्टेशनजवळ असेल ते निवडा आणि ब्रेकफास्ट मिळत असेल ते तर नक्की निवडा.

२.     तुमच्या साइट सीइंग टूर्स तुम्ही Viator.com वरून करू शकता. इथे तुम्हाला जगातल्या बहुतांशी शहरातल्या सर्व प्रकारच्या टूर्सची (काही तासांपासून ते आठवडय़ापर्यंत) माहिती मिळते.

३.     तुम्ही किती आणि कोणत्या देशांना भेट देणार आहात, त्यानुसार तुमचा युरेल पास निवडू शकता, जो तुम्हाला युरोपियन शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपयोगी पडतो. हा पास तुम्ही Eurail.com वरून मिळवू शकता.

४.     एक मोठी बॅग, अंदाजे ४० लिटर्सची (ट्रेकिंग बॅग) आणि दैनंदिन वापरासाठी एक छोटी बॅग बरोबर घ्या.

५.     पैसे बरोबर न्यायचे असतील तर ७० ते ७५ टक्के पैसे तुम्ही एखाद्या फॉरेक्स कार्डच्या माध्यमातून न्या. (ही निरनिराळ्या बँकांची असतात.) बाकी रोख घेऊन जाऊ शकता.

६.     काही स्कँडिनेव्हियन देश किंवा झेक रिपब्लिकसारखे देश स्वत:चे चलन वापरतात, त्यामुळे तुम्ही ज्या देशांना भेट देणार असाल तिथे युरोज स्वीकारतात की नाही हे आधी तपासून घ्या.

७.     उन्हाळा असतो (म्हणजे जुलैच्या मध्यापासून ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत) तेव्हा तितकीशी थंडी नसते, त्यामुळे एखादे साधे जॅकेट पुरेसे होते; पण थंडीच्या मोसमात मात्र जाड लेदर जॅकेट, थर्मल्स, हातमोजे, मफलर, कानटोपी आणि ओव्हरकोट जवळ बाळगणे उत्तम.

८.     तुमची साइटसीइंग व्हाऊचर्स आणि हॉस्टेलचे रिझव्‍‌र्हेशन प्रिंट करायला विसरू नका. प्रवासादरम्यान ते उपयोगी ठरते आणि बऱ्याचशा प्रिंटआऊट्सवर दिशादर्शक नकाशे असतात.

९.     खूप कपडे घ्यायची गरज नसते. लक्षात ठेवा, हे बॅकपॅकिंग आहे! मी २० दिवसांकरिता गेलो होतो आणि माझ्याबरोबर पाच-सहा टॉप्स, पँट्सच्या दोन जोडय़ा, रात्री घालावयाच्या कपडय़ांच्या तीन जोडय़ा आणि पाच जोडय़ा मोजे इतकेच सामान होते. कपडे धुवायला वॉशिंग पावडर बरोबर असून देत. एक टॉप दोन दिवस वापरता येतो.

१०.    बरोबर घ्यावयाच्या गोष्टी : फर्स्ट एड किट, सनस्क्रीन आणि मॉश्चरायझर, कात्री, पावडर आणि डीओ, टिश्यू, वेट वाइप्स, फोन चार्जर आणि युरोपियन अ‍ॅडाप्टर, पोर्टेबल चार्जर, सेल्फी स्टिक, स्पोर्ट्स शूज, स्लीपर्स, सनग्लासेस, टॉयलेट किट, हँड सॅनिटायझर, डासनाशक, प्रोटीन बार्स, एक छोटा डबा आणि पाण्याची बाटली.

१२.    काय घेऊन जाऊनका : खूप चपला, मेकअप किट, मोठय़ा किटल्या, अल्कोहोल, जास्तीचे वूलन कपडे, महागडी उपकरणे.

१३.    कुलपे घेऊन जा, कारण बऱ्याचशा हॉस्टेल्समध्ये ती नसतात किंवा त्यांच्यावर चार्ज लावण्यात येतो आणि एक छोटीशी पर्स बरोबर बाळगा ज्यात पैसे, कार्ड्स हॉस्टेलच्या चाव्या आणि पासपोर्ट ठेवता येईल.

१४.    तिथे पोहोचल्यावर तुम्ही आपोआप तिथल्या वाहतूक व्यवस्थेशी परिचित होता आणि ती सगळ्या युरोपमध्ये एकसारखीच आहे.

१५.    कुठेही जाणार असाल तिथे १५ ते २० मिनिटे आधीच पोहोचायची तयारी ठेवा. कधीकधी रस्ते शोधण्यात वेळ जाण्याची शक्यता असते.

१६.    प्रत्येक शहराचे नकाशे ऑफ लाइन डाऊनलोड करून ठेवा. म्हणजे मग जागा शोधण्यात वेळ वाया जात नाही. हॉस्टेल्समध्ये आणि ट्रेन्स, कॅफेज आणि रेस्टॉरंटमध्ये वायफाय असते.

१७.    हॉस्टेल्समध्ये तसेच इतर काही जागांमध्ये शहराचे नकाशे असतात. बाहेर पडण्याआधी त्यांचा नीट अभ्यास करा. मदतीची गरज असेल तेव्हा तिथल्या स्टाफला किंवा स्थानिक लोकांना विचारायला कचरू नका. युरोपमधली माणसे दयाळू आणि मदत करायला नेहमीच तत्पर असतात.

१८.    ट्रेनच्या प्रत्येक स्टेशनवर एक माहिती कक्ष असतो, जिथे तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता.

१९.    पैसे, कार्ड्स, पासपोर्ट, मोबाइल इत्यादी काळजीपूर्वक ठेवा. युरोपमध्ये चोऱ्या खूप होतात.

२०.    हॉस्टेल्समध्ये इतर पर्यटकांशी संवाद साधा, कारण त्यातून तुम्हाला इतरांबरोबर मिसळायला मिळते, एकमेकांचे अनुभव शेअर करता येतात. निरनिराळ्या गोष्टी शिकायला मिळतात.

२१.    एखादे वेळी हरवलात तरी गोंधळून जाऊ नका. शांत राहा, तुम्ही मार्ग शोधून काढाल. प्रत्येक क्षणाचा आनंद मिळवा! बॅकपॅकिंग एन्जॉय करा!
रोहन फणसे – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 16, 2018 1:07 am

Web Title: europe tour