00-lp-ganeshनित्यनेमाने अथर्वशीर्ष म्हटलं जात असलं तरी त्याचा अर्थ माहीत असतोच असं नाही. वास्तविक अथर्वशीर्ष हे छोटंसं उपनिषद आहे. सगुण साकार अशा गणेशमूर्तीच्या माध्यमातून निर्गुण निराकारापर्यंत कसं पोहोचायचं ते अथर्वशीर्ष आपल्याला सांगतं, म्हणून ते महत्त्वाचं आहे.

गणपतीच्या दिवसांत घरोघरी आरत्या, देवे यांचे रंगलेले सूर ऐकू येतात आणि त्याच जोडीने ऐकू येतं ते धीरगंभीर आवाजात म्हटलं जाणारं गणपती अथर्वशीर्ष. अथर्वशीर्ष हे एक छोटंसं उपनिषद आहे. छोटय़ा आकारात मोठा अर्थ हे उपनिषदाचं वैशिष्टय़ अथर्वशीर्षांतही आढळून येतं. गणपती अथर्वशीर्षही आकाराने छोटंसं आहे. त्यात फक्त दहा मंत्र आहेत, पण प्रत्येक मंत्र त्या परब्रह्माचा विचार करायला लावणारा  आहे. त्याच्या आधाराने आपण परब्रह्माचा हा विचार कधी निर्गुणाच्या माध्यमातून करतो तर कधी सगुणाच्या माध्यमातून करतो. अथर्वशीर्ष हा अथर्व वेदातला भाग आहे. काही जणांच्या मते अथर्वशीर्ष या शब्दाची फोड-अथर्व वेदात सांगितलं गेलेलं, तर शीर्ष म्हणजे उच्चतम ज्ञान. तर काहींनी अथर्वशीर्ष शब्दाची आजच्या काळाला साजेशी फोड करताना थर्व म्हणजे चंचल, शीर्ष म्हणजे डोकं, आणि अ म्हणजे अभाव असा अर्थ सांगितला आहे. चंचलपणाचा अभाव असलेलं डोकं म्हणजेच शांत, स्थिर डोकं. म्हणूनच मन आणि डोकं शांत ठेवण्याची विद्या म्हणजे हे अथर्वशीर्ष!

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
sankashti ganesh chaturthi 2024 shubh muhurat puja vidhi and mantra dwipriya falgun ganesha chaturthi
सर्वार्थ सिद्धी योगातील संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, शुभ योग आणि चंद्रोदय वेळ
ravichandran ashwin profile
व्यक्तिवेध : रविचंद्रन अश्विन

अथर्वशीर्ष हे उपनिषद असल्याने प्रथम शांतिमंत्र म्हणण्याची पद्धत आहे. ‘ओं भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा’ म्हणजे आम्ही आमच्या कानांनी चांगलंच ऐकावं, आमच्या डोळ्यांनी चांगलंच पाहावं. बलवान, निरोगी शरीराने देवांची सेवा करत मिळालेलं पूर्ण आयुष्य व्यतीत करावं. अथर्वशीर्षांच्या या शांतिमंत्रातूनही आपल्या सकारात्मक संस्कृतीचं दर्शन घडतं. जगात चांगलं-वाईट दोन्ही आहे, पण मी कशाचा स्वीकार करायचा हे मीच ठरवायला हवं. जे चांगलं आहे तेच मी पाहीन, तेच मी ऐकेन आणि आयुष्याचा कंटाळा न करता, जे मिळालंय आयुष्य ते सार्थ करत जगेन. आपण शुभेच्छा देताना अनेकदा ‘जीवेत  शरद: शतं’ असं म्हणतो. पण ती एवढीच ओळ नाहीये तर ‘जीवेम शरद: शतं अदीना: स्याम’ म्हणजे कुठलंही दैन्य न स्वीकारता आम्ही सगळे शंभर वर्ष जगू, असं सकारात्मक जगणं सांगणारे हे शांतिमंत्र आहेत. उपनिषद म्हणण्यापूर्वी अशा सकारात्मक लहरी या शान्तिमंत्राच्या माध्यमातून आपल्याभोवती पसरतात. शान्तिमंत्रानंतर मग स्वस्तिमंत्र येतो. ‘ओं स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा:’ म्हणजे इंद्र, सूर्य, बृहस्पती आमचं कायम रक्षण करोत अशी इच्छा व्यक्त केली जाते आणि मग अथर्वशीर्ष सुरू होतं.

‘त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि’-हे गणपती देवा तूच ते प्रत्यक्ष तत्त्व आहेस. तत्त्व म्हणजे ब्रह्म, जे सर्व चराचराला व्यापून टाकतं ते ब्रह्म, ते तू आहेस. आपल्याला ब्रह्म, ते चतन्य दिसतं का? नाही. मग ते पाहायचं कसं? उपनिषद निर्गुणाची उपासना करतं. पण आपण सामान्य माणसं निर्गुणावर मन एकाग्र करू शकत नाही. कारण जे दिसत नाही तिथे लक्ष केंद्रित करणार कसं? म्हणून गणपतीला समोर ठेवून त्याच्यावर लक्ष एकाग्र करून त्याचंच हे सर्वव्यापी रूप समजून घ्यायचं. प्रत्येकात तोच आहे हे समजून घ्यायचं. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ असं ध्यान करताना तो फक्त मूर्तीत नाही तर सर्व भूती आहे हे लक्षात आलं की मग पुढच्या पायरीवर जायचं. ‘त्वमेव केवलं कर्तासि’ ध्यान धरताना मन एकाग्र होऊ शकत नाही याची अनेक कारणं असतात. त्यातलं मुख्य कारण म्हणजे अहंकार. मी सगळं करतो हा भाव माणसाच्या ठिकाणी असतो. या अहंकाराला छेद देणारंच हे वाक्य. मी काहीच करत नाही. गणपती देवा, तूच सगळ्याचा कर्ता आहेस. तूच कर्ता आणि करविता आहेस. तेवढंच नाही तर निर्माणही तूच करतोस, धारणही आणि संहारही तूच करतोस. म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या साऱ्याचा अधिपती तूच आहेस. एकदा तू कर्ता असं म्हटलं की मग अहंकाराची ज्योत विझते. अहंकार विझला की आपोआप मन शांत होतं. हे मन शांत करणारं अथर्वशीर्ष आहे. त्याची सुरुवात गणपतीला ब्रह्म मानूनच होते. माझ्या अंतरंगातला आत्माही तूच आहेस. भगवंतानी गीतेत सांगितलं तसं, ‘ममवांशो जीवलोके.’ भगवंतच सर्वाच्या अंतरंगी आहे तसं हे गणपती देवा, बाहेर व्यापून टाकणारं ब्रह्म तूच आणि माझ्यातला अंतरात्माही तूच.

‘ऋतं वच्मि, सत्यं वच्मि’ मी यथार्थ आणि सत्य सांगतो आहे. ऋत आणि सत्य यांचा थोडा व्यापक अर्थ पाहिला तर जे पारमाíथक सत्य आहे ते ऋत आणि जे व्यावहारिक सत्य आहे ते सत्य. म्हणूनच तुझं निर्गुण रूप पारमाíथक सत्य आहे, आणि तुझा सगुण साकार देह हे व्यावहारिक सत्य आहे. तेही सर्वसामान्यांना समजेल असं सत्य आहे.

आता तिसऱ्या मंत्रापासून काही मागणं मागितलं आहे. ‘अव त्वं माम, अव वक्तारं, अव श्रोतारं’- हे देवा, तू माझं रक्षण कर, बोलणाऱ्याचं रक्षण कर, ऐकणाऱ्याचं रक्षण कर, धारण करणाऱ्याचं आणि देणाऱ्याचं रक्षण कर. यात बोलणाऱ्याचं आणि ऐकणाऱ्याचं रक्षण कर म्हटलंय. कारण हे उपनिषद आहे. गुरूच्या जवळ जाऊन, बसून ज्ञान ग्रहण करणे म्हणजे उपनिषद. त्यामुळे इथे गुरू-शिष्याचा विचार केलाय, म्हणून बोलणारा वक्ता गुरू आणि ऐकणारा श्रोता शिष्य यांचं रक्षण कर. आता फक्त ज्ञान ऐकणाऱ्या शिष्याचं रक्षण करून उपयोग नाही, जो शिष्य ते ज्ञान धारण करू शकतो आणि नंतर पुढे देऊ शकतो त्या दोघांचही रक्षण कर. तरच ही गुरू-शिष्य परंपरा, ज्ञानाची परंपरा पुढे सुरू राहील. तू  माझं सर्व बाजूंनी रक्षण कर. मागून-पुढून-वरून-खालून. ‘अव पश्चातात अव पुरस्तात’ आता सर्व बाजूंनी म्हणजे? पश्चात, पुरस्तात, उत्तरातात. म्हणजेच भूतकाळातील चुकांपासून, भविष्यकाळातील संकटांपासून, उत्तर दिशा कुबेराची दिशा आहे, कुबेरापासून म्हणजे अतिऐश्वर्यामुळे येणाऱ्या उन्मादापासून आणि त्यानंतर होणाऱ्या अध:पतनापासून तू माझं रक्षण कर. अस्मानी संकटांपासून, यमाच्या पाशांपासून तू माझं रक्षण कर. माझं सर्व बाजूंनी हरप्रकारे रक्षण कर. गणपतीच सर्व चराचरात भरलेला असल्याने तो सर्व बाजूंनी रक्षण करू शकतो, हा त्यामागचा भाव आहे.

असा चराचरात भरलेला गणपती कुठे-कुठे प्रत्ययाला येतो? तर केलं जाणारं काम आणि उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द यात गणपतीच आहे. कारण तो वाङ्मयस्वरूप आहे. तो चिन्मय आहे. तो चतन्य आहे. जीवनशक्ती आणि आनंदशक्ती म्हणजे तोच आहे. तो आनंद आहे, तो चतन्य आहे, थोडक्यात तोच सच्चिदानंद आहे. तो ज्ञान आणि विज्ञानमय आहे. तो अनुभूतीतूनच उमगतो, तो पंच तत्त्व, पंचमहाभूत आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणी म्हणजेही तोच आहे. थोडक्यात माझ्या आतलं आणि माझ्या भवतीचं सगळं विश्व म्हणजे गणपती आहे. त्याच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन हे, ब्रह्माचं जे वर्णन केलं जातं त्याच पद्धतीने यात केलं आहे. उपनिषदातला हा निर्गुण वर्णनाचा भाग नेहमीच आपल्याला समजायला अवघड वाटतो.

यानंतर यात मंत्राने गणपतीचे रूप सांगितले आहे. ‘गणािदपूर्वमुच्चाय वर्णािद तदनंतरम’ ग त्यात वर्ण अ, मग अनुस्वार अर्ध चंद्रांकित. म्हणजे गं. त्याच्या आधी ओं व नंतर ओं जोडावं. ओं गं असा त्याचा जप करावा. नादानुसंधानाने करावा. हीच गणेशविद्या आहे. या मंत्राचा निर्माता गणक ऋषि आहे. निचृतगायत्री हा छंद आहे. गणपती ही देवता आहे.

‘एकदन्ताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात’ ही गणेश गायत्री अथर्वशीर्षांत गणक ऋषींनी सांगितली आहे. आम्ही एकदंताला जाणून घेतो आणि वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो दन्ती आम्हाला प्रेरणा देवो.

हे सांगून झाल्यावर गणपतीचे सगुण साकार रूप वर्णिले आहे. ‘एकदन्तंचतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं’  हे केलेलं वर्णन गणपती अर्थात गणांचा अधिपती त्याचं आहे. एखाद्या नेत्याने कसं असावं याचं वर्णन आहे. तो एकदंत आहे म्हणजेच त्याच्याकडे एकवाक्यता आहे. नेत्याच्या ठायी अशीच एकवाक्यता असावी. त्याचे कान मोठे असावेत, कारण जेवढं योग्य तेवढंच ऐकून स्वीकारावं. बाकीची फोलपटं उडवून लावावीत. त्याचं पोट मोठं असावं, कारण त्याने काही गोष्टी आत सांभाळून ठेवाव्यात. त्याच्या पोटात माया असावी, कारण इतरांचे अपराध पोटात घेता यावेत. त्याचे डोळे बारीक असावेत म्हणजेच सूक्ष्मदृष्टी असावी. त्याने त्याच्या सोंडेने भविष्याचा वेध घ्यावा. हे गणपतीचं म्हणजेच नेत्याचं वर्णन आहे. शिवाय गणपतीला लाल रंगाची फुलं आवडतात. त्याच्या हातात पाश, अंकुश अशी शस्त्र असतात. त्याचा एक हात शस्त्र उगारणारा तर दुसरा आशीर्वाद देणारा आहे. त्याने अज्ञानरूपी उंदराला पायाखाली ठेवले आहे. कारण तो विद्य्ोची देवता आहे. अशा सगुण गणपतीचं जो ध्यान करतो तो योग्यांचा योगी होतो. असा ध्यान विधी सांगून गणपतीला नमन करून हे अथर्वशीर्ष संपतं. या नमनात व्रातपती, गणपती, प्रमथपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशी, शिवसुत, आणि वरदमूर्ती अशी आठ नावं वापरली आहेत. नंतरचा भाग हा फलश्रुतीचा आहे. निर्गुण, मंत्र आणि सगुण अशा तीन प्रकारांनी गणपती देवता या उपनिषदात उभी केली आहे. सगुण मूर्ती, निर्गुण ब्रह्म आणि मंत्रातून उमटणारं शब्दब्रह्म, नादब्रह्म म्हणजे गणपती असं ते स्वरूप आहे. अशा अतिशय व्यापक अर्थाने अथर्वशीर्षांत गणपतीचं वर्णन केलं गेलं आहे. अथर्वशीर्षांचं आवर्तन करण्याची विशिष्ट पद्धत आहे. आवर्तन करायला वेळ नसल्यास त्याचा अर्थ समजून एकदा ते म्हटलं तरी आवर्तनाचं पुण्य लाभतं असं म्हटलं जातं. या उपनिषदातून गणपतीची आराधना करण्याचं माध्यम आपल्याला उपलब्ध करून देणाऱ्या गणकऋषीला वंदन!
धनश्री लेले – response.lokprabha@expressindia.com