लॅक्मे फॅशन वीकमध्ये यंदा नव्याने इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या डिझायनर्सची संख्या लक्षणीय होती. त्यांच्या विचारसरणीने उपस्थितांना थक्क केलं. भारतीय पारंपरिक हातमाग, एम्ब्रॉयडरी, पेंटिंग्स यांचा वापर फॉर्मल्स आणि कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये करत फ्यूजनची वेगळी व्याख्याच त्यांनी तयार केली.

जगभरात अमेरिका, युरोप फॅशन क्षेत्रात अग्रेसर मानले जातात. कोणतेही नवे ट्रेंड, नव्या स्टाइल्स पहिल्यांदा इथे येतात आणि मग जगभरात नावाजल्या जातात. अर्थात या दोन्ही खंडांच्या फॅशन स्टाइल्समध्ये कमालीचा फरक आहे. युरोपला राजघराण्यांची मोठी परंपरा लाभली आहे. ही परंपरा त्यांच्या फॅशन संस्कृतीत खोलवर रुजली आहे. त्यामुळे त्यांच्या कलेक्शन्समधील शाही लुक नेहमीच उठून येतो. अमेरिकन फॅशन त्या मानाने नव्याने आलेल्या उद्योजक पिढीवर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे एकीकडे युरोपात एलिगंट, रॉयल लुक प्रामुख्याने दिसतो, तर अमेरिकेतील फॅशन त्यांच्या क्रिस्प कट्स, शार्प लुक्ससाठी ओळखली जाते. गेल्या काही वर्षांत जपाननेसुद्धा फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. अमेरिका, युरोपपेक्षा वेगळी, काहीशी बंडखोरीची छटा असलेल्या जपानी स्टाइलने जगाला त्यांची दखल घेणे भाग पाडले आहे. या सगळ्या गर्दीत भारताच्या फॅशन इंडस्ट्रीची ओळख काहीशी अस्पष्ट, धूसरच होती.

भारत हा प्रामुख्याने सणांचा देश. लग्न, सण समारंभ यांची रेलचेल आपल्याकडे वर्षभर सुरू असते. मग त्यानिमित्त उंची कपडे, दागिने मिरविणे हे ओघाने आलेच. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारतीय फॅशन डिझायनर्सनी सिल्क, वेल्व्हेट यांसारखे उंची कापड, जरदोसी, कशिदा काम यासारख्या पारंपरिक आणि नजरेत भरणाऱ्या एम्ब्रॉयडरीचा वापर करत उंची कपडय़ांचे कलेक्शन्स तयार करण्याकडे प्राधान्य दिले. त्यानंतर मनीष मल्होत्रासारख्या डिझायनर्सनी फॅशन आणि बॉलीवूड यांची नाळ जोडायचा प्रयत्न केला. पण या गडबडीत रेग्युलर वेअर म्हणजेच दैनंदिन वापराच्या कपडय़ांचा विभाग मात्र भारतीय डिझायनर्सच्या हातातून काहीसा निसटला. त्यामुळे एरवी वेस्टर्न लुक आणि फक्त सणांना भारतीय डिझायनरचे कपडे हे चित्र कित्येक र्वष भारतात कायम राहिले होते. पण सध्याची नवीन पिढी नेमकी हीच तफावत भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. रोजच्या वापराच्या कपडय़ांमध्ये भारतीय वातावरणाला साजेसे, सुटसुटीत पण खास इंडियन टच असलेले कपडे हे त्यांचे मुख्य आकर्षण ठरू लागले आहे. या प्रयत्नांत केवळ सणांसाठीचे कपडे आणि बॉलीवूड स्टाइल अशी ओळख असलेल्या भारतीय इंडस्ट्रीची शाखा विस्तारू लागली आहे.

ट्विस्ट इन लुक

एकीकडे पॅण्ट्स, टॉप्स, स्कर्ट्स हा तरुणाईला हवाहवासा वेस्टर्न लुक आणि दुसरीकडे कुर्ता, कॉटन पॅण्ट, सलवारसारखा सुटसुटीत इंडियन लुक यामध्ये तळ्यात मळ्यात खेळण्यापेक्षा यंदाच्या डिझायनर्सनी या दोन्ही लुक्सना एक मॉडर्न ट्विस्ट दिला होता. किमोनो स्टाइल श्रग, समर जॅकेट्स, स्वेटशर्ट, ओव्हरसाइज ड्रेस, रॅप ओव्हरऑल, स्ट्रेट कुर्ता, हाय स्लीट कुर्ता, मॅक्सी ड्रेस, शर्ट ड्रेस असे वेगवेगळे भन्नाट कपडे यंदा रॅम्पवर दिसले. विशेष म्हणजे या सगळ्याचे पेअिरग नेहमीच्या जीन्स, ट्राऊझरसोबत करण्याऐवजी धोती पँट, सलवार, कॉटन पँट, स्कर्ट्स, केप्रीज यांच्यासोबत करण्यात आले होते. डिझायनर कलॉल दत्ताने केवळ नेव्ही रंग वापरून त्याचे अख्खे कलेक्शन केले होते. पण वेल्व्हेट, कॉटन, वूल, सिल्कसारख्या कापडांचा कुशलतेने वापर करत त्याने त्याचे कलेक्शन कुठेच कंटाळवाणे होणार नाही, याची काळजी घेतली होती. डिझायनर कुणाल रावतने कुर्ता, जॅकेट आणि कॉटन पॅण्ट हा मुलांच्या पारंपरिक वॉडरोबचा महत्त्वाचा लुक रोजच्या वापरात कसा कुशलतेने वापरू शकतो, हे रॅम्पवर उलगडले. ‘कोणतेही संगीत, लग्न असो, मुलं त्यांच्या वॉडरोबमधला ठेवणीतला कुर्ता, सलवार ड्रायक्लिन करतात आणि परत वापरतात. पण हेच कपडे त्यांच्या रोजच्या मूडनुसार सहज कसे वापरता येतील आणि त्याला रोज नवीन ट्विस्ट कसा देता येईल, याकडे मी जास्त लक्ष दिले होते,’ असे कुणाल सांगतो.

स्वच्छंदी आणि मनमौजी लुक

लूझ फिट कपडे हे या डिझायनर्सचं मुख्य वैशिष्टय़ होतं. तसंच मेसी लुक, ए-सिमेट्री यंदाच्या कलेक्शन्समध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाली. एरव्हीचे ड्रेसिंगचे नियम झुगारत काहीसा अपूर्ण लुक तयार करण्याकडे डिझायनर्सचा कल होता. अर्थात यात कुठेही स्वैराचार होणार नाही याची काळजीही घेतली होती. ‘हल्लीची पिढी ड्रेसिंगचे साचेबद्ध नियम तोडून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यांना अनेक पातळ्यांवर काम करायचं असतं, त्यात परफेक्शन हवंच हा त्यांचा हट्ट नसतो. पण नवं करण्याची धडपड असते. ही धडपड मला त्यांच्या कपडय़ांमधून दाखवायची होती,’ असे डिझायनर पल्लवी ध्यानी सांगते. शर्ट ड्रेस आणि स्कर्ट, शिफ्ट ड्रेस आणि किमोनो, मॅक्सी आणि स्वेटशर्ट अशा वेगळ्या लुक्सचा समावेश तिच्या कलेक्शनमध्ये होता. फॉर्मल वेअरला थोडा रिलॅक्स फिट देण्याचा प्रयत्न तिने यंदा केला होता. ड्रेिपगची कला भारताला नवी नाही. हल्ली ड्रेिपग म्हटलं तर फक्त साडय़ा डोळ्यांसमोर येतात. पण याच ड्रेिपगचा वापर करून सुटसुटीत ड्रेस तयार करण्याचा प्रयत्न डिझायनर प्रियांका एलाने केला होता.

पारंपरिक कापडांना नवा साज

जीन्स, टी-शर्ट, टय़ुनिक्स म्हणजे रेग्युलर वेअर कलेक्शनचा आत्मा. ऑफिस, कॉलेज, पार्टीजमध्ये यांचा बोलबाला अधिक. त्या अनुषंगाने डेनिमसोबत पॉलिइस्टर, सिंथेटिक कापडांचा समावेश प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये होऊ लागला. पण एरव्ही एसीच्या ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर ठीक आहे, पण लोकल, बसचा प्रवास करताना कडाक्याच्या उन्हात, घामाच्या धारा सुटलेल्या असताना हे सिंथेटिक कापड जीव नकोसा करतं. अशा वेळी अलीबाबाच्या गुहेत दडून बसलेलं कॉटन तरुणाईला जवळचं वाटू लागलं. त्यासोबत लिनिन, मलमलनीसुद्धा फॅशनविश्वात प्रवेश मिळविला. आसामच्या डिझायनर प्रणामी कालिताने आसाममधील खास मुग्गा सिल्क, एरी, पाट सिल्क कापडांचा वापर करत कलेक्शन सादर केलं होतं. ‘आईच्या साडय़ांपासून ड्रेस बनविण्याचा छंद मला होताच. भारतीय तरुणीचा वेस्टर्न आणि इंडियन असे दोन वेगवेगळे वॉर्डरोब नसतात. तिला या दोघांचा मेळ घालायला आवडतं. ही बाब लक्षात घेत पारंपरिक कापडांचे जॅकेट, शर्ट ड्रेस, कुर्ता, धोती असे प्रकार मी कलेक्शनमध्ये घेतले,’ असे ती सांगते. डिझायनर अलॅन अलेक्झांडरने कॉपरेरेट सूट्सवर आधारित कलेक्शन सादर केलेलं. विशेष म्हणजे यासाठी त्याने मरिनो वूल, कॅशमेन, ऑरगॅनिक कॉटन यांसारख्या खास नसíगक कापडांचा वापर केला होता. चंदेरी रॉ सिल्कसारख्या एरवी रिच, पण सुटसुटीत कापडांचा वापर करून डिझायनर विनित-राहुल यांनी पार्टी कलेक्शन तयार केलं होतं. एरवी हे फॅब्रिक्स आईच्या साडय़ांपुरतं कपाटात राहतं, पण भारतीय वातावरणाला साजेसे असल्यामुळे त्यांना रेग्युलर वेअरमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे हे डिझायनर सांगतात.

जुनं ते सोनं

नवी पिढी जुन्या कलांपासून दूर जातेय, हा समज पुसून काढत नव्या डिझायनर्सनी यंदा जुन्या कला, पेंटिंग, विणकाम यामधून प्रेरणा घेत त्यांची कलेक्शन्स सादर केली होती. मथुरेला गोपींसोबत रासलीला करणाऱ्या कृष्णापासून प्रेरणा घेऊन पिच्वाई पेंटिंग बनविल्या जातात. कपडय़ांवर या पेंटिंगमधील फुले, वेली यांचे मोटीफ वापरून मारोडी एम्ब्रॉयडरी करून डिझायनर स्वाती विजयवार्गीने तिचं कलेक्शन तयार केलेलं. विशेष म्हणजे तिने विंटर कलेक्शन सादर केल्याने हिवाळ्याच्या मौसमात काढल्या जाणाऱ्या पिच्वाई पेंटिंग तिने वापरल्या होत्या. हातमाग आसामी बायकांच्या रक्तात भिनलंय. तेथील गावांमध्ये हातमाग येत नसेल, तर मुलींची लग्नं होत नाहीत, असं आवर्जून सांगणाऱ्या आदिती होलानीने तिच्या कलेक्शनमध्ये मोग्गा, इंडी, नुन्नी या हातमागाच्या कापडांचा वापर करत फ्यूजन कलेक्शन तयार केलं होतं. हे कलेक्शन शहरातील तरुणी ऑफिस, पार्टीसाठी सहज वापरू शकेल आणि गावातल्या स्त्रियांना यातून रोजगार मिळेल, हा यामागचा तिचा उद्देश होता.

जुनी कला, हातमाग जपलं पाहिजे, टिकवलं पाहिजे हे फक्त बोलून चालणार नाही. त्यासाठी कारागिरांना हातात रोजगार मिळायला हवा. भारतात प्रत्येक राज्यात हातमागाची वेगळी संस्कृती आहे आणि कुशलतेने वापर केल्यास आपण त्यांना आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनवू शकतो, ही बाब यंदाच्या नवीन फळीच्या डिझायनर्सनी जाणली. यापुढेही हा नव्या-जुन्याचा सिलसिला कायम राहील, याची आशा करायला हरकत नाही.

काळ्या रंगाचा ट्रेण्ड

केसांच्या स्टाइलपासून, कपडे आणि  फूटवेअपर्यंत हजारो डिझायनर्सच्या डिझाइन्सची ओळख करून देणारा सोहळा म्हणून लॅक्मे फॅशन वीककडे पाहिलं जातं. थंडीच्या मौसमसाठी काहीतरी हटके करण्यासाठी घेतलेली कमालीची मेहनत आणि त्यातून आलेल्या अफलातून कलाकृती या वेळच्या रॅम्पवर पाहायला मिळाल्या. भारतीय परंपरेच्या बरोबरीने जगातील इतर ठिकाणच्या क्लोिदगवर तिथे एक प्रकाशझोत टाकला गेला. आजच्या घडीला भारतात तसंच भारताबाहेर फॅशनकडे कसे पाहिले जाते, पुढच्या काळातल्या फॅशन कशा असतील याचा अंदाज या लॅक्मे फॅशन वीकमधून घेता येतो.

पुढील चार ते सहा महिने लग्न, सण-समारंभ आणि सुट्टय़ा या सगळ्याच्या हिशोबाने नवीन स्टाइल्स आणि त्याचे नवीन कलर पॅटर्न कोणते असू शकतात ते मांडणं हे या फॅशन वीकचं खास वैशिष्टय़ म्हणता येईल. स्टायलिंग आणि कपडय़ांचा वापर एखाद्या प्रदेशाच्या वातावरणानुसार करणं ही एक कल्पक गोष्ट या वेळी दिसली. राजस्थानमध्ये कापडाचा वापर वाळवंटी आणि उष्ण वातावरण लक्षात घेऊन होतो. त्यासंदर्भात स्वाती विजयीवग्री सांगते की नाथवाडाच्या पिचवाई पेंटिंगचा वापर करून तिने कलेक्शन्स तयार केले आहेत. ज्यात गोपाष्टमी पिचवाईचा वापर जास्त आहे. नवी पिढी लक्षात घेऊन त्यावरचं पॅचवर्क हे अ‍ॅन्टिक मारोदी एम्ब्रॉयडरीचं असून त्यावरचे शिबोरी पिंट्र्स हे सिल्कसारख्या फॅब्रिकवर केले आहेत. प्युअर सिल्क, मुंगा सिल्क आणि सिल्क ऑरगंजा हे काही सिल्क्स खास करून सर्व काळ्या रंगाचे असून त्याला लाल रंगाची जोड आहे. चोगामध्ये फ्लोअर लेन्ग्थ जॅकेट्स, घागरा, ओढणी आणि पजामा यांचा वापर आहे. राजस्थानसारख्या उष्ण प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या फॅब्रिकचा वापर तिने हिवाळी कलेक्शनसाठी केला. त्याबद्दल ती म्हणते की आपली विचारसरणी आधुनिक असली तरी आपल्याला अजूनही जुन्या परंपरेची ओढ आहे.

त्याचबरोबर राहुल आणि शिखाने ‘चार चिनार’मधून पíशअन फॅब्रिकवर काश्मिरी हॅन्ड एम्ब्रॉयडरीसाठी काश्मीर, हिमालय यांचा स्टाइल म्हणून वापर केला. याबरोबरच या डिझाइन्समधून निसर्गरम्य काश्मीरच्या थंड हवामानाची अनुभूती येते. ते सांगतात, त्यांच्या कलेक्शनमध्ये मरुन, हिरवा आणि निळा हे रंग जास्त पाहायला मिळतील. त्यात अनारकली, लेहेंगा आणि लांब कुर्ते हे टर्कीश धाग्यांनी विणलेले आणि या सर्वावर वेलवेटचा टच असलेला दुपट्टा हा रॉयल टच दिला होता. काश्मिरी एम्ब्रॉयडरी ही खास करून शालींसाठी वापरली जाते. त्यासाठी मुगलकालीन क्राफ्ट आणि टेक्स्टाइल वापरले गेले आहेत, असं राहुल सांगतो. हे कलेक्शन ब्रायडल वेअरसाठी उत्तम ठरू शकतं.

आता यापुढच्या काळात लग्नाचा सिझन असल्याकारणाने गौरांग शहाने वृंदावनाच्या सौंदर्याची संकल्पना मांडली. त्याच ढंगातले ब्रायडल कलेक्शन त्याने रासलीलेच्या रूपात आणले. त्याने पटोला, जामदनी आणि बनारस या तीन वेगवेगळ्या प्रदेशांच्या म्हणजेच पंजाबी, बंगाल आणि उत्तर प्रदेश यांच्या कापडापासून त्याने ब्रायडल कपल वेअर तयार केले. हे कलेक्शन भारतातल्या विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषेचं मिश्रण आहे. शो टॉपर बॉलीवूड अभिनेत्री मुग्धा गोडसेने घातलेल्या लेहेंग्याचं गोल्ड आणि क्रीम-व्हाइट कॉम्बिनेशन हे तामिळनाडू तर हिरवी चोळी आणि तिच्या पाठी असणारी बांधणी हे राजस्थानी आणि पिंट्रेड दुपट्टा हे गुजराती असं सुंदर घागरा-चोळीसारखं ब्रायडल कलेक्शन राधेच्या रूपासारखं आहे असं तो सांगतो.

कपडे वापरताना सिझननुसार रंगही बदलतात. हिवाळ्यात काळा रंग आपल्याला जास्त चांगली ऊब देतो. शिवाय तो कोणत्याही रंगासोबत उठून दिसतो. त्या रंगाची खासियत ही की तो एकटाही राहतो आणि इतर रंगांसोबतसुद्धा. त्यामुळेच या सिझनच्या फॅशन वीकमध्ये विविध रंगांसोबत काळा रंगही दिसला. डिझाइनर ईशा आमीन सांगते की रात्री, गडद अंधारात दिसणारी झाडझुडपं, पानंफुलं, त्यातून निर्माण झालेलं डिझाइन वापरलं, वर काळं आकाश आणि जमिनीवरचा काळोखा भाग त्यात दिसणाऱ्या गडद छटा यांचा वापर फॅब्रिकवर लेझर कट्टिंग, स्कलोपिंग (शेलसारखे डिझाइन) आणि थ्रीडी डिझाइन्सने पॅचवर्क केलं. तिच्या प्रत्येक कलेक्शनमध्ये व्हेरिएशन असल्यामुळे संपूर्ण कलेक्शनमध्ये काळा रंग असला तरी तो तिच्या कलेक्शनचा स्ट्राँग पॉइंट ठरला.

डिझाइनर प्रियदर्शनी रावच्या म्हणण्यानुसार, दरवेळी नवं कोर करायचं हे मनात ठेवून काम केलं. काही वेगळे प्रयोग करत असतानाच कलर कॉम्बिनेशनसहित मांडणी केली. गडद निळ्या आणि काळ्या रंगांच्या आधारे नवनवीन पॅचवर्क व कपडय़ांची स्टाइल, हातापासून ते पायापर्यंत विविधता ठेवली. सशिको हे जपानी एम्ब्रॉयडरी तंत्र आहे. ज्यात कट टॉप, जॅकेट, पॅण्ट व कॉटचा वापर आहे आणि खादी, कॉटन तसेच सिल्क हे फॅब्रिक आणि त्याचे पॅचवर्क हे इण्डिगोत आहे. तसेच मिड-ब्ल्यू हे क्लोरलसाठीचं खास वैशिष्टय़ होतं. एकूण या वेळच्या फॅशन वीकबद्दल सांगायचं तर यंदा काळ्या रंगाचा ट्रेण्ड होता असं म्हणता येईल.

– गायत्री हसबनीस

मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com