29 January 2020

News Flash

खसखस : गमती सांगू किती!

‘दोन मुलांत अंतर ठेवा. पाळणा लांबवा.’

पहाटे आठ वाजता जाग आली. कारण कोंबडी उशिरा आरवली! आमच्या ‘गवाणकर वाडीत’ वाडवडिलांच्या काळापासून कोंबडय़ाच आरवतात. कोंबडे फक्त लाजल्यासारखं करतात. मी तर लग्नानंतर इतका लाजून चूर झालो की, चार-पाच जण हनीमूनच्या वेळी माझ्या सोबतीला आले. माझी एकच बायको आहे. लाडूबाई जनवाडकर. म्हणजे हे माहेरचं नाव. लाडू कबड्डीपटू. मला खेचलं तिने मधुचंद्राच्या मैदानात!

कजाग लाडूबाईमुळे माझं जेवण तुटलं. मध्यंतरी मला अचानक म्हणाली ‘डुकराची फोड वाढू?’

‘काय?’ मी किंचाळलो.

‘अहो, रानडुकराचं छान झणझणीत लोणचं केलंय! मस्त मुरलाय डुक्कर! वाढू का चवीला?’ काय बोलायचं सांगा! तिने कोलंबी तळली तरी मला संशय असतो, नक्की कोलंबीच ना? नाहीतर फ्राय गोगलगाई असायच्या! ही आमची लाडूबाई चीनमध्ये शोभेल. काय वाट्टेल ते खाते. माझं तसं नाय बाबा! मी फक्त पैसे खातो. क्वचित कधी मार खातो. तसा आमचा पारंपरिक धंदा भंगाराचा, पण पप्पा जसे डोअर टू डोअर ‘लोखंड, पितळ, प्लॅस्टिक घेनार’ असं ओरडत लोखंडवाला कॉम्प्लेक्सपर्यंत जायचे, तसे कष्ट मी नाही घेत. चोऱ्याच जास्त करतो. अगदी सार्वजनिक नळसुद्धा सोडत नाही. त्यामुळे माझी नाइट डय़ुटी असते. माझ्या भावाचं रद्दीचं दुकान आहे. तुम्ही स्वत:च चारोळ्यांचा वगैरे संग्रह काढून ठेवला असेल, तर माझा भाऊ पप्या तो वजनावर घेईल.

कक्कूताई कुडुळकरांनी कथासंग्रह काढला होता. तीनशे प्रती हां हां म्हणता आम्ही घेतल्या. उरलेल्या दोनशे त्यांनी हळदीकुंकवाच्या वेळी बायकांना वाटल्या. आवृत्ती उगाच संपते का? हौशी प्रवृत्ती असते त्यामागे!

मी तर बापटांच्या अंगणात ठेवलेला पाळणासुद्धा पळवून आणला. आम्हाला जुळं झालं. डॉक्टर म्हणाले, ‘दोन मुलांत अंतर ठेवा. पाळणा लांबवा.’ मी बापटाचा पाळणा ‘लांबवला’. जुळ्या गुटगुटीत बाळांपैकी एक त्या पाळण्यात ठेवलं, दुसरं जत्रेतल्या आकाशपाळण्यात. दोन मुलांत अंतर ठेवायला सांगितलंच होतं, ठेवलं! आमच्या या जुळ्यांपैकी एक कुंभकर्ण निपजलाय आणि दुसरा बकासुर. मी पहाटे ‘बिझनेसवरून आलो की, त्यातला एक कार्टा आईला म्हणतो, ‘मम्मी, आपला घटोत्कच आला.’..लाडूबाई त्याला ओरडायचं सोडून तोंडावर पांघरूण घेऊन हसते. माझी सासू सध्या नॉर्मल आहे, पण कधी ‘फिरेल’ सांगता येत नाही. अंगणात रात्री-बेरात्री फिरायला लागली की समजायचं, सरकली! मग काय बघायला नको. ‘डफलीवाले डफली बजा’ म्हणून दाखवेल. नारळाच्या झाडावर कसं पटपट चढायचं ते मला शिकवेल. ती सांगेल तसं नाय केलं की, फटके! ते पण पोकळ बांबूचे! एकदा मी तिची आज्ञा पाळून माडावर चढून बसलो, पण उतरता येईना. शिडी लावावी लागली. तरी बरं, मी ‘शिडशिडीत’ आहे! ‘काय चाललंय रे? आँ? आँ? आँ? असं फक्त ‘रात्री’ विचारणारा एक मोठय़ा आवाजाचा पोपटपण आम्ही पाळलाय. त्याचं नाव क्रेझी. शब्दकोडं अडलं, तरी लगेच तो शब्द सांगतो. तो सहज दहावी-बारावी झाला असता. मी होऊ शकलो, तर बाकीचं काय? माझं सामान्य ज्ञान खतरनाक होतं. माझी एक ‘आदर्श’ उत्तरपत्रिका परवा माळा साफ करताना मला मिळाली. आमच्या टेंभेकर सरांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला, तो अशा पेपरांमुळेच! तुम्हीही वाचा.

पृथ्वी गोल आहे हे कुणी व कसे सिद्ध केले?

कोलंबो देशातला राजा कोलंबस, ‘गोल गोल राणी’ करत होता. त्याला ‘गरगरू’ लागले. तेव्हा तो ओरडला, युरेका बरंका! युरेका बरंका! म्हणजेच पृथ्वी गोल आहे!

विषुववृत्तावर कसे वातावरण आढळते?

सगळे विषारी असते. एस्किमो लोकांचे बाणसुद्धा विषारी. अजगर तर भयंकर विषारी. ससा खाल्लात तरी तुम्ही खल्लास! त्यापेक्षा उत्तर ध्रुवावर जावे. छान, थंड असते. तिथेच पिग्मी राहतात. एकमेकांना बर्फाचे गोळे फेकून मारत असतात.’ ‘रेन डिअर’ फक्त पावसात बाहेर काढतात. नाहीतर गोठय़ात बांधून ठेवतात.

इंग्रजांनी शेवटी भारत का सोडला?

त्यांनी कुठे सोडला? आम्ही त्यांना भाऊच्या धक्क्यावर सोडून आलो. जात नव्हते. धक्क्यावर धक्के मारले. माझ्या पणजोबांनी तर ढकललं लॉर्ड कर्झनला हे असं आमचं हसत खेळत शिक्षण झालं! द्या टाळी!
माधव गवाणकर – response.lokprabha@expressindia.com

First Published on April 29, 2016 1:04 am

Web Title: funny family story
Next Stories
1 समर्थस्थापित अकरा मारुती
2 हनुमान आला कुठून?
3 व्यक्तिरेखा ते लोकप्रिय देवता
X