News Flash

गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी

एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.

गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी

आशुतोष बापट response.lokprabha@expressindia.com

देवा तूंचि गणेशु, सकळ मति प्रकाशु

म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी

वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी असे आवाहन केले आहे. त्याचे सुखकर्ता, विघ्नहर्ता हे स्वरूप आणि त्याचे मनामनांत असलेले स्थान पाहता कुठलीही गोष्ट सुरू करताना तिथे सर्वात आधी गणपतीची पूजा करणे हे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग झालेले आहे. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यांच्या काळात फारशी माहिती नसलेली ही देवता तुलनेने काहीशी उशिरा देवता संप्रदायात समाविष्ट झाली आणि सर्वात जास्त लोकप्रियसुद्धा हीच देवता झाली. या देवतेच्या प्राचीन अस्तित्वाचे तुटक तुटक संदर्भ साहित्यातून सापडतात. तरीही ही देवता तशी नंतरच्या काळात प्रकट झालेली दिसते; परंतु असे असले तरीही, लोकप्रियतेच्या बाबतीत इतर कुठल्याही देवतेपेक्षा गणपती हा सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. त्यामुळेच की काय, ‘बाप्पा’ हे प्रेमळ नामाभिधान फक्त याच देवाला प्राप्त झालेले दिसते.

कुठल्याही कामाची सुरुवात गणेशाच्याच नमनाने होते. ‘निर्विघ्नं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा’ या भावनेने गणरायाला सर्वात प्रथम पुजले जाते. यामागे गणपती ही विघ्नांची अधिपती देवता आहे, तिचे पूजन केल्यावर विघ्ने आसपाससुद्धा फिरकणार नाहीत असा विश्वास असल्यामुळे, गणपतीचे पूजन सुरू झाल्याचे अभ्यासक सांगतात. नंतर ही देवता विघ्नहर्ता म्हणूनच पुजली जाऊ लागली. संकटांचे निर्दालन करणारी देवता असल्यामुळे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीलाच

या देवतेला आवाहन करून तिची प्रतिष्ठापना कार्याच्या ठिकाणी करायची, म्हणजे कुठलेही विघ्न जरी आले, तरी त्याचे आपोआप निर्दालन होईल, अशी सर्वाची श्रद्धा.

आपल्याकडे गुप्तकाळानंतर हळूहळू मंदिरस्थापत्य मोठय़ा प्रमाणावर विकसित होऊ लागले. भारतात शैव, वैष्णव, शक्ती असे विविध पंथ-उपपंथ अस्तित्वात होते. त्यांच्या उपास्य देवतांची मंदिरे बांधली जाऊ लागली. मंदिरे कशी बांधायची, त्यांचे स्वरूप कसे असेल, त्या मंदिरावर कुठल्या मूर्ती आणि त्या कुठल्या ठिकाणी असायला पाहिजेत याचे एक विशिष्ट शास्त्र विकसित होत गेले. मूर्तिकला आणि मंदिरस्थापत्य हे हातात हात घालूनच विकसित होत गेल्याचे दिसते. मूर्ती, मंदिरे यांच्या निर्मितीसाठी विविध शास्त्रीय ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांतून एक ठरावीक शास्त्रोक्त पद्धती सांगितली गेली. मंदिरस्थापत्यात काही विशिष्ट गोष्टी प्रामुख्याने निर्माण होत गेल्या. गर्भगृहाचे दरवाजे हे विशिष्ट द्वारशाखांनी सजवले जाऊ लागले. त्या द्वारशाखांच्या संख्येवरून त्यांना नेमकी नावे दिली जाऊ लागली. एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.

द्वारशाखेच्या डोक्यावर मध्यभागी एक चौकट करून त्यात त्या संप्रदायाच्या देवतेची मूर्ती कोरली जाऊ लागली. त्यावरून अमुक एक मंदिर हे अमुक एका देवता संप्रदायाचे आहे, हे समजायला मदत होत असे. द्वारशाखेच्या डोक्यावरील जागा म्हणजे ‘ललाटावरची’ जागा आणि त्या ठिकाणी असलेली मूर्ती म्हणजे बिंब यावरून त्या ठिकाणाला ‘ललाटबिंब’ असे म्हणले जाऊ लागले. मग विष्णूचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गरुड दिसतो. देवीचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून क्वचित देवी किंवा कधी कधी गजलक्ष्मी दिसते. तर महादेवाचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गणपती असतो; परंतु दक्षिण भारतात गेलो तर, अनेक ठिकाणी मंदिर कुणाचेही असले तरीही ललाटबिंबावर गजलक्ष्मीचेच शिल्प पाहायला मिळते. अनेकदा मंदिरातील मूळ मूर्ती परकीय आक्रमणात भग्न झाल्यामुळे किंवा तिथून हलवली गेल्यामुळे गाभारा काही काळ मोकळाच असतो. मात्र कालांतराने त्यात शिवपिंडीची स्थापना केल्याचे दिसून येते. अशा वेळी ललाटबिंबावरून मूळ मंदिर कुणाचे असावे, याचा अंदाज बांधता येतो.

महाराष्ट्रात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गणपती ही देवता इथे लोकप्रिय होत गेली. तसेच गाणपत्य संप्रदायाचा विकास महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यामुळे गणपती या देवतेबद्दल कमालीची श्रद्धा आपल्याकडे दिसून येते. सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता हा प्रत्यक्ष गजाननच आहे, ही भावना आणि श्रद्धा महाराष्ट्रात फार खोलवर रुजलेली आहे. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण, हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह असते आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ अशी अवस्था भक्तांची होते. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नैराश्य पळून जाते. इतर कुठल्याही देवांपेक्षा गणपती हा प्रत्येकाला आपला सखा वाटतो, जवळचा मित्र वाटतो. म्हणूनच त्याला ‘त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु:, त्वम् अग्नी, त्वम् इंद्र’, असे म्हटले आहे. हे सगळे देव किंवा ती तत्त्वे या एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत, अशी भक्तांची पक्की धारणा आहे. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान’ असे तुकोबारायांनी गणेशाबद्दल म्हटले आहे.

या सगळ्या गोष्टींचा मंदिरस्थापत्यावरसुद्धा प्रभाव पडला आणि महाराष्ट्रात मंदिर कुणाचेही असो, परंतु काही अपवाद वगळता ललाटबिंबावर गणपतीचेच शिल्पांकन केले जाऊ लागले. मुख्यत्वे यादव साम्राज्याच्या विकासाच्या काळात जी काही मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली, त्यांच्या ललाटबिंबावर गणपतीच विराजमान झालेला दिसतो. खरे तर भारतभर इथे विविध देवतांचे अंकन बघायला मिळत असले, तरीही महाराष्ट्रात केवळ गणपतीच दिसत असल्यामुळे पुढे पुढे या स्थानाला ‘गणेशपट्टी’ हेच नाव प्राप्त झाले. ललाटबिंब हे नाव मागे पडून गणेशपट्टी हे नाव महाराष्ट्रात सर्वत्र रूढ झाले. इथे चार हातांचा गणपती एका हाताने अभय देताना दाखवलेला असतो. गणपतीचे विघ्नहर्ता हे रूप याला कारणीभूत असले, तरी पुढेपुढे गणेशाप्रति असलेली अपार श्रद्धा प्रबळ झाली. आता गणपती हे मांगल्याचे प्रतीक झालेले दिसते. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते सर्व गणपतीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी भक्तांची श्रद्धा! गणपतीचे हेच मंगलरूप त्यानंतर पुढे मोठमोठय़ा वाडय़ांवरसुद्धा दिसून येते. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्यावर जिथे जुने वाडे असतात, तिथे दरवाजावरील कोनाडय़ात गणेशाचे शिल्प हटकून दिसतेच. या मोठय़ा वाडय़ांच्या दरवाजावर गणपती बाप्पा विराजमान झाला. त्यानंतर साहजिकच घरांच्या दरवाजावरसुद्धा गणपतीचेच अंकन दिसते. यामागे भक्तांच्या दोन प्रकारच्या भावना असू शकतात. एक म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, त्यामुळे घराच्या दारावर बाहेरच्या बाजूला देवाचे अंकन केलेले असेल तर कुठलेही विघ्न घरात प्रवेश करूच शकणार नाही, ही एक भावना. तर दुसरी भावना म्हणजे गणपती हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे आपल्या वास्तूच्या मधोमध आणि उच्च ठिकाणी या मांगल्याची प्रतिमा असायला हवी, ही एक भावना.

किल्ले म्हणजे त्या त्या राजवटीच्या सामर्थ्यांचे प्रतीक! संरक्षणाचे मोठे काम या किल्लय़ांकडे होते. त्यांच्या दरवाजावरसुद्धा आपल्याला गणपतीच दिसून येतील. कधी दरवाजावर, तर कधी प्रवेश करताना बाजूच्या कोनाडय़ात गणेशाचे शिल्पांकन हटकून दिसते. शिवरायांचा देखणा किल्ला राजगड, याच्या सुवेळा माचीवरसुद्धा आपल्याला गणपती विराजमान झालेला दिसतो. म्हणजेच संरक्षण, सामथ्र्य, मांगल्य अशा प्रत्येक वेळी आपल्याला गणेशाचीच मूर्ती बघायला मिळते. जुन्नरजवळ असलेल्या किल्ले चावंडवर एकमेकाला जोडलेली पाण्याची सात टाकी आहेत. त्यातल्या एका टाक्यात उतरायला पायऱ्या आणि पुढे खडकात कोरलेला दरवाजा केलेला आहे. या दरवाजावरसुद्धा एका सुंदर चौकटीमध्ये गजाननाचे शिल्पांकन केलेले आढळते. यावरून त्या टाक्यांपैकी हे एकच टाके काहीसे वेगळे आहे आणि याचे पवित्र जल कदाचित किल्लय़ावरील मंदिरातल्या देवतेच्या अभिषेकाला वापरत असावेत. मांगल्याची ही खूण इथे अशी गणेशाच्या शिल्पांकनातून दिसते.

पुढे पेशवाईतसुद्धा मंदिरांच्या ललाटावर सर्वत्र गणपतीच पाहायला मिळतो. कोकणात या काळात लहानमोठी बरीच मंदिरे बांधली गेली. कोकणातली मंदिरे ही खास तिथल्या हवामानाला आणि पर्जन्यमानाला अनुकूल अशी असतात. म्हणजे मंदिराला उतरते कौलारू छत असते; परंतु कोकणातल्या अनेक मंदिरांमध्ये सभामंडपावर लाकडी कलाकुसर केलेली दिसते. या लाकडी कलाकुसरीची प्रवेशद्वारे आजही गणेशपट्टीने सजवलेली दिसतात. मुख्य गाभारा दगडी असेल तर त्यावर गणपती असतोच; परंतु त्यापुढचा सभामंडप लाकडी असेल तर त्याच्या चौकटीवरसुद्धा गणपतीचे देखणे शिल्पांकन असते. या सुंदर सजवलेल्या चौकटी आजही आपल्याला कोकणातल्या देवळांत दिसतात. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपतीचे गणेशपट्टीवरील स्थान हे आता अबाधित आहे. काळ बदलला, वास्तू बदलल्या तरीसुद्धा गणपती आणि त्याच्या प्रति असलेली श्रद्धा अजूनही तितकीच दृढ असलेली दिसते. आजही नवीन वास्तूचा दरवाजा, मग तो नवीन पद्धतीच्या सदनिकेचा दरवाजा जरी असला तरीही त्यावर आपल्याला गणपतीचे चित्र असलेलीच फरशी बसवलेली दिसते.

विघ्नहर्ता देव ते मांगल्याचे प्रतीक असा या देवाचा प्रवास फार सुंदर आहे. तो आपल्याला विविध मंदिरांवरील गणेशपट्टीच्या रूपाने आजही बघता येतो. नवीन कार्य आणि गणपती यांचा संबंध इतका दृढ झाला आहे, की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ झाला असा शब्द रूढ झालेला दिसतो. कुठल्याही वास्तूच्या गणेशपट्टीवरील देवाचे हे स्थान अढळ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता स्वरूपात गणेशाचा अभयहस्त भक्तांवर कायम आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2021 1:49 am

Web Title: ganesh chaturthi 2021 ganesh festival 2021 ganeshotsav 2021 article 02
Next Stories
1 ‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन!
2 निमित्त : गणपतीची मूर्ती कशी असावी?
3 तंत्रज्ञान : ‘डिजिटल रिमोट’ पालकांच्या हाती
Just Now!
X