News Flash

स्मरणरंजन : सायंतारा…

भावगीतगायक गजाननराव वाटवे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष.

संगीताच्या क्षेत्रात भावगीत या प्रकाराला अमाप लोकप्रियता मिळवून देणारे भावगीतगायक गजाननराव वाटवे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांच्या  भावगीतांसारख्याच बहारदार कारकीर्दीचा गोषवारा-

भावगीतांचे युग निर्माण करणारे, सर्वात मोठे योगदान देणारे बुजुर्ग कलावंत म्हणजे गजाननराव वाटवे. त्यांनी सोळाव्या वर्षी पहिली मफल गाजवून काव्यगायनाला केलेली सुरुवात, अखेपर्यंत अविरत सुरू होती. भावगीत त्यांच्या बरोबर जन्माला आले आणि त्यांच्या संगतीने बहरले, असे म्हणता येईल. येत्या आठ जून रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. (जन्म- आठ जून १९१६).

गजानन वाटवे वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षी बेळगावहून घरदार सोडून पुण्याला केवळ गाणे शिकण्यासाठी आले. अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांनी, गोिवदराव देसाई यांच्या गोपाल गायन समाजामधे गायनाचे शिक्षण घेतले. अनेक आजारांना धीराने तोंड देत, अमाप कष्ट करत, कुटुंबापासून लांब राहत, अत्यंत खडतर मार्गावरून चालत ज्ञान संपादन केले.

गोपाल गायन समाजात त्यांच्याबरोबर गायनाचे धडे घेत असलेले नारायण सोहोनी आणि दसनूरकर हे त्या वेळचे त्यांचे जवळचे मित्र. एक दिवस दसनूरकरांनी एका मासिकात छापून आलेली माधव ज्युलियन यांची ‘चल उडुनी जा पाखरा, पाहा किती रम्य पसरली वसुंधरा..’ ही कविता गजानन वाटवे यांना वाचून दाखवली. त्यातले साधे सुटसुटीत शब्द, पण मोठा आशय वाटव्यांना आवडला. ती कविता त्यांनी आपल्या वहीत उतरवून घेतली. त्यांच्या कवितेच्या वहीतली ती पहिली कविता! त्यांनी त्या कवितेला तितकीच सोपी चाल लावली. पेटी पुढे ओढली आणि दसनूरकरला लगेच गाऊन दाखवली. स्वत: बांधलेली पहिली चाल! स्वत:च्या स्वररचनेत गायलेली पहिली कविता! ती आठवण वाटव्यांच्या मर्मबंधातली ठेव होती. त्या क्षणी ‘काव्यगायक गजानन वाटवे’ यांच्या जीवनाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.

त्यानंतर अनेक कवितांची भर त्या वहीत पडत गेली. कवी अनिल, माधवराव पटवर्धन, गिरीश, मायदेव, तांबे, सानेगुरुजी, अशा कवींच्या अर्थपूर्ण कविता वहीत नोंदल्या गेल्या. त्यांना चाल लावून ते या कविता गाऊ लागले. अर्थात तेव्हा श्रोते होते फक्त त्यांचे गुरुबंधू सोहोनी आणि दसनूरकर!

गोपाल गायन समाजातून बाहेर पडून त्यांनी एक खोली भाडय़ाने घेतली. शंकरराव आणि भालचंद्र लिमये या बंधूंच्या मदतीने एकेरी सुरांची एक पेटी, एक तबला आणि डग्गा घेऊन गाणे शिकवण्याचे वर्ग सुरू केले. परशूराम आणि भार्गव अंबटकर तबला वाजवत व स्वत: वाटवे पेटीवर बसत. अशी या गायन वर्गाची सुरुवात झाली. हळूहळू पुण्यात बस्तान बसू लागले. गाण्याच्या शिकवण्या मिळू लागल्या. कर्वे कॉलेजच्या विद्याíथनींना शिकवायला ते कॉलेजमध्ये जात असत. त्यातून खोलीचे भाडे आणि जेवणाच्या डब्याचा खर्च निघत असे. शिल्लक फार उरत नसली तरी त्यांच्या पोतडीत उत्तमोत्तम कवितांची भर पडत होती. त्यांना चाली लावून ते मित्रांना ऐकवत असत. अशाच फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मित्राने त्यांच्या नकळत त्यांच्या काव्यगायनाचा कार्यक्रम कॉलेजच्या स्नेहसंमेलनात आयोजित केला. काही न सांगता पेटी आणि तबला सोबत घेऊन त्याने वाटव्यांना मंचावर आणून बसवले. अचानक आलेल्या या ‘संकटा’ला त्यांनी धीराने तोंड दिले. घशाला कोरड पडली; परंतु तितकाच आनंदही झाला. तरुणाईची ती मफल वाटव्यांनी सहज जिंकली. स्तुतिसुमनांची उधळण पहिल्यांदाच अनुभवली. मानधनाचे मिळालेले पंधरा रुपये नंतर मिळालेल्या हजारोंच्या मानधनापेक्षा किंवा पुरस्कारांपेक्षा निश्चित अनमोल होते. याच कार्यक्रमातून ‘काव्यगायक गजाननराव वाटवे’ उदयाला आले. ते साल होते १९३८.

या कार्यक्रमाचा खूप बोलबाला झाला. निव्वळ तबला आणि पेटीच्या साहाय्याने स्वरतालात गायल्याने कविता किती खुलते याचा अनुभव सर्वाना नवीन होता. कवितेतील भावना खुलवणारी चाल आणि त्याला संगीताची जोड या नावीन्याकडे रसिक आकर्षति होत होते. त्यात वाटव्यांचा मुलायम मधुर आवाज आणि भावस्पर्शी गायन म्हणजे रसिकांसाठी दुग्धशर्करा योग असे. वाटव्यांच्या चालीत स्वरांच्या उलट सुलट कोलांटय़ा नसत, तालाशी लढाई नसे. कवितेवर स्वरांची कुरघोडी होणार नाही याची ते दक्षता घेत. तसेच शब्दांची विनाकारण मोडतोड त्यांना खपत नसे. उलट चोखंदळपणे निवडलेल्या कवितेला साजेशी अर्थवाही चाल लावून ती जास्तीत जास्त प्रभावी करून रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करीत. म्हणूनच हे कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले. शाळा कॉलेज, गणपती उत्सव, सत्यनारायणाची पूजा, अशा सर्व लहान-मोठय़ा प्रसंगी वाटव्यांचे काव्यगायनाचे कार्यक्रम होत असत. कविता भावपूर्ण, श्रवणीय आणि प्रेक्षणीय करण्याची किमया वाटव्यांमध्ये होती.

३ सप्टेंबर १९३९ ही तारीख ‘इंग्रज सरकारची दुसऱ्या महायुद्धाची घोषणा’ म्हणून इतिहासात भयसूचक दिवस म्हणून नोंदली गेली; परंतु तोच दिवस वाटव्यांसाठी मात्र अत्यंत शुभ ठरला. याच दिवशी वाटवे पहिल्यांदा मुंबईला आले, याच दिवशी आकाशवाणीवर त्यांचा पहिला कार्यक्रम झाला आणि याच दिवशी एच.एम.व्ही.ने त्यांच्याशी गाण्याच्या ध्वनिमुद्रणाचा करार केला. वाटव्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालेली पहिली रेकॉर्ड ‘वारा फोफावला.’ ही रेकॉर्ड इतकी लोकप्रिय झाली, की विक्रीच्या बाबतीत त्या वेळच्या गाजलेल्या फिल्मी गाण्याचेही रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘चंद्रावरती दोन गुलाब’, ‘राधे तुझा सल अंबाडा’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘गेला दर्यापार घरधनी’, ‘आई तुझी आठवण येते’, ‘गर्जा जयजयकार’, ‘ती पाहा ती पाहा बापूजींची प्राणज्योती..’ अशा अनेक रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. अनेक नामवंत कवींच्या कविता त्यांनी अत्यंत आत्मीयतेने गायल्या. भावाविष्काराचा परमोच्च िबदू ते साधत आणि त्याचमुळे अनेक वष्रे रसिकांच्या मनावर या साऱ्या गीतांचा पगडा होता.

केवळ पेटी आणि तबला या वाद्यांच्या साथीने केलेल्या काव्यगायनाच्या कार्यक्रमात हजार-दोन हजार रसिकांना खिळवून ठेवण्याचे सामथ्र्य वाटव्यांच्या भावपूर्ण मुलायम आवाजात होते. गिरगावातल्या ब्राह्मणसभेमधे सभागृह तुडुंब भरले म्हणून वरच्या मजल्यावरच्या तितक्याच मोठय़ा सभागृहात ध्वनिक्षेपक लावून श्रोत्यांची बसण्याची व्यवस्था करावी लागली होती. आणि मध्यंतरानंतर तिथल्या श्रोत्यांच्या आग्रहाखातर वाटव्यांना वरच्या मजल्यावरच्या स्टेजवर उर्वरित कार्यक्रम करावा लागला. गणपती उत्सवात तर एकाच दिवशी दुपारी गिरगावात कांदेवाडीतल्या वागळे हॉलमध्ये, रात्री आठ ते बारा लालबागेत फिन्ले मिलमध्ये आणि त्यानंतर रात्री एक ते पाचपर्यंत भायखळ्याच्या हॉस्पिटलच्या नस्रेस क्वॉर्टर्समध्ये असे लागोपाठ कार्यक्रम करण्याचा तो एक उच्चांकच असावा. तसाच श्रावण-भाद्रपदात तीस दिवसांत अठ्ठावीस कार्यक्रम आणि तेही सोळा वेगवेगळ्या गावांमध्ये हाही एक उल्लेखनीय उच्चांक आहे.

गणेशोत्सवाव्यतिरिक्त सार्वजनिक सत्यनारायण पूजा, दुकानाची उद्घाटने, मित्रमंडळ, हुतुतु संघ अशा  कोणत्याही प्रसंगाला काव्यगायनाचे कार्यक्रम रस्त्याच्या चौकाचौकात आयोजित केल्या जात. यात आयोजक कोणीही असले तरी येणारा श्रोतृवर्ग हा मध्यमवर्गीय सुशिक्षित असायचा. संसाराची दुखे पचवलेला, दारिद्य््रााचे चटके खाल्लेला, हालअपेष्टा सोसून मनाने हळवा झालेला हा सुजाण मध्यमवर्ग. करमणुकीसाठी सिनेमा नाटकावर पसे खर्च करणे त्यांच्या आवाक्याबाहेर होते. असे जाणते रसिक, गरीब पण बुद्धिमान श्रोते या कार्यक्रमांना आवर्जून हजर असायचे. पशाविना गांजलेल्या लोकांना आपली दुखं विसरून जीवाची करमणूक करण्याची ही चांगली संधी असायची. आपल्या मुलाबाळांसोबत, आईवडिलांसोबत ही कुटुंबे रस्त्यावर पोती किंवा चटयांवर बसून या कार्यक्रमांचा आनंद लुटायचे.

कवितेचे, गीताचे मंचीय सादरीकरण गजानन वाटवे यांनीच सुरू केले. ‘स्वत:च्या आवाजाच्या स्वभावधर्मानुसार भावगीतगायन’ हा वेगळा प्रकारच वाटवे यांनी नव्याने निर्माण केला. वाटवे यांच्यापूर्वी गोिवदराव जोशी, जे. एल. रानडे, ज्योत्स्ना भोळे, केशवराव भोळे यांच्या काही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावरून प्रेरणा घेऊन वाटवे यांनी एक स्वतंत्र वाट निर्माण केली. उत्कट कविता सुंदर पण सोप्या चालीत ऐकणे लोकांना आवडले आणि हा प्रकार लोकप्रिय ठरला. पाश्र्वसंगीताचा अतिशय माफक पण नेटका वापर, शब्दोच्चाराला प्राधान्य, आणि अर्थवाही चाल ही वाटव्यांची गाणी लोकप्रिय करणारी त्रिसूत्री होती. १९४० च्या सुमारास त्यांच्या कविता-गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होऊ लागल्या आणि हा प्रकार सर्वदूर पोहोचला.

१९५२ च्या डिसेंबरमध्ये वाटव्यांच्या पत्नी दुपारच्या बोटीने लंडनला गेल्या. त्यांना निरोप द्यायला गेले असता पातकरांनी दिलेल्या कवितेचा कागद वाटव्यांनी खिशात ठेवला होता. विमनस्क मनस्थितीत संध्याकाळी झेवियर्स कॉलेजमधल्या कार्यक्रमात त्यांनी ती कविता गायली. मनातली विरहाची भावना अतिशय उत्कटतेने त्या चालीतून प्रकट झाली होती. कार्यक्रमाला एच.एम.व्ही.चे रूपकजी आणि कामेरकर बसलेले होते. दोघांना ती कविता इतकी आवडली की कोणत्याही रिहर्सलशिवाय, ऑर्केस्ट्रा न घेता त्या गाण्याचे दुसऱ्याच दिवशी रेकॉर्डिग झाले. ते गाणे होते ‘दोन धृवावर दोघे आपण..’ !!

कार्यक्रमात प्रसंगावधान राखून कोणत्या कविता गाव्यात याची फार अचूक जाणीव वाटव्यांकडे होती. १९५० सालच्या गणेशोत्सवात भवानीशंकर रोडवरच्या कार्यक्रमात अमाप गर्दी झाली. वातावरण अस्वस्थ झाले. कार्यक्रम व्यवस्थित सुरू झाला पण मध्येच कुठून तरी एक दगड समोर बसलेल्या मुलाच्या डोक्यात येऊन आदळला. गोंधळ माजला. पोलीस आले. कलाकारांना सुरक्षित जागी हलवले. कार्यक्रम होणार नाही असे जाहीर करूनसुद्धा लोक जागचे हलले नाहीत. पोलिसांच्या बंदोबस्तात कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात झाली. शेवटी वाटवे पुन्हा स्टेजवर आले. पेटीवर सूर लावले. कार्यक्रमाची सुरवात ‘बापूजींची प्राणज्योत’या मनमोहन नातूंच्या कवितेने केल्याने संपूर्ण जनसमुदाय शांत झाला. स्तब्ध झाला. मंत्रमुग्ध झाला. तासाभरापूर्वी पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलेला हा समुदाय या कवितेने आटोक्यात आणला. प्रसंगावधान राखून समयसूचकतेने कविता निवडण्याच्या या अवधानाचे त्या कार्यक्रमाला आलेल्या जनकवी पी. सावळाराम आणि वसंत प्रभूंनी तोंडभरून कौतुक केले. युद्धाच्या काळात ते ‘गर्जा जयजयकार.., बापूजींची प्राणज्योती.., अशी स्फूर्तिगीते म्हणत. भारत-चीन युद्धाच्या दरम्यान त्यांनी काही समुहगीते ही बसवली. कुसुमाग्रजांचं ‘बर्फाचे तट पेटूनी उठले..’ किंवा कवी यशवंतांचे ‘गाऊ त्यांना आरती..’ ही वाटव्यांनी संगीत दिलेली गीते अतिशय गाजली. परंतु वाटव्यांचा खरा िपड भावगीतगायकाचा किंवा भावसंगीतकाराचा. ‘पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’, ‘कुणीही पाय नका वाजवू..’, ‘यमुनेकाठी ताजमहाल..’, ‘चंद्रावरती दोन गुलाब..’ ही आणि अशी गाणी वाटव्यांची खरी ओळख.

वाटव्यांनी गायलेली कवी माधव ज्युलियनयांची ‘आई’ कविता प्रत्यक्ष ऐकताना कवी गहिवरले आणि वाटव्यांना कौतुकाने म्हणाले, ‘‘अतिशय भावनापूर्ण आवाजात तुम्ही कविता म्हणता. फारच समजून अर्थपूर्ण म्हणण्याची तुमची पद्धत आहे. ‘आई’ म्हणताना तुम्ही स्वत:ही इतके सद्गदित होता हे विशेष आहे. माझी कविता इतकी चांगली आहे हे मला आज नव्याने समजले.’’ कविवर्याचे प्रशंसेचे हे उद्गार कोणत्याही पुरस्कारापेक्षा अनमोल आहेत.

बेळगावला कवयित्री संजीवनी मराठे यांच्या घरी रंगलेल्या काव्यगायनाच्या मफलीची आठवण वाटव्यांनी हृदयाच्या कुपीत जपून ठेवली होती. बा. भ. बोरकर त्यांच्या कविता गाणार होते. ना. म. संत, इंदिरा संत, पु. म. लाड अशा अनेक नामवंतांबरोबर वाटव्यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले. वाटव्यांनी अनेक सुंदर कविता त्यांच्या भावपूर्ण स्वरात अर्थवाही चालीत गायल्या. बोरकरांना त्यातल्या ‘हृदय सांग चोरीले कशास सुंदरी..’ या कवितेची चाल इतकी आवडली की चार-पाच वेळा ही एकच कविता त्यांनी वाटव्यांना पुन्हा पुन्हा गायला लावली, तरीही त्यांचे मन तृप्त झाले नाही. अशा अतृप्त अवस्थेतच मनाला हुरहुर लावत तो कार्यक्रम संपला होता.

तीस वर्षांमध्ये वाटव्यांनी असंख्य कार्यक्रम केले. मनाला भावलेल्या अर्थपूर्ण कवितांना चाली दिल्या. १९५१ पासून वाटव्यांनी आकाशवाणीवर चाली द्यायला सुरुवात केली. वाटव्यांनी संगीतबद्ध केलेल्या कर्णमधुर कविता त्यांच्या स्वत: व्यतिरिक्त मालती पांडे, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर, ज्योत्स्ना भोळे, कुमुदिनी पेडणेकर, सरोज वेिलगकर, अशा अनेक सुरेल गळ्याच्या गायिकांनी गाऊन त्या गाण्यांचे सोने केले. या रेकॉर्डस् आणि रेडिओ या माध्यमातून आणि वाटव्यांच्या कार्यक्रमातून ही सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली आणि आजही आहेत.

१९६०-६५च्या दरम्यान भावगीताचे स्वरूप पालटू लागले. शब्दांपेक्षा संगीताला महत्त्व आले. भावगीत गायनात रागदारी आली, गाणी शब्दनिष्ठ किंवा अर्थनिष्ठ न होता दुर्गम आणि स्वरनिष्ठ होत गेली. तसे काव्यगायनाचे कार्यक्रम कमी होत गेले.

परंतु वाटवे मात्र नवनवीन छान छान कविता शोधून त्यांना चाली लावत राहिले. जितक्या आवडीने त्यांनी माधव ज्युलियन, केशवसुत, कुसुमाग्रजांच्या कविता गायल्या तितक्याचा कौतुकाने त्यांनी नवीन पिढीच्या कवितांना चाली लावल्या.

१९८३ मध्ये वाटव्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त बबनराव नावडीकरांनी वाटव्यांनी संगीत दिलेल्या प्रमुख १०० भावगीतांचे संकलन ‘निरांजनातील वात’ या नावाने प्रसिद्ध केले. त्या पुस्तकात शेवटी नावडीकरांनी ‘गजानन-गौरव’ हे वाटव्यांवर गौरव-गीत लिहिले आहे.

गजानना तव हा गुणगौरव

रसिक करिति तव अमृतउत्सव

तुज न लाभले रम्य बालपण

आव्हानच तव सारे जीवन

राखिलास गुण साहुनि वास्तव

गजानना तव हा गुणगौरव

 

तव गाण्याचा ढंगच न्यारा

शब्द सुरांचा सुबक फुलोरा

फुलविसि तू नित आजहि अभिनव

गजानना तव हा गुणगौरव

 

गोिवदाने पाया रचिला

(गोिवदा म्हणजे जी एन जोशी)

कळस तयावर तूच चढविला

कृतार्थ तव हा अमृतउत्सव

गजानना तव हा गुणगौरव

 

तर प्रख्यात गीतकार-संगीतकार यशवंत देव वाटव्यांना शब्दप्रधान गायकीचे अत्यंत आदराचे स्थान मानतात. त्यांच्या खुमासदार शैलीत त्यांनी वाटव्यांच्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात –

 

भावनांचे भाष्यकत्रे

श्री. गजानन वाटवे

सुगमच्या अभ्यासकांचा

श्री. गजानन वाटवे

आर्जवी स्वर वाटवे,

स्वच्छ वाणी वाटवे

रसिक रंजन साधणारी

गोड गाणी वाटवे

करित नाविन्यास मुजरा

जीव रमवीत वाटवे

आजही नवगायकाचा

सूर घडवित वाटवे.

चांगली कविता हाती लागली की त्यांची बोटे आपोआप हार्मोनियमवर फिरत. आणि पाहता पाहता त्याला चालीत बसवून वाटवे ते गाऊन दाखवत. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी स्वरानंद प्रतिष्ठानने ‘वाटवे ७५ नंतरचे’ हा कार्यक्रम पुण्याच्या भरत नाटय़ मंदिरात केला. त्या वेळी ‘चंद्र मागू कसा..’ माझ्या देहाची घोंगडी..’, अशा त्यांच्या अनेक नवीन रचना सादर झाल्या. ‘आई तुझे प्रेम जसे मोगरीचे फूल’ ही कवयित्री संगीता बर्वे यांची कविता स्वत: वाटव्यांनी सादर केली. नव्वदीतही लय आणि तालावर त्यांची केवढी हुकमत होती.

माझ्या शेवटच्या श्वासावरही गीत असावे. मनात कविता असावी अशी शतायुषी होण्याची इच्छा बाळगणारे भावगीताचे युगप्रवर्तक गजानन वाटवे २ एप्रिल २००९ रोजी कालवश झाले. हा ‘गगनी उगवलेला सायंतारा,’ ‘धृवतारा’ होऊन पुढच्या अनेक पिढय़ांमध्ये अखंड चमकत राहो.

मला त्यांना भेटण्याचे किंवा त्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले नाही याची सदैव खंत वाटते. तशी नवीन पिढीची असून त्या काळातल्या गाण्यात माझे मन रमते. आज असंख्य भावगीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलेय. भावगीत आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. भावगीताशिवाय आपले आयुष्य? कल्पनाही करवत नाही. त्या भावगीताच्या युगप्रवर्तकाचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्या निमित्ताने त्यांना रसिकांकडून विनम्र अभिवादन.

(संदर्भग्रंथ : गगनी उगवला सायंतारा : आत्मकथन – गजानन वाटवे, दरवळ – रंजना पंडित, स्वरगंगेच्या तीरी – जी एन जोशी, निरांजनातील वात – बबनराव नावडीकर)

प्रवास भावगीतगायनाचा..

शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली तरीही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी, सूर, ताल आणि लय यांच्याबरोबर शब्द आणि भावनेला प्राधान्य देत आपली वेगळी वाट निर्माण करणारी भावसंगीताची सरिता गेली नव्वद वर्षे मराठी जनमानसाच्या हृदयातून, नसानसांतून अविरत वाहते आहे.

अशा या भावसंगीताच्या परंपरेत पहिले भावगीत गायले ते रंगभूमीवरील विख्यात अभिनेते-गायक व्यंकटेश बळवंत पेंढारकार तथा बापूराव पेंढारकार यांनी. ते २३ जानेवारी १९२६ रोजी, ध्वनिमुद्रित झाले. ‘गोिवदाग्रज’ म्हणजेच सुप्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी यांच्या ‘वाग्वैजयंती’ या काव्यसंग्रहातल्या या गीताचे बोल होते – ‘हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला’. त्यानंतर जी. एन. जोशी यांनी ना. घ. देशपांडे यांच्या ‘रानारानात गेली बाई शीळ..’ या कवितेला चाल लावली आणि वाद्यांच्या संगतीत गाऊन काव्यगायनाची नवी परंपरा निर्माण केली.

बाबुराव पेंढारकरांच्या भावगीताचे ध्वनिमुद्रण लाखेच्या तबकडीवर झाले आणि ती ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडे असली तरी आता ऐकायची सोय उपलब्ध नाही. परंतु ना. घ. देशपांडेंची ‘शीळ’ जी. एन. जोशींच्या मधुर आवाजात, रानातून गावात आणि शहरांत, सर्व मराठी रसिकांच्या मनात, भावसंगीताची गोडी निर्माण करत घुमली. स्त्रीच्या मनातल्या प्रेमाविषयीच्या भावना मांडणारे हे गीत खरे तर गायिकेच्या आवाजात ध्वनिमुद्रित व्हायचे. पण ते झाले जी. एन. जोशींच्या स्वरात. नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनी करण्याच्या त्या काळात ते कुणालाही खटकले नाही. त्याच दरम्यान सांगलीच्या जे एल रानडेंच्या ‘अती गोड गोड ललकारी’ या गीताने रसिकांच्या मनावर गारूड घातले.

काव्यगायनाची सुरुवात जोशी आणि रानडे यांनी केली. गायनाच्या प्रांतामध्ये त्यांनी निर्माण केलेल्या या नवीन वाटेला गजाननराव वाटव्यांनी अधिक बहारदार आणि रमणीय केले. तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
वसुधा कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 1:26 am

Web Title: gajananrao watve
टॅग : Music
Next Stories
1 प्रयोग : पुन्हा ‘राजा लीअर’
2 दखल : बहुरंगी बुद्धिमत्ता
3 सोन्यासम ट्रफ्ले मश्रूम
Just Now!
X