आकर्षक कपडे घालून मिरवायला प्रत्येकालाच आवडतं. पण, या कपडे खरेदीमध्ये काहीजण इतके बुडून जातात की पायांकडे त्यांचं अजिबात लक्षच जात नाही. पण सुंदर कपडय़ांवर शोभतील अशा चपला तर हव्यातच!

दिवाळी जवळ आलीय, आता साडय़ा, दागिने, कानातले, गळ्यातली, बांगडय़ा या सगळ्याबद्दल भरभरून लिहून येईल. आपल्या खरेदीलाही सुरुवात होईलच. ज्या कुणाला दागिने सोन्यामोत्याचे हवे असतात ते घडवूनही घेतील. पण  एक गोष्ट राहतेच की! म्हणजे होतं असं की आपण एखादा बराच महागाचा ड्रेस घेतो किंवा भारीतला शर्ट घेतो त्यावर सगळं काही मॅचिंग घेतो. दोस्तांमध्ये त्याची चर्चाही करत असतो, पण अचानक आपल्याला आठवतं की यावर घालायला आपल्याकडे चांगल्या चपलाच नाहीत. मग ऐनवेळेची धावाधाव. सरतेशेवटी कुठल्या तरी सँडल्स आणि चपला घालून आपण ती वेळ मारून नेतो. पण एवढं सगळं करण्यापेक्षा पायांची काळजी घेणाऱ्या या पादत्राणांच्या बाजाराकडेही एखादी नजर टाका की राव!

mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण
meaning and significance of holi colors
Holi 2024: होळीला उधळा लाल, पिवळा निळा रंग! मात्र त्याआधी रंगांचे जाणून घ्या ‘हे’ अर्थ…

फॅशन म्हणजे एकूणच नटण्या-मुरडण्याची गोष्ट आली की पहिलं नाव येतं ते मुलींचंच. त्यामुळे चपलांच्या खरेदीतही अर्थातच मुलींना जास्त वाव आहेच. तुमच्या जवळच्या कोणत्याही बाजारात किंवा फॅशन स्ट्रीट, कुलाबा कॉजवे, ठाण्याची पाचपाखाडी, डोंबिवलीचा स्टेशन रोड ते पुण्याचा लक्ष्मी रोड अशा ठिकाणी एक-दोन चक्कर टाकल्यात की चपलांचे हजारो प्रकार समोर येतील. अगदी रस्त्यावरच्या गाडय़ांपासून ते थंडगार वातानुकूलित शोरूम्सपर्यंत चपलांचं हे साम्राज्य पसरलेलं आहे.

मुलींसाठी म्हणायचं तर सध्या सगळ्यात जास्त दिसतायत त्या मोजडय़ा आणि जुतीज. म्हणजे राजस्थानी पद्धतीचे सँडल्स. यामध्ये फक्त राजस्थानी नक्षीकामच नव्हे तर अनेक प्रकारचं नक्षीकाम आहे. या जुतीज संपूर्ण पाय सामावून घेणाऱ्याही आहेत, शिवाय फक्त पायाचा पुढचा भाग झाकणाऱ्या जुतीसदृश चपलाही आहेत.

मोतीवाल्या जुती

जुतींना मोत्यांनी सजवलं जातं. त्यावर मोत्यांनी सजावट केलेली असते किंवा फक्त मोती लावलेल्या मोजडय़ाही मिळतात.

छुमछुम जुती

चपला आणि पैंजण या दोन्हीचं काम या जुती करतात. यांच्या दर्शनी भागालाच छान घुंगरू लावलेले असतात. त्यामुळे त्या सुंदर दिसतातच, पण त्याचा एक लयबद्ध आवाजही येतो.

पारंपरिक मोजडय़ा

खास राजस्थानी पद्धतीचं नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी अशा या जुतीज पाहताक्षणीच आपलं मन मोहून घेतात.

मोरपीस मोजडय़ा

मोरपिसासारखं नक्षीकाम असलेल्या जुती म्हणजे राजस्थानी कलाकौशल्याचा एक अप्रतिम नमुना असतो. मोराचा पिसारा नाहीतर मोरपीस अशी नक्षी ठरवून घेऊन ती जुतीवर रेखाटलेली असते. पायावर असे रंगीत मोर वागवायला कोणाला आवडणार नाही.

मोजडय़ांनंतर नंबर येतो कोल्हापुरी चपलांचा. कोल्हापुरी चपला म्हणजे आजोबांच्या काळातल्या, जुन्यापुराण्या असं काही तुमच्या डोक्यात असेल तर ते आधी काढून टाका. फॅशनविश्वात सध्या कोल्हापुरी चपला लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. एथनिक म्हणून त्या मानाने मिरवल्या जात आहेत. हल्ली या कोल्हापुरी चपलांना गोंडे, टिकल्या लावून, सजवून त्या आणखीच साजऱ्या बनवल्या जातात. या चपला घालणं म्हणजे खरोखरच आपल्या पायाचा कायापालट करण्यासारखं असतं. या चपला साडीवर छान दिसतात तशाच पंजाबी ड्रेस आणि अनारकलीवरही. त्या लेहंग्यावरही शोभतात आणि जीन्स वगैरेवर घातल्यात तर चांगला लुक देतात. हा लुक मिरवायला तसा तोराही हवा. एखादा एथनिक टॉप, मस्त निळी जीन्स, हातात कडं, नाकात नथ आणि पायात रंगीबेरंगी कोल्हापुरी चप्पल म्हणजे परिपूर्ण लुक आहे.

सणासुदीच्या काळात जास्त वापरला जाणारा आणखी एक प्रकार म्हणजे हिल्स. या काळात साडय़ा नेसल्या जातात, पायघोळ लेहंगे, लांबलचक अनारकली वापरले जातात. इतकं नटून मुरडून झाल्यावर अनेकींचे पाय जमिनीच्या चार बोटं वरच असतात, पण ते खरोखरच तसे राहावेत म्हणजे पायघोळ ड्रेसमध्ये गुरफटून आपला धुबूच्चा होऊ नये, यासाठी कामी येतात हिल्स म्हणजेच उंच टाचांच्या चपला. ज्यांची उंची कमी असते अशांसाठी तर हिल्स अगदी वरदान ठरतात, नाहीतर काही कमी उंचीच्या मुलींनी साडी वगैरे नेसल्यावर त्यांना ते अगदी कल्पनासाडीसारखं वाटू शकतं. हिल्समध्येसुद्धा अनेकविध प्रकार आहेत.

झगमगीत हिल्स

चंदेरी, सोनेरी, रुपेरी अशा विविध रंगछटांमध्ये न्हालेल्या झगमगीत उंच टाचांच्या चपला दिसतात तर छानच! शिवाय त्या कुठल्याही रंगाच्या कपडय़ावर चालतात हा त्यांचा आणखी एक फायदा. करिना कपूर अशा प्रकारातल्या हिल्स बऱ्याचदा वापरताना दिसत असे.

नक्षीदार प्लॅटफॉर्म हिल्स

चप्पल उंच टाचांच्या तर हव्यात, पण बोटांशी निमुळत्या होत जाणाऱ्या किंवा अगदी पेन्सिल हिल्स म्हणता येतील अशा नकोत. असं काहीसं तुम्हाला वाटत असेल तर फ्लॅट हिल्स उत्तम. यात चक्क चपलेच्या तळाशी जाडजूड सोल लावलेला असतो. त्यामुळे पायाची उंची वाढते. बाकी सगळी चप्पल एकाच उंचीची असल्याने चालताना त्रास होत नाही. यात मणी, खडे असं अनेक प्रकारचं नक्षीकाम दिसतं. काही चपलांमध्ये तर त्यांचा सोल हाच रंगीबेरंगी आणि नक्षीदार असतो. अशा सोल्स नक्षीदार असलेल्या चपलाही एक वेगळाच लुक देतात.

मोजडय़ा, हिल्स, कोल्हापुरी यानंतर नंबर लागतो आपल्या साध्यासुध्या चपलांचा. अनेकींना हिल्स नको असतात. ते घातल्याने त्यांचे पाय दुखतात, कोल्हापुरी चपला पायाला चावतात अशा अनेक अडचणी येतात. अशा वेळी साध्या सरळ चपला उत्तम. साध्या स्लिपर नाहीतर अगदी साध्या चपलांवरसुद्धा हल्ली विविध डिझाइन्स मिळतात. मणी, लेस, खडे असं सगळं या चपलांवर लावलेलं असतं. शिवाय अनेकदा या चपलांची किंमतही कमी असते. त्यामुळे स्वस्त आणि मस्त अशा या चपला सगळ्यांनाच आवडतील अशा आहेत. लग्नकार्यामध्ये कधी कधी नुसत्याच चमकदार किंवा सोनेरी, चंदेरी चपलाही चांगल्या वाटतात. दिवाळीचा मोसम सणासुदीचा त्यामुळे जास्त झटँग चपला जरा टाळाच. त्याऐवजी या चपला उत्तम.

सध्या ऑफिस, कॉलेजच्या व्यग्र वेळापत्रकामुळे काहींनी ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय निवडला आहे. अशांची बरीचशी खरेदी ही ऑनलाइन होत असते. मग अशा खरेदीत चपला तरी कशा मागे राहणार. ऑनलाइन साइट्सवर चपला अतिशय झक्कास, स्वस्त आणि टिकाऊही मिळतात. शिवाय त्यात भरपूर व्हरायटीही बसल्या जागी पाहता येते. पण त्यासाठी पायाचं माप देताना मात्र आपला गोंधळ होतो, त्यामुळे त्यांनी मापासाठी दिलेल्या गाइडलाइन्सची टय़ुटोरिअल्स नीट पाहा. त्यानुसार आपल्या पायाचं माप ठरवून चप्पल मागवा.

तर दोस्तहो, दिवाळीसाठी मस्त खरेदी करा. सुंदर, आकर्षक अशा ट्रेण्डी कपडय़ांचीही खरेदी करा. पण, त्यावर शोभतील अशा चपला घ्यायला विसरू नका..!

तरुणांसाठी…

मुलांसाठी चपलांचा विचार केला तर पुरुषांनो, तुमच्यासाठी पादत्राणांमध्ये तसे कमी पर्याय आहेत. म्हणजे मुलींसाठी जशी भली मोठी व्हरायटी असते तसं काही तुमच्यासाठी नाही. तुमच्यासाठी सणासुदीला हेच आपले नेहमीचे बूट नाहीतर चपला किंवा सरळ लेदरच्या सँडल. काही हौशी कलाकार मोजडय़ा किंवा कोल्हापुरी चपलासुद्धा वापरू शकतात. थोडासा तोरा म्हणजे फॅशनच्या भाषेतला अ‍ॅटिटय़ूड बाळगलात तर जीन्सवरसुद्धा कोल्हापुरी चपला तुम्हाला मिरवता येतील.

स्टायलिस्ट काय म्हणतात?

‘हॅप्पी जर्नी’ आणि आगामी ‘वजनदार’ अशा मराठी सिनेमांसाठी स्टायलिंग करणारा फॅशन डिझायनर अमित दिवेकर सणासुदीच्या या काळासाठी काही खास टिप्स देतो.

तरुणांसाठी –

बरेचजण दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात झब्बा नाहीतर शेरवानी घालतात. काहीजण गुरुशर्टसारखे प्रकारही वापरताना दिसतात. यावर सूट होणाऱ्या उत्तम चपला म्हणजे लेदर सँडल्स किंवा मोजडय़ा. क्वचित कोल्हापुरी चपलाही चांगल्या दिसतील, पण त्या मुलींसारख्या रंगीबेरंगी नाही हा. तर टिपिकल कोल्हापुरी. सँडल्समध्ये बेज, टॅन, ब्राउन असे रंग जरूर वापरा. आणखीन काही वेगळे रंग हवे असतील तर शक्यतो गडद रंग वापरावेत. उदा. गडद हिरवा, मातकट, गडद निळा, काळपट पिवळा किंवा हळदी पिवळा.

तरुणींसाठी –

नेहमी नेहमी काही हिल्सच घालायला हव्यात असं नाही, पण फ्लॅट हिल्ससुद्धा सणासुदीत बऱ्या पडतील. खरंतर यंदा त्याच इन असतील. यावर खडे, जरी, सोनेरी, चंदेरी रंगाचं नक्षीकाम असेल तर आणखी उत्तम. कोल्हापुरी चपलांना गोंडे लावलेले हल्ली मिळतात आणि हा उत्तम पर्याय आहे. मुलींनी पारंपरिक पोशाखांवर शक्यतो क्लोज्ड हिल्स म्हणजे संपूर्ण तळवा झाकणारे हिल्स घालू नयेत. जर तुम्ही लांब घेराचे किंवा अनारकली, पलाझोसारखे पायघोळ कपडे वापरत असाल तर शक्यतो हिल्सच घालाव्यात. यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर अशा कपडय़ांवर हिल्समुळे मिळणारी जादाची उंची शोभून दिसते, शिवाय हे कपडे पायात अडखळून पडण्याचा धोका कमी होतो. मुलींसाठी अगदी तुम्हाला आवडेल त्या रंगाचे हिल्स आणि चपला वापरता येतील. बीडस्, जरदोसी वर्क केलेल्या चपला तर उत्तमच.
स्वाती केतकर- पंडित – response.lokprabha@expressindia.com