26 February 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : चवीने जगा… चवीला जपा…

आपल्या जिभेच्या टोकावर असलेली संवेदनशीलता म्हणजे चव.

आपल्या जिभेच्या टोकावर असलेली संवेदनशीलता म्हणजे चव. या चवीसाठीच माणसाच्या जगण्याचे सगळे महाभारत रचण्याइतके तिला महत्त्व आहे.

काही दिवसांपूर्वी एका वयोवृद्ध इसमाबरोबर डॉक्टरकडे जाण्याचा योग जुळून आला. वयोवृद्ध म्हणजे त्यांचे वय पंचाऐंशीच्या वर होते. व्हीलचेअरशिवाय पाऊल टाकणे अशक्य होते. ऐकू येत नसे, डोळे विझूविझू करायचे, त्यांच्या बोलण्यातही सुसूत्रता नव्हती. एकूण काय परतीच्या वाटेवरचे पांथस्थ होते. त्यांच्या नियमित चाचण्यांसाठी हॉस्पिटलात आणलेले. डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसले. वयोवृद्ध काकाजींना त्यांनी अखेरचा प्रश्न विचारला, ‘चवी कळतात काय तुम्हाला?’ वयोवृद्धाने कळत असल्याचे सांगताच, डॉक्टरांनी समाधानाचा सुस्कारा काढला. हातातील स्टेथोस्कोप खेळवीत म्हणाले, काकांची तब्येत ठणठणीत आहे. त्यांना सर्व प्रकारच्या चवी कळतात, चविष्ट खाण्याची अभिलाषा त्यांचेत कायम आहे, हेच तर त्यांचे उत्कृष्टतेचे लक्षण होय. डॉक्टर एवढेच नाही म्हणाले, चव केवळ खाण्यापुरतीच मर्यादित असते, असे नव्हे तर, अशा व्यक्ती चवीनं जगतही असतात!

त्या वृद्ध इसमाला चालता येत नव्हते, कानांनी ऐकू यायचे नाही तरी त्यांची टापटिपेची राहणी मात्र लक्षात यायची.

चवीने जगणारा माणूस, ठणठणीत आयुष्याचीच हमी असते, हा नवीनच सिद्धांत डॉक्टरांच्या बोलण्यातून कळला. चवीचा आणि जगण्याचा एवढा निकटचा संबंध असावा, हे नव्यानेच कळले होते. म्हणजे चवीचा संबंध केवळ जिभेपुरता मर्यादितच असतो असे नव्हे!

उत्कृष्ट शेफ, सुगरण आजी किंवा मागील पिढीचा आचारी या सर्वाच्या स्वयंपाकाला वेळोवेळी गहरी दाद मिळायची. ते सहजगत्या स्वयंपाक करीत, मसाले भातात ते सहजपणे मसाले टाकीत, मीठ भिरकावीत, तडतडणाऱ्या फोडणीत बिनदिक्कतपणे तिखटमीठ घालीत असले, तरी त्यांनी केलेली भाजी कधी खारट किंवा तिखटजाळ झाल्याचे घडले नसायचे. त्यांचा सुग्रास स्वयंपाक जिभेवर कळत नकळत विरघळून जायचा. त्यांच्या हाताला चव असल्याची दाद घेऊन जायचा.

चवीने खाणारा, चवीने जगणारा, चव नसणारा, चव हरविलेला वगरे बोलण्याच्या ओघात चव शब्द अनेकदा येतोच. ढोबळमानाने चवीने खाणारा माणूस, खादाड म्हणून ओळखला जातो किंवा तशी त्याची संभावना केली जाते. त्यामुळे त्या चविष्ट व्यक्तीचा आपणाकडून किती घोर अपमान केला जातो आहे, ही बाब लक्षातही येत नाही.

हल्लीची घराघरातील किचन्स शोभेपुरतीच असल्याचे लक्षात येईल. कारण या नव्या किचन्समधे चवीचा दरवळ निर्माण करणारे पदार्थ अभावानेच तयार होतात. ब्रेडबटर किंवा मॅगीच्या कुरळ्या शेवयाच नव्या किचनमधे बहुधा तयार होतात. कधीकाळी कांदेपोहे वगरे. अन्यथा ठिकठिकाणी निघालेल्या हॉटेल्समधून रेडीमेड जेवण मागविणे सोयीचे झालेले आहे.

नाहीतरी सर्व हॉटेलवाल्यांची होम डीलिव्हरी सíव्हस असतेच. घरी बनवण्याचा आटापिटा करण्यापेक्षा तयार रेडीमेड जेवणाकडे ओढा अधिकच असतो. आता चवीचे चोचले हॉटेल्सवाले अधिकच जपतात. फूड चॅनेल्समधून दाखविले जातेच की, ‘हमारे यहॉं के मटनमुर्गा में सोलह प्रकारके मसाले डाले जाते है, इसी कारण यहॉं का जायका अलग किस्म का हैं.’ हॉटेलमालक चॅनेल्सवाल्यांना छाती फुगवून सांगत असतो. आणि टेबलाटेबलावरील हादडणारी गिऱ्हाईक मंडळी हसून दाद देत असतात.

६०-७० वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. दारात पाऊल टाकताच तेव्हाच्या किचनमधे काय शिजते आहे याचा सुगावा लागे. भजी तळल्या जाताहेत की, तव्यावर थालिपिठाचा चुरचुरीत गंध नाकाभोवती रुंजी घालायचा. बाहेरून येणारा थकला भागलेला जीव त्या किचनगंधाने हरखून जायचा. ते दिवस आता इतिहासजमा झालेत. तेव्हाचे लग्नसमारंभातील दिवस तरी कसे गंधयुक्त होते. लग्नविधी आटोपलेले असायचे. पोराबाळांचा हुडदंग मांडवभर सुरू असायचा. मांडवातील बिछायतीवर गटागटाने वऱ्हाडी मंडळी पेंगुळलेली असायची. मांडवाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात आडोसा उभारलेला असे. त्यामागे आचाऱ्यांची टोळी स्वयंपाक सिद्धीला लागलेली असे. तेथून येणारा तोंडली भाताचा, केशरयुक्त जिलबीचा सुवास मांडवभर भूक चेतवीत असायचा. तेही दिवस काळाच्या उदरात गडप झालेत. बफेट पद्धती आली. चवीचे सुवास हरवून गेलेत. टेबलावर मांडलेले जेवणपदार्थ बहुशा: गंधहीनच असतात. चवीची फारकत झालेली असते. तुझ्या हाताला चव आहे, असे म्हणण्यासाठी चवदार जेवणच दुर्मीळ झालंय.

धकाधकीच्या चक्रव्यूहात आपण सारेच कळतनकळत खेचले गेलोत. तुमची इच्छा असो किंवा नसो, त्या चक्रव्यूहात, चरकात उस खेचला जातो त्याप्रमाणे जगण्याच्या चरकात खेचले जातो. दिवसभराच्या धकाधकीत चवीचे भानच विसरतो आहोत. लंच, डिनर वगरे शब्द बापुडवाणे, केविलवाणे झालेत. लंचची वेळ झाली म्हणून टिफिन उघडायचा आणि भराभरा गिळायचा. पत्नीने, आईने करून दिलेली भाजी, तळलेला बांगडा गिळायचा बस्स. जेवण करून उठणाऱ्याला विचारा बरं-  ‘कसली भाजी जेवलास रे! ’ तो सांगणारच नाही, अवघडेल. जरा वेळापूर्वी खाल्लेली भाजीसुद्धा त्याला आठवायची नाही. जगण्याच्या गर्दीत इतका तो वेडापिसा झालेला आहे की, चवीचा सुगंध, चवीचा रेंगाळणारा लडिवाळपणा, चवीचा उन्माद सारे सारे माणूस विसरतो आहे. रानावनातला चवीचा गंध श्वापदाला शिकारीकडे खेचून आणतो. जगण्याचे साहस, सामथ्र्य देतो श्वापदाला. इथे मात्र, माणूस नावाचा प्राणी चवीलाच पारखा होतो आहे. चवीचे बळ हरवतो आहे. चवदार जगण्यालाच तिलांजली देतो आहे. मग जगण्यातील चव हरपते. जगणं लोढणं झालेले असते. नीरसता वेढून असते. त्या मसालेवाल्यांची स्लोगन किती समर्पक आहे, ‘चवीने खाणार त्याला केप्र देणार.’  चव चघळणाऱ्यांना निसर्ग अनंत हस्ताने देत असतो. चवीचा खरा स्वाद जिभेवर कळतो, मान्य. परंतु ते अर्धसत्यच होय. जेवणाचे ताट चौफेर सजलेले असते. अखेरीस प्रत्येकाच्या पानात तुपाची धार ओघळते. वदनी कवळताचा सूर टिपेला जातो आणि पंगतीचे हात ताटातील पदार्थाला स्पर्श करतात, अगदी त्याचक्षणी शरीराच्या रंध्रारंध्रात चवीच्या लाटा चौफेर उसळी मारीत असतात. संपूर्ण शरीर पुरणाच्या पोळीची, तर श्रीखंडाची, भरलेल्या वांग्याच्या भाजीची तर रसरशीत पाटोडीची चव केवळ हस्तस्पर्शाने अनुभवत असतो. स्वयंपाक करणारा आचारी दिवसरात्र चवगंधानेच इतका तृप्त झालेला असतो की, घासभर जेवणही त्याला जात नाही.

आजारी माणसाच्या जिभेची चवच हरवली असते. त्याला प्रत्येक पदार्थ कडू असल्याचे जाणवते. ते कडूपण संपूर्ण शरीरात घोळले जाते आणि मग त्या रुग्णाला सर्वत्र कडुपणाच सामावल्याचे भासमान होते. खरे तर निसर्गाने दिलेला तो इशारा असतो. जगण्यातील चव जपण्याचा सांगावा असतो.
युधिष्ठिर जोशी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:11 am

Web Title: food recipe diwali 2016 tasty food
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : भेटवस्तूंच्या विश्वात!
2 रुचकर – शॉपिंग विशेष : वाहनसौख्य…
3 रुचकर – शॉपिंग विशेष : नवा नवा मोबाइल हवा…
Just Now!
X