मकरंद जोशी

निसर्गाची विविधता भरभरून लाभलेल्या महाराष्ट्रात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. मात्र पावसाळ्यातला हा जलजल्लोष अनुभवताना थोडी काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
sawantwadi dodamarg wildlife corridor marathi news
मुंबई: सावंतवाडी दोडामार्ग परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित करा, उच्च न्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश
Increase in ST accidents 3 thousand 121 accidents in two months
‘एसटी’चे अपघात वाढले! यंदा केवळ दोन महिन्यातच तब्बल ३ हजार १२१…
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला

आपल्या भारताला हवामान आणि नैसर्गिक परिसर या बाबतीत जगाची प्रतिकृती मानले जाते, त्याच चालीवर आपल्या महाराष्ट्राला भारताची मिनी आवृत्ती मानता येईल. सह्यद्रीच्या राकट कणखर डोंगररांगांपासून ते खळाळत्या, फेसाळत्या सागरापर्यंत महाराष्ट्राला जी नैसर्गिक विविधता लाभलेली आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत पर्यटनाचा आनंद लुटताना त्या त्या ऋतूची खासियत अनुभवता येते. ज्या पर्जन्यराजाची वाट शेतकऱ्यापासून ते शहरातील चाकरमान्यांपर्यंत सारेच आतुरतेने पाहात असतात, त्याचे आगमन झाल्यावर तर महाराष्ट्राच्या निसर्गसंपदेला नवी टवटवी आणि तजेला चढतो कारण आकाशातून बरसणाऱ्या घन घन धारांमुळे आता सह्यद्रीच्या अंगाखांद्यावरूनही सर सर जलधारा वाहू लागलेल्या असतात. वेळी-अवेळी दाटून येणारे धुके.. कधी आक्रमकांच्या आवेशाने कोसळणाऱ्या तर कधी आईच्या वत्सलतेनं हळुवारपणे बरसणाऱ्या पावसाच्या धारा.. पावसाच्या आगमनाचा आनंद रंगीबेरंगी रानफुलांमधून व्यक्त करणारी सृष्टी.. ढगातला गारवा थेट मनात झिरपणारे वातावरण अशा माहौलमध्ये आपोआप डोंगरदऱ्यातील धबधब्यांचा घनगंभीर आवाज कानात घुमायला लागतो आणि पावलं कुठल्या तरी जलधारा तीर्थाकडे वळतात.

लोकलच्या तालावर धावणाऱ्या मुंबईकरांना पावसाळी पिकनिकचं ठिकाणसुद्धा याच लोकलने पोहोचता येईल असं मिळालं की ऐन गर्दीच्या वेळी विंडो सीट मिळाल्याचा आनंद होतो. आता मुंबईची जीवनधारा असलेली लोकल कर्जत-कसारा ते पार पालघपर्यंत धावत असल्याने अनेक पावसाळी ठिकाणं लोकलच्या टप्प्यात आली आहेत. सकाळी लवकरची कर्जत लोकल पकडून निघालात तर गाडीत चढल्यावरच टॉस करायला हरकत नाही की भिवपुरीला उतरायचं, नेरळला की कर्जतपर्यंत जायचं, कारण या सगळ्या ठिकाणी खळाळते धबधबे तुमचं स्वागत करायला तयार असतातच. भिवपुरी हे स्थान पूर्वी टाटाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी प्रसिद्ध होते, आता मात्र जुलै ते सप्टेंबर या काळात इथल्या धबधब्यात भिजण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होते. भिवपुरी रोड रेल्वे स्टेशनवरून अर्ध्या तासात भिवपुरी धबधब्याला पोहोचता येते. गावातून जाणारा रस्ता थेट धबधब्याकडेच येतो. भोवतालचा हिरवागार परिसर आणि समोरच्या डोंगरावरून कोसळणारी पाण्याची धार, जिच्याखाली सहज भिजता येते, यामुळे कुटुंबासह येणारे पर्यटक या धबधब्याला जास्त पसंती देताना दिसतात. तुम्ही भिवपुरी आधी आलेल्या नेरळ स्टेशनवर उतरलात तर बाहेर उभ्या असलेल्या रिक्षांतून टपालवाडी गाठायची आणि जरा दूर दिसणाऱ्या डोंगराच्या दिशेनं वाटचाल सुरू करायची. या डोंगरावरूनच टपालवाडीचा धबधबा कोसळतो. तीनशे-साडेतीनशे फुटांवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचा डोह फारसा खोल नसल्याने इथे धारेखाली भिजणे तसे सुरक्षित आहे. या धबधब्याजवळच दुसरा धबधबा आहे, त्याला आनंदवाडीचा धबधबा म्हणतात. नेरळवरून माथेरानला जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद लुटणारे सगळ्या ऋतूत पाहायला मिळतात, पण नेरळ-माथेरान रेल्वे मार्गावर पावसाळ्यात गर्दी वाढते ती जुम्मापट्टी स्टेशन जवळच्या धबधब्याची मजा लुटण्यासाठी. वळणावळणाच्या छोटय़ा घाटातून जुम्मापट्टीला जात असतानाच भोवतालचे हिरवेगार डोंगर आणि त्यावरील धबधब्यांच्या पांढऱ्या शुभ्र रेघा तुमचा उत्साह वाढवत असतात. या उत्साहाशी स्पर्धा करणाऱ्या जुम्मापट्टीच्या धबधब्यात भिजताना मुंबईच्या जवळ असे झक्कास ठिकाण आहे याबद्दल मुंबईकर स्वत:ला भाग्यवान समजतात. कर्जत परिसरातला आणखी एक अनुभवायलाच हवा असा धबधबा म्हणजे कोंडाणे लेण्यांजवळचा धबधबा. कर्जत स्टेशनपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर कोंडाणे गाव आहे, या गावालगतच हजारो वर्षांपूर्वी खोदलेली बौद्ध लेणी आहेत. काल्रे आणि भाजे लेण्यांच्या काळातच ही लेणी खोदली असावीत असा अंदाज आहे. या लेण्यांजवळ मोठ्ठा धबधबा कोसळत असतो. ऐन पावसाळ्यात या ठिकाणाला भेट देऊन लेणी दर्शन आणि धबधब्याचा आनंद असा दुहेरी कार्यक्रम करता येईल. याच डोंगरातली वाट पुढे राजमाची किल्ल्यावर घेऊन जाते.

लोकलच्या टप्प्याबाहेर जाण्याआधी मुंबई कसारा मार्गावर असलेल्या वासिंदचा धबधबा अवश्य अनुभवावा असाच आहे. वासिंद रेल्वे स्टेशनपासून दहा मिनिटांच्या अंतरावर रायकर पाडा हे छोटे गाव आहे. या गावाजवळून भातसा नदी वाहते. या नदीवर बंधारा बांधण्यात आलेला आहे. इंग्रजी झेड आकाराच्या या बंधाऱ्यामुळे इथे छोटासा धबधबा तयार झाला आहे. त्यात डुंबण्याची मजा घ्यायला पर्यटक हमखास येतात. अगदी उन्हाळ्यातही भातसा नदीचे पाणी आटत नसल्याने या मिनी धबधब्याची धारा वाहत असते. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील वसई खाडी किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. तरी वसईहून ‘चिंचोटी’ धबधब्याला जाता येते. तुंगारेश्वरच्या जंगलामध्येच चिंचोटीचा धबधबा आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरूनही चिंचोटी गाठता येते. पावसाच्या पाण्यावरच हा धबधबा वाहात असल्याने जुलै ते सप्टेंबर या काळात चिंचोटीच्या धारांमध्ये चिंब होण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात. हायवेपासून साधारण तासभर चालल्यानंतर (ज्यात काही वेळा पाण्याच्या प्रवाहातून चालावे लागते.) चिंचोटीची दुधासारखी शुभ्र धार दिसते. धबधब्याखालचा डोह उथळ नसल्याने थेट धारेखाली भिजताना काळजी घ्यावी. अहमदाबाद महामार्गावरून गाठता येणारा आणखी एक धबधबा म्हणजे ‘दाभोसा धबधबा’. जव्हारजवळ (सुमारे तासभर) असलेला हा धबधबा लेंडी नदीच्या प्रवाहात निर्माण झालेला आहे. तीनेकशे फुटांवरून कोसळणारा दाभोसा पाहताक्षणी तुमच्या नजरेचा ठाव घेतो. विशेषत: जुलैमधला धुवाधार पाऊस कोसळून गेला असेल तर दाभोसाची भली मोठी पांढरी शुभ्र जलधारा डोळ्यांचे पारणे फेडते. दाभोसा धबधब्याजवळ रॅपिलग, कयाकिंग, अशा साहसी खेळांची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र दाभोसाची रचना आणि स्वरूप पाहिल्यावर हा भिजायचा नाही तर फक्त पाहायचा धबधबा आहे याची खात्री पटते. लोकलने जाण्यासारखा आणि म्हणून मुंबईकरांमध्ये लोकप्रिय झालेला एक धबधबा कसाऱ्याहून फक्त एक तासाच्या अंतरावर आहे. हा धबधबा विही गावाजवळ असला तरी आता तो ‘अशोका धबधबा’ म्हणून ओळखला जातो, कारण शाहरुख आणि करिनाच्या अशोका चित्रपटातील एका गाण्याचा काही भाग इथे चित्रित झाला होता असे गावकरी सांगतात. सध्या विही धबधब्याकडे लोक आकर्षति होतात कारण इथल्या नैसर्गिक प्रस्तर भिंतीमुळे धबधब्यातून रॅपिलग करण्याचा थरार अनुभवता येतो म्हणून. विही गावामध्ये फारशा सुविधा नसल्याने कसाऱ्याहून पोटपूजेची व्यवस्था करून जाणे उत्तम. मुंबई-नाशिक महामार्गावरून विहीला जाण्यासाठी कसाऱ्यानंतर सात किलोमीटर नंतर डावीकडे वळावे, त्यानंतर पाच किलोमीटरवर विही गाव येते.

पण हे असे लोकलच्या आधाराने फारसे धबधबे गाठता येत नाहीत, त्यासाठी महामार्गाची वाटच धरावी लागते. मुंबईहून पुण्याला नेणारा जुना महामार्ग आता जणू विस्मरणातच गेला आहे, पण याच महामार्गावर खोपोलीजवळ एक झक्कास धबधबा आहे, ‘पडसरे धबधबा’. खोपोलीकडून गणपतीच्या पालीकडे जाणारा रस्ता घ्यायचा, या रस्त्यावर पालीच्या साधारणत: सात-आठ किलोमीटर आधी पडसरेकडे जाणारा फाटा येतो. या फाटय़ावरून पुढचा प्रवास छोटय़ा घाटातून आणि गर्द जंगलातून होतो. वाटेत डावीकडे कावळे धरणाचा विस्तीर्ण जलाशय पाहायला मिळतो. भोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेत घेत आपण धबधब्यापाशी कधी पोहोचतो कळतही नाही. पडसरे गावाआधी असलेला हा धबधबा उंचीला फार मोठा नाही पण त्याचा विस्तार चांगला आहे, त्यामुळे त्याखाली ऐसपस डुंबण्याचा आनंद घेता येतो. थंडगार जलधारांमध्ये भिजल्यानंतर जवळच्या टपरीवर गरमा गरम चहा पिण्याचे सुख अनुभवता येते. इथून पालीच्या गणपतीचे स्थान जवळच असल्याने, धबधब्यातील मजा-मस्तीबरोबरच अष्टविनायकांतील बाप्पाच्या दर्शनाचे पुण्यही पदरात पाडून घेता येते. कोकणातल्या धबधब्यांची गणना करताना पहिल्या स्थानावर कुठला याबाबत मतभेद असले तरी पहिल्या पाच धबधब्यांमध्ये महाडजवळच्या शिवथरघळीच्या धबधब्याचा उल्लेख अत्यावश्यक ठरतो. महाडहून बिरवाडीकडे येण्यासाठी गोवा हायवे सोडून आत वळल्यानंतर भोवतालचा परिसरच सांगू लागतो की तुम्ही एका अद्भुताकडे निघाला आहात. एका बाजूला नदीचा खळाळता, आवेगाने वाहणारा प्रवाह आणि दुसरीकडे हिरव्यागर्द झाडांनी भरलेले डोंगर, त्यात मधूनमधून ओसंडणारे पाण्याचे प्रवाह यामुळे आपण खरोखरच एखाद्या अस्पर्श ठिकाणी पोहोचणार याची खात्री पटते. काळ नदीवरचा पूल ओलांडल्यानंतर गाडी रस्ता संपतो तिथेच कानावर पडतो जलधारेचा अनाहत नाद. भोवतालच्या डोंगरांवर आपटून प्रतिध्वनित होणारा हा नाद ज्या जलधारेमुळे निर्माण झालेला असतो, तिच्या समोर उभे राहिल्यावर, डोंगराच्या माथ्यावरून प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या त्या प्रपाताला पाहिल्यावर समर्थ रामदासस्वामींचे शब्द आपोआप आठवतात ‘गिरीचे मस्तकी गंगा, तेथुनि चालली बळे। धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे’ शिवथरघळीच्या धबधब्याचे वर्णन करणारे हे शब्द समर्थानी आधी लिहिले आणि मग त्याबरहुकूम हा धबधबा पडू लागला की काय असं वाटावं इतके हे शब्द चपखल आहेत. याच शिवथरघळीत समर्थानी दासबोधाची रचना केली आणि याच घळीत वास्तव्य करून मोऱ्यांच्या जावळीत शिवाजी महाराजांना शिरकाव करून दिला. शिवथरघळ आणि तिथला धबधबा म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक परंपरा आणि आध्यात्मिक अधिष्ठान यांचा त्रिवेणी संगमच आहे. मात्र शिवथरची धारा दुरून पाहायची धारा आहे, तुम्हाला भिजायचे असेल तर आसपासच्या डोंगरात धबधब्यांची कमी नाही.

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथून भिरा गावाकडे यायचे आणि तिथून सुमारे दोन तासांची पदयात्रा केल्यावर समोर येतो देवकुंडचा धबधबा. दोन डोंगराच्या मधून कोसळणारा हा धबधबा म्हणजे रायगड जिल्ह्य़ातील कुंडलिका नदीचे उगमस्थान मानला जातो. पुण्याहून ताम्हिणी घाटातून खाली येऊन हा धबधबा गाठता येतो. मात्र या धबधब्यापर्यंत पोहोचायला किमान दोन तास चालावे लागते (आणि तेवढेच परत येताना) याचे भान ठेवून कार्यक्रम आखावा. तसेच धबधब्याखालचा डोह खोल असल्याने काळजी घ्यावी. याच महामार्गावर परशुरामाचा घाट ओलांडून चिपळूणकडे जाताना वाटेत सवतसडा धबधबा आहे. महामार्गालगत असल्याने या धबधब्याकडे पोहोचणे सोपे आहे. ऐन पावसाळ्यात उंचावरून कोसळणारी या धबधब्याची पांढरीशुभ्र धारा तुम्हाला खेचून नेते. चिपळूणला किंवा परशुरामला मुक्काम करून या धबधब्याचा आनंद लुटता येतो. कोकणातल्या देवस्थानांचे विशेष म्हणजे ती सगळी निसर्गरम्य परिसरात वसलेली आहेत, त्यामुळे देवदर्शनाबरोबरच निसर्गसौंदर्याचा आनंदही घेता येतो. त्यात देवस्थानजवळ धबधबा असेल तर जणू डबल धमाकाच. कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुखजवळ श्री माल्रेश्वराचे पवित्र आणि जागृत स्थान आहे. या शिवस्थानाजवळ बाव नदीच्या प्रवाहात तयार झालेला ‘धारेश्वर धबधबा’ म्हणजे जणू शिवाच्या माथ्यावरून वाहणाऱ्या गंगेचं प्रतीकच. माल्रेश्वरचे स्थान उंच उंच डोंगरांच्या मध्ये विसावलेलं आहे आणि पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या या गिरी विहरांतून जेव्हा धारेश्वराची मोठी धारा कोसळू लागते तेव्हा सगळ्या निसर्गदृश्याला एक अनोखे परिमाण प्राप्त होते. कोकण रेल्वेवरच्या संगमेश्वर रेल्वे स्थानकापासून माल्रेश्वराचे स्थान तासाभराच्या अंतरावर आहे. तुम्ही महामार्गाने प्रवास करत असाल तर संगमेश्वरनंतर गोवा महामार्गावरून आत वळावे लागते. निवासासाठी देवरुख किंवा संगमेश्वर येथेच सोय होऊ शकते. गोवा महामार्गावर राजापूरजवळ गर्द वनराईमध्ये श्री धूतपापेश्वराचे पुरातन मंदिर आहे. मृदानी नदीच्या काठावर असलेल्या या मंदिराजवळ याच नदीच्या प्रवाहात निर्माण झालेला सुरेख धबधबा आहे. कोकणातील कणकवलीजवळचा सावडाव धबधबाही आवर्जून भेट द्यावी असाच आहे. कणकवलीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर हे निसर्गशिल्प आहे. या धबधब्याच्या धारेमागे एक गुहा आहे, त्यात बसून समोर पडणारी धार बघायला मजा येते. मात्र या धबधब्याचा डोह फारसा खोल नाही, त्यामुळे त्यात सूर मारायचा प्रयत्न करू नका. जवळच चहा, भजी आणि भाजलेली कणसे विकणाऱ्या टपऱ्या आहेत. शिवाय गावकऱ्यांनी कपडे बदलण्यासाठी आडोशाची सोयही केली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात कणकवलीवरून जाताना सावडावच्या जलधारांचा आनंद जरूर घ्या. कोकणातून कोल्हापूरकडे जाताना लागणारा आंबोलीचा घाट प्रसिद्ध आहे तो हिरव्यागार जंगलासाठी आणि थंडगार हवेसाठी. पावसाळ्यात हा आंबोली घाट धबधब्यांचा हारच परिधान करतो. त्यातही पारपोली गावाजवळचा मोठा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतो. ‘आंबोली धबधबा’ म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या या धबधब्याच्या धारांचा आनंद घेता यावा म्हणून आता शासनाने इथे पायऱ्या बांधल्या आहेत (त्याची खरंच गरज होती का?). तसंही महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीत ऐन पावसाळ्यात मुक्काम करून इथल्या धो धो धारांची मजा लुटायला येणाऱ्या पर्यटकांना इथल्या नांगरतास धबधब्यापासून ते कावळेसादला दिसणाऱ्या उलटय़ा धबधब्यांपर्यंत अनेक आकर्षणे आहेतच. आता फिरत फिरत गोव्याच्या जवळ आलोच आहोत तर गोव्यातील सुप्रसिद्ध दूधसागर धबधबा कसा टाळता येईल? गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असलेला हा धबधबा आपल्या नावाला जागून दुधासारख्या पांढऱ्याशुभ्र धारांचा अखंड जलाभिषेक काळाकभिन्न डोंगरावर करत असतो. तीन चार टप्प्यांमध्ये दूधसागराच्या धारा सुमारे हजारेक फुटावरून कोसळत असतात. या धबधब्याजवळून बेळगाव-मडगाव रेल्वे मार्ग गेला आहे, त्यामुळे रेल्वे प्रवासातही या धबधब्याचे दर्शन घडू शकते. गेली काही वर्षे अपघात टाळण्यासाठी दूधसागर धबधब्याकडे जाणारे मार्ग पोलिसांकडून रोखले जातात, त्यामुळे ऐन पावसाळ्यात दूधसागरच्या जवळ पोहोचता येत नाही. पण अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही या जलधारा तितक्याच आवेशाने कोसळत असतात.

धबधब्यांच्या मौक्तिक माळा फक्त कोकणानेच मिरवाव्यात असे नाही. कोकणातून घाट माथ्यावर आल्यावरही धबधब्यांच्या जलधारांची मजा लुटता येते. कोल्हापूरपासून तासाभराच्या अंतरावर शाहुवाडी तालुक्यातील बर्की गाव आहे. या गावापासून आतमध्ये जंगलातल्या रस्त्याने सुमारे चार किलोमीटर (तास- दीड तास) चालल्यावर बर्की धबधबा येतो. सुमारे ३०० फुटांवरून कोसळणाऱ्या बर्कीच्या धारेत भिजल्यावर आपण भोवतालच्या निसर्गाचा भाग आहोत याची खात्री पटते. तसे या परिसरात एकूण पाच धबधबे आहेत, त्यातील फक्त दोन धबधब्यांपर्यंत जाता येते. बर्की धबधब्याकडे येताना कासारी नदीवरचा पूल ओलांडावा लागतो.  पुलावरून नदीचे पाणी वाहात असेल तर मात्र बर्कीकडे जाणारा रस्ता बंद होतो. अशावेळी त्या पुलावरून जायचे वेडे धाडस करूही नये. बर्कीकडे येताना वाटेत एक पोलीस चेकपोस्ट लागते, जिथे पर्यटकांची कसून तपासणी केली जाते आणि पर्यटकांकडे दारू नाही याची खात्री पटल्यावर मगच पुढे जाण्याची परवानगी दिली जाते. बर्कीसारखे चेकपोस्ट खरं तर महाराष्ट्रातील इतर धबधब्यांजवळही असायला हवे. मद्यपान करून धबधब्यात मस्ती करताना जीव गमावणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायलाच हवी. बर्की धबधब्याचे वेगळेपण म्हणजे ज्यांना जंगलातून चालायचे नाही त्यांच्यासाठी चक्क बोटिंगची सुविधा आहे. बर्कीजवळच्या धरणाच्या जलाशयातून बोटीतून हा धबधबा गाठता येतो. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडीचा धबधबाही पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. राधानगरी गावापासून राऊतवाडीपर्यंत जाण्यासाठी रिक्षा मिळू शकतात. मात्र हा धबधबा फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने, जोरदार पाऊस झाल्यानंतरच जाण्यात मजा आहे.

पावसाळी भटकंतीत हे लक्षात ठेवा

* अपरिचित ठिकाणी जाताना गावातील एखादा मार्गदर्शक आवर्जून सोबतीला न्यावा. पावसाळ्यात आणि धुक्यामध्ये वाट हरवण्याची शक्यता असते.

* नदी, ओढे, ओहोळ ओलांडण्यापूर्वी गावकऱ्यांकडून तेथील पाण्याबद्दल माहिती करून घ्या. डोंगरात पावसाचा जोर वाढला की छोटे ओढेदेखील दुथडी भरून वाहू लागतात. शहरी लोकांना त्याची कल्पना नसते.

* अंतर्गत भागात प्रवास करताना अनेक ठिकाणी नदीच्या छोटय़ा पात्रावर छोटे छोटे पूल असतात. वाढत्या पावसात नदी पुलावरून ओसंडून वाहत असते. अशावेळी वेडे साहस करून त्यावरून गाडी घेऊन जाऊ नये. स्थानिकांच्या मार्गदर्शनाशिवाय असे पूल पार करू नये.

* डोंगरात कुठेही जात असाल तर पायथ्याच्या गावातील गावकऱ्यांना तुम्ही कुठे जाताय, केव्हापर्यंत येणार आहात याची कल्पना द्यावी. शक्य असल्यास स्थानिकांचे मोबाईल क्रमांक नोंदवून घ्यावे. आणि परत जाताना गावकऱ्यांना आपण जात असल्याची कल्पना देखील द्यावी.

* ग्रुपमधील सर्वाचे मोबाईल सुरू ठेवून बॅटरी संपू शकते. काही प्रसंग उद्भवलाच तर बॅटरीविना संपर्क साधणे कठीण होऊ शकते.

* धबधब्यावर, नदी अथवा समुद्रकिनारी मद्यपान, धुम्रपान करून जाऊ नका आणि तेथे जाऊनदेखील करू नका.

* सततच्या पावसामुळे धबधब्याच्या ठिकाणी खडकावर शेवाळे तयार होण्याचा संभव असतो. अशा ठिकाणी अत्यंत सावधपणे वावरावे.

* गोंगाट करून निसर्गाची शांतता भंग करू नये.

* आपण सोबत नेलेल्या सर्व प्लास्टिक, थर्माकोल अथवा अन्य वस्तू आपल्यासोबत परत आणून शहरामध्ये त्याची विल्हेवाट लावावी.

* सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकण्यासाठी चित्रविचित्र अंगविक्षेप करून जीवावर बेतेल (कडय़ाच्या टोकावर जाणे, समुद्रात जाणे, धबधब्याच्या माथ्यावर जाणे) असे प्रकार करू नये.

* सतत पावसात भिजत असल्याने दिवसभरात पाणी पिण्याचे टाळले जात, पण असे करू नये. डोंगरात भटकत असलात तर न चुकता भरपूर पाणी प्यावे.

मराठय़ांच्या इतिहासाची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या सातारा शहराच्या अवतीभवती पसरलेल्या सह्य़ाद्री्रच्या रांगांमध्ये पावसाळ्यात अनेक जलप्रपात आपले जलवैभव दाखवत कोसळत असतात. त्यातला ठोसेघरचा धबधबा आपल्या धुवांधार धारांनी पाहाणारांच्या नजरेचा आणि मनाचा ठाव घेत असतो. साताऱ्याहून सज्जनगडाकडे जाताना, वाटेतला बोगदा पार केल्यानंतर वळणावळणांचा घाट रस्ता या धबधब्याकडे घेऊन येतो. सज्जनगड मागे टाकून उंच असा बोरणे घाट चढून आल्यावर ठोसेघरचा धबधबा येतो. चाळकेवाडी आणि ठोसेघर या गावांच्या मध्ये, तारळ नदीच्या उगमाजवळ एका दरीत ११५० फुटांवरून या धबधब्याची धारा कोसळते. दोन स्वतंत्र धारांनी कोसळणारा हा धबधबा दरीत पडल्यानंतर एक होऊन तारळ नदी म्हणून पुढचा प्रवास सुरू करतो. आता या धबधब्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरक्षित सज्जा बांधलेला आहे. तसेच धबधब्याकडे जाताना परिसरातील निसर्गाचे दर्शन घडवणारे छायाचित्रांचे प्रदर्शन तयार करण्यात आले आहे. कासच्या पुष्प पठाराला भेट देताना या विरुद्ध बाजूला असलेल्या धबधब्याचा आनंद जरूर लुटावा. कास पठारावरील रानफुलांचा गालिचा पाहायला अक्षरश हजारो पर्यटक गर्दी करतात, पण या पठारापासून जवळच असलेल्या वजराई धबधब्याला भेट देणाऱ्यांची संख्या मात्र कमीच भरेल. कास पठारावरून बामणोलीकडे जाताना तीन किलोमीटरवर भांबवली हे लहानसे गाव आहे, याच गावातून वजराई धबधब्याकडे जाता येते. रस्ता तसा सोपा नाही, पण धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर मात्र कारणी लागल्याचे समाधान मिळते. सुमारे १८०० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये खाली पडतो. या धबधब्याच्या माथ्यावर वजराई देवीचे स्थान आहे, म्हणून याला वजराई धबधबा म्हटले जाते. साताऱ्याजवळचे महाबळेश्वर ऐन उन्हाळ्यातही आपल्या थंड हवेनं पर्यटकांना सुखावत असतं, पावसाळ्यात या गिरिस्थानाला नवी टवटवी येते. महाबळेश्वरचा लिंगमाळ धबधबा पावसाळ्यात ज्या जोशाने आणि उत्साहाने कोसळत असतो ते पाहून वर्षां ऋतू आल्याचा आनंद यालाच एकटय़ाला झालाय असं वाटतं. वेण्णा नदीच्या हा धबधबा (इथे खरे तर दोन धबधबे आहेत, एक छोटा आणि एक मोठा) तयार झाला आहे. सुमारे ५०० फुटांवरून पडणारी लिंगमाळाची धार बघण्यासाठी उत्तम व्ह्य़ू गॅलरी तयार करण्यात आहे, तिथून दिसणारे धबधब्याचे दृश्य डोळ्यांबरोबरच मनातही साठवले जाते.

महाराष्ट्रातल्या जलधारा तीर्थाचा आढावा घेताना एक नाव टाळता येणार नाही ते म्हणजे भंडारदरा. अहमदनगर जिल्ह्य़ातील प्रवरा नदीच्या काठावरील हे ठिकाण ब्रिटिशांनी बांधलेल्या विल्सन डॅममुळे पर्यटकांच्या नजरेत भरले. या धरणाच्या जलाशयाचा ‘आर्थर लेक’चा सांडवा तयार करताना कल्पकतेनं अशी रचना केली आहे की झकास धबधबा तयार झाला आहे. एका मोठय़ा खडकावरून पाण्याच्या धारा पडताना असे दृश्य तयार होते की जणू पाण्याची छत्रीच उघडली आहे. हा अम्ब्रेला फॉल फक्त धरणाचे दरवाजे उघडून जास्तीचे पाणी बाहेर सोडले जाते तेव्हाच पाहायला मिळतो. पर्यटकांची गर्दी पाहून १५ ऑगस्टच्या दिवशी धरण पूर्ण भरले असेल तर अम्ब्रेला फॉल सुरू करायचा प्रघात आहे. भंडारदरा धरणाची पाण्याची छत्री पाहायला मिळेल का नाही याची खात्री नसली तरी याच परिसरातील रंधा धबधबा मात्र आपल्या जलधारांनी नेहमीच पर्यटकांचे स्वागत करत असतो. १७० फुटांवरून पडणाऱ्या या धबधब्याचा जलस्रोत आता विद्युत निर्मितीसाठी वापरण्यात येत असल्याने पावसाळ्यातले त्याचे दर्शन अधिक मनमोहक असते.

निसर्गाची विविधता भरभरून लाभलेल्या महाराष्ट्रातील जलधारा तीर्थाची यादी तशी न संपणारीच आहे. नाशिकजवळच्या दुगारवाडीचा धबधबा, नांदेडजवळचा सहस्रधारा धबधबा, खोपोलीजवळचा झेनिथ धबधबा, वैभववाडीजवळचा नापणे धबधबा, कोयनानगरचा ओझर्डे धबधबा, लोणावळ्याजवळचा कातळधारा धबधबा असे एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या खळखळत्या जलधारांनी तुमचे स्वागत करायला उत्सुक असतात. मात्र हा डोंगरदऱ्यातला जलजल्लोष अनुभवताना थोडी काळजी अवश्य घ्या. पावसामुळे धबधब्याजवळचा परिसर निसरडा झालेला असतो, शेवाळ्यावरून पाय घसरून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे उगाच धावपळ करू नका. धबधब्याचे डोह, त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि प्रमाण याचा अंदाज घेऊन मगच पाण्यात उतरा. उगाच नसते साहस करण्यासाठी धबधब्याच्या उगमापाशी जाण्याचा प्रयत्न करू नका. धबधब्याची मजा लुटताना मद्यपान करू नका. ज्यांना पोहता येत नाही त्यांना पाण्यात उतरायचा आग्रह करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडच्या काळात बोकाळलेले सेल्फीचे वेड पाहाता, धबधब्याच्या पाश्र्वभूमीवर सेल्फी काढताना सावधगिरी बाळगा. जराशी काळजी घेतलीत तर पावसाळ्य़ातील धबधबाभेटीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल.