यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये डिझायनर वेंडेल रोड्रिक यांनी भारतीय स्त्रियांच्या शरीररचनेनुसार साइजचा तक्ता तयार केल्याचं जाहीर केलं आणि एका नव्या विषयाला तोंड फुटलं. आपल्याकडे फॅशनची एवढी मोठी बाजारपेठ असताना आपण एवढे दिवस अमेरिकी तसंच युरोपीय साइज चार्टवर अवलंबून राहात होतो, ही अचंबित करणारी गोष्ट आहे.

मुंबईमध्ये २४ ऑगस्टपासून ‘लॅक्मे फॅशन वीक’ची लगबग सुरू झाली आणि वर्तमानपत्रांचे रकाने, सोशल मीडियाच्या वॉल फॅशनमयी होऊन गेल्या. नेहमीप्रमाणे डिझायनर्स, त्यांचे कलेक्शन्स, कपडे, ज्वेलरी, मेकअप सगळ्याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्याच्या अगदी सुरुवातीला, फॅशन वीकच्या पहिल्याच दिवशी डिझायनर वेंडेल रोड्रिकने एक महत्त्वाची घोषणा करत सगळ्यांना थक्क केलं. विषयही तितकाच गंभीर होता. त्याने भारतीय स्त्रियांच्या देहरचनेला अनुसरून साइजचा तक्ता तयार केला होता. भारतामध्ये अशा प्रकारचा तक्ता तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न. वास्तविक या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावतील. असं आहे, तर आत्तापर्यंत आपले डिझायनर्स, ब्रॅण्ड्स भारतीय स्त्रीसाठी कलेक्शन तयार करताना नक्की कोणता साइज चार्ट वापरायचे? मुळात ही साइज चार्टची गरज काय आणि किती? त्याने आपल्याला किती फरक पडतो?

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात

कपडे आणि साइज चार्ट

मॉल, दुकानात खरेदीला गेल्यावर प्रत्येक कपडय़ावर असलेले एस, एम, एल, एक्सएल, एक्सएक्सएल हे साइज तुम्ही पाहिले असतीलच. या साइजनुसारच आपण कपडे निवडतो. टेलरकडे कपडे शिवायला नेल्यास तो आपलं माप घेऊन त्यानुसार कपडे शिवतो. पण कोटय़वधी लोकसंख्या असलेल्या देशातील प्रत्येक स्त्रीचे माप घेऊन वेगळे कपडे शिवणं दुकानदाराला, डिझायनरला किंवा ब्रॅण्ड्सना शक्य नसतं. त्यामुळे प्रत्येक देशातील स्त्री आणि पुरुष यांच्या मापांमधील सरासरी काढून त्यानुसार एक ठरावीक चार्ट तयार केला जातो. त्या देशातील स्त्रियांच्या बॉडीटाइपनुसार बस्टलाइन, वेस्टलाइन, हिपलाइन, उंची, खांदे यांची मापे त्यात नमूद केलेली असतात.

हा चार्ट त्या देशातील प्रत्येक ब्रॅण्ड, डिझायनर, गल्लीबोळातील छोटय़ा दुकानदारांपर्यंत सगळ्यांसाठी एकसारखा असतो. त्यानुसार कपडय़ांचे पॅटर्न बनतात. अर्थात कधीतरी ग्राहकाच्या वैयक्तिक मापानुसार तयार कपडय़ांमध्ये काही जुजबी बदल करावे लागतात. सर्वात प्रथम युरोप आणि अमेरिका यांनी साइज चार्टनुसार कपडे बनवायला सुरुवात केली. त्यानंतर चीन, जपान, रशिया यांच्यासोबत अगदी इंडोनेशियामध्येही त्या देशातील स्त्रियांच्या शरीरयष्टीनुसार बनविलेले वैयक्तिक साइज चार्ट वापरले जातात. पण अजूनही भारतात मात्र अशा प्रकारचा चार्ट करायची गरज कोणालाही भासली नव्हती.

साइज चार्टची गरज काय?

मॉल किंवा कोणत्याही दुकानात कपडे खरेदीला गेल्यावर बऱ्याचदा तुम्हाला फिटिंगबद्दल वेगवेगळे अनुभव आलेले असतील. कित्येकदा एखाद्या ब्रॅण्डचा स्मॉल साइजचा कुर्ता तुम्हाला फिट होतो, पण तेच दुसऱ्या ब्रॅण्डमध्ये साइज एम बघावी लागते. जीन्स निवडताना तर प्रत्येक ब्रॅण्डनुसार फिट होणाऱ्या जीन्सच्या साइजमध्ये जमीनअस्मानाचा फरक असतो. क्वचितप्रसंगी एखादा ड्रेस तुमच्या खांद्यावर नीट बसतो, पण कमरेवर सल असतो. त्यावर सेल्समनचं ठरलेलं उत्तर असतं, ‘मॅडम ही साइज तुमच्यासाठी योग्य आहे. लहान साइज घेतलीत, तर ड्रेस घट्ट बसेल. त्यापेक्षा लूझ बरा. हवंतर मी कमरेकडे आतून अर्धा इंच शिलाई मारतो.’ आपण याला निमूटपणे ‘हो’ म्हणतो. दुकानात किमान कपडे घालून पाहायला ट्रायल रूम असतात, पण ऑनलाइन शॉिपगमध्ये आधीच साइजचा गोंधळ, मग घरी पार्सल आल्यावर 30-lp-ganeshकपडय़ांचं ट्रायल घेणं, त्यानंतर ते बदलण्यासाठी खटाटोप करणं, हे सर्व सोपस्कार करावे लागतात. पण मुळात हे गोंधळ होतात, कारण भारतात साइज चार्ट्सची सुसूत्रता नाही.

भारतातील अमेरिकन ब्रॅण्ड्स त्यांच्या भारतातील कलेक्शन्समध्येही अमेरिकन साइज चार्ट वापरतात तर युरोपियन ब्रॅण्ड्स युरोपियन चार्ट वापरतात. (अजून तरी जपानी आणि चिनी ब्रॅण्ड्स भारतात आले नाहीत, अन्यथा त्यांचेही साइज चार्ट भारतात घुसतील). यापलीकडे भारतीय ब्रॅण्ड्स, डिझायनर्स यांच्यात कोणता साइज चार्ट वापरावा, याबद्दल कोणतेही नियम नसून प्रत्येकजण आपल्या सोयीने अमेरिकन किंवा युरोपियन चार्ट वापरतो.

भारतीय स्त्रीची एकूणच शरीरयष्टी ही अमेरिकन आणि युरोपियन स्त्रियांपेक्षा खूप वेगळी आहे. वेंडेल रॉड्रिक सांगतात, ‘भारताच्या प्रत्येक भागातील, स्त्रियांची शरीरयष्टी वेगवेगळी आहे. त्यातही बहुतेकदा भारतीय स्त्रियांच्या शरीराचे कमरेवरचा (अपर बॉडी) आणि कमरेखाली पायापर्यंत (लोअर बॉडी) असे दोन भाग केले असता, दोन्हीची मापं वेगवेगळी असतात. त्यामुळे अपर बॉडीला स्मॉल साइज योग्य असेल, तर लोअर बॉडीला एम साइज बरोबर बसते.’ स्त्रियांमध्ये पेअर किंवा ओव्हरग्लास बॉडीशेप आपल्याकडे अधिक पाहिला जातो. पण युरोपीय आणि अमेरिकन महिलांमध्ये लीन (आयताकृती) बॉडीशेप प्रामुख्याने पाहिला जातो. ज्यामध्ये अपरबॉडी आणि लोअरबॉडी यात फारसा फरक नसतो. कित्येकदा भारतीय महिलांना त्यांच्या मांडय़ा जाड आहेत असं वाटत राहतं. कारण नकळतपणे ब्रॅण्ड्स किंवा डिझायनर्स भारतीय स्त्रियांना या लीन बॉडी टाइपमध्ये बसविण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय शरीरयष्टीनुसार मात्र मॉडेल्स आणि सामान्य स्त्रिया यांच्या हिप्समध्ये तितकासा फरक नसल्याचं वेंडेल रॉड्रिक सांगतात. थोडक्यात योग्य साइज चार्ट वापरल्यास सध्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणाबद्दल असलेला अपराधीपणा कित्येकअंशी कमी होऊ शकतो.

साइजच्या गोंधळाचा उगम

ऐंशीच्या दशकापर्यंत आपल्याकडे टेलर संस्कृती बऱ्यापकी रुळली होती. साधारणपणे नव्वदीच्या दशकात भारतात वेगवेगळे पाश्चात्त्य ब्रॅण्ड्स दाखल होऊ लागले. त्यांची कलेक्शन्स त्यांच्या देशातील साइज चार्टनुसारच होती. त्याआधी ऐंशीच्या दशकापासून भारतात फॅशन डिझायनर ही संकल्पना उदयास येऊ लागली होती आणि रोहित खोसला, तरून तेहलानी, रितू कुमार असे डिझायनर्स त्यांची कलेक्शन्स, डिझायनर स्टोर्स घेऊन बाजारात दाखल झालेले. सुरुवातीच्या काळातील अनेक डिझायनर्स फॅशन डिझायिनगचे औपचारिक शिक्षण परदेशातून घेत. त्यामुळे त्यांना संबंधित देशातील साइज चार्ट वापरण्याची सवय होती. आजही भारतात फॅशन डिझायिनग शिकविणारी कॉलेजेस् असली, तरी त्यांचा अभ्यासक्रम पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीनुसार आहे. त्यामुळे फॅशनचे विद्यार्थी शिकताना अमेरिकन आणि युरोपियन साइज चार्ट वापरतात. हीच सवय पुढे व्यावसायिक पातळीवरही कायम राहिली. त्यामुळे बाजारात अमेरिकन आणि युरोपियन साइज चार्ट दाखल होऊ लागले.

ब्रॅण्ड्स वापरणार का?

डिझायनर वेंडेल रोड्रिक यांनी भारतीय स्त्रीसाठी कपडे तयार करण्यासाठी विशिष्ट साइज चार्टची असलेली गरज ओळखून १९८८ पासून त्यावर काम सुरू केलं होतं. बरीच र्वष ते त्यांच्या ब्रॅण्डअंतर्गत कलेक्शन्स तयार करताना स्वत: तयार केलेला भारतीय साइज चार्ट वापरत आहेत. या चार्टमुळे कलेक्शन्सवर काम करणं सोप्पं असल्याचं ते सांगतात. यंदाच्या ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या निमित्ताने त्यांनी हा चार्ट प्रसिद्ध केला. ‘मी याआधीही डिझायनर्सना या चार्टबद्दल तसंच इंडियन साइज चार्टच्या गरजेबद्दल सांगायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी कोणीच त्याला तितकंसं महत्त्व दिलं नाही. आजही त्यांचा कम्फर्ट झोन बदलून ते हा चार्ट बदलण्यास उत्सुक नाहीत,’ असं ते सांगतात. आज भारत फॅशनची एक मोठी बाजारपेठ झाली आहे. कित्येक नवे ब्रॅण्ड्स रोज भारतात येतात. भारतीय डिझायनर्स, त्यांची कलेक्शन्स परदेशात नावाजली जातात. अशा वेळी आपण साइज चार्टसारख्या महत्त्वाच्या बाबीसाठी बाहेरच्यांवर का अवलंबून राहावं? भारतात फॅशन उद्योग हा संघटित उद्योग नाही. अगदी गल्लीतील छोटय़ा दुकानापासून मॉलमधील डिझायनर बुटिकपर्यंत विविध स्तरांवर हा व्यवसाय पसरलेला आहे. त्यातही एकजूट नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत वैयक्तिकरीत्या पोहोचणे शक्य नसून सरकारी पातळीवर याबद्दल प्रयत्न होण्याची गरज असल्याचं वेंडेल रॉड्रिक सांगतात. त्याचप्रमाणे भारतीय ब्रॅण्ड्स आणि डिझायनर्स यांनीही इंडियन बॉडी चार्टबद्दल सकारात्मक विचार करायची गरज ते व्यक्त करतात.

‘ब्रॅण्ड्स, डिझायनर्सनी इंडियन बॉडी चार्ट वापरावा की नाही, हा पूर्णपणे त्यांचा निर्णय आहे. पण त्यांनी हे करावं असं वाटत असेल, तर ग्राहकांनी त्यांच्याकडे अशी मागणी केली पाहिजे,’ असं वेंडेल रॉड्रिक सांगतात. फॅशन डिझायिनग कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना इंडियन बॉडी चार्ट वापरायला शिकविणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कपडे, मग ते लेटेस्ट ट्रेण्डचे असो किंवा नसोत, पण ते योग्य मापाचे असावेत, याबद्दल आपण आग्रही असणं गरजेचं आहे. येत्या काळात त्यासाठी हा छोटा पण महत्त्वाचा बदल घडवून आणणं, तितकंच गरजेचं आहे.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com