00-lp-devi-logoगेल्या तीसेक वर्षांत लोकांचं बदललेलं राहाणीमान, वाढती क्रयशक्ती आणि वाढती श्रद्धास्थाने यामुळे सार्वजनिक मंदिरं त्यांच्या घरातल्या देवांसाठी दागिने घडवून घ्यायचं किंवा विकत घ्यायचं प्रमाण वाढतं आहे.

‘त्या अमुक ठिकाणच्या देवीला यंदा सोन्याचा कमरपट्टा वाहिला आहे देवीभक्तानं..’ किंवा ‘साईबाबांना चांदीचा मुकुट वाहिला आहे साईभक्तानं..’ नवरात्र असो किंवा अन्य काही निमित्त असो दरवर्षी अशा देवादिकांना चरणी अर्पण केल्या जाणाऱ्या दागदागिन्यांची चर्चा होत राहते. खरं तर आपल्या सामान्यांना सर्वकाही देणारा तोच असतो, असं म्हटलं जातं आणि तरीही अनेकदा ‘अमुक गोष्ट झाल्यास अमुक गोष्ट तुला अर्पण करेन’, असा काहीसा खेदानं ‘दे-घे’चा व्यवहार म्हणावा, असं केलं जातं. अशा वेळी त्या भक्ताचं मागणं पूर्ण झाल्यावर वेळ येते ती व्यवहार पूर्ण करायची. मग घेतला जातो देवाला दागिना. अशा नवसाखेरीजही काही वेळा घरातल्या शुभकार्याच्या निमित्तानं देवांना मोठय़ा हौसेनं दागिने केले जातात. कारण काहीही असो, अशा देवांच्या दागिन्यांची मागणी वाढते आहे. देवाचे बरेचसे दागिने सोन्या-चांदीमध्ये तयार मिळतात किंवा मूर्तीच्या मापाप्रमाणं तयार करून दिले जातात.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..

आपल्या अनेक लेण्यांमधून आढळणारी शिल्पकला इसवीसनपूर्व काळातली आहे. आपली मंदिरं पाचव्या शतकानंतरची आहेत. या दोन्हीं माध्यमांतून विविध अलंकारांचे संदर्भ मिळतात. त्यानंतर कुशाणकाळ, गुप्तकाळ, मोगल सत्ता, पेशवाई आदींच्या सत्ता आणि राजवटींचा प्रभाव दागिन्यांवर पडलेला दिसतो. यापकी काही राजेमहाराजांनी देवस्थानांमध्ये दागिने वाहिले आहेत. उदाहरणार्थ-महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह बरीच देवस्थानं. काहींच्या मते गेल्या तीस वर्षांत देवदेवतांसाठी दागिने तयार करून घ्यायची पद्धत अधिक रूढ झाली आहे. त्याची सुरुवात सार्वजनिक गणेशोत्सवांत गणपतीसाठी दागिने तयार करण्यापासून झाली असावी.

टकले बंधू सराफचे संचालक गिरीश टकले सांगतात की, ‘‘देव आणि देवता या दोघांसाठी वेगवेगळे दागिने तयार केले जातात. काही दागिने भिन्न तर काही समान असतात. मुकुट देव-देवता असा दोघांनाही घातला जातो. काही दागिने फक्त देवीचेच असतात. उदाहरणार्थ- वणीच्या देवीला मोठी नथ आणि मंगळसूत्र करतात. साईबाबांना अधिकांशी मुकुट केला जातो. नवरात्रात देवीला हार केला जातो. शक्य असेल तर कमरपट्टा केला जातो. देवांसाठी गळ्यातली साखळी किंवा जानवं करता येतं. देवीला मण्यांचे अलंकार केले जातात. प्रसंगी बाजूबंद केला जातो. घरातल्या देवांना सोन्याचे दागिने करण्याचा ट्रेण्ड नाहीये. सार्वजनिक देवळांतल्या मोठय़ा मूर्तीसाठी मुकुट, गळ्यातले मोठे हार केले जातात. देवीच्या मोठय़ा मूर्तीना मोहनमाळ, पोहेहार, चपलाहार असे दागिनेही केले जातात. छोटय़ा मूर्तीला कंठी केली जाते.’’

06-lp-devi-gold

देवदेवतांचे दागिने अधिकाधिक आकर्षक होण्यासाठी मोती किंवा खडे वापरले जातात. त्यांच्या वापरानुसार दागिन्यांच्या किमतीत फरक पडतो. त्यामुळं माणिक, पाचू, नीलम, मोती यांचा वापर किंवा त्याऐवजी याच रंगांचे साधे खडे वापरले जातात. त्यामुळं दागिन्यांना अधिकाधिक उठाव येतो. अलीकडं देव-देवतांच्या दागिन्यांसाठी ग्राहकांचा कल सोन्याकडं जास्त आहे. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे सीएमडी सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं की, ‘‘देवदेवतांसाठी दागिने हे बहुतेक करून सगळ्या प्रकारात तयार केले जातात. त्यामध्ये गौरी-गणपतीचे हार, मुकुट तसेच हनुमानाच्या मूर्तीसाठी रुईच्या पानाचा हार, शंकरासाठी रुद्राक्ष माळ, नवरात्रात देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आणि हार, शनीच्या मूर्तीसाठी चांदीचे डोळे, कृष्णासाठी बासरी, विठ्ठलासाठी मुकुट वगरे. या दागिन्यांची शोभा वाढविण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे खडे, मोती, मीनाकारीचा वापर केला जातो. दागिन्यांचे डिझाइन घडवताना दागिन्याचे माप, त्यांना दिला जाणारा डाग, त्यातील खडय़ांचं सेटिंग, त्यांचं पॉलिश ही कामं खूप काळजीपूर्वक करावी लागतात.’’

घरातील देवदेवतांसाठी दागिन्यांमध्ये हार, मुकुट, पानाफुलांचा हार, रुद्राक्ष माळ, नवरात्रात देवीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आणि हार, हातातील तोडे अशा प्रकारे बरेच दागिने सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये तयार मिळतात, किंवा मूर्तीच्या मापाप्रमाणं तयार करून दिले जातात. तर श्रीकृष्णासाठी तयार केल्या जाणाऱ्या दागिन्यांमध्ये मुरली, कडं, मुकुट, चांदीचं मोरपीस, उपरणं तयार करतात. व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड सन्सचे डायरेक्टर सुजन मुसळूणकर यांनी सांगितलं की, ‘‘गणेशोत्सवानिमित्तानं दागिने घेण्याकडं लोकांचा अधिक कल असतो. त्यात कंठय़ा, मोदक, दुर्वा कंठी, सोंडपट्टी वगरे अलंकारांना मागणी असते. दर तीन वर्षांनी थोडेफार बदल करून नवीन डिझाइन्स येतात. ‘‘अनेकदा घरातल्या देवांसाठीचे दागिने घडवणं ही गोष्ट लोकांची इच्छा आणि त्यांच्या ऐपतीवर अवलंबून असतात. शिवाय अनेकदा सोन्या-चांदीच्या मूर्तीच्या अंगभूत डिझाइनमध्येच हार दाखवलेले असतात. त्यामुळं वेगळे दागिने कमी असतात. क्वचित काही वेळा छोटय़ा पडद्यावरच्या मराठी-िहदी पौराणिक मालिका किंवा चित्रपटांचा प्रभाव दागिन्यांच्या घडणीवर-मागणीवर पडतो आणि त्यांची मागणी वाढते. खऱ्या सोन्या-चांदीखेरीज अलीकडच्या काळात एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनाही मागणी आहे. पूर्वापेक्षा या प्रकारच्या दागिन्यांमध्ये बरंच वैविध्य आहे. उदाहरणार्थ- गणपतीसाठी भिकबाळी, सोंडपट्टीसह दागिन्यांसह उपरणंही केलं जातं. काहीजणं नवस करतात, पण त्यांना सोन्याचे अलंकार घेणं परवडत नसल्यामुळं ते एक ग्रॅमच्या दागिन्यांना पसंती देतात.

दागिन्यांमध्ये आवडीनुसार डिझाइन करणं, कलाकुसर करणं यामुळं दागिन्यांच्या किमतीत वाढ होत जाते. शिवाय प्रत्येकाच्या आवडीनुसार, दागिना घडवून घेण्यानुसार ही किंमत वाढत जाते. सध्याच्या काळात सोन्या-चांदीचे वाढते भाव आणि सुरक्षिततेचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेता अनेकदा हे दागिने ठरावीक वेळीच वापरले जातात. पूर्वी देवतांसाठी केवळ मोदक, मुकुट असे ठरावीक प्रकारचेच दागिने केले जात असत. आताशा लोकांची आवक  वाढली आहे. राहणीमान बदलले आहे आणि पर्यायानं भोवतालच्या वातावरणाचा परिणाम स्वरूप, आवडही बदलत चाललेली दिसते आहे. त्यामुळं देवासाठी घ्यायच्या दागिन्यांचा ट्रेंडही बदलतो आहे. आपल्या भक्तीचं प्रतीकात्मक रूप म्हणून देवांना दागिन्यांचा साज चढवण्याच्या मानसिकतेमुळं देवांच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार सराफाबाजारात पाहायला मिळत आहेत. भक्तमनांचा कानोसा घेतला, तर पुढेही देवांच्या दागिन्यांची मागणी वाढती राहील, असंच चित्र दिसतंय.
(छायाचित्र सौजन्य : पीएनजी ज्वेलर्स आणि टकले बंधू ज्वेलर्स)
राधिका कुंटे – response.lokprabha@expressindia.com