इंजिनीअर, मेडिकल, आयटी यापेक्षा थोडं हट के करिअर निवडणाऱ्यांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट हा एक उत्तम पर्याय झाला आहे. हे क्षेत्र क्रिएटिव्ह असलं तरी यात आता पुष्कळ पैसाही मिळू लागलाय. या क्षेत्राकडे पावलं वळवून करिअर चांगल्या प्रकारे मॅनेज करता येईल.

साधारण दहावीच्या परीक्षेनंतर ‘दहावीनंतर पुढे काय?’ असं विचारलं जातं. आजच्या पिढीने कशात करिअर करायचंय हे आधीच  ठरवलेलं असतं. इंजिनीअरिंग, मेडिकल, आयटी, एमबीए या सगळ्या क्षेत्रांबरोबरच आता जाहिरात, पत्रकार, कला, अभिनय, लेखन, अ‍ॅनिमेशन अशा अनेक क्रिएटिव्ह क्षेत्रांकडेही वळणारे तरुण वाढताहेत. पूर्वी क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करायचं एखाद्याने ठरवलं की, त्यात आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे त्याकडे नकारात्मकदृष्टय़ा बघितलं जायचं.  अर्थात ते पूर्णत: चुकीचं नाही. क्रिएटिव्ह क्षेत्रातही पैसे कमावण्याचा वाव असल्याचं चित्र दिसू लागलंय. इव्हेंट मॅनेजमेंटचं क्षेत्र सध्या आशादायी आहे. लहानसहान कार्यक्रमांनाही मोठय़ा सोहळ्याचं स्वरूप दिलं जातं. अशा वेळी अनेक  गोष्टी एकाच वेळी योग्य प्रकारे हाताळणं म्हणजे ‘मॅनेज’ करणं महत्त्वाचं असतं. म्हणून या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झालं आहे.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

बारसं, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, लग्न, साखरपुडा, सांस्कृतिक कार्यक्रम, महाविद्यालयातील स्पर्धा, व्याख्यानं, सोसायटीतली पूजा, ऑफिसमधले कार्यक्रम असं सतत आजूबाजूला घडत असतं. प्रत्येक कार्यक्रमाचा बाज, विषय, मांडणी वेगळी असली तरी त्याची बांधणी एकाच प्रकारची असते. एखाद्याला इव्हेंट करतानाची सगळीच कामं जमायला हवीत असं अजिबात नाही. कोणाला साहित्य नियोजनात रस असेल तर कोणाला तांत्रिक गोष्टींमध्ये. कोणाला कॅटरिंग नियोजन करायला आवडत असेल तर कोणाला संवाद साधून लोकांचं नियोजन करणं जमत असेल. त्यामुळे तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये रस आहे, पण सगळ्या गोष्टी जमत नाहीत तरी हरकत नाही. पण सगळ्या विभागांची किमान माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून एखाद्या विभागाचा एखादा माणूस अनुपस्थित असला तर ते काम थांबायला नको.

कार्यक्रमांची बांधणी सारखीच असून त्याचं स्वरूप, मांडणी बदलत जाते. मार्केटिंग, आशयविषय आणि क्रिएटिव्ह, जनसंपर्क, आदरातिथ्य 18-lp-careerविभाग, पडद्याआड विभाग, प्रेक्षक नियोजन व्यवस्था, स्वयंसेवक विभाग, तांत्रिक विभाग, साहित्य नियोजन असे विभाग यात येतात.

मार्केटिंग :

इव्हेंटसाठी पैसा जमवण्याकरता मार्केटिंग विभाग काम करतो. कार्यक्रमाच्या प्रकारानुसार ही टीम प्रायोजक मिळवण्याचा प्रयत्न करते. इव्हेंट कोणासाठी आहे हे जाणून त्यानुसार प्रायोजक मिळवण्याची कला ज्यांच्यात अवगत आहे त्यांना या विभागात काम करण्याचा वाव आहे. या विभागात काम करण्यासाठी स्वभाव बोलका, इव्हेंटचं महत्त्व पटवून देणारा, इव्हेंटच्या संबंधित इतर गोष्टींचं ज्ञान असणारा हवा. प्रायोजक मिळवताना, आर्थिक व्यवहार करताना चर्चा करावी लागते. ती योग्य प्रकारे हाताळता आली पाहिजे. यासाठी बाजारातील आर्थिक स्थितीची माहिती असणं महत्त्वाचं आहे.

आशयविषय आणि क्रिएटिव्हिटी :

सूत्रसंचालन, लेखन, सूत्रधार अशी क्रिएटिव्ह कामं असतात. लेखनकौशल्य असणाऱ्यांना इथे वाव आहे. सुरुवात, शेवट, आभारप्रदर्शन, कार्यक्रमाची संहिता असं सगळंच कंटाळवाणं वाटू नये यासाठी लेखकाला साधं, सुटसुटीत पण लोकांना छान वाटेल असं लिहावं लागतं. उत्तम लेखन करणाऱ्याला संधी मिळू शकते. कोणत्याही कार्यक्रमात सगळ्यांना एकत्र धरून ठेवत कार्यक्रम पुढे नेणं ही सूत्रसंचालकाची जबाबदारी असते. अशा वेळी त्याच्याकडे असलेली संहिताही उत्तम दर्जाची हवी.  लेखनासह सूत्रसंचालकालाही इथे तितकाच वाव आहे. उत्तम वक्तृत्व, शब्दभांडार, बोलण्यातील ठेहराव, स्पष्ट शब्दोच्चार, वाचनाची सवय असे गुण असणाऱ्या व्यक्तीला सूत्रसंचालक म्हणून काम करता येऊ शकते.

जनसंपर्क :

सगळीकडच्या घडामोडींचा वेध घेण्यात वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्या यांच्यात स्पर्धा सुरू असते. त्यामुळे छोटय़ा कार्यक्रमांबाबतही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या येत असतात. म्हणूनच तुमच्या कार्यक्रमाविषयीची बातमी वर्तमानपत्रं आणि वृत्तवाहिन्यांमध्ये येण्यासाठी ही चांगली संधी आहे. यासाठी पत्रकारिता क्षेत्रातले तुमचे संपर्क चांगले हवेत. कार्यक्रमाविषयी पत्रकारांना पटवून त्याचं कव्हरेज येण्यासाठी प्रयत्न करायला हवा. इथेही तुमचं वक्तृत्व उत्तम हवं. जनसंपर्क म्हणजे पब्लिक रिलेशनचे डिग्री आणि डिप्लोमा कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांसाठी इथे वाव आहे.

आदरातिथ्य आणि पडद्याआड :

कार्यक्रमाचं स्वरूप स्पर्धेचं असेल तर त्यात परीक्षक, गायन-नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सादरकर्ते आणि इतर कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे या व्यक्ती महत्त्वाच्या असतात.  याचं आदरातिथ्य करण्याची जबाबदारी मोठी असते. ते कार्यक्रमाच्या स्थळी आल्यापासून ते जाईपर्यंत त्यांच्यासाठी केलेली व्यवस्था चोख आहे का याकडे लक्ष द्यावं लागतं. त्या व्यक्तींशी सतत संवाद साधणं गरजेचं असतं. कोणत्याही प्रकारचा संकोच न करता त्यांनी तुमच्याशी मोकळेपणाने त्यांना काय हवं-नको ते सांगण्यासाठी त्यांना कम्फर्टेबल करणं गरजेचं असतं. त्यांनी काही मागितल्यास ते योग्य व्यक्तीपर्यंत योग्य वेळेत पोहोचवता आलं पाहिजे. यातच आणखी एक विभाग म्हणजे बॅक स्टेज म्हणजे पडद्याआडचा विभाग. गायन किंवा नृत्याच्या कार्यक्रमात पडद्याआडच्या विभागाचं काम महत्त्वाचं ठरतं. स्पर्धक किंवा सादरकर्त्यांसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची सुविधा रंगमंचामागे पुरवली जाते. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास मदत करण्यासाठी त्या विभागाची माणसं तिथे उपस्थित असतात.

स्वयंसेवक :

स्वयंसेवक म्हणजे व्हॉलिंटिअर्स इथेही असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी सुरुवात व्हॉलिंटिअर्सपासून करावी. हे व्हॉलिंटिअर्स या क्षेत्रातील सगळ्या विभागांत कार्यरत असतात. त्यामुळे व्हॉलिंटिअर्स म्हणून काम करताना सगळ्या विभागांत काम करण्याचा अनुभव घेता येतो. या व्हॉलिंटिअर्सवर लक्ष ठेवण्यासाठीही नेमणूक केलेल्या व्यक्तीकडे सगळ्यांशी समन्वय साधण्याचं कौशल्य हवं.

प्रेक्षक नियोजन व्यवस्था :

‘फर्स्ट कम फर्स्ट सव्‍‌र्ह’ याप्रमाणे कार्यक्रम असेल तर प्रेक्षकांची एकाच वेळी येणारी गर्दी हाताळणं हे प्रेक्षक नियोजन व्यवस्था विभागाकडे काम असतं. कार्यक्रमाच्या स्वरुपानुसार प्रेक्षकांच्या बैठक व्यवस्थेचं नियोजन करण्यात येतं. कधीकधी प्रेक्षकांमध्ये ज्येष्ठ नागरिकही असतात. अशा वेळी तिथल्या तिथे निर्णय घेऊन त्यांच्या सोयीने त्यांना बसायला जागा द्यावी लागते. इथे तुमची निर्णयक्षमता काम करते. कार्यक्रमाचं नियोजन करताना सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार नियोजनही केलं जातं, पण प्रेक्षकांचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे तिथे सतर्क राहून त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं.

तांत्रिक :

माइक, स्पीकर, लाइट्स पुरवणं हे तांत्रिक विभागाचं काम. या विभागाचं काम टेक्निकल असलं तरी त्यांनी क्रिएटिव्ह विभागातही थोडा रस दाखवावा. तांत्रिक विभागातला माणूस  फक्त ‘टेक्निकल’ नसावा, तर कार्यक्रमातल्या इतर गोष्टींमध्येही त्याला रस असावा. कदाचित त्याच्या या कौशल्यामुळे तो क्रिएटिव्ह टीम अधिकाधिक चांगल्या यंत्रणा वापरण्याबाबत सुचवू शकतो आणि यामुळे कार्यक्रम आणखी चांगल्या प्रकारे सादर केला जाऊ शकतो.

साहित्य नियोजन :

कार्यक्रमासाठी आवश्यक असणारं साहित्य हा विभाग पुरवतो. पेन, पेन्सिल, चिकटपट्टी, गोंद, पट्टी, पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, रंगमंचामागे लागणाऱ्या खुर्चा-टेबल, पंखे, स्टूल इत्यादी साहित्य हा विभाग पुरवतो. कोणकोणते साहित्य उपलब्ध करून द्यावे लागणार आहे, याची नोंद हा विभाग करतं. क्रिएटिव्ह विभागाकडून साहित्याची यादी मिळाली तरी त्याशिवाय आणखी कोणत्या साहित्याची गरज भासू शकते, याची समज त्या विभागात काम करणाऱ्याकडे हवी.

सगळे विभाग एकमेकांशी जोडलेले असतात. क्रिएटिव्ह टीम कार्यक्रमाचं स्वरूप, त्यातला आशय मार्केटिंग आणि जनसंपर्क टीमला सांगते. त्यानुसार मार्केटिंग टीम प्रायोजकांना लक्ष्य करतात. जनसंपर्क टीम कार्यक्रमाचा आशय, स्वरूप बघून वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक, वृत्तवाहिन्या अशा सगळ्यांना संपर्क करतात. क्रिएटिव्ह टीम उरलेल्या सगळ्या विभागांना म्हणजे आदरातिथ्य, पडद्याआड, प्रेक्षक नियोजन व्यवस्था, स्वयंसेवक, तांत्रिक, साहित्य नियोजन अशा सगळ्या विभागांना कार्यक्रमाच्या स्वरूपाविषयी सांगते. त्यानुसार प्रत्येक विभाग आपापली कामं करतात. प्रत्येक विभाग तसेच इतर विभागांची कामांची माहिती असावी लागते. सगळ्या विभागांनी एकमेकांशी समन्वय साधणं खूप महत्त्वाचं ठरतं.

वाढदिवसापासून लग्नापर्यंतचे सोहळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांकडे दिले जातात. एखाद्या संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रमही अशा कंपन्यांकडे सोपवला जातो. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या स्वत:च काही इव्हेंट्स करत असतात. यातून येणारी मिळकत चांगली असते. इतर नोकऱ्यांप्रमाणे महिन्याचा पगार मिळत नसला तरी इव्हेंट्सप्रमाणे पैसे मिळतात. सुरुवातीला छोटे कार्यक्रम हाती घेत लहान पातळीवर काम करून मग मोठी झेप घ्यावी. इतर क्षेत्रांत शिक्षण झालं असलेल्यांनाही या क्षेत्राकडे वळण्याचा वाव आहे.

‘नऊ ते पाच’ असं इथलं काम नक्कीच नाही. डेडलाइनसाठी वेळेचं बंधन आहे; पण काम करण्यासाठी वेळेचं बंधन नाही. निर्णयक्षमता व नियोजनक्षमता हे दोन गुण इथे काम करणाऱ्यांमध्ये असायला हवे. गोष्टींचं नियोजन करूनही ऐन वेळी कार्यक्रमात काही अडचणी येतात. अशा वेळी पटकन एखादा निर्णय घेऊन तो पूर्णत्वास नेण्याचं कौशल्य तुमच्यात हवं. नियोजन करून त्याप्रमाणे काम करणं हा इव्हेंट मॅनेजमेंटमधला महत्त्वाचा मंत्र आहे. तर मग वाट कसली बघताय? घरातल्या एखाद्या छोटय़ा कार्यक्रमापासून सुरुवात करा आणि या क्षेत्रात येण्यासाठी पाऊल टाका!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com