गोविंद डेगवेकर – response.lokprabha@expressindia.com
खबर राज्यांची
कर्नाटकातील उडुपी जिल्हय़ातून बाहेर पडून अनेकांनी देशभर हॉटेल व्यवसाय उभा केला. आता या व्यावसायिकांची पुढची पिढी या व्यवसायात यायला तयार नसल्याचे चित्र आहे.

श्रीकृष्ण मंदिर मठाबाहेरील गोपुरात पहाटे चार वाजता ‘नगरी’ झडते. आसमंतात शंखनाद उमटतो. पूजेची तयारी सुरू होते. गर्भगृहाचे दरवाजे उघडले जातात. जगहन्ते वाद्याचा गजर सुरू होतो. श्रीकृष्ण मंदिरात अव्याहत पूजा सुरू असते. कृष्ण अर्चनेत गोपूर रंगून जाते. सर्वाना तीर्थप्रसादाचे वाटप होते. असा प्रसाद रोजच मिळाला तर ही मनातली इच्छाही पूर्ण होते!!

कर्नाटकातील उडुपी जिल्हा श्री कृष्ण मंदिरासाठी जसा प्रसिद्ध आहे, तसा तो प्रसादासाठीही आहे. हो! अखिल जनांसाठी कृष्ण-गोपालाचा प्रसाद मिळावा म्हणून येथील भक्तगण आजही कार्यरत आहेत. रोज हा प्रसाद केवळ मंदिरातच नाही. तर जगभरात वाटण्याची सोय भक्तांनी केली आहे. साऊथ इंडियन किंवा उडुप्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर एखादा चुणचुणीत मुलगा तुमच्या टेबलाजवळ येऊन ‘ऑर्डेर सर..’ असे दक्षिणवळणी शब्द पुटपुटतो आणि पुढच्या पाच मिनिटांत तुमची इच्छित ‘ऑर्डर’ तुमच्यासमोर आणून हजर करतो. अर्थात तुमच्यासाठी टेबलावर आलेला पदार्थ केवळ नाश्ता असतो. परंतु कर्नाटकच्या किनारी भागातील जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उडुपीतील हॉटेलमालकासाठी तो प्रसादासारखाच असतो. त्याचे तो तुम्हाला वाटप करीत असतो. व्यवसाय हा त्यातील एक भाग असला तरी ‘प्रसाद’ ही त्यामागील एक प्रेरणा असते.

श्री कृष्ण मंदिरात दरवर्षी होणाऱ्या सोहळ्यात प्रसाद परंपरा मोठय़ा भक्तिभावाने कायम ठेवण्यात आली आहे. १३व्या शतकात मध्वाचार्यानी द्वैत वेदान्त तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आठ मठांची स्थापना केली. त्यानंतर या परिसरात श्री कृष्ण मंदिर चैतन्यपूर्ण संस्कृतीचा उगम झाला. पुढे या संस्कृतीचा प्रसार कर्नाटक आणि कर्नाटक राज्याबाहेरही झाला. ही संस्कृती प्रसादाची होती. दरवर्षी विविध सोहळ्यात या प्रसादाचे वाटप केले जाते. सोहळ्याला भारतभरातून भक्तगण मंदिरात जमतात. त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. हीच प्रसाद परंपरा समजली जाते. या प्रसादाप्रति अपार श्रद्धा असलेल्या एका व्यक्तीने ही गोष्ट साधारण नसल्याचे त्याच वेळी ठरवले. या परंपरेच्या सुरुवातीला अनेक स्वयंसेवक रात्रंदिवस सेवा देत असत. त्यातील एका स्वयंसेवकाचे नाव के. कृष्ण राव. श्रीकृष्ण मंदिरातील एका पुजाऱ्याचा मुलगा, हॉटेलात अटेन्डट म्हणून काम करणारा कर्मचारी ते ‘वुडलॅण्ड ग्रुप ऑफ हॉटेल्स’चे संस्थापक अशी चढत्या क्रमाची राव यांची कामगिरी आहे. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या राव यांच्या घरी पाककलेचा उत्तम वारसा होता. विविध पदार्थ अत्यंत तन्मयतेने रांधून ते नातेवाईक, मित्रमंडळी, मंदिरातील भाविक आणि पांथस्थांना वाढायची परंपरा घरात कायम होती. त्याचा सखोल परिणाम राव यांच्या मनावरही झाला होता. परंतु राव यांना तेवढय़ाच सीमित वर्तुळात खाद्यसेवा न पुरवता तिचा विस्तार करायचा होता. म्हणजे श्रीकृष्णाचा प्रसाद जगभरात पोहोचविण्याचा त्यांचा मानस होता. तसा मनाशी निर्धार पक्का झाल्यानंतर ही गोष्ट त्यांनी घरातल्या वडिलधाऱ्यांना सांगितली. परंतु या निर्णयाला कृष्ण यांच्या घरच्यांनी विरोध दर्शवला. हा विरोध कृष्ण यांनाही सहन झाला नाही. ते घर सोडून चेन्नईला गेले. हॉटेल क्षेत्रातील महत्त्वाच्या कामांचा अनुभव घेतल्यानंतर राव यांनी चेन्नईत स्वत:चे हॉटेल सुरू केले. या हॉटेलात अन्नसेवा हे प्रमुख कार्य ठरले आणि पैसा दुय्यम मानला गेला. या सेवेतून त्यांनी त्यांच्या प्रत्येक हॉटेलात चैतन्यमय वातावरण निर्माण केले गेले. त्यातून प्रेरणा घेऊन अनेक उडुपी रेस्टॉरंटची परंपरा सुरू झाली. तिने हळूहळू देश व्यापला.

उडुपी जिल्ह्य़ाला खाद्यसंस्कृतीबरोबरच नैसर्गिक आपत्तीचीही परंपरा आहे. १९२३ साली जिल्ह्य़ाला पुराचा तडाखा बसला. या निसर्गनिर्मित आपत्तीत अनेकांना परंपरागत व्यवसाय चालवणे जवळजवळ अशक्य होऊन बसले. काहींवर गाव सोडण्याची वेळ आली. हॉटेल व्यवसायात नुकताच जम बसवलेल्या वा प्रस्थापित झालेल्यांनी जिल्ह्य़ाबाहेर व्यवसायाला सुरुवात केली. उडुपी जिल्ह्य़ातून कष्टकरी देशभरातील विविध शहरांत स्थलांतरित झाले. खरे तर सार्वजनिक ठिकाणी कमी पैशांत पोटभर अन्नपुरवठा ही त्या वेळची आत्यंतिक गरज होती. ती गरज उडुपी हॉटेलांनी पुरवली. म्हैसूरमधील दशप्रकाश, बंगळूरुमधील उडुपी श्रीकृष्ण भवन आणि ‘मावल्ली टिफीन रुम्स’ या काही प्रमुख उडुपी भोजनासाठीची ठिकाणे १९२० मध्ये उभारण्यात आली. या माध्यमातून लोकांना पोटभर अन्न मिळण्याची सोय निर्माण झाली.

या हॉटेलांमधून दारिद्रय़रेषेखालील मुलांच्या हाताला काम मिळाले. ग्राहकांना सेवा देण्यासाठी आजही तरुण हात तितक्याच उत्साहाने सरसावतात. ग्राहकांचे खाऊन झाल्यावर फडक्याचा एक फटकारा मारत ते स्वच्छ करण्यासाठी जो सफाईदारपणा लागतो, जी एकाग्रता लागते, ती वर्षांनुवर्षांच्या सरावातूनच आलेली असते. हा सराव तेथे नोकरी म्हणून केला जात नाही. तर सेवा म्हणून केला जातो. बेळगावमधील उडुपी हॉटेलात वयाच्या बाराव्या वर्षांपासून काम करणारे शंकर धुळाप्पा हे आज साठीत आहेत. या हॉटेलात आजही ते अनवाणी पायांनी अन्नसेवा देतात.

रोजगारासाठी घर सोडावे लागणे ही तशी क्लेशदायक घटनाच असते. घरात बरीच वर्षे वावरल्यानंतर अचानक असं कमावण्यासाठी सोडायचं, हे जिल्ह्य़ातील अनेकांना लवकर जमत नाही. तरीही प्रियजनांना मागे टाकून त्यांना रोजगारासाठी घराचा उंबरा ओलांडावा लागतो. सेवाभाव ही उदात्त भावना त्यांना कामाची ऊर्जा देत असते, असे लक्ष्मण नागर सांगतात. उडुपी जिल्ह्य़ातून बऱ्याच अंशी रोजगारासाठी स्थलांतर करणारा वर्ग गरीब आहेच, पण त्यातही अल्पवयीन मुलांचा भरणा अधिक आहे. यातील काही जण जिल्ह्य़ातच रोजगार शोधतात. काही जण जिल्ह्य़ाच्या बाहेर जातात तर काही जण राज्याच्याही बाहेर! हा रोजगार अर्थात हॉटेलात मिळविला जातो. कारण तिथं दोन वेळचं जेवण मिळतं आणि राहण्याची सोय होते. या सुविधेमुळेच पैसे वाचवणारा मुंबईतील एखाद्या हॉटेलात काम करणारा फडक्यावरला वा पाण्यावरला उडुपी पोरगा स्वत:चे हॉटेल सुरू करण्याचे स्वप्न बघत असतो. त्यामुळे पुढे अनेकांच्या जीवनात या व्यवसायात राहून अनेक नाटय़मय वळणे येतात.

उडुपीतून बाहेर पडून हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी चेन्नई, म्हैसूर आणि बंगळूरु ही महत्त्वाची शहरे होती आणि आहेतही. याशिवाय उडुपींच्या मनात पुढील पिढीच्या भवितव्याचे

विचार असतात. त्यासाठी मुंबई हे त्यांना अत्यंत उपयुक्त शहर वाटते.  माटुंगा येथे अनेक उडुपी हॉटेलांनी १९३० ते ४० या काळात बस्तान बसवले, ते याच प्रेरणेतून.

हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला उडुपी जिल्ह्य़ातून बाहेर पडून ब्राह्मण वर्गातील लोक देशभरात फिरले. विसाव्या शतकातील सुरुवातीला त्यांचीच संख्या अधिक होती. परंतु आता हा व्यवसाय याच जिल्ह्य़ातील ‘बंट’ वर्गाकडे आला आहे. हा कर्नाटकातील कुणबी अर्थात मध्यम आणि छोटय़ा शेतकऱ्यांचा वर्ग. या वर्गाने बहुतेक उडुपी शुद्ध शाकाहारी हॉटेल चालविण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर जुनी वा बंद होण्याच्या मार्गावर असलेली इराणी रेस्टॉरंट ताब्यात घेऊन ती चालविण्यास सुरुवात केली आहे.

उडुपीतून बाहेर पडणाऱ्यांना भाषा हा कधीही अडथळा वाटला नाही. पुढच्या पिढीलाही तो त्यांनी वाटू दिला नाही. पण आता असं दिसतं आहे की पुढच्या पिढीला अशा पद्धतीने हॉटेल चालवण्यात रस नाही. त्यामुळे बरीच हॉटेले बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा काही बंद पडली आहेत. उडुप्यांतीलच नवे व्यावसायिक पुढे यावेत, यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत, असे हॉटेल मालक दयानंद शेट्टी सांगतात.