26 February 2021

News Flash

बौद्ध धर्मातील स्त्रीदेवता

बौद्ध धर्मात सुरूवातीच्या काळात स्रीदेवतांचाच नव्हे, तर कोणत्याच देवदेवतांचा समावेश नव्हता.

00-navratri-logo-lpबौद्ध धर्मात सुरूवातीच्या काळात स्रीदेवतांचाच नव्हे, तर कोणत्याच देवदेवतांचा समावेश नव्हता. पण काळाच्या ओघात हळूहळू या धर्मात हरिती, तारा, महामायुरी अशा स्रीदेवतांचा समावेश झाला.

भारतामध्ये जन्माला आलेल्या विविध धर्मापकी बौद्ध हा एक अतिशय प्रभावशाली धर्म होता. या धर्मामध्ये सुरुवातीला स्त्रीदेवतांचा समावेश नव्हता. खरे तर या धर्मात देवदेवतांचाच समावेश नव्हता. पण काळाच्या ओघात अनेक देव-देवतांनी या धर्मात शिरकाव केला. त्यामध्ये खुद्द गौतम बुद्ध आणि अनेक बोधिसत्त्व याबरोबरच विविध स्त्रीदेवता यांचाही यात समावेश होतो. भारतामध्ये मूर्तिपूजेची रूढार्थाने सुरुवात जरी उशिरा झाली असली तरी देवदेवतांचे मानवी रूपात अंकन नेमके कधी सुरू झाले हे सांगता येणे अवघड आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण अतिशय लोकप्रिय असलेल्या थेरवाद आणि महायान या पंथातील स्त्री देवतांचाच विचार करणार आहोत.

मध्य प्रदेशामध्ये सतना या ठिकाणाजवळ एक भारहूत नावाचे ठिकाण आहे. तिथे इ.स.पू. दुसऱ्या शतकात एक मोठा स्तूप बांधला गेला. त्या स्तुपाला खूप उंच तोरणे (प्रवेशद्वारे) आणि देखण्या शिल्पांनी अलंकृत केलेल्या वेदिका (कठडे) होत्या. त्यामध्ये अनेक जातककथा आणि तसेच तत्कालीन पूजनीय देवदेवता यांचा समावेश होतो. त्यांची नावे तिथे ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत कोरलेली आहेत. त्यांच्या नावांचा विचार करता त्यामध्ये अनेक यक्ष, यक्षी आणि देवता अशा उपाधी लावलेल्या व्यक्ती आहेत. उदा. कुबेर यक्ष, सुपवास यक्ष, अजकालकीय यक्ष इ. पुरुष देवतांबरोबरच अनेक स्त्रीदेवताही इथे आढळतात. त्यामध्ये सिरिमा देवता, चदा (चंद्रा) यक्षी, चुलकोका देवता,  महाकोका देवता इ. या देवता जरी बौद्ध स्थापत्यावर आढळत असल्या तरी यांचे अस्तित्व प्राचीन बौद्ध साहित्यात इतक्या महत्त्वपूर्ण रीतीने आढळत नाही. क्वचित एखादा उल्लेख एखाद्या जातकामध्ये आलेला दिसतो. परंतु त्यांचे स्तुपावरील स्थान पाहता त्यांचे त्या काळातील आणि समाजातील महत्त्व लक्षात येते. त्या काळातील लोकधर्मातील त्या महत्त्वाच्या देवता असणार हे यातून स्पष्ट होते. तसेच त्यांचे नावानिशी शिल्पांकन त्यांच्या भक्तांच्या सोयी साठी होते हेही समजते.

बौद्ध धर्माच्या विकासाचा आढावा घेताना या भारहुतच्या  स्तुपावरील स्त्रीदेवताचे नामोनिशाणही नंतर दिसत नाही. इ.स.च्या पहिल्या शतकानंतर काही वेगळ्याच देवतांचा उदय होताना आपल्याला दिसतो. त्यामध्ये तीन प्रमुख देवतांचा समावेश होतो १) हारिती, २) तारा आणि ३) महामायूरी. या सर्वाची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ.

हारिती ही देवता मुळात एक राक्षसीण होती असे दिसते. बौद्ध साहित्यात तिची गोष्ट अनेक ठिकाणी आढळते. असे सांगितले जाते की तिला स्वत:ला १०० मुले होती. पण ती इतरांची मुले खात असे. त्यामुळे लोकांनी बुद्धाकडे तिची तक्रार केली. तिची खोड मोडण्यासाठी बुद्धांनी तिचा एक मुलगा लपवून ठेवला. तेव्हा अतिशय चिंताक्रांत होऊन ती बुद्धांकडे गेली. तेव्हा बुद्ध तिला म्हणाले की तुला इतर खूप मुले आहेत त्यांच्याकडे पहा, तेव्हा ती म्हणाली की माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. तेव्हा बुद्धांनी तिला जाणीव करून दिली की इतर लोकांनाही त्यांची मुले अशीच प्रिय असतात, त्यामुळे त्यांना खाणे बंद कर. त्या वेळेस तिला पश्चात्ताप झाला आणि तेव्हापासून ती मुलांची रक्षणकर्ती देवता बनली. बौद्ध स्तुपांवर ही मुलांचे रक्षण करणारी देवता असून उपयोग काय? पण त्या ठिकाणी येणारे जे गृहस्थाश्रमी उपासक होते, ते त्यांच्या मुलांच्या रक्षणासाठी या देवतेची पूजा करीत असत.

ही देवता त्या काळातील अतिशय लोकप्रिय देवता होती. तिची ही कथा साहित्यात जशी लोकप्रिय झाली तशीच तिची मूर्तिपूजाही खूप लोकप्रिय झाली असावी असे दिसते. या देवतेच्या पंचिक म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलांबरोबर अनेक मूर्ती भारतात आणि प्राचीन गांधार (आजचे पाकिस्तान) आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये सापडल्या आहेत. महाराष्ट्रातही अजिंठा, औरंगाबाद आणि वेरुळ येथील गुहांमध्ये शिल्प आहेत किंवा महत्त्वाच्या ठिकाणी यांच्या मूर्ती आहेत. तसेच प्राचीन भारतात जिथे जिथे बौद्ध धर्माचे स्थापत्य होते तिथे तिथे या मूर्ती आपल्याला आढळतात.

17-devi-stri-lp

जे गृहस्थाश्रमी उपासक होते त्यांच्यासाठी या देवतेचे महत्त्व अपरंपार होते. ते उपासक त्या परिसरात जात असत तेव्हा त्यांच्या मुलाबाळांचे रक्षण करणारी देवता जर तिथे असेल तर तिची पूजाअर्चा होणे अपरिहार्य होते. त्यामुळे बौद्ध धर्माच्या विकासातील विविध टप्प्यांमध्ये आपल्याला उपासकांची गरज असलेल्या या देवतेचे अस्तित्व स्पष्टपणे दिसते. आज मात्र भारतात या देवतेचीच पूजा होत नाही, किंबहुना लोकांना ही देवताच माहीत नाही; पण बौद्ध धर्म जसा भारतातून बाहेर पडला तसा तोही देवताही बरोबर घेऊन गेला. आज पूर्व आशियाई देशांमध्ये ही देवता खूप लोकप्रिय आहे. जपानमध्ये तर ती चांगली आणि भीतीदायक अशा दोन्ही स्वरूपांत दिसते. तिचे नाव आहे किशिमोजीन. ती मुलांची रक्षणकर्ती तर आहेच, पण प्रसूतीमध्ये स्त्रियांची मदत करणारी देवताही आहे; परंतु बेजबाबदार पालक आणि मुलांना मात्र ती राक्षसी बनून त्रास देते. अशा प्रकारच्या या देवतेचा आजच्या भारतीय बौद्ध परंपरेत मात्र मागमूसही दिसत नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

तारा हा शब्द र्त = तारणे या अर्थाचा बनला आहे. संसारसागर तरून जायला मदत करणारी ही तारा नावाची एक अतिशय महत्त्वाची देवता इ.स.च्या चौथ्या- पाचव्या शतकापासून बौद्ध शिल्पात दिसायला लागते. संकटात सापडलेल्या भक्ताला मदत करायला कायम धावून येणारी ही देवता आहे. लोकांना मदत करणारा अवलोकितेश्वर आणि त्याच्याच स्वभावधर्माची असलेली ही तारा नावाची देवता. मत्री आणि करुणा यांची ती साक्षात मूर्तीच असल्यासारखी आहे. धर्माच्या विकासाच्या शेवटच्या टप्प्यातही ती अतिशय लोकप्रिय तांत्रिक देवता म्हणून नावारूपाला आली. इ.स.च्या बाराव्या शतकापर्यंत तिची लोकप्रियता अमाप वाढली. उत्तर भारतात तर जवळजवळ प्रत्येक घरात तिची प्रतिमा होती असे वाटावे अशा मोठय़ा संख्येने तिच्या मूर्ती सापडल्या आहेत. महायान बौद्ध धर्मातील ती अतिशय महत्त्वाची देवता होती असे दिसते. वज्रयानातही तारेचे महत्त्व अपरंपार वाढलेले दिसते. महायान आणि वज्रयानात तारांचे अनेक प्रकार दिसतात. यामध्ये विविध रंगांची प्रतीकात्मकताही आहे. तारेची असंख्य शिल्पे आणि ब्राँझ मूर्ती संपूर्ण भारतभर मिळाल्या आहेत.

महाराष्ट्रात कान्हेरी, नाशिक, औरंगाबाद, वेरूळ, पन्हाळे काजी या ठिकाणी असलेल्या बौद्ध गुहांमध्येही तारेची शिल्पे मोठय़ा संख्येने मिळतात. भक्तांचे आठ संकटांपासून रक्षण करणारी ताराही वेरूळ येथे शिल्पात पाहायला मिळते. हे अतिशय दुर्मीळ शिल्प वेरूळ येथील गुंफा क्रमांक सातच्या वरच्या बाजूला कोरलेले आहे. अशा प्रकारचे हे भारतातले सर्वात प्राचीन शिल्प आहे. अशाच प्रकारे बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतांमध्ये तारेची उपासना मोठय़ा प्रमाणावर होत होती. त्यामुळे तिथे धातूच्या अनेक मूर्ती पाहायला मिळतात.

18-devi-stri-lp

महामायूरी ही देवता नावाप्रमाणेच मयूर किंवा मोर याच्याशी संबंध असलेली आहे. महायान बौद्ध धर्मात लोकप्रिय असलेली ही देवता मुख्यत: रक्षक देवता होती. सर्पदंशानंतर जर तिची आराधना केली तर ती विष उतरवू शकत असे. बौद्ध भिक्षूंना धर्मप्रसारासाठी जेव्हा अनेक ठिकाणी जावे लागे तेव्हा सर्पदंशाचेही भय असे. अशा वेळी साप चावल्यावर या देवतेचे आवाहन केले तर विष उतरेल अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे या देवतेच्या अनेक मूर्ती भिक्षूंच्या विहारमध्ये ठेवत असत. तसेच ही विद्य्ोची देवताही असल्यामुळे नवीन ज्ञान मिळवणारे भिक्षूही तिची उपासना करत असत. वेरूळ येथील एका शिल्पात या देवतेशेजारी एक भक्तही दाखवला आहे. तो एक पोथी छोटय़ाशा टेबलावर ठेवून अभ्यास करताना दाखवला आहे. बौद्ध साहित्यात ‘महामायूरी’ नावाचा एक ग्रंथही आहे भिक्षूंना साप चावल्यावर म्हणायचे श्लोकही त्यात आहेत, तसेच भारतातील महत्त्वाच्या शहरांतील रक्षक यक्षांच्या नावांची यादीही त्या ग्रंथात दिली आहे. त्यामुळे त्या काळी कोणत्या गावात कोणते रक्षक यक्ष होते याची माहिती आपल्याला मिळू शकते.

प्रज्ञापारमिता ही देवी तर याच नावाच्या एका ग्रंथाचे मानवी रूप आहे अशी कल्पना धर्मात आढळते. हा ग्रंथ इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकात लिहिला गेला. ‘अष्टसाहस्रिकाप्रज्ञापारमिता’ असे या ग्रंथाचे नाव होते. बौद्ध तत्त्वज्ञानावरचा हा ग्रंथ इ.स.च्या दुसऱ्या शतकात चिनी भाषेत भाषांतरित झाला आणि नंतर तो अतिशय लोकप्रिय झाला. या ग्रंथातील तत्त्वज्ञानाला मूर्तरूप देऊन त्याची स्त्री देवता प्रतिमा तयार करून तिची पूजा करायला सुरुवात केली. हळूहळू महायान आणि वज्रयान या टप्प्यांमध्ये ही देवता अतिशय लोकप्रिय ठरली. बौद्ध विहारांमध्ये असलेल्या तंखा चित्रांमध्ये आणि हस्तलिखित ग्रंथांमध्ये हिची अनेक चित्रे पाहायला मिळतात.

अशा प्रकारे या प्राचीन बौद्ध धर्मीय समाजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या देवतांचा आपण आढावा घेतला आहे. इ.स.च्या आठव्या- नवव्या शतकानंतर धर्मात जे बदल झाले आणि तंत्राचा प्रभाव जसजसा वाढला तसतसा अनेक देवतांचा प्रवेश धर्मात झाला असे दिसते. यात अनेक उग्र, भीतीदायक अशा रक्षक देवतांचाही समावेश होतो. अशा अनेक देवतांची उपासना आज तिबेटमध्येही पाहायला मिळते; पण त्या देवतांचे स्वरूप आणि उपासना पद्धती हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
डॉ. मंजिरी भालेराव – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:26 am

Web Title: goddess in bauddha religion
Next Stories
1 स्मरण पंचकन्यांचे…
2 दुर्गरुपेण संस्थित:
3 उत्सव नवरात्रीचा…
Just Now!
X