जागतिकीकरणानंतर गेल्या दोन दशकात आपल्या देशात जशा सेवा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढल्या तसाच मोठा बदल हा आर्थिक क्षेत्रातील रोजगाराबाबतदेखील झाला आहे. अर्थात त्यात चार्टर्ड अकाऊंटंट, कंपनी सेक्रेटरी, आयसीडब्ल्यूए, एमबीए अशा अनेक अभ्यासक्रमांना मागणी आहे. तशीच मागणी नव्याने आलेल्या ग्लोबल अकाउंटिंग प्रॅक्टिस या संकल्पनेलादेखील आहे. बीकॉम करून क्लार्कची नोकरी या पलीकडे जाणाऱ्या अनेक संधी येथे उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक बँकिंग क्षेत्रातील सुरक्षित आणि सुस्थितीतील चौकटीच्या नोकरीची व्याख्यादेखील बदलून गेली आहे.

सध्याच्या काळात बँक हे करिअर क्षेत्र म्हणून किती मराठी तरुण बघत असतील हा संशोधनाचा प्रश्न आहे. खरं तर ३०-३५ वर्षांपूर्वी बँकेतील नोकरी फार प्रतिष्ठेची समजली जायची. मग हुद्दा अगदी कारकुनाचा का असेना, मात्र १९९५ नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत अनेक क्षेत्रं खुली झाल्याने करिअरचेदेखील अनेक पर्याय उपलब्ध झाले आणि बँकेतील करिअरचे महत्त्व कमी झाले. २६ राष्ट्रीयकृत बँकाखेरीज, खाजगी आणि सहकारी बँकादेखील या काळात वाढत राहिल्या. मात्र तरुणांना आता हे क्षेत्र पूर्वीइतके आकर्षक वाटत नाही. गेल्या दशकभरात बँकिंग व्यवस्थेचे संपूर्ण परिवर्तन झालेले दिसते. यांत ऑनलाइन बँकिंगखेरीज बँकांच्या इतर सेवांचादेखील समावेश होतो. यांत प्रामुख्याने क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन्स, कमर्शियल पेपर, मर्चट बँकिंग, विविध प्रकारची कर्जे, गुंतवणूक सल्ला, विमा अशा विविध सेवांचा समावेश होतो. तसेच मोठय़ा बँकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, कायदा, एचआर, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मेंटेनन्स अशी इतर विविध खाती असतातच. त्या मुळेच बँकांमध्ये केवळ वाणिज्य शाखेतील उमेदवार लागतात असे मुळीच नाही. किंबहुना इतर कंपन्यांप्रमाणेच बँकामध्येदेखील विविध प्रकारच्या सेवांची गरज भासत असते आणि गरजेनुसार इंजिनीयर, वकील, एमबीए इ. पदवीधारक उमेदवार लागू शकतात. बँकांचे कामाचे स्वरूप जसे बदलले आहे तसेच पगारही बदलले आहेत. अनेक बँकांतून सेवानिवृत्ती योजना राबवल्याने नवीन कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू आहे, तर यामध्ये आपण नेमकी संधी कशी आणि कोठे शोधू शकतो हे पाहावे लागेल.

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
without btech or engineering diploma degree you can do these technical jobs see list an salary
BTech इंजिनिअरिंग पदवी न घेता करू शकता टेक्निकल क्षेत्रातील ‘या’ नोकऱ्या, कोर्स अन् पगाराबाबत घ्या जाणून
This pictorial story of Lalbagh Botanic Garden during both Bangalore and Bangalore eras
निर्जळगावातलं निसर्गबेट

एखाद्या बहुराष्ट्रीय किंवा लिस्टेड  कंपनीत कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करावं ही जरी कंपनी सेक्रेटरी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक उमेदवाराची इच्छा असली तरी बँकांमध्येदेखील सध्या कंपनी सेक्रेटरींची खूप गरज असते. बँकेचा स्वतंत्र सेक्रेटरी विभाग असतो. मोठमोठय़ा कंपन्यांना कर्ज देताना, त्यांच्याशी व्यवहार करताना हा विभाग प्रचंड कार्यरत असतो. कर्जाची दस्तावेज, आरओसी सर्च, चार्ज क्रिएशन इत्यादी महत्त्वपूर्ण कामांसाठी कंपनी सेक्रेटरीची गरज असते. तसेच अनेक सरकारी बँका आणि खाजगी बँका या स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी झालेली असल्याने स्टॉक एक्स्चेंजच्या नियमांची पूर्तता, तसेच कंपनी कायद्यानुसार कराव्या लागणाऱ्या पूर्तता यांचेही काम असते. कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांनी बँकांतही व्यवस्थित संधी असते हे लक्षात घ्यावे लागेल. येथे भविष्यात चांगलाच वाव मिळणार आहे.

बँकेमध्येच असणारा दुसरा एक महत्त्वाचा विभाग म्हणजे विधी विभाग. अनेक खासगी बँकांमध्ये हा विभाग प्रचंड कार्यरत असतो. मुख्यत: अनुत्पादित कर्जाच्या वाढत्या प्रमाणाच्या पाश्र्वभूमीवर या विभागाचे काम खूपच महत्त्वाचे झाले आहे. हीच गरज अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आर्थिक संस्थांची देखील आहे. बीकॉम आणि कायद्याची पदवी असेल तर तुमच्यासाठी ही दोन्ही क्षेत्रं प्रचंड संधी मिळवून देणारी आहेत. अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शनमध्ये तर वेगाने वाढ होत असून सध्या देशात या क्षेत्रात १८ कंपन्या आहेत. एका वर्षांत त्यांची संख्या २३ होणार आहे. बँक आणि अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन या दोन्ही ठिकाणी कायदा पदवीधर असल्यास सीए आणि सीएसपेक्षादेखील अधिक पगार मिळू  शकतो. अर्थातच तुम्ही कोणत्या संस्थेतून शिक्षण घेतलंय आणि गुणवत्ता किती आहे त्यावर ते अवलंबून आहे.

मर्चंट बँकिंग हा गेल्या काही काळात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा घटक आहे. एमबीए किंवा सीएला यामध्ये बऱ्याच संधी आहेत. याखेरीज कंपनी सेक्रेटरीची पदवी असल्यास देखील ते फायद्याचे ठरू शकत असते. आयपीओ व्यवस्थापन हे र्मचट बँकर्सचे मुख्य काम आहे.

बँका आज त्यांच्या पारंपरिक कामाव्यतिरिक्त अनेक अन्य कामं करत असतात. वेल्थ मॅनेजमेंटचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मात्र या कामात केवळ शिक्षण असून चालणार नाही तर तुम्ही स्मार्ट असणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. इंडियन बँकर्स असोसिएशनतर्फे वेल्थ मॅनेजमेंटचे कोर्सेस चालवले जातात. तर सीएफपी (चार्टड फायनांशिअल प्लॅनर) हा कोर्स आता भारतातदेखील उपलब्ध आहे.

जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्था बदलत चालली आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशात कार्यरत आहेत. अर्थातच जागतिक पातळीवरील अकाऊंटिंगशी तुम्हाला जोडून घेता आले पाहिजे. ज्याला अर्थविश्वाच्या परिभाषेत ग्लोबल अकाऊंटिंग प्रॅक्टिस असे म्हणतात. त्यासाठी काही विशेष कोर्सेस सध्या उपलब्ध आहेत.

सीमा – CIMA – सीआयएमए (चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटिंग) – ही परीक्षा लंडनस्थित संस्थेकडून घेतली जाते. याची परीक्षा फी तब्बल १७०० पौंड आहे. त्यासाठीचा अभ्यास शिकवणाऱ्या काही संस्था भारतात आहेत, त्यांची फी वेगळी. हे सारं थोडं महागडं वाटू शकते. पण ही पात्रता मिळाल्यानंतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा ठिकाणीदेखील अकाऊंटिंगच्या नोकरीस पात्र ठरता. तुम्ही सर्टिफाइड ग्लोबल अकाऊंटंट होऊ शकता.

सिसा – CISA –  सर्टिफाइड इन्फर्मेशन सिस्टिम ऑडीटर. हा कोर्स आयटीसाठी आहे. पण अनेक चार्टर्ड अकाऊंटंटदेखील हा कोर्स करताना दिसतात. भविष्यातील डिजिटल आर्थिक व्यवहाराची व्याप्ती पाहता याची गरज वाढणार आहे.

केवळ बीकॉम असणे ही आता नोकरी मिळवून देणारी पात्रता राहिलेली नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड द्यावी लागेल. मात्र हल्ली अनेक वेळा अनेक जण छोटे मोठे कोर्सेस करतात आणि त्याचं भेंडोळं घेऊन मुलाखतींना जातात. त्याऐवजी चांगल्या संस्थेचा अभ्यासक्रम निवडणं महत्त्वाचं आहे.

तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर स्कूल ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकिंग हा चांगला पर्याय आहे. क्रेड अ‍ॅनालिस्ट, शेअर अ‍ॅनालिस्ट, इक्विटी अ‍ॅनालिस्ट अशा प्रकारच्या अनेक नोकऱ्यांची संधी या कोर्सेसमुळे उपलब्ध होते.

स्टॉक मार्केटमध्ये आणखीन एक चांगला पर्याय आहे तो म्हणजे फायनान्शियल मार्केट या विषयात बीकॉम करणे. ही पदवी असेल तर तुम्हाला स्वतंत्रपणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे कोर्स करायची गरज नाही. पण त्याच्या बरोबरच सीएफए- चार्टर्ड फिनान्शिअल अ‍ॅनालिस्ट आणि सीएफपी -चार्टर्ड फिनान्शिअल प्लॅनर यापैकी एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला तर तुम्ही एकदम वेगळ्या पातळीवर जाता. दोन्ही अभ्यासक्रम अमेरिकन संस्थेमार्फत घेतले जातात. या अभ्यासक्रमांमुळे या विषयाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून जाते. स्वतंत्र व्यवसायदेखील सुरूकरू शकता.

स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी या दोन्हीसाठी विमा क्षेत्रातील अभ्यासक्रमांचं महत्त्व वाढतच जाणारं आहे. देशातील विमाक्षेत्रात सर्वाधिक संधी आणि गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. इन्शुअरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे लायसन्ससीट, असोसिएट आणि फेलो अशा तीन परीक्षा घेतल्या जातात. ही सरकारी संस्था आहे. अगदी माफक फी आणि अभ्यासासाठीची पुस्तके पुरवली जातात. अभ्यास स्वत: करावा लागतो, तर दुसरी संस्था आहे इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुअरन्स अ‍ॅण्ड रिस्क मॅनेजमेंट (आयआयआरएम). या दोन्ही संस्थांच्या अभ्यासानंतर विमा क्षेत्रात व्यवसायाच्या संधी आहेतच, पण अनेक आर्थिक कंपन्यांमध्येदेखील संधी मिळू शकते.

बँकिंगमध्ये चांगले आणि फास्ट ट्रॅक करिअर करायचे असेल तर बँक प्रोबेशनरी ऑफिसरच्या परीक्षा हा उत्तम पर्याय आहे. पण त्याकडे मराठी मुलं खूपच दुर्लक्ष करतात. इंडियन बँकर्स असोसिएशन आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकर्स या दोन संस्थाकडूनदेखील अनेक अभ्यासक्रम चालवले जातात. हे अभ्यासक्रम तुमच्या पात्रतेला वजन मिळवून देऊ शकतात.

मधल्या काळात कॉमर्स शाखेत जाणं म्हणजे काहीसं हेटळणीचं कारण ठरलं होतं. पण सध्या कॉमर्सला भरपूर वाव आहे. चांगल्या गुणांची माणसं मिळत नाहीत ही तक्रार हल्ली अनेकदा ऐकायला येते. त्यासाठी तुम्ही स्वत:ला एक दोन वर्षे पॉलिश करावे लागेल. स्वत:ला रोजगारक्षम करावं लागेल. छोटे छोटे दहा कोर्सेस करून ठेवल्याने काही साध्य होत नाही. एक चांगली डिग्री हवी आणि त्यात काय शिकायला मिळतयं हे पाहणं महत्त्वाचं आहे. नाही तर भुईछत्र्यांप्रमाणे इंजिनीअर जसे जागोजागी दिसतात तसे होईल.

अर्थात सगळे बी.कॉम. झाले तरी स्मार्ट बी.कॉम. कायमच पुढे जातात हे लक्षात ठेवा.
अजय वाळिंबे – response.lokprabha@expressindia.com
शब्दांकन – सुहास जोशी – twitter – @joshisuhas2