कपडे, अ‍ॅक्सेसरीज, दागिने, मोबाइल या खरेदीच्या यादीत आता आणखी एका वस्तूची भर टाकायला हरकत नाही. बॅगवतीची! अर्थात बॅगची. इतर गोष्टींप्रमाणेच बॅग्जही आता ट्रेण्डी होऊ लागल्या आहेत.

कपडे, दागिने, चपला, कानातले, गळ्यातले असं सगळं काही घेतलं तरी मुलींना पर्सची हौस असतेच. सणासुदीच्या काळात नवा ड्रेस मिरवण्याइतकंच महत्त्व नवी पर्स मिरवायला असतं. आपल्या ड्रेसवर मॅचिंग पर्स प्रत्येकीला हवीच असते. बाजारात नजर टाकली तर आपल्याला पर्समध्ये हजारो प्रकार पाहायला मिळतील. म्हणजे स्लिंग बॅग, बटवा, वॉलेट, पॉकेट, पाउच, क्लच, एन्व्हलप बॅग्ज, आखूड बंदांच्या पर्स, लांब बंदांच्या पर्स, टोट बॅग्ज.. एकापेक्षा एक. मग या इतक्या साऱ्या ढिगातून नेमकी कशाची निवड करायची?

क्लच

हातात नेमका मावणारा हा प्रकार. फक्त एका दाबाच्या बटणाने याची उघडझाप केली जाते. यात अगणित रंग, अनेक नक्षीदार प्रकार आहेत. हा क्लच शक्यतो साडी, वनपीस, पंजाबी, अनारकली, पलाझो यावर छान दिसेल. जीन्सवर मात्र नाही. क्लचमध्ये अनेक रंग आणि आकार उपलब्ध आहेत. त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, गोल अशा अनेक आकारांत क्लच मिळतात. रंगाच्या बाबतीतही यात वैविध्य आढळतं.

बटवा

बटवा हा पर्सचा एक पारंपरिक प्रकार आहे. बटवा म्हणजे एखादी नक्षीदार पुरचुंडीच जणू. बटव्याच्या दोऱ्या ओढणं आपल्या हातात असलं तरी आपल्या फॅशनेबल लुकची नाडी बटव्याच्याच हातात असते. त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. यामध्ये कापडाच्या विविध प्रकारांतले बटवे तर आहेतच मग मखमल, साधं कापड, जरीचं कापड, चुणीदार कापड अशा अनेकविध प्रकारांत बटवे उपलब्ध आहेत. आणखी एक प्रकार म्हणजे चक्क धातूचे बटवे. एखादा डबाच वाटावा जणू असे हे बटवे असतात. यात चांदीचे बटवेसुद्धा येतात बरं का! बटवे वेगवेगळ्या आकारांतही उपलब्ध असतात. नेहमीचा पुरचुंडीचा आकार तर आहेच, शिवाय बदामाच्या आकारातले बटवेसुद्धा असतात. त्याला जर, गोंडे लावलेले असतात. त्यामुळे ते विशेष शोभून दिसतात.

एन्व्हलप बॅग्ज

एन्व्हलप बॅग म्हणजे चक्क पोस्ट पाकिटासारखी चौकोनी मोठी बॅग. यातही अनेक प्रकार हल्ली आले आहेत. यामध्ये विशेषत: एकरंगी बॅग्ज दिसतात. भडक किंवा गडद रंग अथवा निऑनमध्येही या बॅग आहेत.

वर्क केलेल्या बॅग्ज

सध्या बाजारात वर्क केलेल्या बॅग्जचा ट्रेण्ड दिसून येतोय. कच्छी वर्क, बाटिक प्रिंट, बांधणी, राजस्थानी वर्क, आरसा वर्कच्या विविध प्रकारांतल्या बॅग्ज आलेल्या दिसतील.

लेदर बॅग्ज

खास ब्रॅण्डेड किंवा लेदरच्या बॅग्जची गोष्टच वेगळी असते. त्या तुम्हाला सणासुदीसोबतच लग्नसमारंभ, ऑफिस, पार्टी अगदी कुठेही वापरता येतात.

टोट बॅग्ज

टोट म्हणजे खांद्याला अडकवायच्या मोठय़ा पिशव्या. टोटचा अर्थ आहे वाहून नेणं, बरंच काही सामान भरायला उपयोगी असलेल्या त्या टोट बॅग्ज. या बॅग्जना शक्यतो चेन नसते किंवा एखादंच बटणं किंवा वेलक्रो असतो. पण बऱ्याच टोट बॅग्ज शक्यतो चेनविरहितच असतात. खरंतर तीच त्याची खासियत आहे.

आता इतक्या साऱ्या बॅग्जमधून आपल्याला हवी ती बॅग कशी निवडावी, असा प्रश्न पडला असेल. तर आपली बॅग ही आपल्या कपडय़ांवर अवलंबून असते. तुम्ही ती मॅचिंगच घ्यायला हवी असं काही नाही, पण ती कपडय़ावर शोभून दिसायला मात्र नक्कीच हवी. पायघोळ अनारकली किंवा पंजाबी घातला असेल तर क्लच छान दिसेल. थोडा पाश्चिमात्य पद्धतीच्या पलाझो पँट्ससोबत स्लिंग बॅग शोभेल. पण तुमचा पलाझो भारतीय प्रिंटचा असेल किंवा पलाझो अनारकली असेल तर मात्र नाही. त्यावर साधी हातातली पर्स किंवा बटवा, क्लचच छान दिसेल. साडी नेसल्यावर स्लिंग बॅग सोडून काहीही घेऊ शकता. म्हणजे क्लच, बटवा, पर्स काहीही छान दिसेल. तुम्हाला कायमच खांद्याला अडकवायच्या लांब बॅगांची म्हणजे स्लिंग बॅगांची सवय असेल तर सोनेरी किंवा चंदेरी रंगाच्या साखळ्या असलेले क्लच किंवा एन्व्हलप बॅग वापरू शकता.

आपला बटवा साडीच्या पदराला मॅच करणं, हे एक छान स्टेटमेंट होऊ शकतं. शिवाय त्याची नजाकत वेगळीच जाणवते. तुम्ही केसात काही दागिने घालणार असाल किंवा पिन्स वगैरे लावणार असाल तर तुमची पर्स किंवा बटवा तुम्ही त्यासोबतही मॅच करू शकता. शिवाय फक्त ड्रेसच नव्हे तर चप्पल आणि बटवा या दोन्ही गोष्टी तुम्ही मॅचिंग वापरू शकता. म्हणजे जर तुमचा गडद निळा ड्रेस असेल तर त्यावर विरुद्ध रंगाच्या चपला आणि साधारण तसाच एखादा बटवा किंवा पर्सही वापरू शकता. हे एक वेगळं स्टाइल स्टेटमेंट होईल. अर्थात हे सगळं करताना नेहमीचा फॅशन नियम विसरू नका. साडी, ब्लाउज, दागिने सगळंच जर भारी असेल तर बटवाह अति नक्षीकाम केलेला नको त्याऐवजी तो हा सगळा तोल राखणारा असायला हवा. मुलांसाठी बॅग्जमध्ये लेदर पाउचचा पर्याय चांगला आहे. पण त्यातले काळा, तपकिरी असे रंगच त्यांना वापरण्याजोगे असतात. तशातही जर मोठी बॅग घ्यायची हौस असेल तर ऑफिसला नेतात त्याप्रमाणे बॅगही घेता येईल.

कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजचे ट्रेण्ड फॉलो करताना थोडंसं लक्ष बॅगच्या ट्रेण्ड्सकडेही असू द्या. कारण तुमच्या ट्रेण्डी कपडय़ांचा लुक या बॅग्जमुळेच जास्त खुलतो. तर मग विचार कसला करताय, दिवाळीच्या कपडे, दागिने, मोबाइल खरेदीसह बॅग्जचीही खरेदी होऊन जाऊ दे!
स्वाती केतकर-पंडित – response.lokprabha@expressindia.com