26 February 2021

News Flash

रुचकर – शॉपिंग विशेष : झटपट बेसन वडी

वरील सर्व साहित्य जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवावे व सारखे ढवळत राहावे.

झटपट बेसन वडी

साहित्य :

साखर १ वाटी

बेसन १ वाटी

तूप १ वाटी

दूध १ वाटी

वेलची

ड्रायफ्रुट.

कृती :

वरील सर्व साहित्य जाड बुडाच्या पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवावे व सारखे ढवळत राहावे. तूप सुटून गोळा झाला की वेलची पावडर घालावी व ढवळून तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये जाडसर थापावे. वर ड्रायफ्रुट घालावे. गार झाल्यावर वडय़ा पाडाव्या.

नारळाची गोड कचोरी

साहित्य :

बटाटे अर्धा किलो

ओलं खोबरं १०० मिलीच्या ३ वाटय़ा

अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट

पावकिलो साबुदाणा पीठ

२-३ लहान चमचे मैदा

२-३ चमचे खसखस भाजून

वाटलेली हिरवी मिर्ची

साखर

मीठ

आमचूर पावडर

तळण्यासाठी तेल किंवा तूप.

पारीची कृती : बटाटे उकडून किसून घ्यावे. त्यात मीठ व साबुदाणा पीठ घालून एकजीव करून गोळा करावा. साबुदाणा पीठ लागेल त्याप्रमाणे साबुदाणा पीठ घालावे. पारी वळता येईल इतपत घट्ट असावे.

सारण कृती : ओलं खोबरे, खसखस न कुटता, शेंगदाणा कूट, साखर, मीठ, मिर्ची, आमचूर चव बघून घालावे. सारण गोड झाले पाहिजे. हे सर्व साहित्य हाताने नीट मिसळून घ्यावे.

कृती :

वरील तयार केलेल्या पिठाची हातावर खोलगट पारी करून त्यात चमचाभर सारण घालावे व मोदकाप्रमाणे बंद करावे व थोडा चपटा आकार द्यावा. अशा सर्व कचोऱ्या तयार करून घ्याव्या. मैद्यामध्ये जरा जास्त पाणी घालून गुठळी न होता पातळ भिजवावा व त्यात एकेक कचोरी बुडवून कढईतील गरम तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून कागदावर काढाव्या. जमल्यास झाऱ्याने न हलवता हाताने कढई गोल फिरवावी म्हणजे जास्त चांगल्या तळल्या जातात. साबुदाणा पीठ व मैद्याऐवजी आरोराट वापरला तरी चालेल म्हणजे उपवासासाठी चालतील. बरोबर चिंचेची गोड चटणी घ्यावी.

गोड आप्पे

साहित्य :

बारीक रवा २ वाटय़ा

नारळाचे दूध साडेतीन वाटय़ा

२ सपाट वाटय़ा साखर

चवीला मीठ

खायचा सोडा अर्धा टी स्पून

तूप.

कृती :

सोडा वगळता सर्व साहित्य अर्धा ते पाऊणतास भिजवून ठेवावे. आप्पे करते वेळी सोडा घालून हाताने चांगले फेटावे. आप्पेपात्र गॅसवर ठेवून थोडे गरम करावे. प्रत्येक खळग्यांत थोडे तूप घालून खळगा, पाऊण भरावा व वर झाकण ठेवावे. अंदाजे ३ ते ४ मिनिटांनी झाकण काढून आप्पे उलटावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्यावे. पाहिजे असल्यास भिजवलेल्या रव्यांत वेलची पावडर घालावी.

पुडाच्या वडय़ा

साहित्य :

पारीसाठी मैदा २ वाटय़ा

बेसन २ वाटय़ा

तळण्यासाठी व मोहनासाठी तेल

मीठ

लिंबूरस किंवा चिंचकोळ गूळ घालून पारीला लावण्यासाठी.

सारण साहित्य:

सुकं खोबरं चुरून (भाजून) १ वाटी

अर्धी वाटी तिळाचे कूट

खसखस २ चमचे भाजून कुटून

लाल तिखट आवडीप्रमाणे

पाहिजे असल्यास गरम मसाला

साखर आवडीप्रमाणे  ल्ल ४ वाटय़ा चिरलेली कोथिंबीर  ल्ल मीठ.

कृती :

प्रथम दोन्ही पिठें एकत्र करून मीठ व मोहन घालून भिजवून अर्धा तास झाकून ठेवावी. सारणाचे सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळून घ्यावे. पुरीपेक्षा थोडी मोठी पिठाची पारी करून त्याला लिंबूरस किंवा चिंचेचा कोळ लावावा व त्यावर सारण पसरावे घट्ट गुंडाळी करून दोन्ही कडा बंद करून त्याला घराच्या छपरासारखा आकार द्यावा. किंवा चारी बाजू समोरासमोरील दुमडून लांबट चौकोनी आकार द्यावा. चवीला फारच खमंग लागतात.

तिखट आप्पे

साहित्य :

२ वाटय़ा तांदूळ

१ वाटी चणाडाळ

अर्धा वाटी उडीद डाळ

मीठ, वाटलेली हिरवी मिची

चवीला साखर

ओल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे

मिरी पावडर जाडसर

बारीक चिरलेला कांदा.

कृती :

तांदूळ व दोन्ही डाळी ६-७ तास पाण्यांत भिजत घालाव्यात. भिजल्यावर मिक्सवर बारीक वाटावे. सकाळी आप्पे करायचे असल्यास आदल्या दिवशी तांदूळ व डाळी वाटून ठेवाव्या. बाकी सर्व साहित्य आप्पे करण्याअगोदर पिठांत घालून चांगले ढवळून घ्यावे. आप्पेपात्रांत तेल घालून गॅसवर ठेवावे. थोडे गरम झाल्यावर तयार पीठ आप्पेपात्रांत घालून वर झाकण ठेवावे. अंदाजे ३-४ मिनिटांनी झाकण काढून आप्पे उलटावे वाटल्यास परत थोडे तेल सोडावे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्यावे. नारळाच्या चटणीबरोबर खायला द्यावे. पाहिजे असल्यास पिठांत कोथिंबीर घालावी. या पिठाचे जाडसर घावनही चांगले होतात.

मुगाच्या पिठाचा ढोकळा

साहित्य :

मूग पीठ २०० मिलीची वाटी वपर्यंत भरून

वाटीभर पीठ भिजवण्यासाठी पाणी

मीठ   ल्ल २ चमचे साखर

खायचा सोडा अर्धा टी. स्पून, साइट्रिक अ‍ॅसिड सपाट चमचा

कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिर्ची

पाहिजे असल्यास पिवळा रंग (हळद नको)

फोडणीसाठी २ टे. स्पून तेल

२ चमचे साखर पाण्यांत विरघळवून. पाणी गरम केले तरी चालेल.

कृती :

मुगाच्या पिठांत पाणी घालून गुठळी न होता भिजवावे. भिजवताना त्यात सोडा वगळून सर्व साहित्य घालावे. (साइट्रिक अ‍ॅसिड, मीठ, रंग साखर) कुकरमध्ये रिंग किंवा चाळण उपडी घालावी. कुकरमध्ये पुरेसे पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवावे. कुकरच्या आतल्या भांडय़ाला नीट तेल लावून ते कुकरमध्ये गरम करायला ठेवावे. पाण्याला चांगली उकळी आल्यावर भिजवलेल्या पिठांत सोडा  मिसळावा व पीठ चांगले फेटावे. पीठ हलके होऊन फुगून येईल. ताबडतोब कुकरमधील भांडय़ांत ओतावे. भांडे हलवू नये. कुकरवर ताट झाकण ठेवावे. १२-१३ मिनिटांत ढोकळा तयार होतो. जास्त वेळ ठेवल्यास चिकट होतो. कुकरमधील भांडे ताबडतोब बाहेर काढावे. तेलाची फोडणी करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता व मिरच्या घालाव्या. मिरचीचे तुकडे मोठे करावे. फोडणी झाल्यावर त्यात साखरेचे पाणी घालावे व ढोकळ्यावर घालून भांडे गोल फिरवावे म्हणजे सगळीकडे फोडणी पसरेल. नंतर मिरचीचे तुकडे काढून घ्यावे. वर कोथिंबीर घालावी वाटल्यास ओले खोबरे घालावे. चटणीबरोबर खायला द्यावा.
जयश्री काळे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 1:14 am

Web Title: food recipe diwali 2016 zatpat besan vadi
Next Stories
1 रुचकर – शॉपिंग विशेष : जाफरानी पेढा
2 रुचकर – शॉपिंग विशेष : दिवाळीच, पण थोडी वेगळी
3 रुचकर – शॉपिंग विशेष : चवीने जगा… चवीला जपा…
Just Now!
X