दिवाळी म्हणजे सेलिब्रेशन. त्याच्या तयारीत दिवाळीच्या आधीपासूनच गृहिणी अगदी गढून गेलेल्या असतात. पण असं खाद्यपदार्थाच्या दुनियेत रमणं ही काही फक्त गृहिणींचीच मक्तेदारी नाही.

लहानपणीची एक प्रकर्षांने आठवणारी गोष्ट. त्या वर्षी आमच्या घरी अगदी आणीबाणी होती. अगदी हातातोंडाची देखील भेट होत नव्हती. अशा वेळी मी हट्ट केला तो एका दिवाळी अंकाचा. किंमत होती फक्त १० आणे. आता दहा आणे म्हणजे काय तेही लोकांना समजणार नाही. आता मुलं १० रुपयेच काय १०० रुपये ही मागतात. आणि त्यांना ते मिळतातही. मी रुसून बसलो आणि शेवटी १० आणे म्हणजे आत्ताचे ६० पैसे घेऊन सोरेगांवहून सोलापूरला ५ मैल सायकलवर जाऊन तो अंक घेऊन आलो. त्यापुढे लाडू-करंज्या, फटाक्यांची मातबरी ती काय?

काळ कोणासाठी तोच राहात नाही. आमच्या बाबतीतही ते खरंच झालं आता. फटाके-फराळाची सरबत्ती होऊ लागली. मोठा होऊ लागलो. वैद्यकीय शिक्षण संपलं. आता खाण्यापिण्याच्या पदार्थाची चिकित्सा सुरू झाली. चिकित्सेचा मुख्य मुद्दा म्हणजे तेल कोणतं वापरावं? वडील म्हणाले, कुणीही जिथे राहतो, त्या प्रदेशात जे तेल मुख्यत्वे मिळते ते त्याच्या प्रकृतीसाठी योग्य असते. वनस्पती तेलात कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते. पण थंडीत गोठणारे खोबरेल तेल वापरणे बरे नव्हे, असा एक विचार. आमच्या घरात सर्वानाच वाचनाची पुस्तके-वर्तमानपत्रे अत्यंत आवड आहे. वडील म्हणाले, केरळमध्ये थायलंड-फिलिपीन्समध्ये खोबरेलच वापरतात. त्यांच्यातल्या कोलेस्ट्रॉलबाबत आकडेवारी काय आहे, याची जरा चौकशी कर. आणि खोबरेल प्रकृतीला वाईट असेल तर तेथे तद्नुषंगिक विकारांचे प्रमाणही जास्त असावे. पण तशी काही आकडेवारी तज्ज्ञांनी केलेली दिसत नाही. तेल वापरताना तळणीचे तेल परत परत तापवून वापरू नये हे मात्र खरे.

दिवाळी म्हणजे ‘लाडू, करंज्या, शंकरपाळी’ या ओळी आठवतात. शंकरपाळे हा शब्दप्रयोग कसा काय आला आपल्या भाषेत? आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्रीयन लोकांना मुलुखगिरीची सवय आहे. सर्व हिंदुस्थानभर ते फिरले आहेत. आता ती केवळ पर्यटनापुरतीच उरली आहे. तर या मुलुखगिरीत महाराष्ट्रात जे काही आलं त्यात खाद्यपदार्थाचाही समावेश आहे. मूळ पदार्थाचे नाव ‘शक्कर पारे’ आहे. ही उत्तर हिंदुस्थानी मिठाई आहे. ‘शक्कर’ म्हणजे साखर आणि ‘पारे’ म्हणजे तुकडा. साखरेचा तुकडा. शक्करपारा खरोखरच हा साखरेचा तुकडा दिवाळीशिवायही आता सर्वाना हवा हवासा वाटतो आणि मिळतोही. आता नवीन विचारसरणीनुसार त्यात थोडाबहुत बदलही केला जातो. मैद्या ऐवजी कणीक थोडे कमी आहेत. साखर वापरून हा पदार्थ भट्टीत भाजून करतात.

तुम्ही म्हणाल ही तर बिस्किटे झाली. कोणी ‘सत्यनारायण’ म्हणतात. कोणी ‘सत्यदवे’. असो.

आता दुसरा आयातित पदार्थ म्हणजे ‘गुजिया’. आपली करंजी हो. हा इराणी पदार्थ आहे. त्यात ते सुकेमेवे वापरतात. पण आपण महाराष्ट्रीय त्यात खोबरे वापरतो. प्रदेशसदृश उपलब्ध पदार्थाचा वापर केला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे. कोकण जवळ असल्याने व आपण मोदक करतच होतो त्यात नारळ वापरत होतो. तर ही करंजी आली. तीमध्ये सारण नारळ वापरणे साहजिकच होते. सुके खोबरे आणि साखर वापरणे सुरू झाले आणि मोदकापेक्षा अधिक दिवस टिकणारा पदार्थ तयार झाला.

लाडू हा पदार्थ आपणास वैदिक काळापासून माहीत आहे. लड्डूक असा त्याचा उल्लेख पुराणात आला आहे. गणेशाचा आवडता पदार्थ असे त्याचे वर्णन आहे. हाच मोदकारी म्हणजे आनंद देणारा पदार्थ ‘मोदक’ म्हणून प्रचलित झाला. इथे मोदकाशी संबंधित एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक राणी तलावात स्नान करत होती. तेथे राजा आला आणि गमतीने राणीच्या अंगावर पाणी उडवू लागला. तेव्हा राणी म्हणाली, ‘‘मोदकै: ताडिमाम्’’

आम्ही शाळेत संस्कृत शिकायचो आणि पूर्वीच्या मराठी लिखाणातही अशी संस्कृत वाक्ये यायची. ‘‘ते नो ही दिवसा गत:’’

तर राणी म्हणाली, ‘मोदकै: ताडिमाम.’’ तेव्हा राजाने मुदपाकखान्यातून मोदक आणविले आणि तिच्या अंगावर मारू लागला. राणीने कपाळाला हात लावला. राणीला म्हणायचे होते, मा उदके म्हणजे पाणी उडू नको. तर असो.

आता लाडू म्हणजे बेसन लाडूच आठवतात. बेसन लाडू करण्याची एक अगदी सोपी पद्धत सांगतो. अगदी १० मिनिटात लाडू तयार. भडंग, चुरमुरे जिथे मिळतात तिथेच डाळे, फुटाणेही मिळतात. हे डाळे खमंग भाजलेले असतात. ते ग्राईंडरमध्ये वाटून पूड करा. त्यातच मऊसर गूळ व थोडा पिवळा रंग घाला व वाटून घ्या. यातच वेलदोडा पूड व तूप घालून परत वाटून घ्या. छान गोळा तयार होतो. त्याचे आवडीनुसार लहानमोठे लाडू वळा. झाले लाडू तयार.

आता तिखट पदार्थाकडे वळूयात. आपला आवडता पदार्थ आणि सुगरणपणाची कसोटी म्हणजेच चकली. आमच्या पुण्यात जेथे काही उणे नाही असे म्हणतात तेथे एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे. बेक्ड चकली. म्हणजे भाजलेल्या चकल्या. तुमचे मळलेले पीठ घेऊन जा आणि तयार बेक्ड चकल्या घेऊन जा. किंवा तुमच्या तळलेल्या चकल्या घेऊन या आणि यंत्राने त्यातले तेल काढून खुसखुशीत चकल्या घेऊन जा.

निरनिराळ्या छापाचे पण नावाआधी किंवा नंतर ‘बेस्ट’ विशेषण लावलेले अनेक चिवडे मिळतात. पण ते तेलाने थबथबलेले असतात. आता भेळ म्हणजे चिंचेचे पाणी आलेच. तिलाच भेळ म्हणतात. तसे चिवडा म्हणजे तेलाचा वापर आलाच. या चवींचा विरह झाला तर तो पदार्थ तोच आहे असे म्हणवत नाही. पण कमी तेल वापरूनही खमंग चिवडा करता येतो. भडंग नावाचे गोलसर चुरमुरे मिळतात त्यांचा चिवडय़ासाठी वापर करावा. हे चुरमुरे मुले नुसतेसुद्धा आवडीने खातात. सोबत खारे शेंगदाणे असल्यास चैनच!

तर प्रथम ग्राइंडरमध्ये मीठ, साखर, सायट्रिक अ‍ॅसिड, लाल तिखट, पिवळा रंग याची पूड करून घ्यावी. मोठय़ा जाड बुडाच्या भांडय़ात तेल घेऊन गॅसवर ठेवावे. तेल तापल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंग, लसूण, कढीपत्ता घालावा. त्यातच शेंगदाणे घालावेत. हलवत राहावे. शेंगदाण्यांचा रंग साधारण बदलत आल्यावर आच मंद करून त्यात भडंग घालावेत व सर्व भडंगांना तेल लावल्यावर त्यात वरील पूड घालावी. आता अगदी मिनिटे-दोन मिनिटे आच वाढवून उरलेली पूड घालावी. गॅस बंद करून भडंग चांगले गार होई तो अधूनमधून झाऱ्याने वर खाली करत राहावे. झाला भडंग चिवडा तयार. भाजके पोहे किंवा पातळ पोह्यांच्या चिवडय़ापेक्षा हा लोकांना नक्कीच हवाहवासा वाटतो.

आता दिवाळीचा नेहमीचा काय आणि थोडा वेगळा काय फराळ तो फराळच. आपले पाहुणे अनेक ठिकाणी त्याचे सेवन करून थोडे कंटाळलेलेच असतात. तेव्हा आलेल्या पाहुण्यांना फराळाबरोबरच थोडा वेगळेपणा म्हणून इतर काही पदार्थ दिला तर? उदाहरणार्थ इडली सांबार? एक तर हा पदार्थ आधीही तयार करून ठेवता येतो आणि सांबार तर काय जितके मुरेल तेव्हढे अधिक चवदार होते. इडल्या करायची थोडी वेगळी रीत सांगतो. नेहमी यात कोणी ‘खमीर’ म्हणजे ‘यीस्ट’ वापरत नाहीत. तर हे यीस्ट दोन स्वरूपात मिळते. ताजे आणि कोरडे. तर हे यीस्ट चमचाभर घ्या. वाटीत चमचाभर साखर घाला व वर पाव वाटी कोमट दूध किंवा पाणी घालून चांगले कालवून उबदार जागी ठेवून द्या.  दोन तासांत ते वाटीभर फुलून येते.

आता हे यीस्ट सकाळी भिजवून ठेवलेल्या संध्याकाळी वाटलेल्या डाळ तांदुळाच्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करा व रात्रभर उबदार जागी ठेवून द्या. सकाळी हे मिश्रण चांगले फुलून येते. ते अजिबात न ढवळता चमच्याने  इडलीपात्रात  भरून इडल्या १० मिनिटे वाफवून घ्या. या इडल्यांना जुन्या पद्धतीच्या पावाप्रमाणे खमंग सुवास येतो. अशा या सुगंधी इडल्या सांबारासोबत पाहुण्यांना द्या. पहा त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी!
डॉ. अ. रा. गोडसे – response.lokprabha@expressindia.com