रुचकर-शॉपिंग विशेष

जय पाटील – response.lokprabha@expressindia.com

दिवाळीच्या काळात रंगीत, चमचमत्या वेष्टनात दडलेले अनेक लहानमोठे खोके घरात येतात. प्रत्येकावरचं वेष्टन काढताना उत्सुकता सारखीच असते. कारण खोक्यातल्या वस्तूशी ती देणाऱ्याच्या भावना जुळलेल्या असतात. या भावना व्यक्त करण्याची संधी देणाऱ्या विविध पर्यायांविषयी..

शॉपिंग मॉलमध्ये फेरफटका मारा, ऑनलाइन सेलवर नजर टाका, सराफाकडे जा नाही तर एखाद्या प्रदर्शनात.. दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे शेकडो पर्याय अक्षरश: हात जोडून उभे आहेत. ज्याला गिफ्ट द्यायचं आहे, त्याची आवड, गरज, उपलब्ध पर्याय आणि या साऱ्याची आपल्या खिशाशी सांगड घालण्याची कसरत घराघरांत सुरू आहे. पूर्वी दिवाळीतील भेटवस्तूंची खरेदी फक्त पाडवा आणि भाऊबीजेपुरतीच मर्यादित असे; पण आता दिवाळीत, नातेवाईक-मित्रमंडळींसाठी एवढंच नव्हे तर व्यावसायिक संबंध जपण्यासाठीही भेटवस्तू खरेदी केल्या जातात. दिवाळीचे बजेट ठरवताना आता त्यासाठीही एक भाग राखून ठेवला जाऊ लागला आहे.

आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींसाठी  भेटवस्तू घेणे तुलनेने सोपे असते. एक तर त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी, त्याच्याकडे काय आहे, काय नाही, त्यांची विशलिस्ट असे सगळे आपल्याला माहीत असते. त्यामुळे भेटवस्तूची निवड सोपी होते आणि सार्थकीही लागते.

फिटनेसला आता सगळेच प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यामुळे त्यासंबंधित वस्तू भेट म्हणून देण्याकडे अनेकांचा कल आहे. यात फिटनेस बॅण्ड, वॉटर रेझिस्टण्ट फिटनेस ट्रॅकर, जिममध्ये वापरण्याचे, धावण्याचे, ट्रेकिंगचे शूज, शेकर बॉटल, ग्रीन टी, हेडबॅण्ड, योगा मॅट, जिमसाठी बॅग, ट्रेकिंग बॅग, स्लिपिंग बॅग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही जण जिम्नॅशियमचं वर्षभराचं सदस्यत्वही भेट देतात.

आजच्या वेगवान आयुष्यात सगळ्यांना सारे काही झटपट हवे असते. त्यामुळे लहान-मोठी कामे झटपट आणि सहज करून देणारी उपकरणे दिल्यास घेणाऱ्याचे आयुष्य नक्कीच सुकर होते. यात टोस्टर, ब्लेंडर, इलेक्ट्रिक किटली, ज्युसर इत्यादी वस्तूंना प्राधान्य दिले जात आहे. अशी उपकरणे भाऊबीजेसाठी उत्तम भेटवस्तू ठरतात. स्वयंपाकघराशी संबंधित भेटवस्तूंच्या यादीत क्रोकरीचे स्थान तर वर्षांनुवर्षांपासून पक्के आहे. गालिचा, बेडशीट, उशांचे अभ्रे यांचा सेट, टेबलवरचे आच्छादन, आगळ्यावेगळ्या डिझाइन्सची कुशन कव्हर्स अशा फर्निशिंगचाही पर्याय आहे. छोटय़ा भाऊ-बहिणीसाठी चॉकलेट्स, खेळणी, सॉफ्ट टॉइज, गोष्टींची पुस्तके, कपडे, टॅब, घडय़ाळ, सनग्लासेस असे अनेक पर्याय आहेत. त्याव्यतिरिक्त चॉकलेट्स आणि कुकीजनाही पसंती दिली जात आहे. काही जणांनी तर चक्क फिशटँक किंवा एखादा पाळीव प्राणी भेट द्यायचं ठरवलं आहे.

पाडव्यानिमित्त होणाऱ्या खरेदीत दागिने अग्रस्थानी आहेत. त्याव्यतिरिक्त कपडे, घडय़ाळ, कॅमेरा, लॅपटॉप, किंडल, फोन, महागडे परफ्युम्स, हँडबॅग्ज, वॉलेट्स, पर्सेस यांची क्रेझ आजही आहे. ज्यांना सोन्याएवढा महागडा पर्याय नको असतो, त्यांनी चांदीचे दागिने, चांदीचे पूजा साहित्य, भांडी इत्यादी पर्याय स्वीकारले आहेत. टूर पॅकेज देण्याचीही प्रथा रूढ झाली आहे. याव्यतिरिक्त विविध सौंदर्य प्रसाधने, स्पा किंवा ब्युटी ट्रीटमेंट्ससाठीचीही पॅकेजेस दिली जातात.

कॉर्पोरेट गिफ्ट्स हा प्रकारही आता चांगलाच रुळला आहे. भेटवस्तू देण्याची प्रथा आता कॉर्पोरेट क्षेत्रापासून लहानमोठय़ा कार्यालयांपर्यंत सर्वत्र सुरू झाली आहे. यात टी कोस्टर्स, पेन स्टॅण्ड, फोन स्टॅण्ड, इनडोअर झाडे, मूर्ती हे सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहेत. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्यांची आणि साखर वज्र्य मानणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे अनेक कार्यालयांत मिठाईऐवजी सुका मेवा दिला जाऊ लागला आहे. विविध स्वादांतील सुका मेवाही उपलब्ध आहे. ज्यांना गोड पदार्थच द्यायचे आहेत, ते सुक्या मेव्याची मिठाई आणि चॉकलेट्सचा पर्याय स्वीकारताना दिसतात. हे सर्व पदार्थ अतिशय आकर्षक आवरणांत उपलब्ध आहेत.

पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देण्यासाठी विविधरंगी कुंडय़ांतील रोपे, इनडोअर आणि शोभेची झाडे, औषधी वनस्पती, विविध झाडांच्या बिया भेटवस्तू म्हणून दिल्या जात आहेत. दिवाळी म्हणजे तेजाचा सण, त्यामुळे सुशोभित पणत्यांचा संच, सुगंधी मेणबत्त्या, समई, चांदीचे दिवे भेट म्हणून देण्याचे नियोजन अनेकांनी केले आहे. पेंडण्ट लॅम्प, झुंबर, कंदील इत्यादींना अनेकांनी प्राधान्य दिले असून त्यात अनेक वैविध्यपूर्ण आणि कलात्मक पर्याय उपलब्ध आहेत.

दिवाळी म्हणजे घराला नवे रूप देण्याचा काळ. त्यामुळे यानिमित्त सजावटीच्या अनेक वस्तू घरात येतात. काही जण घराचे पूर्ण इंटिरिअरच बदलून टाकतात. काही जण स्वयंपाकघर, मुलांची खोली किंवा दिवाणखाना, अशा एखाद्या खोलीचा ‘मेकओव्हर’ करतात. त्यामुळे गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी मोठय़ा प्रमाणात केली जाते. हे खरे तर घरातील सदस्यांनी स्वत:च स्वत:ला दिलेले गिफ्ट असते. काही जण यानिमित्त होम थिएटर घेतात, कोणी नवा सोफा सेट घेतात, कोणी डायनिंग टेबल, कोणी मुलांसाठी बंक बेड, तर कोणी बाल्कनीत बांधण्यासाठी हॅमॉक घेतात. फुलदाण्या, लायटिंग, लॅम्पशेड्स, फोटोफ्रेम, विविध प्रकारच्या मूर्ती, पडदे, टेबलक्लॉथ अशा लहानमोठय़ा वस्तूही खरेदी केल्या जातात.

या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी शॉपिंग मॉल, बुटिक्स, शोरूम्सच्या अनेक फेऱ्या केल्या जातात. वारंवार हिशेब करून खर्चाचे गणित पक्के केले जाते. एवढी मेहनत आणि खर्च केल्यानंतर तो सार्थकी लागणे महत्त्वाचे. त्यामुळे मुळात ज्याला गिफ्ट द्यायचे आहे, त्याच्या आवडीनिवडी- गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. विनाकारण भारंभार वस्तूंची खरेदी करण्यापेक्षा मोजक्याच, उपयुक्त, आगळ्यावेगळ्या, दीर्घकाळ टिकतील आणि खिशाला परवडतील अशाच वस्तू खरेदी कराव्यात. बाजाराच्या भूलभुलैयाला बळी पडून निरुपयोगी, तकलादू वस्तू घरी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मोहात टाकतील, अशा अनेक ऑफर्स या काळात जाहीर होतात. त्यातल्या कोणत्या फसव्या आणि कोणत्या आपल्यासाठी खरोखरच उपयुक्त हे नीट समजून घेणे आणि मनापेक्षा मेंदूचे ऐकून खरेदी करणे महत्त्वाचे आहे. अन्यथा आपला आणि ज्याला ती भेटवस्तू देणार आहोत, त्या व्यक्तीचाही विरस झाल्याशिवाय राहणार नाही.