पाऊस सुरू झाला की तो एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडणारे रमतात ते सुंदर झरे, धबधबे, हिरवाई या गोष्टींमध्ये. पण या पावसाच्या आगमनाचा निदर्शक समजला जाणारा बेडूक किती देखणा असतो हे तुम्ही कधी जंगलात जाऊन बघितलंय?

एखाद्या जंगलात आपण का आणि कसे भटकतो हे किती महत्त्वाचं असतं? सुंदर झरे-धबधब्यांनी नटलेल्या डोंगरांमध्ये बघता येतील अशा भरमसाट गोष्टी असतात, पण प्रत्येकाची नजर वेगवेगळी असते.  तर, पावसाळ्यातल्या जंगलांमध्ये एक प्राणी असा असतो की ज्याची वाट पावसाएवढय़ाच आतुरतेने काही लोक बघतात. त्यांचं रंगीबेरंगी रूप आणि लयदार आवाज, मोठ्ठाले नक्षीदार डोळे, आणि त्यांची प्रचंड विविधता, काही लोकांना वेड लावते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच माझ्यासारख्या जंगल-भटक्या आत्म्यांना आठवण येते ती घनदाट धुक्यात न्हालेल्या डोंगरांची आणि त्यात सापडणाऱ्या बेडकांची. खरंय हे! मी बेडकांबद्दल बोलतेय. म्हणजे, बऱ्याच लोकांना वाटेल बेडकात काय आहे एवढं बघण्यासारखं? पण आम्हाला मात्र बेडूक खास वाटतात. त्याचं असं आहे, की हे इवलेसे प्राणी, काही बेडकांच्या जातींचा अपवाद वगळल्यास, फक्त पावसाळ्यातच बघायला मिळतात, आणि त्यातले बरेच बेडूक हे पूर्ण जगात फक्त भारतातील मोजक्या ठिकाणी सापडणारे! जगात बेडकांच्या जवळपास पाच हजार जाती आहेत, आपल्या भारतात उभयचर प्राणी म्हणजेच बेडूक व यांसारखे इतर प्राणी यांच्या जातींची संख्या अडीचशेच्या वर आहे. अगदी नेमकी संख्या देता येणार नाही कारण अजूनही बेडकांच्या नवनवीन जाती शोधल्या जात आहेत. कदाचित मी हा लेख लिहित असतानाच अजून एखादा नवीन आणि पूर्ण जगात इतर कुठल्याही देशात न सापडणारा बेडूक कुठल्या तरी दक्षिण भारतातील डोंगरातील झऱ्याच्या जवळ शोधला गेला असेल. तसे शहरांमध्येही बेडूक सापडतात, पण जंगलात मात्र त्यांचे भरपूर प्रकार पाहायला मिळतात. असे हे बेडूक बघण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागा म्हणजे आंबोलीचं जंगल. इथे पावसाचं वास्तव्य एवढं असतं की एकदा दार उघडलं की हॉटेलांच्या खोल्यांमध्ये आणि स्थानिक रहिवाशांच्या घरांमध्येही लगेच पाऊस-धुक्याचा शिरकाव होतो. असं हे घनदाट पावसाचं जंगल.

pune vegetable prices marathi news
पुणे: बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर; पालेभाज्यांच्या दरात घट
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

41-lp-frog

मी पहिल्यांदा आंबोलीला गेले तेव्हा मला बेडकांचं वेड लागलं नव्हतं. पण बेडूक, साप इत्यादी प्राण्यांविषयी जाणून घ्यायची इच्छा होती आणि त्या वर्षी मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने या प्राण्यांमध्ये ज्यांना रस असेल अशांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. मग परत आले ती बेडकांच्या प्रेमात पडूनच. त्यानंतरही बऱ्याचदा जाणं झालं. गाडी आंबोली घाटातून धुक्यात शिरताच कधी एकदा खाली उतरतोय असं वाटायला लागतं. पाठीवर छोटी मोजक्या कपडय़ांची बॅग घेऊन आंबोलीला येऊन धडकायचं. लगोलग कॅमेरा आणि रेनकोट किंवा कॅमेऱ्यासकट शरीर झाकणारा मोठ्ठा पॉन्चो घालून बाहेर पडायचं. बरोबर अशाच काही दोस्तांचा गट. एकदा असं रेनकोटखाली गेल्यानंतर बरोबर कोण आहे हे कळायलाही मार्ग नसतो. पण ते कळण्याची तशी गरजही नसते कारण सगळ्यांच्या नजरा जमिनीलाच खिळलेल्या. मग एखादा बेडूक, साप, पाल असा प्राणी दिसताच इतरांना हाका घालायच्या. मग त्या प्राण्याचं भरपूर कौतुक. असं दिवसभर भटकायचं आणि मग गच्च धुक्यातून चालत परत खोलीवर यायचं. बेडकांवरची पुस्तकं काढायची, न ओळखता आलेल्या बेडकांचे फोटो पडताळून पाहायचे. एकदा वाफाळतं जेवण जेवलं आणि शरीरावर कुठे जळवा राहिल्या आहेत का हे तपासलं, की पुन्हा एकदा भटकंतीला बाहेर पडायचं. पावसात भिजणंही व्हायचंच. साधारण असाच असतो आंबोलीचा प्रोग्राम दर वेळी. सुरुवातीला जाताना ओळखीच्या लोकांनी सांगितलं होतं ‘लीच सॉक्स’ नक्की घेऊन जा. मग समजलं की जळू चावू नये म्हणून काही लोक नेहमीच्या मोज्यांच्यावर अजून एक मोठय़ा आणि लांब कापडी मोज्यांचा थर चढवतात. त्यावर बूट. जळवांना कापडावर चढणे कठीण होते. पण हे मोजे बाजारात काही मिळेनात. मग मित्राचे मोजे मापासाठी घेतले, एक मीटर जाड कापड आणि नाडीचं बंडल घेतलं, आणि हे मोजे शिवून घेतले. खूप उपयोग झाला त्यांचा. पण स्थानिक लोक आणि त्या जंगलाला सरावलेले तज्ज्ञ रबरी चपला घालून फिरतात आणि जळू आल्यास तिला टिचकी मारून उडवतात किंवा जळवा जास्त असल्यास त्यांना रुमालात बांधलेल्या तंबाखू आणि मिठाच्या पुरचुंडीने पळवून लावतात. हे बघितल्यावर आपण उगीच स्वतचे जास्त लाड केले असं वाटायला लागलं.

खरं म्हणजे बऱ्याच पर्यटकांना या जळवा दिसतंच नाहीत, कारण जळवांना डांबरी रस्ते फारसे आवडत नाहीत. त्यांना भेटायला जंगलात पाय टाकावा लागतो. हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान असेलेलं आंबोलीचे जंगल सिंधुदुर्ग जिल्हय़ात येतं. तशी पर्यटकांची फार गर्दी नसते, पण तिकडची थंड हवा आणि धबधबे गोव्या-कोल्हापूरच्या पर्यटकांनाच आकर्षति करून घेतातच. काही लोक इथे शांतपणे आरामात सुट्टय़ा घालवण्यासाठी येतात, आणि बरेचसे आंबोलीच्या धबधब्यात डुंबण्यासाठी. येता-जाता गाडय़ांमधून आरडा-ओरड करत फिरणारे, कचरा करणारे असेही काही लोक दिसतात. पण तोपर्यंत बेडकांच्या मागे धावणारं मन एवढं शांत आणि केंद्रित झालेलं असतं की असे हे पर्यटक आणि त्यांनी न बघितलेली अशी आंबोली ही दोन वेगवेगळी जगं आहेत की काय असं वाटायला लागतं. खरं म्हणजे पावसाची मजा घेणं यात काय वाईट? पण आपल्या मजेत तिकडच्या जागेला आणि इतर लोकांना त्रास होणार असेल तर ही फार स्वार्थी आणि अन्यायकारक मजा झाली. अर्थात, जंगलवेडं असणं हेही नेहमीच त्या जागेला चांगलं असतं असं नाही. याचं उदाहरण मी देईनच नंतर.

42-lp-frog

पण हे मात्र खरं, की आंबोलीचं विश्व खोलात जाऊन जाणून घ्यायचं असेल तर ते अगदी जवळून, बेडकांच्या नजरेने पाहून घ्यायला लागेल. बेडूक आणि इतर उभयचर प्राणी, पाण्याद्वारे ऑक्सिजन घेतात. त्यांची तरल त्वचा आजूबाजूचे पाणी, आणि त्याचबरोबर त्यातील प्राणवायू शोषून घेते. याच कारणामुळे पर्यावरणातील प्रदूषणाला बेडूक फार संवेदनशील असतात. एखाद्या ठिकाणी प्रदूषण झाले की त्याचा पहिला फटका बेडकांनाच बसतो. प्रदूषित पाणी त्यांच्या शरीरात जाऊन या नाजूक बेडकांना आजार होतात, शरीराला व्यंगत्व येते. यामुळे त्यांना पर्यावरणाचा एक महत्त्वाचा सूचक समजले जाते. आणि त्यामुळे बेडकांना अशा जागा आवडतात जिथे पाणी स्वच्छ असेल आणि हवा शुद्ध असेल. आंबोलीसारखं हिल स्टेशन तर बेस्टच! या जंगलात एवढी आद्र्रता आहे की बेडूकच काय, जळवांसारख्या नाजूक (रक्त पिणाऱ्या असल्या तरी नाजूक असतात त्या) प्राण्यांनाही इथे राहणं पसंत पडतं. जंगल अगदी घनदाट, पावसाळ्यात तर नेहमीच अंधारलेलं, जमिनीवर सतत गळलेल्या पानांचा जाड ओलसर थर, आणि त्यात छोटय़ा-छोटय़ा झऱ्यांची आणि डबक्यांची गर्दी. अगदी मुख्य गावातही जुनी, जांभ्याच्या दगडांची घरं, त्यांच्या िभतींवर शेवाळाचा एक कायम थर. जंगल मधूनच दगडी पठारांमध्ये संपणारं (अशा भागाला सडा असं म्हणतात). त्या पठारांवर पसरलेली टोपली-कारवी किंवा माळ-कारवीची झुडुपं सात वर्षांतून एकदा आंबोलीतल्या पठारांना निळ्या-जांभळ्या रंगाने भरून टाकतात. या कारवीच्या आजूबाजूला, दगडांच्या खोबणीमध्ये, पानांच्या थराखाली, झऱ्या-डबक्यांमध्ये, जांभ्याच्या िभतींमध्ये आणि चक्कझाडांवरही बेडूक आणि इतर छोटे प्राणी, त्यांना फस्त करणारे सापासारखे प्राणी मस्तपकी दडून राहतात.

याशिवाय इकडच्या जंगलात फिरताना मधूनच एखादं भेकर (हरणाचा एक छोटा प्रकार) उडय़ा मारत रस्ता पार करतंय असही दृश्य दिसतं कधी तरी. कावळेसादच्या दरीत धनेश पक्षी बऱ्याचदा दिसतात. एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जंगलाने भरलेली दरी पार करून जाताना हे पक्षी खूप डौलदार दिसतात. अशा वेळी त्यांना बघताना वाटतं की आपण काही हजार र्वष आधीच्या काळात गेलो आहोत, जेव्हा ती दरी फक्त या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा व्हय़ूपॉइंट होती. तसं बघायला गेलं तर आपल्या पृथ्वीवर उभयचर आणि सरपटणारे प्राणी माणसासारख्या सस्तन प्राण्यांपेक्षाही आधी अस्तित्वात आले, त्यामुळे या जंगलांवर खरं म्हणजे त्यांचाच पहिला हक्क. काही वर्षांपूर्वी एका बेडकानेच आपल्या आशिया खंडाविषयी एक चित्तवेधक माहिती समोर आणली. २००३ साली एका संशोधकाला दक्षिण भारतातील केरळमध्ये एका जांभळ्या रंगाच्या, लांब नाकाच्या बेडकाच्या जातीचा शोध लागला. असा बेडूक भारतात आधी कधीच बघितला गेला नव्हता. त्याचा अभ्यास केल्यावर असं समजलं की या बेडकासारखे बेडूक फक्त आफ्रिकेजवळील सिचिलिस नावाच्या बेटांच्या समूहात सापडतात. या बेडकाच्या शोधामुळे या समजाला पुरावा मिळाला की सिचिलिस आणि मादागास्करसारखी बेटं ही सध्याचे खंड वेगवेगळे होण्यापूर्वी असलेल्या गोंडवन भागाचे तुकडे झाल्यानंतरही भारतातील जमिनीला जोडून होती. एवढा हा आगळावेगळा बेडूक २००३ पर्यंत आपल्याला दिसलाही नव्हता, यावरूनच आपण या प्राण्यांकडे किती कमी लक्ष दिलं आहे हे तुम्हाला कळलंच असेल.

आंबोलीतील सगळ्यात प्रसिद्ध प्राणी म्हणजे मलबार ग्लायिडग फ्रॉग. झाडावर राहणाऱ्या बेडकांपकी असा एक बेडूक जो त्याच्या बोटांमधील पडद्याचा वापर करून झाडावरून खाली उडी मारताना किंवा एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाताना हवेत तरंगत जातो. लाल-हिरव्या रंगाचा हा बेडूक अतिशय सुंदर दिसतो. आंबोलीमध्ये साठलेल्या पाण्याच्या वरच एखादे झाड डोकावले असेल तर या बेडकाची अंडी हमखास दिसतात. ती अशा प्रकारे घातलेली असतात की अंडय़ातून पिल्लू बाहेर पडताच ते थेट पाण्यातच पडावं. याशिवाय मला अगदीच आवडणारा आंबोलीतील बेडूक म्हणजे निकटीबॅट्रेकस, अगदी गुटगुटीत दिसणाऱ्या या बेडकाच्या त्वचेवर सुरकुत्या असतात, रंग फार आकर्षक नसतो पण याच्यासारखा चेहरा आणि डोळे अजून कुठल्याच बेडकाचे नाही. अगदी समोरच्या बाजूला असलेले, सुंदर नक्षीकाम असलेले डोळे आणि त्यांच्या मध्यभागी हिऱ्यासारखा आकार. याहूनही आकर्षक म्हणजे त्याचा आवाज. आंबोलीच्या जंगलात फिरताना याचा टिक-टिक आवाज आणि एकूणच धुकं-पाऊस असं वातावरण यांचा मेळ अतिशय छान जमून येतो. हे बेडूक जंगलातल्या झऱ्यांजवळ राहतात आणि यांना शोधताना बऱ्याचदा झाडाझुडुपांच्या बारीक फांद्यांवर वेटोळे घालून बसलेले सापसुद्धा सापडतात. तेही विविधरंगी आणि बऱ्याचदा बेडकाएवढेच शामळू. याशिवाय आंबोली अजून एका दुर्मीळ उभयचर प्राण्यांच्या गटासाठी प्रसिद्ध आहे. सिसिलियन असं यांना इंग्रजीत नाव आहे, मराठीत यांना देव-गांडूळ म्हणतात. हे थोडेफार मोठय़ा गांडुळासारखे दिसणारे प्राणी बेडकांसारखेच उभयचर असतात पण त्यांना पाय नसतात. गांडुळांप्रमाणेच हे ओल्या मातीत राहतात. या प्राण्यांसंदर्भातील एका तज्ज्ञांसोबत एकदा आंबोलीला जाण्याचा योग्य आला होता. बरोबर माझ्यासारखे अजून काही विद्यार्थी होते. त्या संध्याकाळी बाहेर पडताच घोषणा झाली ‘जो सिसिलियन शोधेल त्याला माझ्याकडून एक चॉकलेट ’. मग काय सगळे हिरिरीने हा प्राणी शोधायला लागले, त्या एका छोटय़ा चॉकलेटला या प्राण्याने खूपच दुर्मीळ बनवून सोडलं होतं. खूप गांडूळ सिसिलियन समजून उचलल्यानंतर दिवसाच्या शेवटी माझ्यासह एकूण फक्ततीन जणांना चॉकलेटं मिळाली. पण काय आनंद होता त्या प्राण्याला बघण्याचा! नीट निरीक्षण केल्यावर समजलं की याला छोटे-छोटे डोळे आणि नाकपुडय़ाही असतात. आंबोलीत गेल्या काही वर्षांत या दुर्मीळ प्राण्यांवर बरंच काम झालं आहे.

अशी ही आंबोली जंगलवेडय़ा लोकांना आकर्षति करतेच पण ज्यांनी कधी बेडूक-साप निरखून बघितलेही नसतील अशांनाही त्यांचं वेड लावते.

गेल्या काही वर्षांत मोठय़ा ग्रुपबरोबर आंबोलीला जाणं बंद झालंय. शेवटी गेले होते तेव्हा एका इवलुशा बेडकाला मध्यभागी ठेवून एक प्रचंड मोठा घोळका त्याचे सटासट फोटो काढत होता. फ्लॅशवर फ्लॅश चमकत होते. बेडूक स्तब्ध. त्या दिवशी त्या जंगलाच्या वाटेवरचा एकही दगड त्याच्या जागी नव्हता. प्रत्येक जण दगड उलटे-पालटे करून खाली दडलेले प्राणी शोधण्याच्या मागे लागलेला. दुर्दैवाने बऱ्याच जंगलवेडय़ांना आता फोटोवेडाची लागण झाली आहे.  अजूनही काही गोष्टी बदलू लागल्यात, जांभ्याच्या िभती जाऊन सिमेंटची अंगणं येऊ लागलीत, त्यांचं रूपांतर रिसॉर्टमध्ये होऊ लागलंय. गेली कित्येक वर्षे आंबोलीचं जंगल हे प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशात्राच्या विद्यार्थ्यांना बरंच काही शिकवत आलंय. त्यामुळे खरं म्हणजे या जंगलाचा आणि त्यातील छोटय़ा-मोठय़ा प्राण्यांच्या हिताचा विचार करणारे लोक असायला हवेत. तसं या जंगलात बरंच संशोधनही होत आलंय. आणि याच गोष्टींमुळे असंही वाटतं की हे जंगल त्या छोटय़ा बेडकांच्या दृष्टीने बघितलेलंच बरं. शेवटी हाच प्रश्न पडतो, एखाद्या जंगलात आपण का आणि कसे भटकतो हे किती महत्त्वाचं असतं नाही?
ओवी थोरात – response.lokprabha@expressindia.com