आपण विज्ञानयुगात जगत असलो, तंत्रज्ञानाचा मुक्तपणे वापर करत असलो तरी आपल्या समाजाची ओळख देवभोळा अशीच आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती देवांना रिटायर करण्याची.

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूंनी काही वर्षांपूर्वी ‘देवांना रिटायर केले पाहिजे’ असे विधान करून खळबळ उडवून दिली होती. परंतु अशा खळबळी पाण्यातल्या बुडबुडय़ाप्रमाणे लगेच खाली बसतात हे वारंवार दिसून आले आहे. महात्मा फुले काळात त्यांनी देवाला ‘निर्मिक’ हा शब्द वापरून आपला अनेक धर्म व जातींबद्दलचा रोष प्रगट केला होता. त्या काळात कुणाही समाजसुधारकाला नास्तिक म्हणवून घेणे परवडणारे नव्हते. कारण चातुर्वण्र्य व जातिव्यवस्था सर्व समाजाच्या इतकी रोमारोमात भिनलेली होती की धर्मावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हल्ला करून चालणारे नव्हते. खरं म्हणजे सर्व धर्माचा निर्मिक  एकच ही कल्पनादेखील त्या काळात अतिशय धाडसाची होती. महात्मा फुले यांच्यासारख्या सामाजिक उद्धारणासाठी जिवाचे रान करणाऱ्याने ती केल्यामुळे तसा तिला फारसा विरोध झाला नसावा. ब्रिटिश साम्राज्याच्या आगमनानंतर महात्मा फुले यांच्या रूपाने समाजाला व राष्ट्रालाही एक वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करणारा मूर्तिकार लाभला होता- महर्षी शिंदेंच्या म्हणण्याप्रमाणे महात्मा फुले म्हणजे स्वयंभू समाजसुधारक होते. चातुर्वण्र्य व जातींनी पोखरलेल्या समाजाला नवी संजीवनी देण्याचा त्यांचा प्रयत्न हा त्यांच्यापासूनच सुरू झाला. त्याकरिता महर्षी शिंद्यांनी अतिशय हृद्य रूपक वापरले आहे. ते म्हणतात, कोळी जसा आपल्या पोटातून निर्माण केलेल्या तंतूंपासून सुंदर असे जाळे विणतो त्याचप्रमाणे महात्मा फुले यांनी सामाजिक प्रश्न उभे केले व त्यातून समाजसुधारणा घडवून आणण्याचा जीवतोड प्रयत्न केला.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर महात्मा फुले यांच्या रूपाने सुरुवात तर फार चांगली झाली होती. त्यातून पुढे शिवराम जानोजी कांबळे, गोपाळबाबा वलंगकर, किसन फागू बंदसोडे, इ.नी दलितांकरिता खूपच चांगले काम केले. ही मंडळी महात्मा फुले यांचा वारसा घेऊन पुढे आली होती. त्यानंतर पुढे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था ह्यवर तळहाती शिर घेऊन आपल्या आयुष्याचा होम करून दलितांचे प्रश्न वेशीवर टांगले.

धर्माच्या अवडंबराचे आमच्यावरचे सावट मात्र अजूनही संपलेले नाही. धर्म माणसाकरता असतो, माणूस धर्माकरता नसतो असे असले तरी आज जगभर ‘धर्म’वृत्तीने जो धिंगाणा घातला आहे व त्यातून निर्माण झालेला आतंकवाद पाहता धर्म हा माणसाच्या प्रगतीसाठी नसून माणसाच्या अधोगतीसाठी आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे. साधारणत: जगात आठ धर्माचा प्रभाव दिसतो; ज्यू, झरतृष्ट, ख्रिश्चन, इस्लाम तर भारतात मूळ असलेले बौद्ध, जैन, शीख, हिंदू. ह्य सर्व धर्माचा एकत्रित विचार पाहू जाता गंमतच वाटते; विनोद वाटतो. जगभर साऱ्याच मानवजातीला देवाने झपाटलेले दिसून येते. सर्वाभूती परमेश्वर असे म्हणायचे व बहुसंख्य जनतेतील परमेश्वराला लाथाडायचे असा धर्माच्या नावावर जगभर खेळखंडोबा चालू आहे.

ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांडय़ांतून वैश्य व पायातून शूद्र निर्माण झाला आणि त्यावर आधारित जातीव्यवस्था उभी राहिली अशी विकृत हिडीस, किळसवाणी कल्पना वाचून देव ह्य कल्पनेचा फोलपणा किती भयंकर आहे हे लक्षात येते. परंतु आजही अशा वेडगळ व विज्ञानाला संपूर्ण छेद देणाऱ्या भाकडकथांपासून आम्ही दूर जात नाही. प्रत्येक धर्माचा उद्गाता वेगवेगळेच तारे तोडतो. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू, महेश सारेच देव स्वयंभू मानले जातात. येशू ख्रिस्त सांगतात ते ईश्वराचा एकमेव पुत्र तर प्रेषित महंमद सांगतात ईश्वराचा पुत्र कुणीच नाही व ईश्वराला पुत्र असणे शोभत नाही. तर श्रीकृष्ण सांगतात ते स्वत:च ईश्वर आहेत. ह्य सृष्टीचा नियंत्रणकर्ता प्रत्येक धर्मातील ह्य प्रेषितांना वा अनुयायांना वेगवेगळे संदेश देऊन हा सृष्टीचा नियंता सर्व धर्मात तंटेबखेडे माजविण्याचे कार्य का करतो असा प्रश्न साहजिकच पडतो. युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांती व धर्म सुधारणांनंतर त्याचे साऱ्या जगभर पडसाद उमटले. पण भारतीय जग मात्र कासवगतीने विज्ञाननिष्ठेकडे झुकत आहे. दुर्दैव आमचे एवढेच की एकीकडे आम्ही युरोप, अमेरिकेशी बरोबरी करू पाहतो पण दुसरीकडे धर्म, वर्ण जाती ह्य कचाटय़ातून सुटका करून घ्यायला मागत नाही. हा विरोधाभास आमच्यातून जोवर आम्ही काढून टाकीत नाही तोवर आम्ही युरोप-अमेरिका यांच्याशी बरोबरी करू पाहणे हे असमंजसपणाचेच होय. चीन जपानादी देशांनी ह्यतून आपली सुटका करून घेतली म्हणूनच ते आज जगात अग्रेसरांपैकी आहेत.

ईश्वराची कल्पना ही माणसाच्याच डोक्यातून निघालेली कल्पना आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव प्रगत होत गेला तसे त्याला ह्य सृष्टीचे खेळ अचंबित करीत असणार. त्यामुळे त्याला एकप्रकारे मदतकारक ठरणाऱ्या सूर्य, चंद्र व पाऊस यांना देवता मानले – पृथ्वीला माता मानले. त्यातूनच पुढे पुढे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या देवादिकांच्या कपोलकल्पित कल्पना रचल्या जाऊन त्यातून धर्माची-वर्णाची उतरंड रचण्यात आली. एवढेच नाही तर स्वर्ग, पुनर्जन्म, कर्मकांड, इत्यादींना जन्माला घालून ह्य साऱ्याला अतिशय किचकट, क्लिष्ट व भयावह स्वरूप देण्यात आले. त्यातून मग हिंदू धर्माच्या कर्मकांडात्मक किचकटपणाला शह देण्याकरिता गौतम बुद्धासारख्या धीरोदात्त मानवाचा जन्म झाला. त्यांनी स्वर्ग, पुनर्जन्म, कर्मकांड, देव या साऱ्यांच्या मुळावरच घाव घालून मानवजातीला उपकारक अशा नवीन धर्मतत्त्वांना जन्माला घातले. काही काळ बौद्ध धर्माचा चांगलाच पगडा बसला. पण त्यालाही शह दिला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित बांधवांना हिंदू धर्मातील जोखडातून बाहेर काढण्याकरिता बौद्ध धम्म स्वीकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती की सारा भारत बौद्धमय व्हावा, परंतु दुर्दैवाने त्यांनी बौद्ध धम्मात धर्मातर केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच त्यांचे देहावसान झाल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या प्रक्रियेला फारशी गती मिळाली नाही. उलटपक्षी आरक्षणाद्वारे मिळणारी चांगली नोकरी, हुद्दा पटकावून डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांमध्ये एक वेगळा ब्राह्मणवर्ग निर्माण झाल्याचे नको ते चित्र दिसते.

एकंदरीत काय तर सर्व धर्म व त्यातून निर्माण केले गेलेले ईश्वर मानवाचीच निर्मिती आहे. धर्माचे मूलतत्त्व काय तर प्रगती व नियमन करणे. पण इतिहासाकडे पाहू जाता ते मूलतत्त्व बाजूला राहून सगळीकडे धर्माच्या नावाखाली पक्षाभिमान, प्रांताभिमान यांचीच कीड लागलेली दिसते. त्या किडीतून बाहेर पडावयाचे असेल तर ‘मानवता’ हाच धर्म मानला पाहिजे. अर्थात मानवता धर्म मानून त्यातही काही विकृती निर्माण होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. आज तरी धर्माच्या नावाखाली मानवतेला काळिमा फासणारी कृष्णकृत्येच अधिकाधिक राबवली जात असल्याची दृश्ये दिसत असून आतंकवादाची भयंकर उत्पत्ती झाल्याचे भयानक ‘दृश्य’ दिसत आहे.

धर्माची मूळ कल्पना मानवाला सुखी करणे अशी होय. पण आता त्या मूळ कल्पनेला अगदी उलट स्वरूप मिळाले असून धर्माच्या नावाखाली मानवाचे एक प्रकारे शिरकारणच चालविले जात असल्याचे दु:खद दृश्य पाहायला, अनुभवायला मिळते. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले असून तो मंगळावर पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. तरीही चंद्राला देवत्व देण्याचे आमचे भाबडेपण अजून संपत नाही. आकाशातील ग्रहांचा आमच्यावर होणारा परिणाम पाहण्याचा भाबडेपणा चालू आहे. राशी, जन्मपत्रिका यांच्या भोवऱ्यातून आम्ही बाहेर पडायला तयार नाही. यावर उपाय एकच की आम्ही आता ह्या भाकड प्रकारातून बाहेर पडून पूर्णत: विज्ञाननिष्ठेकडे वळले पाहिजे. विज्ञाननिष्ठाच माणसाला सुखी करू शकेल. त्याकरिता ‘मानवतावाद’ हाच आमचा नारा, हेच आमचे आराध्य दैवत असले पाहिजे. जितक्या लवकर आम्ही धर्म व ईश्वरापासून आमची सुटका करून घेऊ तितक्या लवकर आम्ही सुखाकडे मार्गक्रमणा करीत राहू. वैदिक काळात ज्ञानाच्या दृष्टीने इतक्या उच्चस्थानी असलेला भारत आज ह्य स्तराला येण्याचे कारण म्हणजे आमची धर्म व ईश्वर ह्यबद्दलची विकृत व विनाशकारक कल्पना- अनेक पुनर्जन्म, स्वर्ग, पाप, पुण्य, इ. कल्पनांमधून बाहेर पडून ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ या कारण व परिणाम अशा विज्ञाननिष्ठ भूमिकेप्रत आले पाहिजे. वेगवेगळे धर्म निर्माण करून व त्यांच्यात भांडणे लावून मानवजातीला दु:खाच्या खाईत लोटण्याचे ईश्वराला प्रयोजनच काय? म्हणून आता आपण ईश्वराला रिटायर व्हायला लावणे हाच एक मानवजातीच्या उद्धाराचा, प्रगतीचा, सुखाचा उचित मार्ग होय.
प्रकाश बंद्रे – response.lokprabha@expressindia.com