26 February 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : परंपरेला मॉडर्न साज…

ती पारंपरिक पद्धतीने नेसा किंवा तिला मॉडर्न लूक द्या, साडी का जवाब नहीं...

रोजच्या धावपळीच्या जगण्यातून साडी हा पेहराव हद्दपार झाला असला तरी आजच्या तरुणींना सण समारंभांना साडी हवीच असते. ती पारंपरिक पद्धतीने नेसा किंवा तिला मॉडर्न लूक द्या, साडी का जवाब नहीं..

‘साडी’ हा भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. कपाटात कितीही वेगवेगळ्या पद्धतीचे, स्टाइलचे कपडे असोत, साडीसाठी एखादा कप्पा ठेवलेला असतोच. मग कधी आजीची आठवण म्हणून तिची साडी त्यात असते, तर कधी आईकडून हट्टाने घेतलेली तिची साडी. कधी मैत्रिणीच्या लग्नासाठी नव्या स्टाइलची साडी त्यात असते किंवा ताईच्या लग्नात नेसलेली खास नऊवारी. तिचे प्रकार वेगवेगळे असतील, पण साडीची जागा कायम असते. बरं, मजा म्हणजे प्रत्येक पिढीने मागच्या पिढीतील साडीचं पहिलं स्वरूप पाहून नाकं मुरडलेली असतात, त्यामुळे काळानुरूप या साडीने स्वत:मध्ये अनेक बदल करवून घेतले. अगदी मातीच्या गोळ्याप्रमाणे ज्या साच्यात टाकलं त्याचा आकार तिने घेतला. पण आपली जागा काही सोडली नाही. त्यातही ‘आता साडीचे दिवस गेले,’ ‘हल्ली मुली त्यांच्या लग्नातही साडी नेसत नाहीत,’ अशी ओरड होते, पण ती तात्पुरती. साडीला परिवर्तनाची चाहूल देत ती एका वेगळ्या रूपात लोकांसमोर येते आणि पुन्हा सगळ्यांची लाडकी होते. साडीच्या या परिवर्तनाला आजचा काळही चुकलेला नाही. हल्लीच्या सहा-सहा महिन्यांत बदलणाऱ्या ट्रेंड्सच्या भाऊगर्दीत साडीही या शर्यतीत उतरलेली आहे आणि प्रत्येक वेळी नव्या पद्धतीत सगळ्यांसमोर येते.

नवीन सीझन, नवीन ट्रेण्ड म्हणजे साडीचं नवं रूप, असा विचार जर केला तर साडीतील सध्याचे ट्रेण्ड्स पाहून थक्क व्हायला होईल. जेव्हा एका फॅशन वीकमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा सांगते की, ‘मी शंभर वर्ष जुन्या असलेल्या चार साडय़ा रिस्टोर केल्यात आणि त्या आवर्जून वापरते,’ तेव्हा तरुणांना, या पिढीला कुठेतरी जुन्या, पारंपरिक ठेवणीतील साडय़ा हव्याहव्याशा वाटत आहेत याची खात्री पटते. तर दुसरीकडे अभिनेत्री आदिती राव हैदरीने रॅम्पवर घातलेली लेगिंग साडीसुद्धा इंस्टाग्रामवर लाईक केली जाते, म्हणजेच त्यांना हे नवं स्वरूपही खुणावतंय. त्यामुळे पारंपरिक आणि फ्युजन असे दोन्ही साडय़ांचे प्रकार सध्या हातात हात घालून आनंदाने नांदताहेत.

पारंपरिकतेला नवा साज

पारंपरिक साडय़ा म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर पहिल्यांदा पैठणी येते. पण याही पलीकडे जाऊन वेगवेगळ्या प्रांतातील आतापर्यंत माहीत नसलेले किंवा काळाच्या ओघात मागे पडलेले साडीचे प्रकार पुन्हा चर्चेत येऊ  लागले आहेत. ‘भारतातील पारंपरिक साडय़ांचे वैशिष्टय़ म्हणजे त्या कधीच केवळ एक कपडय़ाचा प्रकार म्हणून राहात नाहीत, तर त्या त्यांच्यासोबत त्या प्रांताची संस्कृती, कारागिराची मेहनत, त्याची कला सोबत घेऊन येतात. त्यामुळे प्रत्येक साडी एक वेगळीच गोष्ट सांगत असते’, असं तुलसी सिल्कचे संतोष पारेख आवर्जून सांगतात. सध्या या पारंपरिक साडय़ांचे आकर्षण तरुणाईला आहे. त्यामुळे एरवी लग्नासाठी लेस, नेटच्या फँसी साडय़ा घेणारे आता आवर्जून कांजीवरम, बनारसी सिल्क साडय़ांकडे वळू लागले आहेत. या बदलाचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पारंपरिक साडय़ा प्रामुख्याने सिल्क, कॉटन यासारख्या नैसर्गिक कापडाच्या असतात. हे कापड आपल्याकडील वातावरणाला सोयीचे आहे. एरवी फॅन्सी साडी दिसायला कितीही आकर्षक दिसली, तरी काही वेळाने घामाने रॅश येणे, स्कीन लाल पडणे, खाज सुटणे हे प्रकार घडतात. त्यावरील एम्ब्रॉयडरी बोचू लागते. त्याऐवजी ब्राईट रंगाची, बोल्ड प्रिंट्सचे विणकाम असलेली सिल्क साडी आरामदायी आणि सोयीची वाटते. बनारसी सिल्कशिवाय पटोला साडी, कांथा साडी, कोसा सिल्क, घिचा सिल्क, मलबारी सिल्क, महेश्वरी कॉटन साडय़ासुद्धा सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

खादी, हँडलूमच्या साडय़ासुद्धा सध्या तरुणाईमध्ये पसंत केल्या जातात. एरवी साडी म्हटल्यावर भावणाऱ्या ब्राईट रंगांना फाटा देत खादी साडय़ांचा रस्टिक, डल लुकसुद्धा आवर्जून घेतला जातो. खादी आणि हँडलूम साडय़ांच्या कलेक्शनसाठी ओळखली जाणारी डिझायनर अनाविला मिश्रा या बदलासाठी खादीतील सुटसुटीतपणा जबाबदार असल्याचे आवर्जून सांगते. यंदाच्या कलेक्शनमध्ये तिने खादीच्या साडय़ांना पन्नाशीच्या दशकातील प्लेफुल लुक देत साडय़ांमधील फ्रेशनेस जपण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी तिने फ्लोरल डिझाइन्स आणि सफेद रंगाचा आवर्जून वापर केला.

नवलाई रंग आणि मोटीफची

सण आणि काळा रंग यांचं समीकरण सहसा जुळत नाही. त्यातही काळ्या रंगाची साडी म्हणजे निषिद्धच. पण सध्या काळ्या रंगाची नवलाई साडय़ांवरही चढली आहे. त्यामुळे तरुणाई आवर्जून काळ्या साडय़ांची मागणी करताना दिसतात. याशिवाय मरून, नेव्ही, मेहंदी, डस्टी गोल्ड, सिल्व्हर, रस्टिक पिवळा, मस्टड यल्लो, डल नारंगी हे रंग यंदा साडय़ांमध्ये ट्रेण्डमध्ये असतील. हिवाळा म्हटला की डार्क शेड्स ट्रेण्डमध्ये येणं सहाजिक आहे, हे सांगताना डिझायनर स्वाती विजयवार्गीने तिच्या वापरलेल्या काळ्या रंगाचा वापराचे उद्दिष्ट स्पष्ट केले. राजस्थानमधील पारंपरिक पिचाई वर्कमधील रासलीला प्रिंट्सचा वापर करत तिने कलेक्शन सादर केले होते. तिच्या साडय़ांमध्ये मुख्य रंग काळा ठेवून त्याला लाल रंगाच्या ब्लाउजची जोड देत उठाव देण्याचा प्रयत्न केला होता. पारंपरिक साडय़ांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘तुलसी सिल्क’ ब्रॅण्डने यंदा पहिल्यांदाच फॅशन वीकमध्ये आपले साडय़ांचे कलेक्शन सादर केले होते, त्यामध्ये त्यांनी काळ्या आणि चंदेरी रंगाची सांगड घालत तयार केलेल्या बनारसी साडय़ा सादर केल्या. त्यांच्या कलेक्शनची अजून एक खासियत म्हणजे त्यांनी पारंपरिक संगीत आणि वाद्यांपासून प्रेरणा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या साडय़ांवर ढोलकी, वीणा, तबला अशा वाद्यांचे मोटीफ होते.

एरवी साडय़ांमध्ये प्रामुख्याने फ्लोरल, भौमितिक मोटीफ असतात. पुराणातील कथा, संदर्भही साडय़ांवर रेखाटले जातात. पण यंदा तरुणाईला आकर्षित करण्यासाठी डिझायनर्सनी काही हटके मोटीफसुद्धा साडीमध्ये वापरलेले पहायला मिळतात. डिझायनर िरकू सोबतीने फळांमधील ब्राइट रंग, गमतीशीर आकार यांपासून प्रेरणा घेत साडय़ांवर स्ट्रॉबेरी, द्राक्ष, अननस अशा फळांचे मोटीफ विणलेले होते. अ‍ॅबस्ट्रॅक डिझाइन्स, ट्रायबल आर्टचा वापरही साडय़ांमध्ये केलेला पाहायला मिळतो. स्ट्राइप्स आणि चेक्स हे कधीही ट्रेण्डमधून बाहेर जात नाहीत. यंदा साडय़ांमध्येही स्ट्राइप आणि चेक्सचा बऱ्याच प्रमाणात वापर केला गेला.

ओल्ड वर्ल्ड चार्म

पारंपरिक साडय़ांच्या ट्रेण्डमध्ये लेस, नेट, शिफॉनच्या साडय़ा मागे पडल्यात, असं अजिबात नाही आहे. मध्यंतरीच्या काळात सत्तरी, पन्नाशीच्या दशकातील फॅशन ट्रेण्ड पुन्हा येऊ  पाहत होते. शिफॉनच्या साडय़ांनी हा काळ गाजवला होता. तोच ओल्ड वल्ड चार्म पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न डिझायनर्सनी यंदा केला आहे. आकाशी, बेबी पिंक, पोपटी, लेमन यल्लो या रंगांच्या डल शेड्स या साडय़ांमध्ये प्रामुख्याने आहेत. सोबत सेल्फ रंगाची थ्रेड किंवा जरदोसी एम्ब्रोयडरी याने त्या काळातला नेमका मूड डिझायनर्सनी पकडला आहे. मध्यंतरीच्या काळात लग्नामध्येही भरगच्च एम्ब्रोयडरी असलेली साडी किंवा लेहंगा घालण्याऐवजी सुटसुटीत साडी नेसण्याकडे तरुणींनी प्राधान्य दिले होते. ही बाब लक्षात घेत यंदा डिझायनर्सनी साडय़ांवरील एम्ब्रोयडरी शक्य तितकी हलकी आणि सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विविध थ्रेड एम्ब्रोयडरी, छोटे मोटीफ यांचा वापर यात केला आहे. साडय़ांचे बॉर्डरसुद्धा कॉन्ट्रास मॅचऐवजी सेल्फ कलरच्या केल्या आहेत.

पदारातील नावीन्य

साडीच्या पसंतीची पावती मिळते ती तिचा पदर पाहिल्यावर. त्यामुळे प्रत्येक साडीमध्ये पदर फोकसमध्ये असणं सहाजिकच आहे. यंदा डिझायनर्सनी साडय़ांच्या पदरासोबत विविध प्रयोग केले. त्यातील मुख्य प्रयोग म्हणजे लांब पदर. नेहमीप्रमाणे जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या पदराची लांबी काही इंचाने वाढवत साडीला पायघोळ पदर यावेळी देण्यात आले. याशिवाय फक्त जमिनीवर लोळवत ठेवण्याऐवजी स्कार्फप्रमाणे गळ्याभोवती गुंडाळत, उलटा पदर घेऊन साडीला ड्रेपिंगने ट्विस्ट देण्याचाही प्रयत्न केला जातोय. मध्यंतरी सोनम कपूरने आकाशी रंगाची साडी नेसली होती. त्या साडीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला दोन पदर होते. साडीच्या पदरासोबत त्याच रंगाचा किंवा कॉन्ट्रास दुपट्टा मागच्या बाजूने दुसऱ्या खांद्यावर घ्यायचा. दुपट्टय़ाचे मागचे टोक खाली लोळवण्यापेक्षा निऱ्यांच्या बाजूने त्याला खोचायचे. साडी ड्रेपिंगचा हा प्रकार तरुणींमध्ये सध्या बराच लोकप्रिय आहे. पदराला फोकसमध्ये आणण्यासाठी त्यावरील कारागिरी पण महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे कॉन्ट्रास प्रिंट, बोल्ड प्रिंट्सचा वापर करून पदराला फोकसमध्ये आणले आहे. याशिवाय पदर सुटा सोडण्याऐवजी चापूनचोपून पिनअप करण्याचा ट्रेण्ड सध्या इन आहे. हाफ फोल्ड मारलेला पदराचा मेस्सी लुकसुद्धा ट्राय करता येईल.

साडीचा पदर आणि एकूणच ड्रेपिंग अजून आकर्षक कसं होऊ  शकतं यावरही हल्ली तरुणी वेगवेगळे प्रयोग करताहेत. भारतात प्रत्येक प्रांतात साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसली जाते. या पारंपरिक पद्धतींना एक नवा ट्विस्ट सध्या दिला जातोय. उजव्या खांद्यावरून समोर येणाऱ्या गुजराती साडीच्या पदराला उलटा पदर म्हणतात. पण हाच उलटा पदर उजव्याऐवजी डाव्या खांद्यावर घेणे, पदर खांद्यावर घेऊन उजव्या खांद्यावर पदरचे एक टोक पिनेने लावणे असे अनेक प्रकार यात केले जातात. अशा वेळी युटय़ूबवरील ब्लॉगरसुद्धा त्यांच्या मदतीस येतात. युटय़ूबवर नव्या पद्धतीच्या साडी ड्रेपिंगचे असंख्य व्हिडीओज सध्या पाहायला मिळतात आणि हे प्रयोग एरवीही तरुणी आवर्जून करतात.

साडीचा पदरही हल्ली सजविला जातो. त्यासाठी पदराला लटकन, झालर लावली जाते. पदरासोबत एखादी मोत्याची लांब माळ किंवा चेन ज्वेलरी घेऊन पदर फोकसमध्ये आणता येतो. कधीतरी पदर अर्धा ठेऊन त्याला लांब झालर लावली जाते. अशा वेळी पदरावरील मोठाली बॉर्डर ही संकल्पना साहजिकच मागे पडते.

ब्लाऊजची विविधता

साडीचा ब्लाऊज हा आता केवळ गरजेचा भाग राहिलेला नाही. साडीइतकेच ब्लाऊजच्या ट्रेण्डमध्येही सतत बदल होत असतात. सध्या स्टेटमेंट ब्लाऊजचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे सिंपल साडीवर मस्त एम्ब्रॉयडरी केलेला, कॉन्ट्रास मॅचचा ब्लाऊज घालण्याकडे तरुणींचा कल आहे. त्यातही बारीक पदर घेऊन किंवा पदर थोडा कोपऱ्यात पिनअप करून ब्लाऊज फोकसमध्ये आणला जातो. टय़ूब ब्लाऊज, स्ट्रीपलेस ब्लाऊज सध्या ट्रेण्डमध्ये आहे. पन्नाशीच्या दशकाचा लुक लक्षात घेत पफ स्लीव्ह, थ्री-फोर्थ स्लीव्ह, फुल स्लीव्ह ब्लाऊज पाहायला मिळतात. कॉलर नेक आणि बॅकलेस ब्लाऊजसुद्धा वापरता येतील. बॅकलेस ब्लाऊजसोबत सध्या वेगवेगळ्या स्टाइलचे लटकनचे प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळत आहेत. याशिवाय ब्लाऊजला पर्याय म्हणून मल्टी कलर क्रॉप टॉपसुद्धा वापरता येतो. बहुतेकदा एकच साडी मुख्य साडी, साडी घागरा आणि लेहंगा चोळी म्हणून वापरली जाते. अशा वेळी क्रॉप टॉप किंवा चोळी ब्लाऊज म्हणून वापरता येते. लांब एम्ब्रॉयडर शर्ट किंवा जॅकेटसुद्धा ब्लाऊज म्हणून वापरता येतो.

कन्सेप्ट साडी

गेल्या काही वर्षांपासून साडीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. पाचवारी, नऊवारी म्हणून साडी नेसण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने एखाद्या ड्रेसप्रमाणे साडी घालता येऊ  शकते का, याचे प्रयोग डिझायनर्स करत आहेत. त्यातून साडी गाऊन, साडी लेहेंगा, स्टिच्ड साडी असे अनेक प्रकार समोर आले. यावर्षीही साडीमध्ये असे प्रयोग करण्यात आले आहेत. साडी लेहंगा हा वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येतो, त्यामुळे एखाद्-दोन कार्यक्रमांना वापरून तो कपाटात पडून राहात नाही. म्हणूनच यंदाही साडी लेहंगाला मागणी आहे. सध्या बऱ्याच लेहंगाच्या आत कॅनकॅनचा जादाचा स्कर्ट असतो, त्यामुळे लेहंगा फुलतो. साडी लेहंगामध्येही हा प्रकार आवर्जून केला जातो. साडीची लांबी ही पायघोळ असते, त्यामुळे कित्येकदा प्रवासात अडचण होते. अशा वेळी साडीची लांबी थोडी कमी असेल तर? असा विचार करून यंदा अँकल लेन्थ साडय़ाही बाजारात आल्या. खादीच्या या साडय़ांवर अगदी स्नीकर्स घालूनही वेगळा लुक मिळतो. हे सगळं बाजूला करून तुमच्या लेगिंग किंवा जीन्सवर साडी नेसता आली तर? साडीतील सुटसुटीतपणा हा मुद्दा फोकसमध्ये ठेवत लेगिंग साडी ही संकल्पनाही बाजारात आली आहे. यात तुम्हाला परकर किंवा स्कर्ट घालायची गरज नसते. साडी थेट लेगिंगमध्ये खोचायची. बऱ्याचदा ही साडी स्टीच्ड असते, त्यामुळे सुटण्याची चिंता नसते. यातील धोती साडीचा ट्रेण्ड सध्या चलतीत आहे.

साडीच्या निऱ्या ही तशी महत्त्वाची बाब. निऱ्या व्यवस्थित असल्या म्हणजे साडी नीट नेसली असे मानतात. त्यामुळे यंदा डिझायनर्सनीसुद्धा या निऱ्यांवर विशेष लक्ष दिले आहे. साडी गाऊन किंवा साडी ड्रेसमध्ये या निऱ्या फोकसमध्ये येतील अशा प्रकारे ड्रेस शिवले जातात. त्याचबरोबर पदराचं ड्रेपिंगसुद्धा या ड्रेसेसमध्ये आवर्जून कायम ठेवलं जातं.

लेअरिंगची स्टाइल कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही. साडीच्या बाबतीत लेअरिंगनेही प्रवेश घेतला आहे. दिवाळी म्हणजे हिवाळ्याचा मौसम. एरवी थंडीच्या दिवसात पार्टी किंवा लग्नात साडी नेसून जायचं म्हणजे थोडय़ा वेळाने कुडकुडायला सुरुवात होते. मग एखादी शाल, स्वेटर साडीवर घेतला जातो. साहजिकच ते साडीला मॅच होत नाही आणि साडीचा लुक जातो. त्यामुळे साडीवर घेता येतील असे केप, जॅकेटचे प्रकारही हल्ली पाहायला मिळतात. साडीवर सिंपल ब्लाऊज घालून त्यावर एखादं कॉन्ट्रास जॅकेट, श्रग किंवा केप घालता येतो. सध्या साडीवर घेण्याजोगे ओव्हरसाइज कोटसुद्धा पाहायला मिळतात. पण कन्सेप्ट साडी ट्राय करण्यासाठी थोडंसं धाडस करण्याची आणि वेगळा विचार करण्याची गरज आहे. तरच हा लुक व्यवस्थित कॅरी करता येतो.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:04 am

Web Title: food recipe diwali 2016 saree fashion
Next Stories
1 उत्सव : दीपोत्सव – आनंदोत्सव!
2 सोन्याला प्रतीक्षा उठावाची!
3 दागिने देवांचे
Just Now!
X