News Flash

गणेश विशेष : ‘ती’ मूर्तिकार

मूर्तिकार रोहिणी पंडितला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तिचे मन अभ्यासापेक्षा कलेतच जास्त रमायचे.

गणेश विशेष : ‘ती’ मूर्तिकार

राधिका कुंटे response.lokprabha@expressindia.com
आज अनेक घरांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झाले असेल. ती प्रसन्न, सुबक आणि आशीर्वाद देणारी मूर्ती घडवणाऱ्या हातांपैकी काही हात ‘ती’चेही असतात. अशाच काही महिला मूर्तिकारांशी संवाद साधला. काही जणींनी लहानपणापासून मूर्ती घडताना पाहिलेली आहे, तर काही जणींना कलाशिक्षण घेतल्यावर मूर्तिकलेची गोडी लागली. खरेतर स्त्री-पुरुष भेद आता जवळपास सर्वच क्षेत्रांतून हद्दपार झाले आहेत. तरीही गणेश मूर्तिकलेच्या क्षेत्रात पुरुषांचंच आधिक्य दिसतं. त्यामुळे महिला मूर्ती घडवणार म्हटल्यावर काही ग्राहकांच्या मनात शंका येतातच. महिलांनी घडवलेल्या मूर्ती अशा शंकांचं पूर्ण निरसन करतात. मूर्तिकलेच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:च्या शैलीची खास ओळख निर्माण केली आहे. गणेशभक्तांकडून त्यांच्या कौशल्यांना दादही मिळत आहे.

मूर्तिकार जननी हडकर-बिर्जे.. लहानपणी बाबांबरोबर काकांच्या कारखान्यात जायची. त्या वेळी उंदीरमामा रंगवणे किंवा मोठय़ा गणेशमूर्तीचे पितांबर रंगवण्यापासून सुरुवात झाली होती. बारावीपासून ती मूर्तिकामाचे निरीक्षण करून शिकू लागली. नंतर छोटय़ा मूर्तीचे डोळे रंगवणे म्हणजेच लिखाई करणे, रंगकाम करणे असे करत ती मूर्तिकलेचे धडे गिरवू लागली. नंतर तिने जे. जे. कला महाविद्यालयातून शिल्पकलेतील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. जेजेला प्रवेश घेतल्यावर दुसऱ्या वर्षी स्वत: मातीचा गणपती घडवला आणि तिचा आत्मविश्वास वाढू लागला. आता जवळपास २० वर्षे ती हे काम करत आहे. सध्या ती लिखाई अर्थात मूर्तीचे डोळे रंगवण्याचे काम करते.

जननी सांगते, ‘बाबांनी प्रोत्साहन देत आमच्या घरचा गणपती करायला सांगितले. मग मित्रमैत्रिणींच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. हळूहळू विचार करून मी रंगसंगतीत थोडा बदल करू लागले. पूर्वी पितांबराचा रंग पिवळाच ठरलेला असायचा. मी सुरुवातीला हिरवा मग गुलाबी, लव्हेंडर असे रंग दिले आणि आता पिवळा सोडून सगळे रंग असतात. हे रंगातले वेगळेपण अनेकांना आवडले आणि ती मूर्ती उठून दिसते हे कळले. पूर्वी दागिने मातीचे असायचे. आता गेली काही वर्षे मी मोत्यांच्या, रुद्राक्षांच्या माळा वापरते. आधी बसलेलाच गणपती हवा असा एक आग्रह असायचा. मी आमच्या घरच्या गणपतीची उभी, नृत्यमुद्रेतली मूर्तीही करायचे. ती बघून काही जण तशी ऑर्डर देऊ लागले. सध्या खडे वगैरे लावायचा ट्रेण्ड आला आहे. पण ते इतके लावतात की मूर्तीकडे लक्षच जात नाही. आम्हाला कुणी ते लावायला सांगितले तर ते अगदी मोजक्याच ठिकाणी लावतो. माझी लिखाई गणेशमूर्तीच्या वेशभूषेला साजेशी असते आणि माझे काम लोकांना ओळखता येते. गणेशमूर्तीचा जीव म्हटले त्याच्या डोळ्यांमध्ये असतो. तो आपल्याकडेच बघतो आहे, असे वाटावे लागते. कधी-कधी पीओपीच्या काही मूर्ती घडवताना कारागीर जास्त घासतात, कधी पापणी तुटलेली असते. शेवटचा हात पूर्ण करताना ते दुरुस्त करावे लागते. लिखाईच्या वेळीच नाम लिहायचे असते. ते प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. काहींचे ठरावीक त्रिशूळाचे असते तर काहींना सोंड पूर्ण भरलेली हवी असते.

दोन वर्षांपूर्वी तिने कामत हॉटेलसाठी आठ हजार गणपतींची ऑर्डर घेतली होती. ती सगळ्यांच्या साहाय्याने आधी दिली आणि मग नेहमीच्या गणपतींकडे वळली. शेवटी तिच्या घरच्या आणि इतर काही गणपतींची लिखाई करायला वेळच मिळत नव्हता. रात्र-रात्र जागून ते काम पूर्ण केले. यंदा तिला लिखाई शिकवली त्या भावाला कामानिमित्त नेमके बाहरेगावी जावे लागले. त्यामुळे ८५ गणपतींच्या लिखाईचे पूर्ण काम तिच्यावर आले. दिवस-रात्र एक करून तिने काम पूर्ण केले. त्यातच बाबांची तब्येत बिघडल्याने तिची धावपळ झाली. आता ते बरे आहेत. तिच्या कामाला माहेर आणि सासरच्या सगळ्यांचा कायम पाठिंबा मिळतो. गणपतीखेरीज ती देवांच्या मिनिएचर मूर्ती करते. ड्रॉइंग क्लास घेते. गिफ्ट म्हणून देण्याजोगे क्ले किंवा ड्रॉइंगमध्ये पोर्टेट करते. कोविडमुळे गणेशमूर्तीची ऑर्डर कमी असली तरी विसर्जन घरी करायचे म्हणून का होईना, अनेकांनी पीओपीऐवजी मातीच्या मूर्तीचा पर्याय स्वीकारला, याचे कलाकार म्हणून समाधान वाटते, असे ती नमूद करते. गेल्या वर्षी आणि यंदाही त्यांनी मृदा गणेश तयार केले आहेत. ती सांगते की, ‘मूर्ती पूर्ण केल्यावर खूप समाधान मिळते. बाप्पाचे डोळे एकदम बोलके आहेत. चेहरा हसरा वाटतो, अशी दाद मिळाल्यावर आपले काम चोख झाल्याचे समाधान मिळते. एकेक भक्त मूर्ती घरी घेऊन जातात तेव्हा स्टुडिओ एकदम रिकामा वाटतो, पण एक बाप्पा माझ्याही घरी आलेला असल्याने थोडे बरेही वाटते..’

मूर्तिकार कल्याणी परदेशीने नाशिकच्या के. के. वाघ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये बीएफएला प्रवेश घेतल्यावर पहिल्या वर्षी पेंटिंग विषय घेतला होता. तिथे गेल्यावर शिल्पकला असल्याचेही कळले. मग तिने विषय बदलून शिल्पकला विषयात पदवी घेतली. पुढे नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फाइन आर्ट्स डिपार्टमेंटमध्ये एमएफए केले. म्युरल हा तिचा मुख्य विषय होता. तेव्हा हॉस्टेलसाठी चार रात्री जागून गणेशमूर्ती घडवली होती. पुढे विसर्जनाच्या वेळी मात्र तिचा जीव अगदी कासावीस होऊन गेला होता. ओझरच्या मिग विमानतळावर तिने केलेले ५ बाय १२ फुटांचे मिग२९चे म्युरल लावण्यात आले आहे. गेली सात वर्षे ती गणेशमूर्ती घडवण्याचे काम करते आहे. तिची शिल्पकला पाहून लोकांनी तिला गणेशमूर्ती करायला सुचवले. ती माती मळण्यापासून ते आखणीपर्यंत सगळे काम ती करते. तिचे आई-बाबा रंगकामात वगैरे मदत करतात. दर वर्षी १०-२० मातीच्या मूर्ती ती हातानेच करते. करोनाकाळातल्या निर्बंधांमुळे लोकांकडे वेळ आहे, त्यामुळे अनेक जण स्वत:च गणपती तयार करण्याचा प्रयत्न करतात. फोनवरून सल्ला विचारतात. थोडय़ा ऑर्डर कमी झाल्या आहेत, असे ती सांगते.

शिल्पकला शिकल्यापासून तिच्या घराचा गणपती तीच करत होती. सरावाने मूर्ती जमायला लागली. मूर्ती सजीव भासावी असा तिचा प्रयत्न असतो. डिझाइन रंगसंगतीचे करते. कुंदन वगैरे लावत नाही. काही हौशी लोकांना मूर्तीला फेटा बांधायचा असतो, पितांबर नेसवायचे असते. त्यानुसार ती मूर्ती घडवते. ती सांगते की, ‘कामासाठी कधी रात्री जागावे लागते, तर आई-बाबा मला सोबत म्हणून बसून राहतात. तेही मी करत असलेल्या कामाचा आनंद घेतात. प्रसंगी माझ्या कामाचा पसाराही आवरतात. घराचा गणपती सगळ्यात शेवटी रात्री जागून करते. मूर्तीकाम पूर्ण झाल्यावर ऑर्डर देताना भक्तांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मी निरखते. माझ्या मनाजोगे होईपर्यंत मी मूर्तीत सुधारणा करतच राहते, पण त्यांच्या चेहऱ्यावरून मला ते काम कसे झाले आहे, याचा अंदाज येतो. त्यांना आवडल्यावर आनंद वाटतो.’

मूर्तिकार रोहिणी पंडितला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. तिचे मन अभ्यासापेक्षा कलेतच जास्त रमायचे. पुढे यातच करिअर करायचे असे तिने ठरवले होते. वर्षां बंकपुरे यांच्या मार्गदर्शनामुळे तिने एसएमआरके-बीके-एके महिला महाविद्यालयात अकरावी-बारावीला फाइन आर्टस्ला प्रवेश घेतला. त्यात दोन विषय पेंटिंगचे होते. बारावीनंतर बॅचलर इन व्हिज्युअल आर्ट हा चार वर्षांचा अभ्यासक्रम केला. अलीकडेच तिने शेवटच्या वर्षांचे पेपर दिले. चौथीत ती एका कार्यशाळेत गणपती करायला शिकली होती. त्यानंतर गणपती करत राहिली. सराव होत राहिला. ती सांगते की, ‘वृक्षवल्ली फाऊंडेशन या संस्थेतर्फे आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्यापैकी यंदा पर्यावरणपूरक गणपतीचा संदेश स्थानिक वनविभागापर्यंत पोहोचला आहे. त्यांनी २५० गणपतींची ऑर्डर दिली, मात्र इतरही ऑर्डर असल्याने त्यांना १० दिवसांत १०० मूर्ती करून दिल्या. त्यामुळे आपसूक प्रसिद्धी मिळाली. आई-बाबा, मित्र-मैत्रिणींच्या सहकार्य आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. मूर्ती खूप असल्याने त्या साच्यातून काढल्या होत्या. एरवी शाडूच्या मूर्ती शक्यतो हाताने करते. कलाभ्यासातल्या पोर्टेट, फुलफिगर या विषयांचा मूर्ती करताना फायदा झाला. मी मुकुटाला पानासारखा आकार देते. हाताने मूर्ती करताना बारीकसारीक गोष्टींवर काम करता येते. साच्यात यांत्रिकपणा जास्त असतो. रंगासाठी हळद-कुंकू, अष्टगंध आदींचा वापर करते. काही वेळा अ‍ॅक्रॅलिक रंग वापरते.

यंदा तिने मोठी ऑर्डर घेतली आणि फक्त चार दिवस शिल्लक असताना तिला परीक्षेचे वेळापत्रक मिळाले. इकडे तर माती मळून ठेवली होती. गणपती करायला सुरुवात केली होती. त्यामुळे फारसा अभ्यास आणि काम करता आले नाही. त्यातल्या त्यात दोन्ही गोष्टींचा समतोल राखायचा प्रयत्न केला. ‘व्हिडीओ कॉल कर’ असा सरांचा निरोप आला तेव्हा ती वनखात्याच्या कार्यालयात होती. ही गोष्ट तिने कॉलेजमध्ये थिसिस सबमिट करायला गेल्यावर प्राध्यापकांना सांगितली.

सध्या कॉलेज ऑनलाइन सुरू आहे, काही वेळा नेटवर्कअभावी अडथळे येतात. कोविडपूर्वीच्या काळात कॉलेज पूर्ण दिवस असायचे, तेव्हा ती कराटे क्लासमध्ये शिकवायला जात असे. त्यामुळे मूर्तीसाठी जास्त वेळ देता येत नव्हता. ती ब्लॅकबेल्ट असून सहा वर्ष शिकवत आहे. मध्यंतरी तिच्या ग्रुपने वृक्षवल्ली फाऊंडेशनतर्फे लसीकरणासाठी जनजागृती केली. या सगळ्यासाठी आई-बाबांचा खूपच पाठिंबा मिळतो. शिक्षक दिनानिमित्त कॉलेजला गेली असताना तिच्या वडिलांनी २८ किलो माती मळून ठेवली होती. कराटेमध्ये करिअर करावं की पेंटिंगमध्ये याविषयी तिची द्विधा मन:स्थिती आहे. मास्टर्ससाठी तिला मुंबईत एसएनडीटी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे. ती सांगते, ‘ग्राहक मूर्ती घेऊन जातात तेव्हा इतके दिवस या कामात आपण गढलो होतो, चिक्कार पसारा होता, ढीगभर मातीची सोबत होती, पण हे काहीच आता नसणार, अशी हुरहुर लागतेच!’

मूर्तिकार जान्हवी कुलकर्णीने कलानिकेतनमध्ये बारावीनंतर जी.डी. आर्ट (पेंटिंग) केले आहे. त्याच वेळी एच.पी.टी. आर्ट आणि आर.वाय.के. सायन्स महाविद्यालयातून मानसशास्त्राची पदवीही घेतली आहे. आठ वर्षांपूर्वी तिच्या ओळखीच्या एका काकूंनी गणेश कार्यशाळेत केलेला गणपती बघायला बोलावले होते. तो बघून आपणही मूर्ती करू शकतो असे वाटल्याने तिने मूर्ती घडवली. ती बघून एक ऑर्डर मिळाली. नंतर ऑर्डर्स वाढत गेल्या आणि २०१६ नंतर ती मोठय़ा प्रमाणात ऑर्डर घेऊ लागली. यंदा तिने साधारण ८०० ते १००० गणपती मूर्ती केल्या आहेत. त्यातील काही साच्यातून तर काही हाताने केल्या आहेत. कलाशिक्षणामुळे रंगसंगती, प्रमाणबद्धता इत्यादींची माहिती होतीच. सुरुवातीला साचा कुठे मिळेल, तो कसा वापरायचा हे प्रश्न पडले पण अनेकांची मदत मिळाली आणि प्रश्न सुटत गेले. तरीही तिला हाताने मूर्ती करायला जास्त आवडते.

‘मी केलेल्या मूर्तीची बैठक शाडूचीच असते. पण रंगकाम आणि फिनिशिंग वेगळे असते. अ‍ॅक्रलिक आणि पावडर रंगांचा वापर करते. आधी एकटी आणि घरच्यांच्या मदतीने काम करत असे. आता तीन वर्षे दोनजण मदतीला येतात. कोविडची साथ सुरू झाल्यापासून घरच्यांच्याच मदतीने हे काम केले. गेल्या वर्षी सगळ्यांचा कल शाडूच्या मूर्तीकडे होता, त्यामुळे चांगला प्रतिसाद होता. एरवी मी पेंटिंग्जच्या ऑर्डर घेते. क्लास घेते. मूर्तीकामामुळे पेंटिंग मागे पडले नाही, उलट मूर्तिकामाच्या निमित्ताने स्केचिंग सुरू झाले. पुढे पेंटिंगचे शो होऊ लागले,’ असे ती आवर्जून सांगते. देश-विदेशात तिच्या चित्रांची प्रदर्शने झाली आहेत. काही पुरस्कारही मिळाले आहेत.

अजूनही अनेकांना पारंपरिक पद्धतीच्या साध्या मूर्ती हव्या असतात. काहींना कलात्मक मूर्तीही आवडतात. पण त्या पूजनासाठी आवडतात, असे म्हणता येणार नाही. पीओपी बंदीमुळे शाडू मातीकडे वळणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी पीओपीची मूर्ती बघायची सवय झालेली असते. त्यामुळे त्यात काहींना कुंदन वर्क, फेटा बांधणे वगैरे गोष्टी हव्या असतात, असे ती सांगते. ती गणेशमूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेत होते, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. येत्या काळात महिला मूर्तिकारांचा ग्रुप तयार करायचा तिचा मानस आहे.

ती सांगते की, ‘मूर्तिकाम संपून मूर्ती न्यायच्या वेळी मी पूर्ण ब्लँक असते. आदल्या दिवसापर्यंत डोक्यात असते की, आतापर्यंत केलेल्या कष्टांचे चीज होणार. लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहायला मिळणार, पण ते प्रत्यक्षात घडताना फक्त अपार समाधान आणि शांतता असते. रिते झाल्यासारखे, वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटते.’

मूर्तिकार जयश्री वराडकर-साळवी यांचे वडील सदानंद वराडकर प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. त्यांच्या कलेचा वारसा जोपासणारी जयश्री यांची पाचवी पिढी असून पुढे त्यांची मुलेही मूर्तिकामात मदत करत आहेत. जयश्री, त्यांची बहीण आणि भाऊ लहानपणापासून वडिलांना गणपती घडवताना बघतच होते. वडील परफेक्शनिस्ट होते. ते मूर्ती करायच्या आधी स्केच करायचे. लहानपणापासून मूर्तिकाम बघितल्यामुळे त्याची गोडी लागली आणि ती कला या भावंडामध्येही रुजली. निरीक्षण करून तुमचे तुम्ही शिका, असा वडिलांचा सल्ला असे. त्या सांगतात, ‘वडिलांसोबत काम करताना त्यांचा आदरयुक्त दरारा वाटायचा. त्यामुळे निरीक्षण करणेच जास्त असायचे. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. रुग्णालयात न्यावे लागले. इकडे कारखान्यात ५०-६० गणपती रंगवायचे बाकी होते. आम्ही ते काम जिद्दीने पूर्ण केले. नंतर आम्ही देवीच्या मूर्तीही घडवल्या. तेव्हा वडिलांना आमचे कलाकौशल्य पाहून समाधान वाटले. साधारण नव्वदच्या दशकापासून मी या कामाकडे वळले. आता भाऊ सुनील आमचा कारखाना बघतो आणि त्याला मी मदत करते. आमच्याकडे साचा आणि हाताने दोन्ही पद्धतींनी मूर्ती घडवतात. गेल्या वर्षी साथीमुळे मूर्तिकामासाठी गोरेगावहून गिरगावला येता आले नाही. यंदा थोडे निर्बंध शिथिल झाल्याने येता आले.’

जयश्री यांनी जेजेमधून फाइन आर्टस् आणि डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन केले आहे. त्यांच्या मते, त्यांच्या बाबांची कला हेच जणू एक पुस्तक होते. त्यामुळे कलाशिक्षण घेताना घरी शिकलेल्या कलेचा त्यांना फायदा झाला. नितीन देसाईंकडे नोकरीसाठी गेल्यावर त्यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती करायला सांगितली होती. ते मूर्तीकाम देसाई यांना आवडल्याने जयश्री यांना नोकरी मिळाली. त्यांनी इफ्फीच्या एका शोसाठी १८ फूटांच्या फिगर्स तयार केल्या. दादरमध्ये झालेल्या साहित्य संमेलनासाठी गणेशमूर्ती तयार केली होती. त्यानंतर जयश्री यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गणपतीच्या कामामुळे कामाचे व्यवस्थापन, संयम या गोष्टी कळल्या. अनेक प्रकारची माणसे भेटली. त्यांच्या आवडी-निवडी आणि स्वभाव दिसले, असे त्या आवर्जून सांगतात.

त्या म्हणतात की, ‘माझ्या वडिलांनी मूर्ती करणे ही कला म्हणून जोपासली व्यवसाय म्हणून नव्हे आणि तोच कलावसा आम्ही पुढे चालवतो आहोत. आम्ही वडिलांनी घालून दिलेल्या पद्धतीनुसार मूर्ती करतो. उदा. नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती आम्ही करतो. विविध रूपातल्या बालमूर्ती वडिलांनी त्यांच्या काळात घडवल्या होत्या. आम्ही आता शाडूच्या मूर्ती करतो. पोस्टर कलर्स वापरतो. आमचे बाबा सार्वजनिक गणपती करायचे तेव्हा हलते देखावे असायचे. तेव्हा गणपतीसह त्या देखाव्यातल्या सगळ्या पात्रांना वेषभूषा केली जायची.’

जयश्री सांगतात की, ‘माझ्या कामाची खासियत म्हणजे डोळे. वडिलांनी काम करणे बंद केल्यावर मी डोळे करायला लागले. तेव्हा अनेकजण मुद्दाम बघायला आले की डोळे कसे होत आहेत. त्यांनी डोळे बाबांसारखेच रंगवल्याची दाद दिली. गणपतीचा चेहरा, हाताची बोटे, आसन आणि डोळे ही आमच्या मूर्तीची वैशिष्टय़े आहेत. भावानेही ही गणेश मूर्तीची वैशिष्टय़े कायम ठेवली आहेत. आमच्या कारखान्यात बरेच विद्यार्थी दरवर्षी शिकायला येतात. त्यापैकी काहींनी त्यांचे कारखाने काढले आहेत. या करोनाकाळात अनेकांना मूर्तिकला शिकण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही. पुढल्या वर्षी करोनाचे संकट निवारून सगळ्या गोष्टी सुकर होऊ देत हीच बाप्पा चरणी प्रार्थना.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2021 1:54 am

Web Title: ganesh chaturthi 2021 ganesh festival 2021 ganeshotsav 2021 article 04 zws 70
Next Stories
1 गणेश विशेष : सुभाषितांतील गणपती!
2 गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी
3 ‘’जागर : मलाबार युद्धसराव आणि चीन!
Just Now!
X