हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी भारतात येणारे फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्षी पाहणं म्हणजे एक वेगळाच सोहळा असतो. मुंबईत ऐरोली खाडीत जाऊन घेतलेला हा समृद्ध करणारा अनुभव.

हिवाळा सुरू झाला की निसर्गप्रेमींना, मुख्यत्वे पक्षीप्रेमींना वेध लागतात ते स्थलांतरित पक्ष्यांचे. आणि यात पहिला नंबर लागतो तो फ्लेिमगो, रोहित अर्थात अग्निपंखाचा. पुस्तकातून, प्रसारमाध्यमातून, प्रकाशचित्रांतून तशी यांची तोंडओळख जवळजवळ सगळ्यांना आहेच. परंतु, ते अप्रतिम सौंदर्य ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवणे काही औरच.

तर अशा या फ्लेिमगो दर्शनाची एक सफर..

उत्साही मित्रमंडळाचे या वर्षी हे पाहुणे पक्षी पाहायचं असं ठरलं. कुठे तर ठाण्याच्या खाडीत. कसं जायचं? भांडुप उदंचन केंद्रातून (मराठीत भांडुप पम्पिंग स्टेशन). इथं बोटीने खाडीत जाता येते. इथल्या नावाडय़ाने मोठी नामी युक्ती शोधलीये. त्याने आधीच एक व्हाट्सअ‍ॅप गट करून, त्यात या पक्ष्यांचे सुंदर सुंदर फोटो टाकून पक्षीप्रेमींना भुलवायचं काम अगदी चोख केलं. आम्ही त्याला भुललोही (मेकिंग इंडिया – डिजिटल इंडिया, या मोहिमेचा अचूक फायदा घेत नावाडय़ाने नाव काढलं). दिवस, वार, वेळ, ठिकाण ठरलं. मग ‘आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडाना’ या उक्तीप्रमाणे समानधर्मी मित्रांना विचारणा झाली. त्यानंतर कुणी, कधी, कुणाबरोबर, कसं, कुठे यायचं हे यथासांग ठरवून झालं.

जायचा दिवस उजाडला. नोव्हेंबरमासे, रविवासरे, पंच पंच उष:काले उठून ठाण्याला निघालो. तिथून मित्रांबरोबर भांडुप पिम्पग स्टेशनला. इथे या ऋतूत सकाळपासून अनेक फोटोग्राफर्सची वर्दळ असते. शनिवार-रविवारी अधिकच. अन् माझ्यासारख्या नुसत्याच बघ्यांची त्याहून अधिक. इथे चालता चालतादेखील बरेच पक्षी दिसतात. अर्थात त्यासाठी  दिव्य द्विजदृष्टीदेखील असावी लागते. आम्ही अगदीच वेळेत पोहोचल्याने लगेचच बोटीत शिरलो (फ्लेिमगोचे जवळून दर्शन हे भरती-ओहोटीच्या वेळेवर अवलंबून असते, परंतु आमच्या नावाडय़ाने पंचांग आधीच पाहून ठेवल्याने आमची ऐन वेळी काही पंचाईत झाली नाही). बोट चालू झाली आणि आमचा भांडुपकडून ऐरोलीच्या दिशेने खाडीत प्रवास चालू झाला. दोन्ही बाजूच्या दाट कांदळवनातून मार्ग काढत व निरनिराळे पाणपक्षी पाहत आमची बोट पुढे सरकत होती. एव्हाना मोठे बगळे (Great Egret), तुतारी (Common Sandpiper), राखी बगळे (Grey Heron), ढोकरी (Pond Heron), काळ्या डोक्याचा शराटी (Black-headed Ibis), चमचा (Spoonbill), काळ्या शेपटीचा पाणटिवळा (Black-tailed Godwit), पाणकोंबडी (Waterhen), उचाटया (Pied Avocet), टीळवा (Redshank), पाणकावळे (Cormorant) … असे अनेक पक्षी दिसू लागले. पक्ष्यांच्या पंखाच्या फडफडाटात कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट मिसळत होता. पक्ष्यांच्या अनेक मुद्रांचे फोटो टिपत मंडळी आपलं कौशल्य पणाला लावत होती. आमच्यासारखे काही मात्र दुर्बणिीतूनच हे ‘शकुन्त’लावण्य पाहत होते. मधेच एखाद्या पक्ष्याची ओळख पुस्तकातून पटवली जात होती.

आता लांबवर आम्हाला पक्ष्यांचा एक मोठ्ठाच्या मोठ्ठा थवा दिसू लागला. लांबून काहीच कळत नव्हते. पण जशी बोट थव्याजवळ जाऊ लागली तसतसे लोकांचे डोळे विस्फारू लागले. हो.. अगदी बरोबर..तेच ते फ्लेिमगो, अग्निपंख. अक्षरश: शेकडोंच्या संख्येत तो गुलाबी थवा डोलू लागला. जसजसं जवळ जाऊ तसतसं विस्फारलेल्या डोळ्यांबरोबर विस्फारलेल्या तोंडातूनही वाहवा येऊ लागली. आमचं घोडं ‘खाडीत’ न्हालं.

आता त्यांच्या जितक्या म्हणून मुद्रा टिपता येतील तितक्या टिपण्याचं काम वेगात चालू होत. त्या पक्ष्याचं लावण्य तरी काय वर्णाव! शिडशिडीत, कमनीय बांधा, लांबलचक भगवे-गुलाबी पाय, पिसांचा मनोहर गुलाबी व काळसर रंग, बाकदार मान आणि लालचुटुक चोच. प्रत्येक फ्लेिमगो वेगळा, त्याच्या पिसामधील गुलाबी रंगाची छटा वेगळी. काहींचे पंख खरंच त्यांचं नाव सार्थ करीत होते. भारतात येणाऱ्या फ्लेिमगोचे दोन प्रकार असतात, ग्रेटर व लेसर. त्यांच्या उंचीत, पंखात, चोचीत थोडा फरक असतो. थोडय़ाफार निरीक्षणातून तो कळतो. या थव्यात दोन्ही प्रकारचे फ्लेिमगो होते. बोटीतील प्रत्येक जण समोरचं चित्र डोळ्यांत व कॅमेऱ्यात जमेल तसे साठवत होते. मधल्या वेळेत एखाद दुसऱ्या कैकर (Osprey) व भोवत्याने (Harrier) देखील दर्शन दिलं.

अचानक आम्हाला दूरवर आणखी मोठ्ठं  गुलाबी वादळ दिसू लागलं. आणि बोटीने मोर्चा तिकडे वळवला. आता ते गुलाबी वादळ पाण्यावर तरंगू लागलं. बोट जवळ जाताच क्लिकक्लिकाट वाढला. आता थव्यातल्या गडद गुलाबी रंगांच्या, वेगळीच पोझ देणाऱ्या, पाण्यावर तुरुतुरु धावणाऱ्या (हो. हो, खरंच. . हे उडण्याआधी काही सेकंद पाण्यावर धावतात), चोचीने पिसे खाजवणाऱ्या, मान मुरडणाऱ्या.. अशा अनेकांचे पर्सनल फोटोशूट व निरीक्षण चालू झाले. त्यांच्या उडतानाच्या अनेक पोझ तर अप्रतिम. लांबलचक पाय व तेवढीच लांबलचक मान एका सरळ रेषेत ताठ ठेवून अगदी आखीव-रेखीव पद्धतीने पंख फडफडवत (फ्लाियग स्टिक) उडण्याचे कौशल्य हे कसे आत्मसात करीत असतील, असा विचार मनात आला. त्या विहंगांचे उडतानाचे दृश्य आणखीनच विहंगम दिसत होते.

काही वेळाने बोटीने यू टूर्न घेऊन परतीचा मार्ग धरला होता. फ्लेिमगो फोटोशूट व निरीक्षण अखंड चालूच होते. आता भुवई बदक (Garganey), थापटय़ा बदक (Northern Shoveller) यांचे थवेही दिसू लागले. थापटय़ा बदकांचे उडतानाचे पंखांतील चमकदार रंग सूर्यप्रकाशात अधिकच तेजाळू लागले. नदी सुरय  (River Tern), काळ्या डोक्याचे कुरव (Black-headed Gull), वारकरी (Common Coot) यांचेही निरनिराळ्या मुद्रेत यथासांग व यथेच्छ फोटोशूट  झाले. परत फिरताना फ्लेिमगोचे ते गुलाबी थवे प्रत्येकजण मनात साठून ठेवत होते. या सुंदर पाणपक्ष्यांच्या नसíगक अधिवास असणाऱ्या कांदळवनांचे व खाडय़ांचे खरंच जतन झाले पाहिजे, असे प्रकर्षांने वाटू लागले.

बोटीतून उतरताना प्रत्येकाने हा अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल नावाडय़ाचे तोंडभरून कौतुक केले व त्याची ‘पावती’देखील दिली. त्यानेसुद्धा कृतज्ञतेने, ‘साहेब, तुम्ही खूश तर आम्ही खूश’अशी पोचपावती दिली.

एक नितांतसुंदर व अविस्मरणीय असा अनुभव घेऊन प्रत्येक जण तृप्त झाला होता.
विशाल शिंदे – response.lokprabha@expressindia.com