आपणच अधिकाधिक उंचीची शिखरं कशी गाठली हे सांगण्यासाठी किंवा कुणाशी स्पर्धा करायची म्हणून नव्हे तर गिर्यारोहणाचा निखळ आनंद घेण्यासाठी. म्हणूनच गिर्यारोहण करणाऱ्या गेरलिन्डे काल्टेनब्रुनर नुकत्याच भारतात येऊन गेल्या.

साहस ही माणसाची आदिम प्रेरणा. अज्ञाताच्या शोधातून त्याने अनेक साहसी उपक्रम केले. त्यातूनच गिर्यारोहणासारख्या साहसी क्रीडा प्रकाराचा जन्म झाला. धोका आहे म्हणून साहस आहे आणि म्हणूनच तो साहसी खेळ आहे. पण यातदेखील साहसाची परिसीमा गाठल्यावर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर गेरलिन्डे काल्टेनब्रुनर या ऑस्ट्रियन महिला गिर्यारोहकाच्या कारकिर्दीकडे पाहिल्यावर जाणवते.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
pune crime news, pune fake gst officer fraud marathi news
पुणे : ‘जीएसटी’ अधिकारी असल्याच्या बतावणीने व्यापाऱ्याची लूट
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
dubai five year multiple entry visa
विश्लेषण : दुबईने भारतीय पर्यटकांना पाच वर्षांसाठी ‘मल्टीपल एंट्री व्हिजा’ देण्याची घोषणा का केली? याचा भारतीयांना कसा फायदा होईल?

गेरलिन्डे काल्टेनब्रुनर या महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे झालेल्या १६ व्या गिरिमित्र संमेलनासाठी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. ‘लोकप्रभा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांचा आजवरचा प्रवास उलगडला. पण एवढेच नव्हे तर एकंदरीतच गिर्यारोहण हीच जीवनशैली असलेले जीवन कसे असू शकते, याचा प्रत्यय त्यांच्या बोलण्यातून येत होता. गिर्यारोहण हे आनंदासाठी आहे, ना की विक्रमासाठी ही अगदी सरळ साधी भूमिका मांडणाऱ्या काल्टेनब्रुनरचा सारा प्रवासच थक्क करणारा आहे.

आठ हजार मीटरपेक्षा उंच (अष्टहजारी) अशा सर्वच्या सर्व १४ हिमशिखरांवर यशस्वी आरोहण करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला गिर्यारोहक आणि कृत्रिम प्राणवायूच्या मदतीशिवाय आरोहणात त्यांचा पहिला क्रमांक लागतो. पण त्या सांगतात, ‘‘मी कधीच या स्पर्धेत नव्हते. किंबहुना प्रसिद्धीमाध्यमांनीच माझ्या आणि पसाबानमध्ये स्पर्धा असल्याच्या बातम्या दिल्या तेव्हा मी खूपच व्यथित झाले होते.’’ त्यापूर्वीच्या महिला गिर्यारोहक वांडाचा विक्रम मी मोडणार का, असादेखील प्रश्न केला जाई. पसाबान हिने तोपर्यंत अष्टहजारी हिमशिखरांपैकी आठ शिखरांवर आरोहण केले होते. त्यामुळे सर्वच्या सर्व शिखर सर करणारी पहिली महिला कोण होणार यावर एका स्पॅनिश वर्तमानपत्राने ‘नाऊ द रेस इज ओपन’ अशा मथळ्याची बातमी झळकवली होती. अर्थातच नसलेली स्पर्धा निर्माण केल्यामुळे काल्टेनब्रुनरना त्याबद्दल खूपच वाईट वाटले होते. मात्र त्यातून डोंगरांनीच कसा मार्ग काढून दिला याबाबत काल्टेनब्रुनर त्याचवेळी घडलेली दुसरी घटना सांगतात. काल्टेनब्रुनर त्यावेळी म्हणजेच २००७ मध्ये अष्टहजारी शिखरांपैकी काराकोरम पर्वतराजीतीली ब्रॉड पिकच्या (पाकव्याप्त काश्मिरातील शिखर) आरोहणासाठी गेल्या होत्या. आणि पसाबानदेखील त्याच शिखरावर आरोहण करण्यासाठी आल्या होत्या. प्रसिद्धीमाध्यमातील वातावरणाला चोख उत्तर देण्याची ही वेळ असल्याचं दोघींच्या लक्षात आलं आणि ब्रॉड पिकवर (८०४७ मीटर) त्या दोघींनी एकत्रित आरोहण केलं. आमच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचं दाखवण्यासाठी ते पुरेसं होतं असं त्या नमूद करतात. त्या सांगतात, ‘‘मी कोठेही लेख अथवा प्रत्युतर देण्याच्या फंदात पडले नव्हते. आम्हा दोघींची डोंगरातील ही संयुक्त मोहीमच या सर्व प्रश्नांना पूर्णविराम देणारी ठरली.’’ नंतर पसाबानाने २०१० मध्ये सर्व अष्टहजारी हिमशिखरं आरोहण करुन पहिल्या महिला गिर्यारोहकाचा मान पटकावला.

या आणि अशा अनेक प्रसंगांत काल्टेनब्रुनर यांची एकंदरीतच विचारसरणी महत्त्वाची ठरते. मुळातच त्यांनी अष्टहजारी शिखर आरोहणाचे स्वप्न जपले होते ते विक्रमासाठी नव्हे तर आनंदासाठी. वयाच्या सातव्या वर्षांपासूनच त्यांना त्याच्या स्पाइटल (अप्पर ऑस्ट्रीया) या गावातील रेव्हरंड डॉ. एरिच ट्रिस्लर यांच्यामुळे वयाच्या १३ व्या वर्षांपासून डोंगराची आवड निर्माण झाली होती. त्यातूनच त्या २३ व्या वर्षी ब्रॉड पिकवर आरोहणासाठी गेल्या होत्या तेव्हा त्यांना काराकोरम आणि हिमालयाने भुरळ पाडली. तेव्हाच त्यांनी एक स्वप्न उराशी बाळगले की सर्व अष्टहजारी हिमशिखरांवर आरोहण करायचे, तेदेखील कृत्रिम प्राणवायूशिवाय.

मात्र हे स्वप्न पूर्ण करताना त्यांचा स्वत:वरचा विश्वास अधिक दृढ होता. मी माझ्या आनंदासाठी हे करतेय हा त्यातील महत्त्वाचा भाग होता. त्या सांगतात, ‘‘अष्टहजारी यादीतील पाच हिमशिखरांवर आरोहण होईपर्यंत मी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये काहीही लिहिले नव्हते, की या मोहिमांसाठी कोणाकडून निधीची अथवा प्रायोजकत्वाची अपेक्षा केली नव्हती. जे करायचं ते स्वत:च्या आनंदासाठी. मग त्यासाठी स्वत:च कष्ट करावेत आणि पैसे जमवावेत.’’ त्यांचा हा खाक्याच वेगळा होता. अर्थार्जनासाठी त्यांनी परिचारिकेची नोकरी स्वीकारली. मोहिमांचा खर्च बराच असल्यामुळे अधिक पैसे मिळवणे गरजेचे होते तेव्हा त्या सांगतात, ‘‘मी तेव्हा रात्रपाळी मागून घेतली होती. रात्रपाळीला दिवसाच्या कामापेक्षा अधिक पैसे मिळायचे. आणि दिवसा काम असेल तेव्हा माझ्या घरापासून ४० किलोमीटर सायकलिंग करत मी हॉस्पिटलला पोहचायचे. त्यामुळे माझा शारीरिक सरावदेखील होत असे. त्यामुळे माऊंटन बाइकच्या स्पर्धामध्ये मी भाग घ्यायचे. त्यात पारितोषिक मिळवायचे त्यातूनदेखील थोडे पैसे गाठीला लागायचे. स्कीईंगमध्ये प्रावीण्य मिळवून फावल्या वेळात स्किईंग प्रशिक्षक म्हणून काम केले. नवीन कपडे, छानछोकी असं काहीच मी त्या काळात केलं नाही. प्रत्येक शिलिंग अगदी जपून वापरण्यावर माझा कटाक्ष असायचा. किंबहुना बचतीतला प्रत्येक शिलिंग मी गिर्यारोहणाच्या साधनसामग्रीवर वापरला’’ काल्टेनब्रुनर यांचा हा दृष्टिकोनच एकंदरीत त्यांची डोंगराप्रति असणारी भावना सांगून जातो.

ही परिस्थिती काही प्रमाणात बदलायला सुरुवात झाली ती पाचव्या अष्टहजारी आरोहणानंतर. नंगा पर्वत हे त्यांचे पाचवे अष्टहजारी शिखर. नंगा पर्वत आरोहण करणारी पहिली ऑॅस्ट्रियन गिर्यारोहक हा त्यामागचा आणखीन एक भाग. त्यानंतर एका वृत्तपत्राने त्यांची सविस्तर मुलाखत प्रकाशित केली. ती मुलाखत वाचून एका कंपनीने त्यांना या मोहिमांवर सादरीकरणासाठी आमंत्रित केले. सुदैवाने त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील गिर्यारोहक होते. त्यांनी काल्टेनब्रुनर यांची पुढील मोहीम प्रायोजित केली. पाठोपाठ एका ऑस्ट्रियन बँकेनेदेखील त्यांना प्रायोजकत्व दिले. मग मात्र गेरलिन्डे यांनी नोकरी सोडून व्यावसायिक गिर्यारोहक होण्याचा निर्णय घेतला. येथे एक बाब विशेषत्वाने नमूद करावी लागेल. ती म्हणजे त्यांनी तोपर्यंत सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर आरोहण केलेले नव्हते. केवळ एव्हरेस्ट म्हणजेच गिर्यारोहण अशी काहीशी मानसिकता आपल्याकडे हल्ली तयार झालेली आहे, त्यामुळे इतर मोहिमांना फारसं महत्त्व दिले जात नाही. त्या पाश्र्वभूमीवर काल्टेनब्रुनर यांचे हे यश आणखीनच ठळकपणे उठून दिसते.

आजच्या काळानुसार त्यांनी एव्हरेस्टला सुरुवातीलाच हात न घालण्याचे कारण त्या सांगतात, ‘‘मी टप्प्याटप्प्याने एकेक आरोहण पूर्ण केले. एव्हरेस्ट उंचीने सर्वोच्च आहे. त्यामुळे मी त्यापूर्वी चोयू (८२०१ मीटर), मकालू (८४६३ मीटर) कांचनजुंगा (८५९५) यावर आरोहण केले. सर्वच शिखरांवर कृत्रिम प्राणवायूशिवाय जायचे होते. त्यामुळे मी स्वत:ला तयार करत होते. कांचनजुंगा हे तुलनेने कठीण आणि आरोहणाच्या तांत्रिक बाबतीत कस पाहणाऱ्या शिखराच्या माथ्यावर असताना विचार केला, यापेक्षा अजून २५३ मीटर उंचीवर जावे लागणार. त्यासाठी वेगळी मेहनत करावी लागणार, तेव्हा एव्हरेस्ट गाठता येईल.’’ अर्थातच एव्हरेस्टवरील वाढत्या व्यापारीकरणामुळे त्यांनी एव्हरेस्टवरील हमखास यशाची हमी  देणारा सध्याचा लोकप्रिय आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असा दक्षिण खिंडीचा व्यापारी मोहिमांचा मार्ग टाळला. त्या थेट उत्तरेकडील मार्गावर गेल्या. त्या सांगतात की, जेव्हा त्यांच्या छोटय़ाशा चमूबरोबर उत्तरेच्या बेसकॅम्पवर गेल्या तेव्हा तेथे अन्य कोणीच नव्हते. फक्त ते आणि त्यांची छोटीशी टीम. संपूर्ण आरोहण मार्गावर तर माणसाचे कसलेही अस्तित्व नाही. त्यातही त्यांनी निवडलेला मार्ग तीस वर्षांपूर्वी एकदाच वापरला गेला होता. अर्थात इतकं सारं केल्यावर शिखर आरोहण यशस्वी झालंच पाहिजे अशी भूमिका असणं खरं तर काहीच गैर नव्हतं. पण येथेच तर त्यांचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा अधोरेखित होतो. त्यांना कोणताही विक्रम करायचा नव्हता, की स्पर्धा जिंकायची नव्हती. शिखरमाथ्यापासून २०० मीटरवर असताना त्यांचा सहकारी हिरोटाका याची तब्येत बिघडली. शिखरमाथा केवळ २०० मीटरवर होता. पण त्यांनी मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. ठरवले असते तर हिरोटाकाला सोडून त्या शिखरमाथा गाठू शकल्या असत्या. पण ते त्यांच्या स्वभावातच बसणारे नव्हते. गेरलिन्डे यांची ही भूमिका इतकी ठाम होती की  त्यासाठी कधीच तडजोड केली नाही.

एव्हरेस्टजवळच्याच ल्होत्से या हिमशिखरावरील आरोहणाबाबत त्या सांगतात, ‘‘ल्होत्सेचा शिखरमाथा गाठण्यासाठी केवळ १५० मीटर शिल्लक होते. सायंकाळचे साडेपाच वाजले होते. हात वर केला असता तर शिखर माथा गाठला असता. अंधारात आरोहण करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. पण एकतर त्यावेळचे उणे पन्नास अंश तापमान, शिखरमाथ्यावर असणारा आरोहणातील अडथळा आणि एकूणच वातावरणातील बदल हे सर्व पाहिल्यावर माझ्या अंर्तमनाने मला सांगितले, ‘खाली परत जा’. मी तो आवाज ऐकला.’’ गेरलिन्डे सांगतात, ‘‘शिखरावर यशस्वी आरोहण केलं यापेक्षा ते आरोहण करून मी सुखरूप पायथ्याला परत आले याला मी अधिक महत्त्व देते.’’ किंबहुना त्यामुळेच गेरलिन्डे यांनी प्रत्येक मोहिमेत शिखर आरोहण यशस्वी झालंच पाहिजे असा अट्टहास केला नाही. की त्यासाठी कोणतेही वेडेवाकडे पाऊल उचलले नाही. अष्टहजारी यादीतील १४ हिमशिखरांवर आरोहण करताना त्यांना २१ मोहिमा कराव्या लागल्या होत्या. हा काळ तुलनेने इतरांपेक्षा अधिक असेल, पण त्यात स्वत:च्या भूमिकेशी त्यांनी कसलीही तडजोड केलेली नाही.

अर्थात एक व्यावसायिक गिर्यारोहक झाल्यानंतर साहजिकच मोहिमांचे यशापयश मोजले जाऊ लागते. अशा वेळी अनेक दडपणं येत असतात. त्याबद्दल गेरलिन्डे सांगतात, ‘‘मला  प्रायोजकदेखील असेच मिळाले की, ज्यांनी शिखर सर करण्यापेक्षा, मी यशस्वीरीत्या सुखरूप खाली येणे महत्त्वाचे मानले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी माघार घेताना कधीच मित्र, कुटुंबीय, प्रायोजकांचे दडपण घेतले नाही. मी फक्त माझ्या शरीराचं ऐकते आणि आपलं शरीर आपल्याला वेळोवेळी अशा सूचना करत असते. डोंगरात असताना डोके दुखायला लागले तर अनेकजण औषध घेतात आणि पुढे चालू लागतात. मी अशी औषधे घेणे कटाक्षाने टाळते. खरे तर अशा वेळी एकतर मी कमी पाणी प्यायलेले असते, किंवा खूप भराभर आरोहण केलेले असते. अशा वेळी औषध हा पर्याय नसतो, तर तेथे थांबणे, शरीराराला वेळ देणे किंवा थेट दोन पावले मागे येणे हाच उपाय असतो.’’ आपल्या उद्दिष्टांबाबत स्पष्टता असेल तर करता येते याचे काल्टेनब्रुनर हे सर्वात मोठे उदाहरण म्हणावे लागेल.

एव्हरेस्टनंतर त्यांची चारच अष्टहजारी शिखरे शिल्लक होती. पण के टू या काराकोरम पर्वतराजीतील ८६११ मीटर उंचीच्या शिखरांने त्यांची परीक्षाच पाहिली. २००७, २००९ आणि २०१० या तीन वर्षांत त्यांनी सहा वेळा केटूवर मोहिम आखली होती. अर्थात सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टपेक्षादेखील केटूवरील आरोहण परीक्षा घेणारे आहे. २०१० च्या मोहिमेत तर दक्षिण बाजूने आरोहण करताना त्यांचा नेहमीचा सहकारी फ्रेडरिक याचा अपघाती मृत्यू झाला. तेव्हा पुढील मोहिमेत त्यांनी तो मार्ग टाळायचे ठरवले. पण पर्यायी मार्ग हा तुलनेने अधिक कठीण होता, पण त्यावर धोके कमी होते. अर्थात सातव्या मोहिमेत त्यांनी के टू वर यशस्वी आरोहण केलं. आणि अष्टहजारी शिखर मोहिमा कृत्रिम प्राणवायूशिवाय यशस्वी करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या.

खरं तर काल्टेनब्रुनरच अफाट उर्जेचा स्रोत आहेत असं म्हणावं लागेल. वयाच्या ४७ व्या वर्षी देखील त्या आत्ता आल्प्समध्ये भटकत असतात. अष्टहजारी सर्व हिमशिखरं झाल्यावरदेखील पाच-सहा हजार मीटर उंचीची आल्प्समधील शिखरं हा आता त्यांच्या आनंदाचा भाग आहेत. ही सारी ऊर्जा कोठून येते, याचं उत्तर एकच डोंगरातून. त्या सांगतात, ‘‘मी जेव्हा डोंगरात असते तेव्हा सूर्योदयावेळी जो एक अफाट ऊर्जेचा स्रोत मिळतो तो प्रचंड आशादायी, प्रेरणादायी असतो. एकप्रकारे ड्रायव्हिंग फोर्सच. के टूवर असतान त्या कठीण वातावरणात डोंगरांनी मला प्रचंड ऊर्जा दिली. अर्थात सोबत सहकारी असतातच. मला एकटीने आरोहण करण्यात रस नाही. कारण डोंगरातले ते आनंदाचे क्षण एकटीने अनुभवण्यापेक्षा शेअर करायला आवडतात. डोंगरातले ते सुखद क्षण तुम्हाला तुमचे अस्तित्व विसरायला लावतात. के टू वर असताना सायंकाळी सूर्य जेव्हा क्षितिजावर रेंगाळला तेव्हा संपूर्ण काराकोरम रांग उजळून निघाली होती. अविस्मरणीय असाच तो क्षण होता. ’’ केटूवरील आरोहणानंतर त्यांची १४ अष्टहजारी शिखर मोहीम पूर्ण झाली. अनेक वर्षे मनाशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात आले.

इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे हल्ली गिर्यारोहणात देखील विक्रमाचे प्रस्थ येऊ लागले आहे. त्यातच मग अतिवेगाने आरोहण करणे वगैरे गोष्टी घडतात. गेरलिन्डे यावर सांगतात की, अशाने तुमचा दृष्टिकोन संकुचित होत जातो. तुम्ही डोंगराचे सौंदर्य न्याहाळू शकत नाही. केवळ झापडबंद पद्धतीने आपल्या लक्ष्याकडे जाऊ लागतात. डोंगर अनुभवणं त्यातून होत नाही. असं ठाम मत त्या मांडतात.

गिर्यारोहण हा साहसी खेळ असला तरी या खेळात स्पर्धा नाही. पहिला दुसरा अशी विक्रमांची उतरंड नाही. मात्र तरीदेखील एखादा गिर्यारोहक त्याच्या कौशल्याने असे काही तर करतो की त्याची गणना विक्रमांत केली जाते. मात्र मुळातच डोंगरातला आनंद मिळवण्यासाठी सुरू असलेला खेळ असल्यामुळे त्या गिर्यारोहकाला आपल्या या विक्रमाचे काही सोयरसुतक  नसते. त्यातूनच विनयशीलता त्याच्या अंगी अगदी सहज बाणवली जाते. त्यामुळेच आठ हजार मीटरपेक्षा उंच अशी जगातील सर्वच्या सर्व हिमशिखरांवर यशस्वीपणे आरोहण करताना साहसाची परिसीमा गाठतानाच विनयाची परिसीमा गेरलिन्डे काल्टेनब्रुनर यांच्यामध्ये पदोपदी दिसून येते. ही विनयाची परिसीमाच त्यांना सर्वोच्च पराक्रम करूनदेखील कायम जमिनीवर ठेवते हे महत्त्वाचे.

एव्हरेस्टला काय वाटत असेल?

सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्टवर गेल्या काही वर्षांत आरोहणासाठी व्यापारी संस्था प्रचंड प्रमाणात मोहिमा आखत असतात. अशा मोहिमांवर अनेकदा टीका होत असते. मात्र तरीदेखील येथे आरोहण करणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. यासंदर्भात काल्टेनब्रुनर सांगतात की, त्या जेव्हा एव्हरेस्टसमोरील नुपुत्से या शिखरावर त्यांच्या सहकाऱ्याबरोबर आरोहण करत होत्या तेव्हा एव्हरेस्टचा शिखरमाथा गाठण्यासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली होती. जणू काही माणसांचेच वादळ एव्हरेस्टवर घोंगावतेय की काय असे वाटत होते. आम्ही नुपुत्सेवर होतो तेव्हा एव्हरेस्टवर एक हिमप्रपात झाल्याचे पाहिले. ते पाहून आम्हाला वाटले की, जणू काही हा पर्वत स्वत:ला मुक्त करू पाहात आहे की काय?

एव्हरेस्टवरील वाढत्या व्यापारी मोहिमांमुळे प्रत्येकाला शिखरावर यशस्वी आरोहणाचे आश्वासन दिले जाते. त्यामुळे या माध्यमातून वाढणाऱ्या आरोहकांच्या अपेक्षा खूप उंचावल्या जातात. त्याबद्दल काल्टेनब्रुनर सांगतात की, यामुळे एव्हरेस्टवर अननुभवी आरोहकांचे प्रमाण वाढले आहे. अगदी सहा हजार मीटरवरच कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा केला जातो. त्यांना वातावरणाशी पूर्णपणे जुळवून घेणे शक्य होत नाही. असे आरोहक मग वरच्या टप्प्यावर काही समस्या निर्माण झाली तर गडबडून जातात. यातूनच एकंदरीत अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता वाढते असे त्या नमूद करतात.

कृत्रिम ऑक्सिजनशिवायचा अट्टहास कशाला?

डोंगरात अतिउंचावर गेल्यानंतर हवेतील प्राणवायूचे प्रमाण विरळ होत जाते. त्यामुळे कृत्रिम प्राणवायूचा वापर करावा लागतो. पण काल्टेनब्रुनर यांचा कृत्रिम प्राणवायूचा आधार न घेण्याचा अट्टहास कशासाठी आहे? यावर त्या अत्यंत समर्पक उत्तर देतात. त्या सांगतात की, आठ हजार मीटरवर जाताना जर कृत्रिम प्राणवायूचा आधार घेतला तर आपल्याला साडेसहा हजार मीटरवर असल्याचा अनुभव येतो. मग अशा वेळी आठ हजार मीटरवरील आरोहणाची अनुभूती कशी मिळणार? तेथील आव्हानाचा सामना कसा करणार? असा प्रश्न त्या उपस्थित करतात. अर्थात त्यासाठी ठरवून मेहनत करावी लागेल हे निश्चित.

त्यांनी स्वत: देखील प्रचंड मेहनत घेतली आहे. अधिक उंची गाठत असताना त्या त्या टप्प्यावरील वातावरणाशी जुळवून घ्यायला (अ‍ॅक्लमटाइजेशन) वेळ द्यावा लागतो. काल्टेनब्रुनर यांनी ठरवून असा वेळ दिला. कृत्रिम प्राणवायू वापरण्यामुळे अनेकदा योग्यप्रकारे वातावरणाशी जुळवून घेणे होत नाही. त्या सांगतात, ‘‘ मी माझ्या मर्यादांना जेवढे ताणता येईल तेवढे म्हणजेच परिसीमेपर्यंत ताणते, पण त्या ओलांडून जाण्याचा अट्टहास कधीच केला नाही.’’
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com