News Flash

साहित्य : आहे मनोहर तरी…

या वर्षी भारतीय भाषा, त्यांमधले साहित्य व्यवहार, या भाषांपुढचे प्रश्न हा लिटफेस्टचा मुख्य विषय होता.

एनसीपीएच्या प्रसन्न परिसरात नुकतंच पार पडलेलं दुसरं गेटवे लिटफेस्ट म्हणजे भारतीय प्रादेशिक भाषांचा लाघवी मेळाच. पण प्रादेशिक भाषा, त्यांच्या समस्या यांची चर्चा सामान्य माणसांपर्यंत न नेता शहराच्या एका टोकाला आणि तीही देशाच्या लोकभाषेत न केल्यामुळे ती फक्त बुद्धिवाद्यांपुरतीच मर्यादित ठरली.

साधारण दिवाळी संपल्यानंतर डिसेंबरपासून ते फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत सगळीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांचा अक्षरश: धबधबा सुरू असतो. छान थंडीमध्ये संगीत-नृत्य- साहित्य असे विविध महोत्सव सुरू असतात. अखिल भारतीय साहित्य संमेलन असतं, नाट्य संमेलन असतं, या काळातलं हवामानच बहुधा काहीतरी साजरं करायला प्रोत्साहन देणारं असतं. त्यापकीच नुकताच मुंबईत एनसीपीए इथं पार पडलेला एक महोत्सव म्हणजे गेटवे लिटफेस्ट २०१६. मल्याळम् पत्रिका ‘काका’ आणि पॅशन फोर कम्युनिकेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे दोन दिवसीय गेटवे लिटफेस्ट आयोजित करण्यात आले होते. अर्थात हे वर्ष या लिटफेस्टचं दुसरं वर्ष आहे.

या वर्षी भारतीय भाषा, त्यांमधले साहित्य व्यवहार, या भाषांपुढचे प्रश्न हा लिटफेस्टचा मुख्य विषय होता. त्याशिवाय मग भारतीय सिनेमांमधलं फिक्शन आणि वास्तव या परिसंवादात भारतीय सिनेमे फिक्शनपेक्षा वास्तववादी विषयांना जास्त प्राधान्य देऊ लागलेत का, पूर्वेतर भाषांमधल्या साहित्याकडे दुर्लक्ष होतंय का, आजच्या तंत्रसमृद्ध काळात अनुवादाकडे खरंच गांभीर्याने बघितलं जातंय ना, आजची कविता फेसबुक्ड किंवा व्हाट्सअपमय झाली आहे का, मुक्त अर्थव्यवस्थेच्या दडपणाखाली मल्याळी साहित्य मान तुकवतंय की विरोध करतंय, इंग्रजी भाषा पौराणिक लिखाणाचा प्लॅटफार्म व्यापून टाकत आहे का असे विविध विषय होते.

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन् यांच्या हस्ते लिटफेस्टचं उद्घाटन झालं. आपल्या छोटेखानी भाषणात अदूरजींनी सांगितलं की आपल्या देशात जयपूर फेस्टिव्हलसारखे अनेक लिटरेचर फेस्टिव्हल होतात. त्यात प्रादेशिक भाषांना अगदी नाममात्र स्थान असतं. गेटवे लटफेस्टने ही परंपरा मोडून चांगला पायंडा पाडला आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण सलमान रश्दींनी मध्यंतरी असं विधान केलं होतं की भारतीय भाषांमध्ये काही घडतंच नाही. वास्तविक भारतीय प्रदेशिक भाषांच्या साहित्यातून भारतीय भाषांची श्रीमंती अनुभवायला मिळते. त्यामुळे भारतीय भाषांमध्ये काय घडतं ते सांगणारा महोत्सव म्हणून हा महोत्सव महत्त्वाचा आहे.

वरचष्मा कुणाचा…

लिटफेस्टच्या उद्घाटनानंतर सुरुवातीलाच इंग्रजी लिहिणाऱ्या भारतीय लेखकांच्या प्रभावापुढे प्रादेशिक भारतीय लेखकांची, या भाषांमधल्या साहित्याची वाढ होते आहे का असा विषय होता. या परिसंवादात ज्ञानपीठ विजेते ओडिसी लेखक- सीताकांत महापात्र, ज्ञानपीठ विजेत्या ओडिसी लेखिका- प्रतिभा राय, साहित्य अकादमी तसंच कबीर सन्मान विजेते गुजराती लेखक- सीतांशु यशचंद्र, एनएस माधवन हे क्रॉसवर्ड पारितोषिक विजेते मल्ल्याळी लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली लेखक सुबोध सरकार सहभागी झाले होते. सूत्रसंचालनासाठी या परिसंवादाची सूत्रं हातात घेताना बंगाली लेखक सुबोध सरकार म्हणाले की जयपूर फेस्टिव्हलसारख्या कार्यक्रमांमुळे परदेशी लोकांना वाटत असतं की भारतात फक्त इंग्रजीच लिहिली, वाचली, बोलली जाते. वास्तविक इथे इतक्या भाषा, त्यांच्या बोली आहेत, की ही भारताची सांस्कृतिक श्रीमंती आहे. रश्दींसारखे लोक असं समजतात की भारतातलं उत्तम साहित्य इंग्रजीमध्ये लिहिलं जातं. पण खरं सांगायचं तर मराठीतल्या भालचंद्र नेमाडेंसारख्या लेखकाचं साहित्य हे इंग्रजीत लिहिणाऱ्या कोणाही लेखकापेक्षा शंभर टक्के उत्तम दर्जाचं साहित्य आहे. त्यामुळे इंग्रजीत लिहिणारे आणि प्रदेशिक लेखक असा भेदभावच मुळात करता कामा नये.

सीताकांत महापात्र हे ओडिसामधले ज्ञानपीठ विजेते लेखक, कवी. प्रादेशिक भाषांमधल्या साहित्याबद्दल बोलताना ते म्हणाले की कुणीही ज्या भाषेत स्वप्नं पाहतो, त्याच भाषेत कविता लिहू शकतो. आणि कवी आपल्या कवितेतून वास्तवाचे अनेक दडून राहिलेले पलू उलगडून दाखवत असतो. हे पलू भाषेच्या शक्यतेत आणणं हे काम कवी करत असतो. त्याच्यासाठी कविता हे एक प्रकारचं मेडिटेशनच असतं.

ज्ञानपीठ विजेत्या ओडिसी लेखिका प्रतिभा राय यांना प्रादेशिक लिखाण असा उल्लेखही मान्य नाही. त्यांच्या मते इंग्रजी हीसुद्धा आता भारतातली एक प्रादेशिक भाषाच आहे. त्यांनी आपल्या भाषणात मातृभाषा नदीसारखी असते, ती पूर्वजांचा आशीर्वाद असते आणि ती स्वप्नांसारखी आपल्यातून वहात असते अशा आशयाची एक कविता सादर केली. त्या म्हणाल्या की भाषा प्रादेशिक असते, पण साहित्य वैश्विक असतं. आपल्याकडे इतक्या भाषा आहेत, पण त्यांचं काय चाललंय हे आपल्याला समजू शकत नाही. ते शक्यही नाही. पण म्हणून कुठलीच भाषा कमी जास्त, लहान मोठी असू शकत नाही. त्या सगळ्याच तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. आणि भाषा कुठलीही असो, तुम्हाला खरंच लिहायचं असेल तर तुम्हाला कुणी थोपवू शकत नाही. नवीन लिहिणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की आपल्याला लेखक व्हायचंय, मनोरंजनकार नाही.

लेखक सीतांशु यशचंद्र हे गुजरातमधलं लोकप्रिय व्यक्तिमत्त्व. त्यांनी आपल्या भाषणात भारतीय भाषांचं नेटवìकग होण्याची गरज व्यक्त केली. एवढंच नाही तर बंगाली लेखकाची समीक्षा ओडिसी लेखकाने करायला हवी, मराठी लेखकाची समीक्षा तमीळ लेखकाकडून व्हायला हवी, म्हणजेच प्रादेशिक भाषांमधलं साहित्य एकमेकांपर्यंत पोहोचायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं. या परिसंवादाचा इंग्रजीच्या तुलनेत प्रादेशिक भाषांची वाढ होते आहे का, असा विषय होता. त्याबद्दल आक्षेप घेत ते म्हणाले की वाढ हा शब्दच चुकीचा आहे. इंग्रजीची वाढ होत असेल तर ती बांडगुळी पद्धतीची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अडीचशे वर्षांपूर्वी जी भाषा इथे कुणाला माहीत नव्हती, ती इथला सगळा परिप्रेक्ष्य व्यापून टाकेल ही भीतीच अनाठायी आहे. भारतीय साहित्यातला एक दिवस हा हजार दिवसांइतका आहे. आज इंग्रजीत लिहून पसा मिळतो म्हणून लोक तिकडे जातात. पण लेखकाला कशाला हवा आहे पसा? तुम्ही तुमच्या शाईने नाही तर घामाने लिहा. संध्याकाळी सर्दी झाली म्हणून रात्री औषध घेतलं आणि सकाळी सर्दी बरी झाली. तसं इंग्रजी लिखाणाचं आहे. ते खूप तात्पुरतं आहे. गेल्या तीन हजार वर्षांच्या आपल्या इतिहासाशी कसं जोडून घ्यायचं हे प्रादेशिक भाषेत लिहिणाऱ्यांना माहीत आहे. इंग्रजीत लिहिणाऱ्यांना नाही. त्यामुळे आजचं बाजारपेठेवर प्रभाव टाकणारं भाषेच राजकारण उद्या बदलणार आहे हे नक्की. ती नवी पहाट होईपर्यंत आपण लिहीत राहिलं पाहिजे.

हाच धागा पुढे नेत मल्याळी लेखक एन. एस. माधवन म्हणाले की तुम्ही काय खाता, काय घालता हे आजच्या काळात बाजारपेठ ठरवत असते, तसंच भाषेच्या बाबतीतही होत आहे. पण सगळा दोष इंग्रजीला देता येणार नाही. िहदीमुळेही एक प्रकारचा दबाव तयार होतो. सगळीकडे आता एकजीनसीपणाचा ट्रेण्ड आहे. त्याचाच हा भाग आहे. एका समूहाला इथल्या सगळ्यांनी िहदी बोलणं अपेक्षित आहे. मी िहदीविरोधी नाही, पण हा माझ्या भाषेच्या अस्मितेचा (आयडेंटिटी क्रायसिस) मुद्दा आहे. लेखकांनी असल्या गोष्टीत न पडता चांगलं साहित्य निर्माण करण्याचं काम करावं. अर्थात इंग्रजी- िहदी या वादांची चिंता वाटण्यापेक्षा मला चेतन भगत लाटेची जास्त चिंता वाटते. कारण अशा लाटेमुळे इतक्या आवृत्त्या निघणं, इतका पसा मिळणं म्हणजेच यश असं तरुण पिढीला वाटू शकतं, हे जास्त धोक्याचं आहे.

या सत्राचा समारोप करताना सूत्रसंचालक बंगाली लेखक सुबोध सरकार म्हणाले की साहित्याच्या क्षेत्रात एके काळी सोव्हीएत लाट होती, मग स्पॅनिश लाट आली, आत्ता आपल्याकडे चेतन भगत लाट आहे, तशी यापुढच्या काळात व्हॅट्सअप रायटिंग, फेसबुक रायटिंग अशी पॅकेज रायटिंगची लाट येऊ घातली आहे.

सिनेमातलं कल्पित आणि वास्तव

यानंतरचा परिसंवाद रंगला तो सिनेमांमधलं कल्पित आणि वास्तव या विषयावर. आपले सिनेमे कल्पित सोडून वास्तवाकडे अधिक झुकत आहेत का या विषयावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते मराठी दिग्दर्शक परेश मोकाशी, िहदी दिग्दर्शक अनंत महादेवन, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, सिनेसमीक्षक उदय तारा नायर, तमीळ निर्मात्या लीना मनीमेकलाई, लेखक अमृत गांगर आणि अदूर गोपालकृष्णन यांनी चर्चा केली. लीना मनीमकेलाई यांचं मत असं होतं की फिक्शनपेक्षा वास्तववादी सिनेमांकडे कल वाढला आहे ही खरी गोष्ट आहे. तर या विषयावर सुनील सुकथनकर म्हणाले की सिनेमाकडून सगळ्यांची मनोरंजन हीच अपेक्षा असते. आणि पुस्तकाच्या तुलनेत सिनेमाला कायमच कला म्हणून कमी दर्जा दिला गेला आहे. एकीकडे कमी दर्जा आणि दुसरीकडे मनोरंजनाची अपेक्षा यामुळे सिनेमा कायमच वास्तवापासून दूर जात आला आहे. पण वास्तववाद आपल्यात असतो, आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत भूगोलात, इतिहासात, निसर्गात सगळीकडे असतो. आणि सिनेमा नेहमीच सांस्कृतिक इतिहास तयार करत असतो, सादर करत असतो. त्यामुळे पुढची पिढी सिनेमातच वास्तववाद शोधणार आहे. त्यामुळे आपली जबाबदारी मोठी आहे.

तर अमृत गांगर यांनी फिक्शन आणि वास्तववाद वेगळा कसा काढणार असाच प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या मते प्रेक्षकांच्या बाबतीतलं राजकारण म्हणजे पॅलिटिक्स ऑफ वूिवगही लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या पंधरा वर्षांची आकडेवारी सांगते की, मल्टीप्लेक्स संस्कृतीत सिनेमा म्हणजे कोक, पॉपकॉर्नही पाहिजेच. या पद्धतीने सिनेमा पाहणारे अदूर गोपालकृष्णन यांचे सिनेमे पाहतील का. आजचा सगळा सिनेमा मल्टीप्लेक्स संस्कृतीने हायजॅक केला आहे. आज जे कॅमेडी, थ्रीलर्स निघताहेत ते कोणत्या पुस्तकांवर आधारित नसतात. पुस्तकातल्या कथेवरून सिनेमे बनवणंही दुर्मीळ झालंय. त्यामुळे आज वास्तववादी सिनेमा निघतात ते शूट आऊट अ‍ॅट वडाला, वन्स अपॉन टाइम इन मुंबईसारखे. रचनेपेक्षा फक्त सादर करणं एवढा एकच मुद्दा आज उरला आहे.

ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत महादेवन म्हणाले की आपल्याकडे डॉ. कोटणीस की अमर कहानीपासून चांगल्या चरित्रपटाची परंपरा आहे. पण आताच्या निर्मात्यांना चरित्रपटही शुगर कोटेड, वाढीव हवा असतो. स्वातंत्र्यसनिकावरच्या एका सिनेमावर समीक्षकांचं म्हणणं होतं की फिल्म थोडी स्लो आहे, काही निर्मात्यांना तर चरित्रपटातही गाणी, नृत्यही हवं असतं. खरं तर हा सगळ्याच पातळ्यांवरचा संघर्ष आहे. कारण गौर हरी दास्तानसारख्या सिनेमाला मल्टीप्लेक्स मिळत नाही. माझं मल्टीप्लेक्सवाल्यांना म्हणणं असतं की तुम्ही अशा सिनेमाचे दर कमी करा. मग तो जास्त लोक येऊन पाहतील, पण त्यांना ते पटत नाही. त्यांच्या आíथक गणितात ते बसत नाही म्हणे. त्यामुळे सिनेमातला वास्तववाद आणि तो बनवण्यातला वास्तववाद असा संघर्ष नेहमीच राहणार आहे.

दिग्दर्शक परेश मोकाशींनी याबाबतीत वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की आम्ही एखाद्या समस्येवर आधारित वास्तववादी सिनेमे बनवले की लोकांनी त्यांचं कौतुकच केलं पाहिजे असं गृहीत धरलं जात असतं. दादासाहेब फाळके यांच्यावर कुणीतरी सिनेमा बनवला म्हणजे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे असं नसतं. त्या सिनेमाचा दर्जा नीट तपासून पहा. पण तसं न करता लोकांना आणि समीक्षकांना गृहीत धरलं जातं. त्यापेक्षा दर्जाला महत्त्व दिलं पाहिजे. दुसरीकडे एखादी कलाकृती पुस्तकावर आधारित असते तेव्हा फक्त पुस्तकाचंच महत्त्व नसतं तर ती पडद्यावर आणणाऱ्याचंही तेवढंच महत्त्व असतं. हरिश्चंद्राची फॅक्टरी हा सिनेमा उभा करताना सगळे संदर्भ पुस्तकातूनच घेतले पण तुम्ही त्याकडे कसं बघता, कसं सादर करता यावर त्याचं वेगळेपण ठरतं. इतर कुणीतरी त्याची ट्रॅजेडी केली असती, पण मी त्यातला विनोदाचा गाभा घेतला. तुम्ही कसं बघता हे त्यातलं आंतर वास्तव असतं आणि ते महत्त्वाचं असतं.

याशिवाय पहिल्या दिवशी दुपारनंतरच्या सत्रात पूर्वेत्तर राज्यांमधल्या भाषांवर चर्चा झाली, त्यात आसामी कवी प्रणय फुकन, मणिपुरी कवी इबोमचा सिंग, बंगाली कवी- लेखक बिनायक बंदोपाध्याय, बंगाली कवयित्री कौशिकी दासगुप्ता, बंगाली लेखक सुबोध सरकार यांनी भाग घेतला. अनुवादातून मूळ लिखाणाचा आत्मा हरवतो का विषयावरच्या चर्चासत्रात कोकणी स्त्रीवादी लेखिका हेमा नायक, संपूर्ण चटर्जी, केरळी पत्रकार गौरीदासन नायर यांनी भाग घेतला. गुजराती कवी सीतांशू यशचंद्र, तमीळ कवयित्री लीना मनीमेकलाई, बिनायक बंडोपाध्याय, काश्मिरी, उर्दू लेखक झमन अझुरदाह, मल्याळी कवी टी के मुरलीधरन, मराठी कवी हेमंत दिवटे, मल्याळी कवी के. व्ही मणिराज, मथिली कवयित्री बिनिता मलिक आणि बंगाली कवयित्री कौशिकी दासगुप्ता यांच्या काव्य वाचनाने पहिल्या दिवसाचा समारोप झाला.

प्रश्न अस्तित्वाचा

दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र होतं, प्रादेशिक भाषांचा ऱ्हास का होतो आहे या मुद्दय़ाच्या चच्रेचं. या सत्रात मल्ल्याळी लेखक के. एस. रामन, संथाली-उडिया लेखक पूर्णचंद्र हेंबरम, सिंधी लेखिका माया राही आणि संथाली सकु मांझी यांनी भाग घेतला. या सत्राचं सूत्रसंचालन करताना पत्रकार शाजी विक्रमन यांनी भारतीय भाषांची स्थिती उलगडली. ते म्हणाले की खरं सांगायचं तर भारतात नेमक्या किती भाषा बोलल्या जातात याचा नेमका आकडा आजही सांगता येणार नाही. घटनेने मान्य केलेल्या भाषा, घटनेची मान्यता नसलेल्या भाषा, राष्ट्रीय भाषा, प्रादेशिक भाषा, आदिवासींच्या भाषा, बलाढय़ भाषा, तुलनेत दुर्बल भाषा अशी खूप वर्गवारी करता येईल. त्याशिवाय अनेक भाषा अस्तंगत होत आहेत. त्याची कारणं आपल्या बाहेर आहेत आणि आपल्या आतही आहेत. आपण आपल्या भाषेवर प्रेम करत नाही तेव्हा असं होतं. विविध भाषा ही आपली श्रीमंती आहे, पण आपल्याला तिचं महत्त्व वाटत नाही. सरकारही सगळ्या भाषांना तेवढंच महत्त्व देत नाही. ज्या भाषेला सामाजिक महत्त्व नाही, ती अस्तंगत होत जाते आहे. आणि ती भाषा बोलणारे त्यांच्या आसपासच्या परिसरात बोलली जाणारी सामाजिकदृष्टय़ा प्रभावी भाषा स्वीकारतात. लोकांना मातृभाषेत शिक्षण नको आहे. आदिवासींच्या भाषा तर स्वतंत्रच आहेत. त्या भारतीय भाषाकुलाचा भागही नाहीत. हे सगळेच लोक आपल्या भाषा नाकारत हळूहळू इंग्रजीकडे वळत आहेत.

संथाली भाषेबद्दल बोलताना पूर्ण चंद्र हेंबरन म्हणाले की मूळ ठिकाणापासून लांब आलं की लोक मुलांना संथाली शिकवत नाहीत. आपण मुख्य प्रवाहाच्या मागे पडू अशी भीती त्यांना वाटते. आंतरजातीय लग्नांमुळेही संथालीभाषक कमी होत जातात. संथाली मुली लग्न करून दुसऱ्या समाजात गेल्या की तिथली भाषा स्वीकारतात. किंवा दुसऱ्या समाजातल्या मुली लग्न करून इथे आल्या तरी संथाली स्वीकारतातच असं नाही. आम्ही मौखिक पद्धतीने आमची भाषा हजारो वष्रे जतन करून ठेवली पण गेल्या शतकात वीसच्या दशकात तिला लिपी मिळाली आणि लेखन सुरू झाल्यावर आता ती नष्ट व्हायची भीती निर्माण झाली आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सिंधी भाषेतील लेखिका माया राही म्हणाल्या की फाळणीनंतर आम्ही अवघड परिस्थितीला सामोरे गेलो. आम्हाला सिंधी लोकांना बरीच तडजोड करावी लागली. आधी जगण्याचा संघर्ष आणि नंतर त्यात स्थिरस्थावर झाल्यावर भाषा संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न असा आमचा प्राधान्यक्रम आपोआपच झाला. पण जगण्याच्या संघर्षांत भाषा संस्कृती टिकवायला आम्हाला उशीर झाला आहे. आमच्या पुढच्या पिढ्यांनी ते जिथे होते तिथली भाषा, लिपी स्वीकारली. आमच्या भाषेत आता फक्त तीन मासिकं निघतात. आमच्या भाषेतलं लिखाण कोणीही फारसं वाचत नाही. माझ्या मुलाच्या मोबाइलमध्ये इंग्रजीतली ५०० पुस्तकं आहेत. तो कशाला सिंधीकडे वळेल अशी स्थिती आहे. पण आम्ही आशावादी आहोत. आम्ही शाळांमध्ये जाऊन मुलांना सिंधी शिकवण्यासाठी प्रयत्न करतो. मला खात्री आहे, इंग्रजी शिकून आमच्या पुढच्या पिढय़ांना खूप मोठय़ा संधी मिळतील, पसे मिळतील आणि मग एक दिवस त्यांना वाटेल की चला आपली भाषा शिकूया.

रामन के. एस. या मल्ल्याळी लेखकांनी भाषा कशी सत्ता गाजवू शकते याचं उदाहरण म्हणून गुणाढय़ाची कथा सांगितली. त्या काळात पशाची भाषेचं झालं तेच आज अल्पसंख्य भाषक असलेल्या भाषांचं होत आहे, असं सांगून ते म्हणाले की यामुळे या शतकाच्या शेवटी आज उपलब्ध भाषांपकी निम्म्या भाषा संपतील अशी भीती व्यक्त केली जाते आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाषा टिकवणं म्हणजे इको सिस्टीम टिकवणं. म्हणून भाषा टिकवली पाहिजे.

यासंदर्भात बोलताना संथाली लेखक सात्कु मांझी म्हणाले की, आपण मुळातच भाषांच्या बाबतीत इतर भेद न करता मदर टंग आणि आणि अदर टंग एवढाच फरक केला पाहिजे. आज शिक्षणामुळे आणि तंत्रज्ञानामुळे तरुण पिढी मातृभाषेपासून लांब जाते आहे. या धोक्याचा विचार करायची आता वेळ आली आहे. उडिया लेखक मोहन मांझी यांनी सांगितलं की लोकांचा रस संपला तरच भाषा संपते. आपल्याकडे भाषेच्या बाबतीत रेनेसान्स होण्याची गरज आहे.

स्त्रियांना दुय्यम वागणूक

स्त्री लेखिका राष्ट्रीय पातळीवर का चमकत नाहीत, त्यांना कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं या परिसंवादात सहभागी झालेल्या चारही लेखिकांनी आपल्याला स्त्री-पुरुष हा भेद मान्य नसल्याचं ठासून सांगितलं, पण हेही नमूद केलं की स्त्री म्हणून त्यांना साहित्य व्यवहारात दुय्यम वागणूक मिळते. त्यांची दखल घेतली जात नाही. या परिसंवादाचं सूत्रसंचालन ओपन या मासिकाचे संपादक एस. प्रसन्नराजन यांच्याकडे होतं तर त्यात ज्ञानपीठ विजेत्या ओडिसी लेखिका प्रतिभा राय, मथिली लेखिका शेफालीका वर्मा, तमीळ कवयित्री लीना मनीमेकलाइ, बंगाली कवयित्री कौशिकी दासगुप्ता यांनी भाग घेतला होता.

आपली भूमिका ठामपणे मांडताना प्रतिभा राय म्हणाल्या की, मला लेखनात स्त्री-पुरुष हा भेदच मान्य नाही. पण ही गोष्ट खरी आहे की हे पुरुषांचं क्षेत्र आहे. सगळ्या संस्था, कार्यक्रम सगळं पुरुषांच्या हातात आहे. वरिष्ठ लेखकांबरोबरच समीक्षकही आमची दखल घेत नाहीत. आमच्याकडे क्षमता आहे, पण आम्हाला अनेक अडथळे पार करावे लागतात. पण ते सगळे पार करून स्त्रियांनी लिहिलं पाहिजे.

लीना मनीमेकलाई ही तरुण तमीळ लेखिका म्हणाली की तमीळनाडूत मुळातच खूप कर्मठ वातावरण आहे. तळच्या जातीतल्या स्त्रियांच्या लिखाणाची इथे दखलच घेतली जात नाही. तरी परिघावरच्या स्त्रिया ९० च्या दशकात लिहायला लागल्या. त्यांनी इतिहासाचं पुनल्रेखन केलं. पण ते समीक्षकांना मान्य नाही. मग स्त्रियांना विचारलं की आमच्यावर टीका करणारे तुम्ही कोण. हा प्रश्न आल्यावर त्यांनी या स्त्रियांच्या लिखाणाची दखल घेणंच बंद करून टाकलं. मी आजवर चार पुस्तकं लिहिली, पण एकाचीही दखल घेतली गेली नाही. स्त्रियांच्या लिखाणावर चर्चा होत नाही, तर स्त्रियांवर चर्चा करतात. पण तरीही चांगली गोष्ट ही आहे की स्त्रिया लिहिताहेत. त्यामुळे भाषा बदलते आहे.

मथिली भाषेत लिखाण करणाऱ्या शेफालिका वर्मा यांनी स्त्रीवादी भूमिकेलाच हात घातला. त्या म्हणाल्या की, आज रामायण लिहिलं तर सीतेला नारीशिरोमणी म्हणता येईल. पण तसं होत नाही, कारण आमचा जमाना कधीच नव्हता. काही पुरुषांची जयंती साजरी केली जाते, पण कधी कुठल्या स्त्रीची जयंती साजरी केली जात नाही. इतिहास लिहिणं, पुरस्कार देणं, वेगवेगळ्या संस्था हे सगळं पुरुषांच्याच हातात आहे. आम्ही ज्यांना जन्म देतो ते आमच्यावर वरचष्मा गाजवतात. कधीतरी आमच्या चष्म्यातून जगाकडे बघा.

कौशिकी दासगुप्ता यांनी तर स्त्रीवाद, पुरुषी वर्चस्व या शब्दांनाच आक्षेप घेतला. या शब्दांचे साचे ठरून गेले आहेत आणि ते लेखकांची वाट रोखतात असं त्यांचं म्हणणं होतं. स्त्रियांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यांची शिकार केली जाते असं त्यांचं म्हणणं होतं. दुसरीकडे प्रकाशक महिलांचं लिखाण प्रकाशित करायला तयार नसतात, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली.

मराठीची स्थिती

मराठी साहित्यातले साठोत्तरी तसंच नव्वदोत्तरी काळातले संघर्ष या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याचे सूत्रसंचालन लेखक सचिन केतकर यांनी केले. या परिसंवादात उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, कवी हेमंत दिवटे, कवी- लेखक मुस्तनसीर दळवी आणि अनुवादक जेरी िपटो यांनी भाग घेतला.

१९६०च्या दशकानंतर राज्यातील अनेक उपेक्षित, वंचित घटकांतील साहित्यिक पुढे आले, आणि त्यांनी नव्या वेदना, नवे अनुभव मराठी साहित्यविश्वाला दिले. शंकर पाटील, गंगाधर पानतावणे, नामदेव ढसाळ, उद्धव शेळके आदी दलित, ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनामुळे मराठी साहित्यक्षेत्रात एक नवी जागृती निर्माण झाली. बाबुराव बागुलसारख्या लेखकांनी पहिल्यांदाच ‘मी जात चोरली’ सारखे आत्मकथन लिहून एक वेगळे अनुभव जगासमोर आणले. यातील बहुतांश साहित्यिक हे केवळ साहित्यिक नव्हते तर कार्यकत्रे, आंदोलनकत्रे होते म्हणून त्यांच्या लिखानाला एक वेगळी ओळख होती. मात्र या साहित्यिकांपकी काही मोजक्याच साहित्यिकांच्या पुस्तकांचे इंग्रजी आणि इतर भाषेत अनुवाद झाले. मात्र ते अजूनही जागतिक स्तरावर म्हणावे त्या प्रमाणात गेले नसल्याची खंत यावेळी ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी व्यक्त केली. आयटी क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे त्या तसंच इतर क्षेत्रात लोकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या आणि त्याचा साहित्याला फायदाच झाला असं मत त्यांनी मांडलं.

कवी हेमंत दिवटे म्हणाले की साठच्या दशकात अरुण कोल्हटकर, विलास सारंग आणि वसंत गुर्जर यांच्यासारखे कोणताही राजकीय प्रभाव नाकारणारे लेखक होते तर दुसरीकडे भालचंद्र नेमाडे, सतीश काळसेकर, चंद्रकांत पाटील यांच्यासारखे राजकीय लेखक होते. यांनी सातारा, सांगली, कोल्हापूरकडचं साहित्य चांगलं, पुण्या-मुंबईत काही नाही अशी वर्गवारी केली. दुय्यम दर्जाच्या लेखकाला पुढे आणणं, पुरस्कार देणं असले उद्योग केले. वयाच्या ८४ व्या वर्षीही भालचंद्र नेमाडे साहित्य अकादमीवर कसे काय असू शकतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. साठच्या दशकात बंडाचं वातावरण होतं तर नव्वदच्या दशकात ते व्यवस्थेविरोधातले लोक व्यवस्थेत जाऊन बसले होते. नेमाडे, ढसाळांसारखे लोक जणू काही व्यवस्थेत जाऊन बसण्यासाठीच आधी व्यवस्थेविरोधी भूमिका घेऊन उभे होते. त्यामुळे यांची साहित्याशी कसली बांधीलकी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

तर ‘बलुंत’ या पुस्तकाचे भाषांतर केल्यानंतर त्याची मागणी आणि वाचक जगभरात कसा वाढला याची माहिती जेरी िपटो यांनी यावेळी दिली. तर मुस्तनसीर दळवी म्हणाले की आता माणसं खूप व्यक्तिवादी जगतात. त्यामुळे ते कुणाचं प्रतिनिधित्व करतात असं होत नाही. तसंच टोकाचं स्थानिकीकरण झालं आहे. ज्याप्रमाणे मराठीतील साहित्य इंग्रजीत गेले पाहिजे त्याच धर्तीवर इंग्रजी आणि इतर भाषेतील साहित्यही मराठी येण्याची गरज असून त्यासाठी अनुवाद करण्याची परंपरा कमी पडत असल्यानेच मराठी साहित्य जागतिकस्तरावर जाऊ शकत नसल्याने त्यासाठी सर्वानी पुढाकार घेतला पाहिजे असे मत या चर्चासत्राचे अध्यक्ष सचिन केतकर यांनी व्यक्त केले. यावेळी मल्ल्याळम् आणि मराठी भाषेला एकत्र घेऊन दोन्ही भाषेतील आदानप्रदान करणारी एक चळवळ उभी राहावी, प्रत्येक साहित्य संमेलनात या दोन्ही भाषेच्या साहित्यावर किमान चर्चा व्हावी अशी भावना उपस्थितांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

मराठी बाणा

मराठी भाषेसंदर्भातल्या परिसंवादाच्या प्रश्नोत्तरांच्या वेळी एका मल्ल्याळी कवीने प्रश्न विचारला की मी कवी आहे, मी गेली ४० वष्रे महाराष्ट्रात राहतो. केरळ सोडून आम्हाला ४० वष्रे झाली म्हणून तिथेही आम्हाला तिथल्या साहित्य वर्तुळात विचारलं जात नाही. आम्हाला इथेही कुठल्याच साहित्यिक कार्यक्रमात स्पेस मिळत नाही. आता तरी तुम्ही आम्हाला स्थान देणार आहात की नाही..स्थलांतरितांना दोन्हीकडचे फायदे मिळत नसतात, असं सांगत जेरी िपटो यांनी त्या कवींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण हेमंत दिवटे म्हणाले की अहो, तुम्हालाच कशाला मी इतकी वष्रे महाराष्ट्रात राहतो, पण मलाही कधीच कुठल्या कार्यक्रमाला किंवा अगदी साहित्य संमेलनातही बोलावलं जात नाही. आमचीच ही अवस्था तर तुम्हाला कुठून बोलावणार. लक्ष्मण गायकवाड यांनीही दिवटे यांचीच री ओढत इथे साहित्य वर्तुळात कसं राजकारण आहे, आम्हाला कसं विचारलं जात नाही हे सांगितलं. वास्तविक केरळी कवींनी मराठी संमेलनात येऊन कविता वाचल्या तर त्या कुणाला समजणार आहेत आणि ४० वष्रे महाराष्ट्रात, मुंबईत राहून ते मराठी किती शिकले, ते त्यांच्याच कवितांचे मराठी अनुवाद करून मराठी संमेलनातून कविता सादर करू शकतात का हे प्रश्न विचारले जायला हवे होते. साहित्य संमेलनाचा विषय असो की नेमाडेंचा मराठी साहित्यिकांनी दिलखुलासपणे मतभेद जाहीर करायचा आपला मराठी बाणा अजिबात सोडला नाही.

प्रादेशिक भाषांवर इंग्रजीत चर्चा

दोन ज्ञानपीठ विजेते लेखक, अनेक साहित्य अकादमी विजेते लेखक, शिवाय वेगवेगळ्या १५ भारतीय भाषांमधून लिखाण करणाऱ्या पन्नासेक लेखकांच्या उपस्थितीमुळे लिटफेस्टला एक वेगळंच गांभीर्य आलं खरं, पण ज्यांना इंग्रजी बोलणं शक्य नाही असे एकदोन अपवाद वगळता झाडून सगळ्यांनी आपलं जे काही म्हणणं होतं ते इंग्रजीतच मांडलं. सगळेच आपापल्या भाषेत बोलले तर कुणालाच समजलं नसतं हे खरं, पण भारतीय भाषांच्या भवितव्याची चर्चा करताना ती निदान िहदीत व्हायला काहीच हरकत नव्हती. इंग्रजी ही इथल्या इंटलेक्चुअल वर्गाची भाषा झाली आहे, हे मान्य केलं तरी ती काही भारताची प्रादेशिक भाषा निश्चितच नाही. त्यामुळे ही चर्चा निदान िहदीत तरी व्हायला हवी होती. पण तुम्हाला इंटलेक्चुअल म्हणवून घायचं असेल तर फडर्य़ा इंग्रजीत बोलायला हवं हा नेहमीचाच पाठ इथे पुन्हा एकदा गिरवला गेला. कार्यक्रमाच्या ठिकाणी म्हणजे एनसीपीएच्या एक्स्पिरिमेंटल थिएटरमध्ये स्टेजवर लावलेल्या फलकावर लिटफेस्टबद्दल मेिल्टग पाइंट ऑफ ऑल रिजनल लिटररी स्ट्रीम्स असं इंग्रजीतच लिहिलेलं होतं. एनसीपीएसारख्या शहराचं दुसरं टोक असलेल्या ठिकाणी हा कार्यक्रम असल्यामुळे सहभागी वगळता इतरांची फारशी उपस्थिती नव्हती.
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 1:27 am

Web Title: gateway litfest 2016
Next Stories
1 तंत्रज्ञान : स्मार्ट बाजारपेठ
2 कथा : ‘हट्ट’
3 निमित्त : मायबोली
Just Now!
X