दसरा-दिवाळी म्हणजे खरेदीसाठी हक्काचा काळ. अगदी कपडय़ालत्त्यांपासून ते घरखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या खरेदीसाठी या सणांचा मुहूर्त गाठण्याकडे अनेकांचा कल असतो. वाहनक्षेत्रही त्यात कसे मागे राहील..?

एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यावर साधारणत त्याच्या भविष्यकथनात ‘तुमच्या नशिबात वाहनसौख्य आहे’, असं हमखास सांगितलं जातं. पत्रिका दाखवण्यासाठी आलेली व्यक्तीही मग हरखून जाते. ती व्यक्तीही मग मनोमन हिशेब मांडू लागते. साधारण कोणती गाडी घेता येईल, आपल्या खिशाला कोणती परवडेल इ. इ. घरातही मग चर्चा सुरू होते. मित्रांना सल्ला विचारला जातो. आधी सेकंडहँड गाडीचा विचार केला जातो. मग हो-नाही करता करता नवीन गाडीच घ्यावी यावर शिक्कामोर्तब होते. गाडी घेण्याचा मुहूर्त शोधला जातो. साधारणत सणासुदीच्या मुहूर्तावरच गाडी घेण्याकडे कल असतो. त्यात दसरा-दिवाळी नजीक असेल तर मग आनंद आणि उत्साहाला तोटा नसतो. या दोन मुहूर्तापकी एका दिवशी गाडी घरी येते. तिची यथासांग पूजा होते. नारळ वाढवला जातो आणि मग खऱ्या अर्थाने गाडी मार्गाला लागते.

ज्योतिष वगरेचा भाग सोडला तर थोडय़ाबहुत फरकाने अगदी अस्संच होतं गाडी घेताना. दुचाकी असणाऱ्यांना चारचाकीचे वेध लागलेले असतात आणि ज्यांच्याकडे काही नसते त्यांना दुचाकीचे तरी वेध असतात. आणि त्यासाठी मुहूर्ताची प्रतीक्षा असते. त्यामुळेच सणासुदीच्या हंगामात कोण काय ऑफर्स देतंय याकडे बारीक लक्ष असतं या वाहनेच्छुकांचं. असो. मुद्दा तो नाही. तर दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच काळात वाहननिर्मात्यांकडून विविध ऑफर्स तर दिल्या जातातच शिवाय नवनवीन गाडय़ाही ग्राहकांसाठी बाजारात उतरवल्या जातात.

सद्यस्थिती

गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाने अगदी भरभरून दिलंय. त्यामुळे दुष्काळ, महागाई या शब्दांना तरी सामोरे जावे लागणार नाहीय. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यांत वाहनांची विक्रीही जोरात झालेली आहे. त्यामुळे वाहन निर्मात्यांनीही सणासुदीचा हंगाम एन्कॅश करण्याचं ठरवलंय. शिवाय सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळणार आहे. इंधनाच्या किमतीही आवाक्यात आहेत. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून केली जाणार असल्याने चारचाकींची किंमत पुढील वर्षी यंदाच्या तुलनेत जास्त असेल. त्यामुळे किमती वाढण्याआधीच गाडी घ्यावी याकडेही ग्राहकांचा कल असेल.

पॅसेंजर व्हेइकल (प्रवासी वाहन) सेगमेंटमध्ये यंदा सगळ्यात जास्त विक्रीची नोंद झाली आहे. त्यातही युटिलिटी व्हेइकलना ग्राहकांची जास्त मागणी आहे. मान्सून चांगला झाला असल्याने दुचाकी आणि कृषिपूरक वाहनांना यंदाच्या हंगामात जास्त मागणी असेल, असा जाणकारांचा होरा आहे. मात्र, असे असले तरीही प्रवासी वाहनांनाही मागणी असणारच यात शंका नको. ऑगस्टपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार ग्राहक पसंतीत मारुतीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. त्यांच्या अल्टो या हॅचबॅकला अजूनही मागणी आहे. निव्वळ ऑगस्ट महिन्यातच २१ हजार अल्टोंची विक्री नोंदवली गेली. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री कमीच आहे. रेनॉच्या क्विड या एन्ट्री लेव्हल हॅचबॅकने मारुती अल्टोसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. ुंदाईच्या विक्रीतही सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ुंदाईच्या सर्व प्रकारच्या एकंदर ४३ हजार गाडय़ांची विक्री आतापर्यंत झाली आहे.

एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटाच्या इनोव्हाने आपले स्थान कायम राखले आहे. इनोव्हाच्या क्रिस्टाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. आतापर्यंत साडेआठ हजार इनोव्हा क्रिस्टांची विक्री झाली आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर त्यात वाढ होण्याची निश्चिती आहे. एकुणात २०१६-१७ या आíथक वर्षांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत वाहन उद्योगाची वाटचाल चांगलीच म्हणावी लागणार आहे. देशांतर्गत विक्री १६ टक्क्यांनी वाढली आहे.

दुचाकीच्या विक्रीतही वाढ झाल्याची नोंद आहे. बजाज, हिरो, होंडा, मिहद्रा, टीव्हीएस या नेहमीच्याच दुचाकी निर्मात्यांनी आपापला ग्राहकवर्ग टिकवून ठेवला आहे.

सणासुदीचा हंगाम आणि ऑफर्स

खरं तर गणपतीपासूनच सणासुदीचा हंगाम गृहीत धरला जातो. पितृपंधरवडा वगळता हा हंगाम दिवाळीपर्यंत चालतो. टाटा मोटर्स, मिहद्रा, स्कोडा, फियाट, शेवरोले आदी वाहन निर्मात्यांनी या काळातच विविध ऑफर्स दिल्या आहेत. स्कोडाच्या नव्या रॅपिडची खरेदी आता करून पुढील वर्षी पसे भरा, अशी ऑफर आहे. तर टाटा मोटर्सने ‘हर वीक दिवाली’ ही ऑफर आणली आहे. या ऑफरचा एक भाग म्हणून टाटा कार बुक करणाऱ्या सात ग्राहकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची संधी मिळणार आहे. नव्याने दाखल झालेल्या टाटा टियागोसहित सर्वच प्रवासी वाहन श्रेणीसाठी ही ऑफर लागू राहणार आहे. या ऑफरमध्ये वाहन विमा मोफत दिला जाणार आहे. तसेच आपल्या प्रवासी वाहन ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि एक्स्चेंज प्रोग्रॅम्स टाटा मोटर्सतर्फे राबवण्यात येणार आहेत. सफारी स्टॉर्मवर एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ असेल तर झेस्टच्या खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.

मिहद्रानेही टीयूव्ही, एक्सयूव्ही, केयूव्ही या सर्व प्रकारच्या गाडय़ांच्या खरेदीवर आकर्षक सूट प्रस्तावित केली आहे. अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे यावेत या मिषाने विविध वाहन निर्मात्यांनी विविध प्रकारच्या ऑफर्स दिल्या आहेत. त्याला ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.

नव्या गाडय़ा

टाटा हेक्झा : टाटा अरियाची सुधारित आवृत्ती वाटावी अशी टाटा हेक्झा दिवाळीत किंवा दिवाळीनंतर बाजारात येईल, अशी चिन्हे आहेत. एसयूव्ही टाइपमधील ही गाडी लक्झरियस असेल यात शंकाच नाही. टाटांच्या टियागो या हॅचबॅकचे जोरदार स्वागत झाले. दणकट इंजिन आणि उत्तम मायलेज असलेली ही गाडी कारप्रेमींच्या पसंतीला उतरली. आता टाटांच्या हेक्झाबद्दलही बरीच उत्सुकता आहे. ही एसयूव्ही इनोव्हा आणि एक्सयूव्ही यांना स्पर्धा निर्माण करू शकेल.

टाटा काइट : झेस्ट, बोल्ट, टियागो यांच्या यशानंतर टाटा हेक्झा या एसयूव्हीबरोबरच काइट ही सेडानही सणासुदीत लाँच करतील अशी दाट शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांत काइट उपलब्ध असेल. डिझेलवर चालणारी काइट २३ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देऊ शकेल तर पेट्रोलवर चालणाऱ्या काइटचा मायलेज १८ किमी प्रतिलिटर एवढा असेल. चार ते सहा लाखांत काइट उपलब्ध असेल.

मारुती सुझुकी इग्निस : मिहद्राच्या केयूव्ही हंड्रेडने सध्या मारुतीच्या गाडय़ांना स्पर्धा निर्माण केली आहे. या स्पध्रेला तोंड देण्यासाठी मारुतीनेही जय्यत तयारी केली असून दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांची इग्निस ही हॅचबॅक लाँच करण्याचे ठरवले आहे. पाच ते सात लाख रुपयांदरम्यान इग्निसची किंमत असेल. मारुतीच्या सर्वाधिक खपाच्या स्विफ्टचेही नवीन रुपडे लवकरच सादर होणार आहे. परंतु ही नवीन गाडी बहुधा नव्या वर्षांतच रसिकांच्या भेटीला येईल, अशी चिन्हे आहेत.

फोक्सवॅगन टिगुआन : फोक्सवॅगनची एकही कॉम्पॅक्ट एसयूव्ही अद्याप भारतीय रस्त्यांवर निदर्शनास आलेली नाही. दिवाळीच्या आगेमागे किंवा वर्षअखेपर्यंत मात्र फोक्सवॅगन ही कसरही भरून काढेल, असे दिसते. त्यांच्या टिगुआन या नव्याकोऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे आगमन या कालावधीत होईल. ट्रेण्डलाइन, कम्फर्टलाइन आणि हायलाइन या तीन प्रकारांत टिगुआन उपलब्ध असेल. ऑडी क्यू ३ आणि बीएमडब्ल्यू एक्स १ या क्रॉसओव्हर्सना ही गाडी स्पर्धा निर्माण करू शकेल. २५ ते ३० लाखांत ही गाडी उपलब्ध असेल.

ह्य़ुंदाई टक्सन : ह्य़ुंदाईच्या क्रेटाचे चांगले स्वागत झाले भारतात. तसेच त्यांच्या आय टेन आणि आय ट्वेंटी यांचीही जोरात विक्री झाली. सध्याच्या घडीला देशांतर्गत कारविक्रीत ह्य़ुंदाई दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पाश्र्वभूमीवर ह्य़ुंदाईची टक्सन बाजारात येणार आहे. उत्तम ग्राऊंड क्लिअरन्स, फोर व्हील ड्राइव्ह आणि प्रशस्त गाडी असे टक्सनचे वर्णन करता येईल. क्रेटा आणि सँटा फे या एसयूव्हींच्या रांगेत बसणारी ही गाडी असेल. टक्सनची किंमत १८ ते २४ लाखांच्या दरम्यान असेल.

याशिवाय छोटय़ा गाडय़ांमध्ये डॅटसनच्या गो या हॅचबॅकचे आणखी एक सुधारित रूप या कालावधीत सादर होण्याची चिन्हे आहेत.

इलेक्ट्रिक बाइकचा पर्याय

दुचाकी बाजारात तसा नेहमीचाच ट्रेण्ड आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बजाज आपली ४०० सीसीची बाइक बाजारात आणेल अशी चिन्हे आहेत. तर इलेक्ट्रिक बाइकचा पर्यायही या कालावधीत उपलब्ध होईल. पुणेस्थित टॉर्क मोटारसायकल्सने सणासुदीत टी सिक्स एक्स ही त्यांची स्पोर्ट्स इलेक्ट्रिक बाइक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

(टीप : लेखात उल्लेखलेल्या सर्वच गाडय़ा दिवाळीत लाँच होतील, असे नाही. त्यांचे सादरीकरण दिवाळीच्या नंतरही होऊ शकते.)
विनय उपासनी – response.lokprabha@expressindia.com