सात पडी पुरी

साहित्य :

पुरीच्या पिठासाठी :

अडीच कप मैदा

अर्धा चमचा मीठ

तीन ते चार चमचे तेल.

सारणासाठी :

अर्धा कप तांदळाचे पीठ

दोन चमचे तेल

अर्धा चमचा मीठ

कृती :

मैदा, तेल आणि मीठ एकत्र करून पीठ मळून घ्या. अर्धा तास बाजूला ठेवून द्या.

एका भांडय़ात तांदळाचे पीठ घ्या. त्यात तेल, मीठ, पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.

तयार पिठाचे छोटे गोळे करून ते लाटून घ्या. या लाटीवर तांदळाची पेस्ट लावून तिचा रोल तयार करा. या रोलचे छोटे छोटे काप कापून घ्या. त्यांच्यावर थोडा दाब देऊन ते चपटे करा. हे काप दोन्ही बाजूंनी दाब देऊन बंद करून घ्या आणि तळून घ्या. तळल्यानंतर त्यांना हलका गुलाबी रंग येतो. गार झाल्यावर खायला द्या.

चोलाफली

साहित्य :

पाव कप पाणी

अर्धा टीस्पून पापडखार

एक ते दोन टीस्पून तेल

अर्धा टीस्पून लाल मिरचीची पावडर

अर्धा टीस्पून मीठ

अर्धा टीस्पून संचल पावडर

एक कप हरभरा डाळीचं पीठ

दोन ते तीन कप उडदाच्या डाळीचं पीठ.

कृती :

एका बाउलमध्ये पाव कप पाणी घेऊन ते गरम करून घ्या. त्यात मीठ, पापडखार आणि तेल घालून गरम करा.

दुसऱ्या भांडय़ात हरभरा डाळीचं पीठ आणि उडदाच्या डाळीचं पीठ एकत्र करून घ्या. त्यात गरम केलेलं पाणी थोडं थंड करून घाला. हाताला तेल लावून हाताने नीट मळून घ्या. त्या पिठाचे लहान लहान गोळे करून घ्या. त्याच्यावर थोडं उडीद डाळीचं पीठ आणि तेल शिंपडून त्याचं कोटिंग करून घ्या. एक एक गोळा घेऊन तो पातळ लाटून पिझा कटरने कापून घ्या. गरम तेलात तळून घ्या. गरम चोलाफलीवर लाल मिरचीची पावडर आणि काळं मीठ शिंपडा. कुरकुरीत चोलाफली तय्यार. ती हवाबंद डब्यात ठेवा.

टीप :  पुदिन्याच्या थंडगार चटणीबरोबर चोलाफली चांगली लागते.

मठिया

साहित्य :

दोन कप गव्हाचे पीठ

एक कप उडीद डाळीचे पीठ

दोन टीस्पून तूप

अर्धा टीस्पून हिंग

एक टीस्पून पापड खार किंवा सोडा खार

एक टेबलस्पून आजवाइन

एक टीस्पून सफेद मिरची पाडवर

अर्धा कप साखर

दीड टीस्पून मीठ

एक ते अर्धा कप गरम पाणी

तळण्यासाठी तेल.

कृती :

एका भांडय़ात गहू आणि उडदाचे पीठ घेऊन ते मिसळून घ्या. त्यात तूप, आजवाइन, सफेद मिरची पावडर, हिंग घाला. दुसऱ्या भांडय़ात पाणी करम करा. त्यात मीठ, साखर आणि पापडखार घाला. हे मिश्रण पिठात घालून चांगले मळून घ्या. मग हे पीठ बत्ता घेऊन चांगले कुटून मऊ करून घ्या. मग त्याचे लाडूसारखे छोटे गोळे बनवा. एका बाउलमध्ये उडीद डाळीचं पीठ आणि तूप घालून पेस्ट करून घ्या. तयार केलेल्या गोळ्यांमध्ये खळगा करून ही पेस्ट भरा आणि ते गोळे बंद करून हलक्या हाताने दाबा. मग हे गोळे लाटून हलक्या रंगावर तळून घ्या. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवून द्या.

गहू पुरी

साहित्य :

गव्हाचे १५० ग्रॅम पीठ

एक कप उडदाच्या डाळीचे पीठ

तूप अर्धा टीस्पून

एक टी स्पून हिंग

एक टीस्पून पापडखार

एक टीस्पून अजवाइन

एक टीस्पून सफेद मिरची पावडर

अर्धा कप साखर

चवीनुसार मीठ

एक टेबलस्पून गव्हाचे पीठ

एक टीस्पून तेल

गरजेनुसार गरम पाणी.

कृती :

एका बाउलमध्ये उडदाचं पीठ, गव्हाचं पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, आजवाइन, हिंग, आणि तेल घालून मिसळून घ्या. पाणी घालून पीठ मळून घ्या. त्याचे लहान लहान गोळे बनवून त्यांना पुरीच्या आकारात तळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.

सुवाली

साहित्य :

दीड कप मैदा

दोन टेबलस्पून साखर

दीड कप तूप

दोन टेबलस्पून तेल

गरम तसंच गार पाणी

कृती :

एका बाउलमध्ये एक कप पाणी उकळून घ्या. त्यात तेल आणि साखर  साखर घाला. दुसऱ्या बाउलमध्ये मैदा घेऊन त्यात तूप घाला. चांगलं मिसळून घ्या. गरम पाणी थोडं थंड झाल्यावर त्या पिठात घालून पीठ मळून घ्या. जास्त पाण्याची गरज वाटली तर थंड पाणी घालू शकता. थोडं तूप घालून पीठ चांगलं मळून घ्या. लहान लहान तुकडे करून त्याच्या छोटय़ा छोटय़ा पुऱ्या लाटून गुलाबी रंगावर गरम तेलात तळून घ्या.

टीप : गुजरातमध्ये मठिया आणि सुवालीशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही.

फुलवडी

साहित्य :

दीड कप जाडसर दळलेलं हरभरा डाळीचं पीठ

अर्धा कप जाडसर दळलेलं गव्हाचं पीठ

एक कप आंबट दही

एक टेबलस्पून तेल

एक टेबलस्पून काळी मिरी

एक टेबलस्पून धने

एक टेबलस्पून लाल मिरचीची पावडर

२ टेबलस्पून साखर

अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर

पाणी गरम तेलात मिसळून घ्या

तळण्यासाठी तेल.

कृती :

हरभरा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ एका मोठय़ा बाउलमध्ये एकत्र करून त्यात दही घाला आणि सहा तासांसाठी किंवा रात्रभर ठेवून द्या. त्यानंतर त्यात मिरी पावडर घाला. धने पावडर, साखर, मीठ, लाल मिरची पावडर आणि तीळ मिसळून घ्या. त्यात बेकिंग पावडर मिसळलेलं तेल घाला. (त्याच्यामुळे फुलवडी सॉफ्ट होते.) फुलवडीच्या यंत्राने गरम तेलात फुलवडय़ा सोडून गडद रंगावर तळून घ्या.

ठोर

साहित्य :

एक बाउल मैदा

तीन टेबलस्पून तूप

एक बाउल दूध

एक टेबलस्पून तेल

एक बाउल साखर

पाणी.

कृती :

एका बाउलमध्ये मैदा घ्या. तूप घाला. दोन्ही मिसळून घ्या. तीळ घाला. दूध घालून घट्ट कणीक मळा. त्यातून गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. या पुऱ्यांना छोटी छोटी छिद्रे पाडून घ्या. त्यामुळे पुरी फुगत नाही. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात या पुऱ्या सोनेरी रंगावर तळून थंड करून घ्या.

एका पॅनमध्ये साखर घेऊन त्यात तेवढंच पाणी घालून गरम करा. एकदम घट्ट पाक बनवा. त्यात एक एक पुरी बुडवून बाहेर काढा. ताटात पसरून ठेवा. हे काम खूप भरभर करावं लागतं. गार झाल्यावर पुऱ्यांवर साखरेचं पांढरं कोटिंग दिसायला लागेल. गार झाल्यावर डब्यात भरा.

टीप : या पुऱ्या कोणत्याही आकारात तयार करता येतात.

मगस

साहित्य :

हरभरा डाळीचं जाडसर दळलेलं पीठ ३०० ग्रॅम

तूप १५० ग्रॅम

दूध आवश्यकतेनुसार

पिठीसाखर ३५० ग्रॅम

बदाम, चारोळ्या, वेलची वापडर

कृती :

एका बाउलमध्ये हरभरा डाळीचं पीठ घेऊन त्यात थोडं तूप आणि जवळपास अर्धी वाटी दूध घालून नीट मिसळून घ्या आणि अध्र्या तासासाठी तसंच ठेवून द्या. अध्र्या तासानंतर हे मिश्रण गहू चाळायच्या चाळणीने चाळून घ्या आणि बाजूला ठेवून द्या.

एका पॅनमध्ये हे पीठ घालून ते रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्या. ते गुलाबी रंगावर जाईल. आता त्यात तूप घालून पुन्हा चांगलं भाजून घ्या. थंड होऊ द्या. पूर्ण गार झाल्यानंतर त्यात पिठीसाखर घालून चांगलं मिसळून घ्या. ताटाला तूप लावून त्यात पसरा. त्याच्यावर वेलची पावडर, बदामाचे काप आणि चारोळ्या घालून गार्निशिंग करा. थोडा वेळ तसंच ठेवून द्या. नंतर त्याचे काप करून घ्या.

टीप : काप करायचे नसतील तर तुम्ही त्याचे लाडूही करू शकता.

डाकीर का गोटा

साहित्य :

दोन कप बेसन

एक कप रवा

अर्धा कप दूध

पाऊण कप तीळ

अर्धा कप मेथीची पाने किंवा कसुरी मेथी

एक कप पाणी

अर्धा कप साखर

दोन-तीन चिमूट हिंग

दोन- तीन चिमूट सोडा

दीड टेबलस्पून लाल तिखट

एक टीस्पून धने-जिरे पावडर

एक टीस्पून हळद

दीड टीस्पून तीळ

एक टीस्पून धणे

एक टीस्पून बडीशेप

एक टीस्पून सुंठ पावडर

दीड टीस्पून मीठ

दीड टीस्पून सायट्रिक अ‍ॅसिड

एक टीस्पून गरम मसाला.

कृती :

बाउलमध्ये बेसन आणि रवा त्यात सगळे सुके मसाले (सोडा वगळून) आणि तेल घालून एकत्र करून घ्या. जरुरीनुसार दूध आणि पाणी घाला. सोडा आणि दोन-तीन चमचे गरम तेल घालून सगळं एकत्र करून भजीसाठी असतं तसं पीठ तयार करून घ्या. गरम तेलात मध्यम आचेवर भजीसारखंच सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. दह्य़ात मीठ आणि लाल तिखट घालून त्याच्याबरोबर खा.

टीप : सायट्रिक अ‍ॅसिड घालायचं नसेल तर तुम्ही यात दही घालू शकता.

घुगरा

साहित्य :

एक कप मैदा

चार टेबलस्पून तूप

तीन टेबलस्पून रवा

चार टेबलस्पून पिठीसाखर

अर्धा टीस्पून वेलची पावडर

दोन टेबलस्पून खसखस

किसलेलं सुकं खोबरं

पाच-सहा बदामाचे काप

पाच-सहा पिस्त्याचे काप

थोडं दूध.

कृती :

एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात रवा घालून तो चांगला भाजून घ्या. त्यात सुकं खोबरं घालून पुन्हा भाजून घ्या. पॅन खाली उतरवून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळा. त्यानंतर वेलची पावडर, पिस्त्याचे काप, बदामाचे काप घाला.

आता एका बाउलमध्ये मैदा घाला. त्यात तूप आणि पाणी घालून पीठ मळून घ्या. छोटी पुरी लाटून त्यात वर सांगितल्याप्रमाणे तयार केलेलं सारण एक चमचा घाला. कडांना दुधाचा हात लावून करंजीप्रमाणे कडा दुमडून बंद करून घ्या. तूप गरम करून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
रूपल शाह – response.lokprabha@expressindia.com