विशाखा कुलकर्णी

गणपती उत्सवात तरुणाई हिरिरीने भाग घेते. सगळ्या प्रथा परंपरा भक्तिभावाने पाळते. दुसरीकडे सार्वजनिक पातळीवर या उत्सवाकडे एखाद्या इव्हेंटसारखे बघते. तरुणाईमुळे हा उत्सव म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ झाला आहे. 

गणपतीची तयारी सध्या सगळीकडेच झोकात सुरू आहे. गल्लोगल्ली आणि नाक्यानाक्यावर असणाऱ्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून तयारी केलेली आहे आणि घरात इकडची काडीही तिकडे न करणारी सर्व तरुण मंडळी आपापल्या मंडळाच्या प्रत्येक तयारीत अतोनात उत्साहाने सहभाग घेताना दिसत आहेत. ऑफिसात उच्चपदस्थ असणारी व्यक्ती गणपतीच्या मंडपात कसलीही लाज न बाळगता सतरंज्या अंथरण्यापासून ते प्रसाद वाटण्यापर्यंतची कामं अगदी मनोभावे करते. समाजाच्या सर्व थरांमध्ये लाडक्या असणाऱ्या बाप्पाच्या सेवेत कधीच कुठे भेदाभेद दिसत नाही. इंटरनेटच्या या जमान्यात पंढरीची वारी, नवरात्र असे सगळेच सण ‘इव्हेंट’ झालेले असताना गौरी-गणपती तर या ‘इव्हेंट्स’च्या यादीत अग्रेसर आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव जसजसे व्यापक स्वरूप धारण करू लागला, तसतसं तरुणाईच्या ऊर्जेला वाट करून देणारा हा सण, गणेशाच्या भक्तीबरोबरच त्यातल्या ‘सेलिब्रेशन’साठी जास्त आवडीचा ठरला. गणेशोत्सव म्हणता क्षणी बाप्पाच्या प्रसन्न मूर्तीसह मिरवणुकीत भान हरपून नाचणारे तरुण मुलं-मुली येतातच. आता गणपती न नाचता, नुसता वाजत-गाजत आणला तरी चालतो; पण गणपतीची स्थापना आणि विसर्जन मिरवणुकीशिवाय केलंय, अशी कल्पना तरी करता येते का? अर्थात नाही! मग तरुणाई गणपतीच्या सणाकडे केवळ ‘सेलिब्रेशन’साठी, ‘फुल्टू एन्जॉयमेंट’ म्हणूनच बघते का? जरा आजूबाजूला बघितलं की लक्षात येतं, खरं तर असं नाहीये. एरवी देवाधर्मात फारसा इंटरेस्ट नसलेल्या मंडळींनाही बाप्पा आपल्या जवळचा वाटतो, भलेही तरुणाई पूजाअर्चा- अभिषेक असे प्रकार करताना दिसणार नाही, भलेही आरत्या म्हणताना जोरजोरात सूर लावून आरती करतेवेळेस धांगडिधगा करतील, पण याच बाप्पाकडे डोळे मिटून आपल्या मनातली गोष्ट अगदी एखाद्या मित्राला सांगावी तशी सांगतील. मंडळाच्या गणपतीला दिवसभर वाहिलेले असणारे घरातले तरुण, घरच्या पूजेलाही, ‘‘बाबा, या वेळी मी पूजा करतो,’’ असं म्हणत जबाबदारी आनंदाने आपल्या खांद्यावर घेतील आणि अगदी मन लावून गणपतीची प्रतिष्ठापना करतोय हे पाहून वडिलांनाही आपली कित्येक वर्षांची परंपरा यापुढेही अबाधित राहील हे मनोमन पटेल.

आजच्या घडीला गणपतीत नयनरम्य देखावे, आगमन, विसर्जनाची मिरवणूक, सकाळ-संध्याकाळच्या आरत्या हे अगदी सर्वत्र दिसते; पण महाराष्ट्राच्या अनेक भागांत गणेशोत्सवात अनेक आगळ्यावेगळ्या परंपरा असतात. त्या त्या भागातील तरुण मंडळी या प्रथा अगदी मनापासून पुढे नेत असतात. या परंपरांची माहिती जाणून घेतल्यास अनेक वैविध्यपूर्ण प्रथा समोर येतात.

कोकणात गौरी-गणपती हा वर्षांचा सण. त्यासाठी अगदी जगाच्या कुठल्याशा कोपऱ्यात असला तरी गणपतीसाठी कोकणी माणूस घरी येतोच. कोकणात गावातील प्रत्येक घरात गणपती आणि घरातला गणपती म्हटल्यावर अगदी काहीही झालं, घरात एखादी दु:खद घटना जरी घडली तरी गणपती बसवला जातोच. याबद्दल कोकणातील डॉ. बापू भोगटे एक मजेशीर गोष्ट सांगतात. कोकणात काही गावांमध्ये घरात गणपतीच्या स्थापनेची सुरुवात कशी होते या प्रश्नाचं उत्तर ते देतात, ‘‘९० टक्के घरांमध्ये गणपती हे चतुर्थीच्या दिवशी पहाटे एक ते पाच या वेळेत घरमालकाला फसवून किंवा चोरून ठेवले जातात आणि जाताना घराबाहेर भरपूर फटाके फोडून जातात.’’ या कोकणातल्या गणपती ठेवणाऱ्या टोळीमध्ये गावातीलच काही खोडकर तरुण असतात. मग या सगळ्या गणपती ठेवण्याच्या कार्यक्रमासाठी नीट नियोजन करून, आधीच छोटीशी मूर्ती बुक करून आणली जाते, घरमालकाला बोलण्यात गुंतवून घराबाहेर किंवा आत नेऊन आपण बाहेर मूर्ती ठेवून पसार व्हायचे. बाहेर फटाक्यांचा आवाज आला, की घरमालकाला काय ते लक्षात येते आणि मग या टोळक्याचा इरसाल मालवणी शिव्यांनी उद्धार न झाला तरच नवल! फसवून बसवलेला असला तरी या गणपतीचे स्वागत मात्र आनंदाने याच टोळक्याचे तोंड गोड करून केले जाते. कोकणात मालवणी मुलखात आपल्या लाडक्या बाप्पाच्या लाडक्या उंदरासाठी गणपतीतील दहा दिवसांपैकी एक दिवस राखून ठेवतात. त्यालाच हुंदरबी असंही म्हणतात. या दिवशी खास उंदरासाठी नवेद्य दाखवतात आणि दुसऱ्या दिवशी हाच नवेद्य घरातील कर्ता पुरुष अगदी पहाटे शेतात नेऊन उंदीरमामासाठी ठेवतो. याच दिवशी शेतातील अनेक महत्त्वाची कामेदेखील केली जातात. कोकणात कुठे गणपतीच्या दिवशी पहाटे ढोल वाजवून सगळ्या गावाला उठवण्याची पद्धत, तर कुठे रात्री पुरुष मंडळींनी एकत्र जमून फुगडय़ा घालायची पद्धत.. आणि या सगळ्यांमध्ये तरुणाईचा हिरिरीने असलेला सहभाग. अशा किती तरी वेगळ्या परंपरा कोकणात शेकडो वर्षे चालल्या आहेत आणि तरुणांच्या त्यात असलेल्या सहभागामुळे त्या अखंड राहतील याबद्दल कोकणी माणूस निश्चित आहे.

गणपतीत घरोघरी जागरण करण्याची परंपरा सर्वत्र दिसून येते आणि या जागरणाचा वेळ कसा घालवावा याचीही ‘सोय’ करून ठेवलेली दिसते. अनेक ठिकाणी गणपतीच्या तिसऱ्या दिवसानंतर पत्ते खेळायला सुरुवात होते. यासाठी दहा-बारा जणांचा ग्रुप असतो. हा ग्रुप आरती झाल्यानंतर जो डाव सुरू करतो, तो अगदी पहाटे पाच-सहा वाजेपर्यंत हा खेळ रंगतो. आता या गटाला चहापाणी पुरवण्यासाठी एक हरकाम्या असतोच, जो चहापाण्याच्या खर्चातून आपला खर्च काढण्यात माहीर असतो. कधी खूप पैसे लावून, तर कधी केवळ आनंदासाठी जागरणात पत्ते खेळले जातात. याचा गणपतीशी जरी काही संबंध नसला, तरी वर्षांनुवर्षे खेळत असल्यामुळे आता हे नित्याचेच झाले आहे.

मराठवाडा-खानदेश भागामध्ये  गणपतीपेक्षाही महत्त्व असते गौरीला. इकडे त्याला महालक्ष्म्या असे म्हटले जाते. या महालक्ष्म्यांची अगदी मोठी तयारी केली जाते. त्यांच्यासमोर बांधण्यासाठी फराळाच्या विविध पदार्थाचा फुलोरा केला जातो. घराघरांतील मुलींची या कामी आईला मदत होतेच, शिवाय त्यांच्यासमोर जी सजावट केली जाते, त्याचं खातं घरच्या तरुणाईकडेच असतं. मग घराघरांत केलेल्या सजावटींची चुरस असते. पुण्या-मुंबप्रमाणे मराठवाडय़ातही तरुणाई एकत्र येऊन सार्वजनिक गणपती बसवते; पण यातही एक वेगळेपण म्हणजे इतर वायफळ खर्च कमी करून इथे प्रत्येक मंडळ गणपतीच्या दहा दिवसांपैकी एका दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करते. या भंडाऱ्यात दालबाटी, मसालेभात अशी मेजवानी ठेवली जाते आणि सर्व जातीधर्माच्या सर्व स्तरांवरील माणसांना एकत्र आणत हा भंडारा केला जातो.

ही अगदीच काही उदाहरणे झाली; पण मलागणिक बदलणाऱ्या भाषेसोबतच प्रत्येक ठिकाणच्या प्रथाही बदलतात आणि त्या इतक्या अनोख्या असतात की, आपल्या सणाचं वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही.

गणपतीचा सण एकीकडे इव्हेंट झालेला असताना, त्यात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असताना अशा वेगवेगळ्या परंपरांची होणारी जपणूक पाहिल्यावर आपल्या संपन्न संस्कृतीचा वारसा जतन होतोय याची जाणीव होते आणि याचबरोबर या परंपरांना कुठेही अंधश्रद्धेची किनार लागू न देता नव्या-जुन्याची सांगड घालत या परंपरा पुढे नेण्याची जबाबदारीसुद्धा आजच्या तरुण पिढीकडे येते.