गुरू : घाबरू नकोस, आजी पडली.

ताई : काय, कुठे, कशी?

गुरू : पडली रस्त्यात फक्त मुका मार लागला आहे.

ताई : किती लागलंय? आत्ता कुठे आहे?

गुरू : हो हो. सांगतो. पण तू पॅनिक होऊ नकोस.

ताई धावतपळत हॉस्पिटलमध्ये आली. रिसेप्शनिस्टने सांगितल्याप्रमाणे समोरच्या वॉर्डमध्ये आली. बरीच तरुण मुले उभी होती. ताईला बघून गुरू पटकन् पुढे आला. ‘आजी कुठे आहे? आजोबा कुठे आहेत? आजी कशी आहे?’ ताईची प्रश्नांची सरबत्ती चालता चालता चालू होती. गुरू तिला घेऊन आजीजवळ जाऊ लागला. आजोबांना बघून तिला एकदम हुंदका फुटला. आजोबांनी तिला पाठीवर थोपटून शांत हो, काही नाही असे सांगितले. ती धावत आजीजवळ गेली. अशी पलंगावर आरामात पहुडलेली आजी तिने फारच क्वचित बघितली होती. आजीच्या गळ्यात पडून ती रडू लागली. आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हटले, ‘‘अगं वेडे, मला काही झालेले नाही. मी पडले म्हणून जरा आरामाची आवश्यकता आहे.’’

तेवढय़ात नर्स आली व डॉक्टर राऊंडवर येत आहेत म्हणून सर्वाना बाहेर जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी आजीला घरी घेऊन जाण्यास सांगितले. परंतु वेळच्या वेळी औषधे व आठवडय़ाचा सक्तीचा आराम फर्मावला. व्हीलचेअरमध्ये बसून आजीची सवारी कारमधून घरी आली. कारमधून उतरून पुन्हा व्हीलचेअरवर बसून खोलीतील बेडवर विराजमान झाली. ‘आजी टेक केअर, आम्ही येतो, बाय बाय’ म्हणत गुरूच्या दोस्तांचा फौजफाटा बाइक्सवरून निघून गेला.

मुलांचा कल्ला बघून ताई एकदम आश्चर्यचकित झाली होती. ती आजीला म्हणालीच, ‘‘काय गं, ही मुले एवढी कशी तुझ्या तैनातीला हजर होती?’’

आई : ते गुरूचे मित्र आहेत.

ताई : पण आजी, मला एक गोष्ट कळत नाही की तू एवढय़ा लांब आणि तेही एकटी आजोबांना न घेता का गेली होतीस.

आजी : काही नाही गं सहज.

ताई : आजी, एवढय़ा लांब एकटे अणि तेही सहज शक्यच नाही. प्रत्येक गोष्ट तू आमच्याबरोबर शेअर करतेस, पण आज काहीतरी लपवतेस माझ्यापासून असं वाटतं.

आजी : मी काही लपवत नाही. तुला पटणार नाही.

ताई : काय पटणार नाही. सांगून तर बघ.

आजी : ते पोकीमॉन पकड डाव..

तेवढय़ात गुरू तेथे आला. ताईने त्यालाच विचारले, ‘‘काय सांगते आहे?’’

गुरू : अगं तो पोकीमॉन गो गेम माहीत आहे ना तुला.

ताई : त्या गेमचा आणि आजीचा काय संबंध.

गुरू : त्यामुळेच तर हा लफडा झाला.

ताई : गुरू आजीला नक्की काय झाले ते सांग.

आता ताईपुढे आपली काही खर नाही हे गुरूला कळून चुकले. मला अर्जण्ट कॉल करायचाय असे सांगत तो तेथून सटकला. ताईची चिडचिड सुरू झाली. ‘‘आजी ह्य वयात जपून राहायचे तर तू एकटी कशाला गेलीस. आता तुझ्याकडे कोण बघणार? मी नवी सासुरवाशीण. मी काही येऊन राहू शकत नाही तुझ्याजवळ. आई-बाबांनाही तू अमेरिकेला जायचा आग्रह केलास.’’

आजी शांतपणे म्हणाली, ‘‘हे आहेत ना माझ्याजवळ काळजी घ्यायला.’’

ताई : हो, आजोबा आहेतच तुझ्याजवळ. पण आता ते स्वयंपाकपण करणार का?

आजी : अगं, ती गुरूची मित्रमंडळी रोज एकेक दिवस डबा घेऊन येणार आहेत आपापल्या घरून.

ताई : मला हेच विचारायचे आहे की गुरूचे फ्रेण्ड्स एवढे तुझ्या दिमतीला हजर कसे काय?

आजी : अगं त्याची गंमतच आहे.

‘‘त्यात कसली आल्येय गंमत?’’ ताई फणकाऱ्याने बोलली.

‘‘तुझी धुसफुस, घालमेल, उत्सुकता या सगळ्याची उत्तरे मिळण्यासाठी तुला आजीची कहाणी ऐकावी लागेल. शांतपणे माझ्याजवळ बस. काही महिन्यांपूर्वी गुरूच्या प्रोफेसरनी तक्रार केलेली लक्षात आहे ना. तो व त्याचे मित्र पोकीमॉनचा खेळ खेळण्यात एवढे तल्लीन झाले होते की कॉलेजचे तोंडही बघत नव्हते. घरातून वेळी-अवेळी बाहेर पडायचा. एकदा बाहेर गेला की घरी यायचीही त्याला शुद्ध नसायची. तेव्हा त्याला मी  सांगितले, ‘बघ रे पोरा, तुझे आई-वडील एवढे हुशार, नावाजलेले. त्यांना अमेरिकेच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी  पाठवण्यात आले. तूपण त्यांच्या नावारूपाला साजेसे वागले पाहिजे. हल्ली तुझे हे काय विचित्र वागणे सुरू  आहे. कॉलेजनेही नोटीस पाठवली आहे. तुझे आई-वडील तुझी जबाबदारी आमच्यावर सोपवून निश्चिंत मनाने आपल्या कामासाठी गेले आहेत. तेव्हा तुझा काय प्रॉब्लेम आहे तो तू आम्हा दोघांना सांगितला पाहिजेस. आणि कॉलेजवाले म्हणत होते की तू एकटा नाही तर तुमचा पाच जणांचा ग्रुप गैरहजर असतो.’ त्यावर गुरू म्हणाला होता, ‘काही नाही आजी. आई-बाबांनी तो नवीन स्मार्टफोन घेऊन दिला आहे, त्यावर गेम खेळतो.’ पण त्याचे रात्री-अपरात्री बाहेर फिरणे. कधी हायवेवर, कधी समुद्रकिनारी जाणे. एकदा तर ते सर्वजण जंगलात वाट चुकले होते. दोन दिवसांनी घरी आले..’’

आजीचे बोलणे मध्येच तोडत ताई वैतागून म्हणाली, ‘‘या सगळ्या झालेल्या गोष्टी मला माहीत आहेत. लाडक्या नातवाला पाठीशी घालू नकोस. मागचं राहू दे, आत्ता काय झाले ते बोल. आणि बोलण्यामध्ये गोल गोल फिरवून मूळ मुद्दय़ापासून तू दूर जातेस.’’

आजी हसत हसत म्हणाली, ‘‘अगं मी मुद्दय़ाचेच सांगते आहे. तर गुरूने कॉलेजला वेळच्या वेळी जावे, चांगला अभ्यास करावा म्हणून मी त्याच्याकडून पोकीमॉन गेमची माहिती काढून घेतली. त्याने उत्साहात त्याच्या फोनवरची गेमची माहिती मला समजावली. मला थोडे थोडे महत्त्वाचे तेवढेच कळले. हल्लीच्या मुलांना आमच्यासारखी अस्खलित मराठी येते कुठे. त्यांची आपली भाषेची खिचडी शिजत असते. इंग्रजीमध्ये थोडे मराठी, थोडे हिंदी शब्द. जसे तांदळात मूगडाळ, तूरडाळ पण आपला गुरू अगदी सुरेख समजावून सांगत होता हो. आई-वडिलांचा चांगला गुण उतरला आहे त्याच्यात.

‘‘आजीऽऽ!’’ ताईने आजीकडे रोखत हातानेच इशारा केला.

आजीने गुरुपुराण थांबवून पुढे सांगायला सुरुवात केली. ‘‘तो पोकीमॉनचा गेम मस्त आहे हो अगदी. मी गुरूला म्हंटले रात्री व सुट्टीच्या दिवशी खेळत जा ना गेम. पलंगावर पडल्या पडल्याही गेम खेळता येतो, मग त्यासाठी वेळीअवेळी बाहेर का हिंडतोस. पण तो म्हणाला ते काय पकडायला जावे लागते..’’

‘‘..व्हर्चुअल कॅरॅक्टर्स.’’ ताई पटकन् उद्गारली.

‘‘हा तेच ते. जेवढे जास्तीत जास्त पकडू तेवढे पुढच्या लेव्हलला खेळता येते. मग मी त्यावर खूप विचार केला. गुरूला बरेच प्रश्न विचारले, मनातल्या शंका बोलून दाखवल्या. त्याने सर्व काही मला एकदम छान समजावून सांगितले. मी पुन्हा त्यावर  विचार केला. एक दिवस त्याच्या फोनवरून त्याला गेम खेळून दाखवायला सांगितला. मिश्कीलपणे हसत आजी म्हणाली,  मीही थोडा खेळून बघितला. रात्रभर त्या विचारात तळमळत राहिले. सकाळी गुरू उठायची वाट पाहात राहिले. सकाळी नाश्त्याच्या वेळी मी त्याला ठामपणे सांगितले की तू रात्री व सुट्टीच्या दिवशी पोकीमॉन खेळू शकतोस. तो नाराजीने म्हणाला, पण आजी तू मला बाहेर जाऊ देणार नाहीस तर मी पुढच्या लेव्हलला कसा पोचणार.  त्यावर मी उत्साहात त्याला सांगितले, अरे बाळा तू नक्की पूढे पुढे जाणार, यशस्वी होणार, मी व आजोबा तुला मदत करणार. आणि तेव्हापासून सुरू झाला आजी-आजोबांचा पोकीमॉन पकड डाव.’’

ताई मंत्रमुग्ध होऊन आजीची कहाणी ऐकत होती.

‘‘असेही आम्ही दोघे सकाळ- संध्याकाळ फिरायला जातच हातो, पण आता गुरू सांगेल त्या दिशेला आम्ही फिरायला जातो. मध्यंतरी आम्ही त्या गणपती मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो आठवतंय. ते फक्त निमित्त होतं. गुरूने आम्हाला तो स्पॉट सांगितला होता. तिथे समुद्र किनाऱ्यावर खूप पोकीमॉन मिळतात असे त्याला कळले होते. त्यानेच आमची जायची-यायची सोय करून दिली होती. आता या वयात समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातोय कसं सांगायचं, म्हणून गणेश दर्शनाचं कारण तुम्हाला सांगितलं.’’

हे ऐकून ताईला खूपच गंमत वाटली. आजीही कौतुकाने हसत हसत सांगत होती, ‘‘खूप छान जागा होती. त्यानिमित्ताने देवदर्शन व फिरणेही झाले. गुरू तर इतका खूश झाला आमच्यावर की विचारायची सोयच नाही. त्याच्या मित्रांना ही वार्ता कळली तेव्हा सगळे त्याच्या फोनवर तुटून पडले. ‘फारच रेअर्स कॅरॅक्टर्स मिळाले आहेत तुला.’ त्यानंतर त्याचे मित्र काही ना काही कारणाने घरी येऊ लागले. आम्हालापण कॅरॅक्टर्स हवेत म्हणून हट्ट करू लागले. आम्हा दोघांनाही ते कॅरॅक्टर्स पकडणे, मुलांचे घरी येणे-जाणे, त्यांच्याशी गप्पा मारणे आवडू लागले. गुरू आपल्या मित्रांना ऑनलाइन कॅरॅक्टर्स देऊ लागला. तोपण खूश आणि आम्हीही खूश. आमचा वेळही चांगला जाऊ लागला.

ताई एकदम आठवून म्हणाली, ‘‘पण आजी तू पडलीस ते..’’

आजी पटकन म्हणाली, ‘‘त्याचीपण एक गंमतच झाली. आपली युनिव्हर्सिटी आहे ना तिथे पोकीमॉन वॉकचे आयोजन केले होते. त्यात आम्ही दोघे जाणार होतो. जायची वेळ होत आली तरी हे उठायचे नाव घेत नव्हते. पुरणपोळी भरपेट खाऊन यांची स्वारी निद्रासुख घेत होती. मी घडय़ाळाकडे बघत तयार झाले. गुरूच्या मित्राने कारचा हॉर्न वाजवला, तशी मी दार लोटून निघून गेले. वॉकसाठी खूप जण आले होते. मी अगदी बाजूबाजूने हळूहळू चालत होते. प्रत्येक जण पोकीमॉन पकडायच्या तंद्रीत होता. कुणाचा तरी धक्का मला लागला आणि मी कलंडले. अ‍ॅम्ब्युलन्सची सोय होतीच. त्यातून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. गुरूला बोलावून घेतले. आजोबांना घेऊन गुरू आपल्या दोस्तांच्या काफिल्यासह हॉस्पिटलमध्ये हजर झाला. अशी कहाणी आहे माझ्या पोकीमॉन पकड डावाची.’’
शुभांगी निमकर – response.lokprabha@expressindia.com