प्रभाकर बोकील
गणपतीचे दिवस आले की, १९५५-५६ सालापासूनचा काळ आठवतो. गेल्या साठेक वर्षांत ‘गणपती’संदर्भात घडत गेलेले सारेच बदल जाणवतात; व्यक्तिगत तसेच सामाजिकदेखील. गेल्या साठ वर्षांच्या आठवणींची ही साठवण!

व्यक्तिगत पातळीवर लहानपणापासून देव म्हणजे ‘घरच्या देव्हाऱ्यातले देव’. त्यातील देवांच्या छोटय़ा पितळी मूर्ती, बाळकृष्ण अन् अन्नपूर्णा, तांब्याचे वा पंचधातूंचे देवीचे- खंडोबाचे टाक, काही जुन्या काळच्या तसबिरी. त्यातल्या काही मोठय़ा राजा रविवम्र्याच्या अप्रतिम चित्रकारीतील देवतांच्या तसबिरीदेखील होत्या, ज्या कालांतराने ‘मुंबईच्या जागेच्या अडचणीमुळे’ गावी ‘शिफ्ट’ झाल्या! मात्र आजही देव्हाऱ्यातली ‘कोदंडधारी रामाचं’ छायाचित्र असलेली ‘जिवंत वाटणारी’ तसबीर कुठल्या देवळातील, याचा पत्ता नाही. देव्हाऱ्यात सामावून गेलेले लग्नातले नवे बाळकृष्ण अन् अन्नपूर्णा वगळता, बाकीचे बहुतेक सर्वच देव माझ्या जन्माआधीपासूनचे, पूर्वापार चालत आलेले. या सर्वात दीड-दोन इंची पितळी गणपती म्हणजे जणू ‘कुटुंबप्रमुख’! साहजिकच दर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला ‘पाहुणा’ म्हणून येणाऱ्या बाप्पांची ऐट वेगळीच अन् त्या दिवसांत ‘माहेरी’ येणाऱ्या ‘ज्येष्ठा गौरींचा’ मानदेखील आगळाच. पूर्वापार अखंड चालत आलेला असा घरचा पाच दिवसांचा- गौरींसह विसर्जति होणारा- गणपती सोहळा.

वडिलांच्या पोलीस खात्यातील नोकरीतील दर तीन वर्षांनी मुंबईमध्येच होणाऱ्या बदल्यांमुळे, आमची शाळा कायम मध्यवर्ती दादरला असली तरी आमची ‘गणपतीची शाळा’ प्रत्येक ठिकाणी बदलायची. शाळा म्हणजे ‘चित्रशाळा’ अर्थात गणपतीचा कारखाना. हेच गणपतीचं ‘बुकिंग ऑफिस’ जिथं महिनाभर आधी गणपती ‘बुक’ करायचा. एरवी ठरावीक मूर्ती नंतर मिळेल याची गॅरंटी नसायची. मूर्ती जवळपास सव्वा फुटाची- शाडूची. (‘पर्यावरण’ हा शब्द नंतर ३०-४० वर्षांनी निर्माण झाला! पीओपी वा इको-फ्रेंडली वगैरे शब्दांची तर तेव्हा ओळख असण्याचं कारणदेखील नव्हतं.) तीसुद्धा पेणची ठरावीक साच्याची, ठरावीक बठकीची. त्या काळी मूर्तीची किंमत ‘आठ रुपये’ (बाप रे, त्या काळचे आठ.. त्या काळी महागच! एका आण्याला अख्खा नारळ मिळण्याचा तो काळ!) असल्याचं आठवतं! तशाच शाडूच्या मूर्तीची किंमत गेल्या ६० वर्षांत दीड-दोनशेपट झाली आहे. गणेश चतुर्थी येईपर्यंत दोन-तीनदा तरी ‘शाळेत’ जाऊन ‘आपला गणपती’ पाहून यायचा छंदच लागायचा! गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे उठून ‘बाप्पांना घरी आणायचा’देखील सोहळाच असायचा. (आदल्या दिवशी बाप्पांना घरी आणणं, ही नंतरची वाढत्या गर्दीमुळे स्वीकारलेली सोय.) अंतर कमी असेल तर पदयात्रा अन्यथा त्या काळच्या ‘व्हिक्टोरियात’ अर्थात बग्गीत बसण्याची संधी मिळायची. (ही बग्गी हल्लीच मुंबईतून हद्दपार झाली, तेव्हा दादरला शाळेत नेणारी ‘ट्राम’- हाफ तिकीट अर्ध्या आण्यांत, हीदेखील चनच- १९६४ साली निवृत्त झाल्याची आठवण झाली!) त्या काळी हीदेखील बाप्पामुळे पोरांची होणारी चनच!

प्राथमिक शाळेला गणपतीसाठी पाचही दिवस सुट्टी असायची. पाचवीनंतर मात्र फक्त चतुर्थीला अन् अनंत चतुर्दशीला सुट्टी. त्यामुळे मधल्या दिवसात गणपतीला घरी सोडून(!) शाळेत जायला पाय निघायचा नाही. मात्र शाळेत दीड- दिवसवाले पाच-दिवसवाल्यांपुढे हळवे व्हायचे.. ‘मजा येत असेल नाही पाच दिवस गणपती म्हणजे..’ असं काहीसं ऐकून बरं वाटायचं! दहा-दिवसवाले इनमिन कमीच, पाच दिवसांनी एकटे पडल्यामुळे कंटाळणारे. त्यांना ‘सार्वजनिक’ गणपतींची सोबत. शाळेच्या मधल्या सुट्टीत अन् शाळा सुटल्यावर असे आसपासचे सार्वजनिक गणपती ‘कव्हर’ करायचे. घरी गेल्यावर परळ-लालबाग, माझगाव-गिरगावचे गणपती बघायला जायचं. वेळ नेहमीच कमी पडायचा. त्या काळी गणपतींचे ‘अमुकतमुक राजा- सम्राट- नवसाला पावणारे’ असले प्रकार नसत. त्यामुळे सार्वजनिक गणपतीदेखील घरचाच वाटायचा! ‘गणपती बघायला जाणं’ हा सोहळा असायचा. एकूणच दिवस मजेचे होते.. उत्साहाचे होते.. त्या दहा दिवसांत अभ्यास दुय्यम ठरायचा, हादेखील त्या उत्सवाच्या आनंदाचाच महत्त्वाचा भाग!

पहिल्या दिवशी भुलेश्वर-दादरहून फुलबाजारातून हार-कंठीबरोबर केवडा-कमळ-पत्री आणली जायची. (हल्ली तिकडच्या प्रचंड गर्दी अन् धक्काबुक्कीमुळे – अन् वाढत्या वयानुसार- लोकल स्टेशनबाहेरच्या बाजारात समाधान मानावं लागतं.) मात्र दुर्वा- तेरडा- कण्हेर- जास्वंद- गुलाब या गोष्टी विकत आणायच्या नाहीत, तर इतरांच्या बागेतून तोडून आणायच्या, हा शेजारधर्म सगळेच पाळायचे. आज या सगळ्याच गोष्टींना भरमसाट पैसे मोजावे लागतात. गणेश चतुर्थीला (अन् ‘व्हॅलेंटाइन डेला’!) दहा रुपयाला एक गुलाब असतो हल्ली! तर केवडा चुकून दिसला तरी ५० रुपये पान वा ५०० रुपये कणीस! हल्ली तर रोजच्या डाळ-कांद्याचे भावदेखील डोळ्यांत पाणी आणणात.. असो, ही ‘श्री महागाईदेवीची आरती’ कधी न संपणारी!

त्या काळी सकाळ-संध्याकाळ होणारे आरत्यांचे गजर- मंत्रपुष्पांजली अन् अथर्वशीर्षांची आवर्तनं, यासाठी शेजारपाजारच्या वेळा ‘अ‍ॅड्जस्ट’ केल्या जायच्या. हा देखील ‘शेजारधर्माचाच’ भाग होता. अशा वेळेस अथर्वशीर्ष न येणाऱ्यांनी, ‘सिनेमातली गाणी बरी पाठ होतात?’, हे ऐकण्याची तयारी ठेवायची. नेमका तो सिने-संगीताचा ‘सुवर्ण काळ’ होता, त्याला आमचा देखील नाइलाज होता! (त्यातून त्या काळी रेडिओ सिलोन जवळचा असल्याचं आठवतं! त्यानंतर विविधभारती आली अन् सिलोनचं श्रीलंका झालं!) या गाण्यांचा फायदा सार्वजनिक गणेशोत्सवातल्या ‘स्थानिक’ कार्यक्रमात व्हायचा. अशा सार्वजनिक उत्सवातील बाहेरून आलेला सिने-संगीत ऑर्केस्ट्रा अन् -पडद्याच्या दोन्ही बाजूंनी बघता येणारा- रात्रीचा चित्रपट (हा आनंद हल्लीच्या ‘स्मार्ट-फोन’ पिढीतल्या स्मार्ट पोरांना कसा कळणार?), नामवंत संस्थांच्या नाटकांची हजेरी, नावाजलेल्या गायकांच्या मफली, यासंबंधी बातम्या गल्लोगल्ली इत्थंभूत पसरायच्या. त्या काळी फोन फक्त श्रीमंत घरीच असायचे. (मोबाइल आल्यावर अशा फोनचं हल्ली ‘लॅण्डलाइन’ असं नव्यानं बारसं झालं!) एकूण त्या काळी घरचा गणपतीदेखील खऱ्या अर्थाने घराघरांतून ‘सार्वजनिक’ व्हायचा अन् सार्वजनिक गणपती ‘घरचा’ वाटायचा, असा सगळा माहोल असायचा!

गणपतीचा दुसरा दिवस, दीड दिवसवाल्यांसाठी महत्त्वाचा. अन् इतरांसाठी तिसऱ्या दिवशी घरोघरी येणाऱ्या ‘गौरी-आवाहनाच्या’ तयारीचा. त्यातून आमच्या गौरी पितळी मुखवटय़ांच्या. मुखवटे दोन पिढय़ांचे जुने! चिंचेनं लख्ख घासून ठेवलेले गौरींचे पितळे मुखवटे रंगवणं हे दुसऱ्या दिवशीचं मुख्य काम. मूर्तीचं सारं देवत्व मूर्तीच्या डोळ्यांत असतं, हे तेंव्हापासून मनावर ठसलं. तिसऱ्या दिवशी शाळेतून घरी आलं की दारातूनच थेट दोन उभ्या ‘मंगल’गौरी दिसायच्या. जरीच्या साडय़ा नेसवलेल्या, दागदागिने-फुलवेण्यांनी नटलेल्या. मन हरखून जावं असं बाह्य़रूप.. आणि अंतरंग तर पूर्ण रचनात्मक अन् प्रतीकात्मक! डब्यांवर डबे ठेवून उभ्या शरीराचा आकार आणायचा. त्या डब्यांतून गहू-तांदूळ, धान्य-डाळी, खारीक-खोबरं, बदाम-हळकुंड, वगैरे ठेवायचं.. ही अन्नपूर्णेची समृद्धी! कालांतराने गौरींचे सोयीस्कर स्टॅण्ड आले तरी आतमध्ये हे डबे तसेच ठेवले जातात. नंतर चकलीचा सोऱ्या उपडा बांधून त्या खांद्यावर मुखवटा ठेवायची सोय करायची. या साच्याला साडी-चोळी नेसवायची हा खरा स्त्रियांच्या कौशल्याचा भाग. मग गौरींचे चमकदार मुखवटे तबकातल्या तांदुळावर ठेवून, मुख्य दरवाजातून ‘गौरी आल्या सोन्या-मोत्यांच्या पावलांनी’ असं गात त्यांना घरभर फिरवून मग मुखवटे सोऱ्यावर बसवायचे, अन् डोईवरून पदर घेतला की, गौरी-आवाहन पूर्ण झालं! अशा उभ्या गौरींना देखील ‘गौरी बसल्या’ म्हणायचं, हे गमतीशीरच!

गौरींच्या आगमनानंतर तीन दिवस तीर्थ-प्रसादाला येणाऱ्यांची गर्दी वाढायची ती थेट गौरी-गणपती विसर्जनापर्यंत. त्या काळी पोलीस क्वार्टर्समधल्या कॉन्स्टेबल इ़क्बाल शेखपासून सबइन्स्पेक्टर डिसूझासाहेबांपर्यंत अन् इन्स्पेक्टर कृपालसिंग साहेबांपासून ए.सी.पी. राममूर्तीसाहेबापर्यंत सगळ्यांची हजेरी लागायची. ‘हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई, सबको मेरा सलाम..’ हाच त्या काळांत ‘एकमेव धर्म’ वाटायचा. रात्री होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमातून ऑर्केस्ट्राला गाण्यांची फर्माईश व्हायची. त्यात ‘प्यार हुआ, इकरार हुआ..’, ‘मांग के साथ तुम्हारा..’ पासून ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा..’, ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम..’ पर्यंत कुठलीही लोकप्रिय गाणी हमखास असायची! हिंदी सिनेमातली गाणी पाठ होण्यांत रेडिओपाठोपाठ अशा कार्यक्रमांचा देखील हात निश्चित होता! (‘अथर्वशीर्ष’ त्यामानानं अवघडच!) ‘सर्वधर्मसमभाव’ हा फार नंतरचा शब्द. एकूणच लहानपणीच्या त्या दिवसांत गणेशोत्सव म्हणजे मजेचा ‘आनंदोत्सव’ असायचा. मुख्य म्हणजे तेंव्हा आयुष्य ‘नििश्चत, निरागस अन्.. निर्भय’ होतं. हे सारं वय वाढत गेलं तसं हातातून ‘निसटत जाताना’ जाणवत गेलं!