दिवाळीत कोणाकोणाला भेटवस्तू द्यायची याची यादी करताय? पण, ‘भेटवस्तू म्हणून काय द्यायचं’ हा प्रश्न पडलाय. फिकर नॉट! गिफ्टचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्याचसाठी तर बाजारपेठ सजली आहे.
श्रावण महिन्यापासून सुरू झालेली सणांची रांग दिवाळीजवळ येऊन संपते. सणांच्या प्रसन्न वातावरणात उत्साह, जल्लोष, आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. महिलावर्गाची नटण्यामुरडण्याची लगबग सुरू होते. कोणत्या सणाला काय घालायचं, कसं दिसायचं याचं विचारचक्र सुरू होतं. नवरात्रीत तर हे प्रस्थ आणखी वाढतं. मग येतो दसरा आणि शेवटी दिवाळी. या सणांमध्ये ‘कसं दिसायचं’ यापलीकडे आणखी एका गोष्टीचा विचार केला जातो. तो म्हणजे भेटवस्तू देण्याचा. अर्थात गिफ्टिंगचा सिलसिला! दिवाळी तर हक्काची असते. गिफ्ट घेण्यासाठीही आणि देण्यासाठीही.. त्यातही भाऊबीज आणि पाडवा म्हणजे मुलींसाठी आनंदाचा दिवसच. पर जमाना बदल गया है बॉस! आता भाऊसुद्धा भेटवस्तूंची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे पुरुष मंडळींसाठीसुद्धा आता ते दोन्ही दिवस महत्त्वाचे आहेत. एकीकडून खिसा रिकामा होतोय तर दुसरीकडे रिकामी पिशवी भेटवस्तूंनी भरतेय अशी गत आता प्रत्येकाचीच होते.
गिफ्टिंगचा आनंद सगळेच लुटत असले तरी दरवर्षी कोणाला काय द्यायचं या प्रश्नावर अडकायला होतंच. ‘ते गिफ्ट मागच्याच वर्षी दिलंय तिला’, ‘त्याला त्याची फारशी आवड नाही’, ‘ते पहिल्यांदाच येणार आहेत आपल्याकडे. मग तसंच गिफ्ट द्यायला हवं’ या संभ्रमात अनेक जण पडतात. मग डोक्याला थोडा आणखी ताण देत ‘लास्ट मिनिट’ गिफ्ट्सची शॉपिंग होते. पण, ज्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं त्या व्यक्तीच्या सवयी, आवडनिवड, छंद याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यांना एखादं भन्नाट गिफ्ट देता येईल. दिवाळीमध्ये फक्त भाऊबीज, पाडव्याच्या दिवशी गिफ्टचा माहोल असतो असं नाही तर संपूर्ण दिवाळीतच तसं चित्र असतं.
दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी समस्त भावंडं एकत्र एका ठिकाणी जमतात. बरेच भाऊ असलेल्या बहिणीची मजा असते. पण, भाऊबीजेला आता रिटर्न गिफ्टचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे तिलाही भावांना गिफ्ट द्यावे लागतात. अर्थात असा नियम नाही. पण, साधारण असं असतं. मग अशावेळी बहिणींकडे दोन पर्याय असतात. एक म्हणजे सरसकट सगळ्या भावांना एकच गिफ्ट घ्यायचं आणि दुसरा म्हणजे त्यांच्या आवडीनिवडीनुसार भेटवस्तू ठरवायच्या. सगळे भाऊ साधारण एकाच वयाचे असतील तर उत्तम. पण वयांमध्ये फरक असेल तर त्यातही वर्गवारी करून भेटवस्तू द्याव्यात. कॉलेज-ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना टाय, टीशर्ट, ऑफिस फोल्डर, वॉलेट, कडं, लॉकेट, हातरुमालांचं पॅकेट्स, टिफिन बॉक्स, पेनड्राइव्ह अशा वस्तू गिफ्ट म्हणून देता येतील, तर शाळेत अगदी पाचवीपर्यंतच्या मुलांना रंगपेटी आणि त्यापुढील मुलांना स्पोर्ट्समधलं काहीही त्यांच्या आवडीनुसार देता येतील. खिशाला परवडणाऱ्या अशा या वस्तू आहेत.
प्रत्येकाच्या आवडीनुसार गिफ्ट द्यायचं ठरवलंत तर तुमचं थोडं काम वाढेल हे खरं पण त्याचा आनंद काही वेगळाच असेल. वाचनाची आवड असलेल्याला एखादं पुस्तक देता येईल किंवा एखाद्या पुस्तकांच्या दुकानातलं ठरावीक किमतीचं व्हाऊचरही उत्तम पर्याय आहे. म्हणजे तो त्याला हवी ती पुस्तकं घेऊ शकेल. सिनेमा किंवा परदेशी सीरिज बघण्याची आवड असलेल्यांना त्याच्या सीडीज तुम्ही गिफ्ट करू शकता. इथेही ठरावीक किमतीचं व्हाऊचर देऊ शकता. एखाद्याला कपडय़ांची आवड असेल कस्टमाइज्ड टीशर्ट देता येईल. कस्टमाइज्ड टीशर्ट लहान मुलांसाठीही योग्य पर्याय आहे. कार्टून्सची चित्र असलेले टीशर्ट दिल्याने बच्चेकंपनी एकदम खूश होईल. अगदी जवळच्या भावाला गिफ्ट द्यायचं असेल आणि त्याच्यासाठी तुमचं ‘नो बजेट लिमिट’ असेल तर असंख्य पर्याय तुमच्यासमोर आहेत. अशावेळी त्याला सध्या काय हवंय आणि त्याने ती वस्तू अजून घेतली नाही असा प्रसंग असेल तर आणखी उत्तम. त्याला सरळ तीच वस्तू गिफ्ट करून टाका म्हणजे त्याचाही फायदा आणि तुमचंही समाधान! तुमचं ‘नो बजेट लिमिट’ असलं तरी एकदा प्राइज टॅगवर नजर टाका म्हणजे झालं!
हे झालं भावांसाठी गिफ्टचं पुराण. आता बहिणींसाठी. भावांनो, आता जरा लक्ष द्या. बहिणींसाठी घ्याव्यात अशा बऱ्याच वस्तू असतात. इमिटेशन ज्वेलरी हा त्यातला नंबर वनवर असलेला आणि हिट पर्याय. हे गिफ्ट वायाही जात नाही आणि कधीच आऊटडेटेडही राहत नाही. दुसरं म्हणजे, ड्रेस मटेरिअल, कुर्ता, साडी, कपडय़ांचे नानाविध प्रकार बहिणींसाठी योग्य ठरतील. शाळेत जाणाऱ्या लहान मुली असतील तर त्यांना बेबी क्लिप्स, हेअरबॅण्ड, ब्रेसलेट असं किट देता येईल. चित्र रंगवण्याची काही पुस्तकंही मिळतात तीही देता येतील. शाळेतल्याच पण थोडय़ा मोठय़ा मुली असतील तर त्यांनासुद्धा इमिटेशन ज्वेलरी, कुर्ता, जीन्स, ट्रेण्डी टॉप्स, मेकअप किट असं देता येईल. संगीत शिकणारी बहीण असेल तर तिच्यासाठी एक भन्नाट गिफ्ट तुम्ही देऊ शकता. १६ किंवा त्यापेक्षा थोडं जास्त जीबीचं पेनड्राइव्ह विकत घ्या. त्यात तिच्या आवडीच्या गायक-गायिकेची गाणी अपलोड करा आणि ते पेनड्राइव्ह तिला द्या. असं आगळंवेगळं गिफ्ट बघून ती खूश होईल. यात आणखी एक गंमत करता येईल. आता पेनड्राइव्हही कस्टमाइज्ड करून मिळतात. तर संगीत विषयाशी संबंधित आकाराचं पेनड्राइव्ह घेऊन त्यात हे गाण्यांचं कलेक्शन सेव्ह करा. यासाठी तुमचा खर्च फक्त पेनड्राइव्ह घेण्यापुरताच होईल. हेच सगळं एखाद्या भावासाठीही करता येईल. नृत्य शिकणाऱ्या एखादीला घुंगरू देऊ शकता. पण, घुंगरू घेताना तत्संबंधीची योग्य माहिती तुमच्याकडे हवी. एखादीला पाककलेची आवड असेल तर तिला त्याची पुस्तकं देऊ शकता.
दिवाळीनंतर एखाद्या भावाचं किंवा बहिणीचं लग्न असेल तर त्यांना लग्नासाठी उपयोगी पडेल अशी एखादी वस्तू तुम्ही गिफ्ट देऊ शकता. त्यांच्या लग्नाचं गिफ्ट वेगळं देणारच असाल तर तेच बजेट थोडं वाढवून त्यांना टू इन वन असं एकच मोठं पण उपयोगी वस्तू गिफ्ट करा. यात आणखी एका पर्यायाचा तुम्ही विचार करू शकता. गिफ्ट म्हणून पैसे देण्याचा पर्याय. हा पर्याय नवा नक्कीच नाही. पण याचं स्वरूप थोडं बदललंय. एकमेकांशी बोलून, गिफ्ट म्हणून दिले जाणारे पैसे किती आहेत हे स्पष्ट सांगितलं जातं. लग्नात इतर काही गोष्टींसाठी पैशांची गरज असतेच. अशावेळी जवळच्या व्यक्तीने गिफ्ट म्हणून पैसेच दिले तर लग्न ठरलेल्या मुलीला किंवा मुलाला त्याची मदतच होते.
एरवी वाढदिवस वगळता आईवडिलांना ठरवून असं गिफ्ट देता येत नाही. शिवाय दिवाळीचा बोनसही झालेला असतो. मग या बोनसमध्ये थोडंसं पालकांनाही खूश करा. आईला साडी आणि वडिलांना शर्ट असं तद्दन गिफ्ट घेऊ शकता. पण, यापलीकडे जायचं असेल आणि बजेट थोडं जास्त असेल तर त्यांना चार दिवस कुठेतरी फिरायला जायचं गिफ्ट द्या. बजेट थोडं कमी असेल तर हाच प्लॅन तुम्ही एका दिवसाचा आखू शकता. त्या दिवसात दुपारचं जेवण, नाटक किंवा सिनेमा, संध्याकाळी शॉपिगंचं ठरावीक किमतीचं व्हाऊचर आणि रात्रीचं जेवणं असा प्लॅन करता येईल. या सगळ्याचं बुकिंग तुम्ही आधीच करून ते गिफ्ट म्हणून त्यांना देऊ शकता. त्यांच्या आयुष्यातला ‘एक उनाड दिवस’ जगायला त्यांनाही नक्की आवडेल. फोटोंचं कोलाज करून त्याचं घडय़ाळही बनवून मिळतं. त्यामुळे त्यांचे जुने-नवे फोटो जमा करून कोलाज चांगलं सजवून भिंतीवरील एखादं घडय़ाळ गिफ्ट म्हणून द्यायला हरकत नाही. घडय़ाळ द्यायचं नसेल तर फोटोंच्या कोलाजची एक छानशी फ्रेमही तुम्ही देऊ शकता. यामध्ये त्यांचे, त्यांच्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबतचे असे सगळ्या फोटोंचा समावेश करावा. असं फोटोंच्या कोलाजचं आणि त्याच्या घडय़ाळाचं गिफ्ट तुम्हाला इतर कोणालाही देता येईल.
कॉलेज, ऑफिसच्या हल्लीच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मित्रपरिवाराच्या भेटीगाठी कमी होताहेत. दिवाळी या सणाचं निमित्त करून अनेक जण ठरवून एकमेकांना भेटतात. ही निवांत भेट लक्षात राहावी म्हणूनही छोटंसं गिफ्ट देता येईल. यात मैत्रिणींना इमिटेशन ज्वेलरीपैकी एखादा दागिना, क्लच, पर्स, वॉलेट असं काहीही देता येईल. सध्या पेपर क्विलिंगच्या कानातल्यांचा ट्रेण्ड आहे. तुम्हाला ही कला अवगत असेल तर उत्तम. तुम्ही स्वत: ते करून गिफ्ट करू शकता. पण तुम्हाला येत नसेल तर अशा कानातल्यांची ऑर्डरही देता येते. मित्रांसाठी किचेन मस्त वाटेल. अनेकांकडे बाईक किंवा कार असते. त्यासाठी त्यांना उपयोगी होईल. मात्र किचेन देताना जरा विचार करा. सरसकट सगळ्यांना एकसारखे द्या नाहीतर प्रत्येकाच्या आवडीनुसार किचेन निवडा. सरसकट सगळ्यांना एकच देणार असाल तर मैत्रीविषयक काही असेल तर जास्त शोभून दिसेल. यासाठी तुमचं बजेट जास्त असण्याची आवश्यकता नाही. कमी किमतीत बसणारी ही गिफ्ट्स आहेत. सो, कीप गिफ्टिंग!
पाडवा म्हणजे समस्त विवाहित महिलांचा आवडता दिवस. त्यांच्या कमाईचा दिवस. समस्त नवऱ्यांनो, या दिवशी बायकोसाठी शॉपिंग करताना थोडा आधीपासून अभ्यास करा. एखादी साडी देऊन भेटवस्तू देणं ‘उरकण्या’सारखी परिस्थिती आता राहिली नाही. आता बायकोला काय हवंय त्याची माहिती जरा आधीच काढून ठेवा. खरंतर ही वेळसुद्धा आता फारशी येत नाही. ‘मला पाडव्याला अमुकअमुक हवंय’ असं ती सांगून मोकळी होते. त्यामुळे नवऱ्यांचं काम सोपंच झालंय. पण, तरी तुम्हाला आणखी क्रिएटिव्ह काही करायचं असेल तर कपडे, इमिटेशन ज्वेलरी, सोन्याचा एखादा दागिना, घरातली पण तिच्यासाठी उपयोगी ठरणारी एखादी वस्तू, कॉस्मेटिक्स, पर्स, मोबाईल असे असंख्य पर्याय आहेत. पाडव्याला आता बायकोसुद्धा नवऱ्याला गिफ्ट देते. त्यामुळे इथेही एका हाताने गिफ्ट घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने द्यायचं, असं चित्र इथे पाहायला मिळेल. नवऱ्यासाठी शर्ट, टाय, वॉलेट, घडय़ाळ असेही पर्याय आहेत. पुरुष मंडळींना अनेकदा तांत्रिक वस्तूंमध्येही रस असतो. त्यामुळे पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क, टॅबलेट, एमपीथ्री प्लेअर अशा वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता.
दिवाळीत आपण एखाद्याच्या घरी पहिल्यांदा गेलो की गोड पदार्थ किंवा स्नॅक्ससारखं खायला घेऊन जातो. त्याऐवजी घरात उपयोगी अशी एखादी वस्तू दिलीत तर ती भेट त्यांच्याही नेहमी लक्षात राहील. एखादा गोड पदार्थ आणि स्नॅक्स असं सगळं मिळून साधारण चारशे ते पाचशे रुपये सहज होतात. याच पैशांमध्ये एखादी वस्तू घेतली तर ती त्यांना आवडेल. मोठे कॉफीचे मग हा त्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. अशा कॉफीच्या मोठय़ा मगमध्येही बऱ्याच डिझाइन्स आहेत. दिसायला सुंदर, उपयोगी आणि दीर्घकाळ टिकणारे असे मग गिफ्ट म्हणून देता येतील. एखाद्याच्या नवीन घरी पहिल्यांदा जात असाल तर मात्र तुम्हाला तुमचं बजेट थोडं वाढवावं लागेल. अशा वेळी भिंतीवरील घडय़ाळ, वॉलपीस, फ्लॉवरपॉट, कीस्टॅण्ड, तोरण या पर्यायांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. या सगळ्या वस्तू हजार रुपयापासून सुरू होतात. खूप जवळच्या व्यक्तीच्या घरी पहिल्यांदा जात असाल तर त्यांच्याकरिता गिफ्ट घेण्यासाठी तुमचं बजेट नक्कीच जास्त असेल. अशा बजेटचा विचार करता झुंबर, पुस्तक ठेवण्याचा स्टॅण्ड, अँटिक शोपीस हे पर्याय असू शकतात. खरंतर नव्या घरात झुंबर अधिक शोभून दिसतं. यातही अगदी हजार रुपयांपासून सुरुवात होते.
एवढय़ा सगळ्यांना गिफ्ट देता देता एका व्यक्तीचा विसर पडतो. तो म्हणजे स्वत:चा. एखादी वस्तू हवी असते पण काहीना काही कारणांमुळे ते घेता येत नाही. असं तुमच्याबाबतीत झालं असेल तर दिवाळीचा मुहूर्त गाठा आणि स्वत:ला गिफ्ट म्हणून त्या वस्तूची खरेदी करा. या गिफ्ट घेण्यामागे ‘मैं अपनी फेवरेट हू’ असा तोरा नसला तरी स्वत:साठी गिफ्ट घ्यायला काय हरकत आहे. बिनधास्त खरेदी करा.
मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता सरसकट सगळ्यांना एकच भेटवस्तू देण्याचेही अनेक पर्याय आहेत. त्यामध्ये पेनड्राइव्ह, किचेन, वॉलेट/पर्स, कडं, टी-शर्ट, पुस्तकं, सिनेमांच्या सीडी अशांचा समावेश होतो. आता पेनड्राइव्हही साधारण चारशे रुपयांपासून मिळतात. कोणतंही गिफ्ट असो, त्यांचं पॅकिंग गिफ्ट घेणाऱ्यावर पहिलं इम्प्रेशन पाडतं. एखाद्या वेळी गिफ्ट साधं, लहान असेल, कदाचित तुम्हाला त्यात काही क्रिएटिव्ह करता आलं नसेल पण ते पॅक करताना तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता. रंगबेरंगी डिझाइनचा कागद, रिबन, चमक्या, टिकल्या असं सारं काही वापरून तुम्ही ते पॅकिंग आकर्षक करू शकता.
वर्षांतला दिवाळी हा सगळ्यात मोठा सण. या दिवसांत सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. अशावेळी एकमेकांना छोटंसं का होईना गिफ्ट दिलं तर ती आठवण म्हणून कायम स्मरणात राहते. ती आठवण जपण्यासाठी गिफ्ट देण्याआधी थोडा विचार मात्र करावा लागेल. तरच खिशाला जास्त फोडणी न देता उत्तमोत्तम गिफ्ट्स तुम्ही तुमच्या भावंडांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना देऊ शकता. त्यामुळे तुमची निरीक्षण आणि विचारशक्ती वापरा आणि भेटवस्तूंच्या शोधकार्याला लागा!
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com