सोनं या शब्दासरशी पिवळीधम्मक, लखलखीत लड आपल्या डोळ्यासमोरून सरकते. आता तर ती त्या धातूपुरती उरलेली नाही तर तिनं आपलं सगळं आयुष्यच व्यापून टाकलं आहे.

म्हणतात की, सर्वे गुणा: कांचनम् आश्रयन्ते। म्हणजे सोन्यासारखं र्सवकष काही नाही. आपल्या जिवापेक्षा लाडक्या असलेल्या लेकराला आपण ‘सोनं’ म्हणतो. त्याच्या हातात सोन्याचं कडगुलं घालतो, गळ्यात काळ्या दोऱ्यांत सोन्याची जिवती. ते सोनुलं बाळ, बुद्धी, तेज, व्यक्तिमत्त्व यांत अग्रणी व्हावं म्हणून बाळगुटीत खऱ्या सोन्याचा वळसा उगाळतो. चोखंदळ माणसं पिण्याचं पाणी उकळवून पितात, विशेष म्हणजे पाणी उकळतांना त्यात सोन्याची अंगठी किंवा अस्सल सोन्याचं नाणं टाकतात. बाळाच्या नामकरण विधीच्या आधी त्याचे कान टोचून त्यांत सोन्याचं सुंकलं घालायची प्रथा आहे. कोवळ्या वयातच सोन्यासारख्या लेकीचं नाक टोचून सोन्याचं सुकलं घातलं की भावी आयुष्यातल्या नथीची पूर्वतयारी होते. नंतर तिला सासुऱ्याला धाडतो तेव्हा ‘श्वसूर घराकडून विचारणा होते – सोनं किती घालणार! सोन्यासारखी मुलगी, तीही सोन्याने लगडलेली म्हणजे अधिकस्य अधिकतम् फलम्। अशी बात. जिवलग नात्यांतला सच्चेपणा अधोरेखित करताना, सोन्यासारखा नवरा, सोन्यासारखी बायको, सोन्यासारखा संसार! घरोघरी एकतरी सोनूमावशी, सोनूआत्या असायलाच हवी. हातात कथलाचा वाळा घालणारीचं नांवही सोनूबाई असतं. उगाच कसा वाक्प्रचार जन्माला येईल. उच्चत्तम समाधान  व्यक्त करायला सोन्यासारखी उपमा नाही. आजीला जेव्हा पणतू पाहायचे भाग्य लाभते, तो तिच्या आयुष्याचा सार्थक क्षण असतो, त्या भाग्याला आपण आयुष्याचं सोनं झालं म्हणतो, ते समारंभाने साजरं करतो, तिच्यावर सोन्याची फुलं उधळून असा तो धन्य सोहळा. नातीला मांडीवर घेऊन हलवता – डुलवताना, बोळकं झालेल्या वाणीतून ‘र’ गायब झालेला असतो. तरीही आजी तालांत म्हणत असते. माझी ‘सोन्याची’ शकूबाई बडं कां ग! तिला पोडं सोडं माडतील बडं कां ग! आणि मग ही खमकी आजी तिला वात्रटांच्या त्रासा – कटकटीतून सोडवेपर्यंत कडवी काही संपत नाहीत. आणि ‘ड’ चा लडबडही! हे झालं कौटुंबिक जिव्हाळ्यापुरतं – त्याच्यापलीकडे खूप आहे, सोन्याची लंका, सोन्याचा धूर,  सोन्याच्या विटा, सोन्याची द्वारका, सुवर्ण मंदिर, सोन्याचा पिंपळ, सोन्याचा कळस, सोन्याच्या मोहोरा, सोन्याची मुद्रा, सोन्याची मासोळी. अंबेच्या आरतीत तर सोन्याच्या तुळशीला, मोत्याच्या मंजिऱ्याही आहेत. इतका उत्कट भक्तिभाव।  एक वेगळा इशाराही आहे. मांजराला शुकशुक करून हाकलताना गार्भिणीच्या हातून धक्का लागून मांजर पडली आणि गतप्राण झाली तर सोन्याचं मांजर काशीविश्वेश्वराला वाहून परिमार्जन करावं लागतं. काय ना एकेक लबाड मांजरीचा हा नको त्या प्रसंगी सन्मान आणि धाक!.. अद्वितीय, गुणसंपन्न व्यक्तीला सोन्याची खाण म्हणतो. कारण हात लावील त्याचं सोनं करण्याची  समर्थता त्यांच्या ठायी असते. इथे सोनं म्हणजे सफलता! या सोन्यामुळे अकल्पित घटना घडतात. कांचनमृगापायी रामायण घडले. कांचनाच्या कंचुकीचा मोह सीतेला भलताच महागात पडला. पदरी आला अशोकवनातला घोर बंदिवास. दोन अलौकिकांचा संगम घडला की आपण म्हणतो मणीकांचन योग झाला. हे झाले जुने पुराणे संदर्भ!

Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
How To Avoid White Clothes Getting Stain Of Color Dresses
Video: कपडे धुताना ‘हा’ पांढरा खडा वापरून वाचवा पैसे; बादलीत एका कपड्याचा रंग दुसऱ्याला लागणारच नाही

अगदी अलीकडे त्या मण्णपुरम्वाल्यांनी घरोघरी एक लकेर पॉप्युलर केलीय. पैशाच्या तंगीमुळे एक तरुण मुलगा घायकुतीला येतो, तेव्हा निवर्तलेला अनुभवसंपन्न बाप, स्वप्नांत येतो – चुटकीसरशी दिलासा देऊन, उतारा सुचवून जातो – घरात आहे सोनं – मग कशाला आहे रडणं! अशी ती लकेर – आहे ना बात!

आपल्या प्रियतमा लावण्यवतीचं वर्णन करताना प्रियकर तिला सोन्याहून सोनसळी म्हणून मोकळा होतो. साडीचं सिलेक्शन करताना महिला वर्गाला सोनसळी रंगाचं आकर्षण असतं. बोलीभाषेत  सोन्याच्या उल्लेखाशिवाय आपल्या म्हणण्यातलं अस्सलपण, सत्यता आपण पटवूच शकत नाही. जसं की शंभर नंबरी सोनं, सोन्यासारखी संधी, सोन्यासारखी माणसं, सोनेरी आठवणी, वादावादीत समेट घडतो त्या दुव्याला आपण सवुर्णमध्य म्हणतो – असं किती नि काय काय! – अगदी वेगळंच उदाहरण द्यायचं तर, काठीला घोंगडं बांधू द्या की रं! च्या खूप आधी काठीला सोन्याची परचुंडी बांधून केलेल्या देवयात्रांचा दाखला मिळतो.

सर्वात महत्त्वाचं आणि नजरेत भरणारं प्रतिदिनी अनुभवाला येणारं एक निखळ वास्तव ‘उजाडलं आता उठा’ सांगायला प्रत्येक दाराशी येणारा सवितृ शंभर नंबरी सोन्याचा गोळा होऊन येतो- काय  प्रभा – काय झळाळी!..हिऱ्याला पर्याय नसतो, पण रत्नकीळ फाकायला सोयाचं कोंदण लागतंच की! जेजुरीला बेल भंडारा उधळताना अस्सल सोन्याचं प्रतीक म्हणून पिवळी धम्मक हळद वापरतो. कुठच्याही पराक्रमाची दाद    पुरस्काराने साजरी करताना प्राचीन काळी सोन्याचं कडं बहाल करण्याची प्रथा होती.

माणसाच्या जीवनयात्रेत शेवटचा टप्पा म्हणजे मरण! मोक्षपदाची नांदी आणि तापयंत्रातून मुक्तता. या वियोग विधीला सोनं लागतं – मृत माणसाच्या ओठावर अस्सल सोन्याचा मणी किंवा तत्सम काहीतरी ठेवण्याचा प्रघात आहे. यथार्थ जीवन यात्रेला जन्माचं ‘सोनं झालं’ म्हणतो. मायबोलीचं ममत्व पटवताना मनी मराठी, जनी मराठी अभिमानाची बाब आहे। मायबोली म्हणजे माझा ‘बावनकशी’ रुबाब आहे॥ सोन्याची महती अशी शब्दातीत आहे. तस्करी व्यवसायांत प्रथमक्रम लावला तो सोन्याच्या बिस्किटांनी.

अगदी टोकाची गोष्ट म्हणजे इमारत बांधणीच्या सोपस्कारांत यंत्रांतून दळल्या गेलेल्या  दगडांची रेव. चाळीत घमेल्यांत पाणी घेऊन बसलेल्या कष्टकरी बायका आपण पाहतो. चाळलेल्या रेवेंतून त्यांच्या पदरी असं कितीसं सोनं पडत असेल – गुंजभर! वालभर!!  पण तरी मोल पदरात पडावे म्हणून हा खटाटोप, सायास! तसं तर बोलू नये पण एक खतही सोनख्त नावाने सन्मानित आहे. सोन्याला हपापलेला मिडास राजा तर विकृतीचं प्रतीक म्हणून घराघरांत पोहोचला आहे.

काळ परिवर्तनशील असतो म्हटलं तर जमाना हा असा आहे.

आज युक्तीप्रयुक्तीनं अमाप संपत्ती प्राप्त केलेल्या भ्रष्ट मंडळींचं पितळ उघडं पडलं. पण अस्सल सोनं मात्र काळाच्या कुठच्याही फेऱ्यात नि:शंकपणे मौल्यवान म्हणूनच मिरवेल. अलौकिक तेजाने सर्वांपरी तळपतच राहील.

कारण अनंत कठोर कसोटय़ांतून स्वत:ला सिद्ध करीत जे बावनकशी शुद्ध पदाला पोहोचतं, त्या सोन्याचं मोल त्रिलोकांत अनुपमेय व शाश्वत असणारच.
सुमन फडके
response.lokprabha@expressindia.com