News Flash

हिरवाई : झुडूप आणि गवतही झाडाइतकेच महत्त्वाचे

दरवर्षी नित्यनियमाने आपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो.

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने झाडे वाचवण्याचा, वृक्षलागवड करण्याचा संदेश दिला जातो. पण अनेकांना हे माहीतच नसते, की छोटी झुडुपं, गवताळ प्रदेश हेदेखील पर्यावरण परिसंस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. आणि तेदेखील जपले पाहिजेत.

दरवर्षी नित्यनियमाने आपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. यावर्षीही तो सर्वत्र साजरा करण्यात आला. पर्यावरण म्हणजे काय, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काय संबंध असतो हे सगळ्यांना कळण्यासाठी तो साजरा केला जातो. पर्यावरण म्हणजे काय हे बहुतांशी सर्वानीच त्यांच्या शालेय जीवनात शिकलेले असते. परंतु बऱ्याच वेळेला या पर्यावरणाचा आपल्याशी नित्यनियमाने काय संबंध येतो ते मात्र बऱ्याच जणांना लक्षात येत नाही. पर्यावरणाचे संतुलन राखणे म्हणजेच ते न बिघडवणे हे स्वत:च्या तसेच पुढील पिढीच्या भल्यासाठीही आवश्यक आहे, हे लोकांना कळणे गरजेचे आहे.

वने आणि पर्यावरण यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे वनांशी निगडित कोणतीही गोष्ट जसे की, वनात होणारी वृक्षतोड, गुरेचराई, खाणकामे यांचा वनांवर दुष्पपरिणाम होतो. याच्या जोडीला गवताळ प्रदेशांचे महत्त्व समजून न घेता तिथे मोठय़ा प्रमाणात रोपे अथवा वृक्षलागवड करणे याला आपण दुष्परिणाम म्हणू शकणार नाही; परंतु या कृतीमुळे वनांमधील परिसंस्थेतच बदल होऊ शकतो. कारण वनांमध्ये वृक्ष कितीही असले तरी जोपर्यंत तिथे झुडपे व गवत नाही तोपर्यंत ते वन जंगल म्हणून पूर्णत्वास येत नाही. गवत हे असंख्य तृणभक्षी वन्यजीवांचे खाद्य आहे व हे तृणभक्षी जीव मांसाहारी प्राण्यांचे भक्ष्य असतात. त्यामुळे अन्नसाखळी पूर्ण करण्यासाठी या गवताळ प्रदेशांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गवताळ जमिनीवर वावरणाऱ्या माळढोक, धावक, फ्रॅन्कोलिनसारख्या पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण कीटकांसारखे खाद्य त्यांना या गवताळ प्रदेशातच मिळते. कीटकांचे तर पूर्ण आयुष्य बहुतांशी या गवताळ प्रदेशावर अवलंबून आहे. या कीटकांवर अवलंबून असणारे पक्षी, बेडकासारखे उभयचर प्राणी, सरडय़ासारखे सरपटणारे प्राणी, गवतरूपी धान्यपिकांवर अवलंबून असलेले उंदीर, उंदरांवर जगणारे साप व सापावर जगणारे ससाणा, घार, हॅरिअर यांसारखे पक्षी आपापल्या जगण्याने जंगल जिवंत ठेवतात. प्रत्येक वन आपल्या परिपूर्ण अवस्थेला जाऊन पोहोचते त्यावेळेस निसर्गाच्या विविध चक्रामधून तावून-सुलाखून तयार झालेली परिसंस्थाही वैविध्यपूर्ण वन्यजीवांसाठी योग्य होते. त्यामुळे गवताळ प्रदेशांची परिसंस्था सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे.

सामान्यत: पर्यावरण संतुलन राखणे म्हणजे जमीन जास्तीत जास्त वनाच्छादित व वृक्षाच्छादित ठेवणे असे सर्वाना वाटते. एकप्रकारे ते योग्यही आहे; परंतु पूर्ण योग्य मात्र नाही. कारण निव्वळ वृक्ष हे कधीही एक संपूर्ण परिसंस्था बनत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर इ. जिल्ह्य़ांच्या पूर्व भागात जिथे पाऊस कमी पडतो तिथे बऱ्याच ठिकाणी जमीन उजाड दिसते त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर वनीकरण होणे जरुरी आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. (वनाधिकारीसुद्धा याला अपवाद नाहीत) परंतु या भागामध्ये खरोखरच किती रोपे लावायची अथवा त्यात कोणत्या प्रजाती हव्यात याचा नीट विचार करायला हवा. उन्हाळयाच्या दिवसात या भागाची पाहणी करण्यापेक्षा पावसाळयात म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जेव्हा हा भाग गवताने भरून जातो त्याच वेळेस तेथे या क्षेत्रात कशा प्रकारे वनीकरण करावे हा विचार करणे जरुरीचे आहे. कारण त्या गवताळ परिसंस्थेवर जगणारे लांडगे, कोल्हे, तरस तसेच वेगवेगळया प्रकारचे सरडे, धावक, तितर, बटेर यांसारखे पक्षी कशा प्रकारे या परिसंस्थेवर अवलंबून असतात, या परिसरात अत्यंत कमी प्रमाणात पडणारा पाऊस व त्यातून मिळणारे पाणी हे एखाद्या ‘स्पंज’प्रमाणे काम करून ओलावा कसा टिकवून धरते हे नानज, रेहकुरी, सागरेश्वर, गंगेवाडी अशा ठिकाणी भटकंती केल्यास लगेच कळून येते. मग या ठिकाणी रोपे लावायचीच नाहीत का? तर रोपे जरूर लावायची आहेत; परंतु ती किती व कशा प्रकारे लावायची हे ठरवायला हवे. इथे निव्वळ भरीव वनीकरण (टं२२्र५ी अऋऋ१ी२३ं३्रल्ल ) न करता आफ्रिकेत जशी  ‘सहारा’ प्रकारची गवताळ परिसंस्था आहे त्या पद्धतीची रोपे लागवड इथे व्हायला हवी. जास्त प्रमाणातील मृदू व संधारणाची कामे इथे व्हायला हवीत. त्यामुळे या भागात जेवढा पाऊस पडेल त्याचे पाणी जमिनीत मुरवून टिकवले जाईल. गवताळ परिसंस्था ही निसर्गाची भौगोलिक परिसंस्थेवर अवलंबून असलेली व तेथील हवामानानुसार तयार झालेली एक नसíगक परिसंस्था आहे. ही परिसंस्था जेथे मानवाच्या हस्तक्षेपामुळे खालावली आहे. (डिग्रेडेशन) त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेने त्वरित हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय अस्तित्वात असलेल्या व खालावल्या न गेलेल्या गवताळ परिसंस्था मात्र आहे जशा आहेत तशा टिकवणे गरजेचे आहे. निसर्गाच्या परिसंस्थेतील प्रत्येक घटक आपली भूमिका निसर्ग साखळीत अत्यंत चांगल्या प्रकारे (जेव्हा मानवी हस्तक्षेप नसेल तेव्हाच) पार पडत असतो; परंतु यातला एखादा घटक जरी मानवाच्या हस्तक्षेपामुळे नष्ट झाला तर ही संपूर्ण प्रक्रियाच संकटात येऊ शकते हे आज आपण वेगवेगळ्या नसíगक आपत्तींच्या रूपात (ग्लोबल वॉर्मिग) अनुभवतो आहोत. आपल्या शरीरातील एखाद्या अवयवात जर प्रमाणापेक्षा जास्त बिघाड झाला तर त्याचा परिणाम आपोआपच संपूर्ण शरीरावर होतो, त्याचप्रमाणे भूस्खलन होणे, वाढलेल्या तापमानामुळे बर्फ वितळणे अशी कारणे म्हणजे एखादी परिसंस्थाच नव्हे तर पृथ्वीची तब्येत बिघडली असल्याचे लक्षण आहे. आपण आजारी पडल्यावरच उपाय करतो असे नाही तर आजारी पडूच नये म्हणून जशी काळजी घेतो तशीच याबाबतही घेणे जरुरीचे आहे. त्याचप्रमाणे गवताळ परिसंस्था वाचवणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपण गवत खात नसलो तरी आपल्याला सर्व पोषक द्रव्ये अप्रत्यक्षपणे गवतापासूनच म्हणजे जनावरांच्या दुधातून, मेंढी, बोकड यांच्या मांसातून मिळत असतात. जगात गाई-गुरांची संख्या भारतात जास्त असली तरी त्यातील दुभती जनावरे कमी व भाकड जनावरे जास्त अशी परिस्थिती आहे व त्यामुळे यातील बरीचशी जनावरे चराईसाठी मोकाट सोडली जातात.

त्यांचा चराईचा जास्त भर हा वनक्षेत्रातील व रोपवनातील गवतावर असतो. गवत व झुडपे छोटी असतानाच ही गाई-गुरे अशा गवताळ भागात मोकाट चरल्याने त्या गवतांपासून व झुडुपांपासून बीजोत्पादन होण्याआधीच ती नष्ट होतात त्यामुळे वनविभागाच्या कुरणांमध्ये तसेच वनक्षेत्रातील रोपवनांमध्ये गुरे चराई होऊ नये यासाठी वनविभागाने अत्यंत काळजी घेणे जरुरीचे आहे. ती घ्यायचा प्रयत्न विभाग करीत आहे. जळगाव, धुळे म्हणजेच खानदेशात या गवताळ परिसंस्थेचे रक्षण करणे ही रोपे लागवडीएवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण अवैध गुरेचराई, गवताला बीजधारण होण्यापूर्वीच गवत कापणी केली जाणे या बाबी थांबवून गवताळ प्रदेशाचे चांगले व्यवस्थापन हे वनविभागापुढील मोठे आव्हान आहे. आज वनविभागाने वनांच्या संवर्धनार्थ सर्वत्र संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांचा व्यवस्थित उपयोग करून घेतला तर गवताळ परिसंस्था पुनर्जीवित केली जाऊन चांगली राखली जाऊ शकते. जळगाव जिल्हयातील यावल अभयारण्यातील जामना हे गाव हे याचे उत्तम उदाहरण आहे. ग्रामस्थ आणि वनविभाग यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे एकत्रित काम करून ही गवताळ परिसंस्था वाचवली आहे. त्यामुळे वनविभागाने कमी पावसाच्या प्रदेशातील गवताळ परिसंस्था राखणे व त्याचबरोबर उजाड वनक्षेत्र हरित करणे ही एक दुहेरी जबाबदारी पार पाडायची आहे. याचा विचार येत्या तीन वर्षांत जी ५० कोटी रोपे लावण्यात येणार आहेत त्यामध्ये करण्यात आला आहे.

पर्यावरण संतुलनातील एक चांगला प्रयत्न म्हणून वनविभाग खूप मोठय़ा प्रमाणावर रोपे लावून महाराष्ट्र हिरवागार व्हावा व पर्यावरण संतुलन राखण्यास मदत व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. मागील वर्षी महाराष्ट्र राज्यात वने आणि वनेत्तर क्षेत्रात मिळून १ जुल, २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी रोपे लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला होता व हा रोपे लागवडीचा प्रकल्प एक ‘लोक चळवळ’ म्हणून राबवून त्या एकाच दिवशी २.८३ कोटी रोपे लावली गेली. आज सुमारे ९० टक्केपेक्षा जास्त रोपे जागेवर वाढत आहेत.

त्या रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे करणे ही एक मोठी पर्यावरण चळवळच होणार आहे. चालू वर्षी महाराष्ट्र राज्यात वने आणि वनेत्तर क्षेत्रावर मिळून चार कोटी रोपे लावण्याची तयारी करण्यात आली आहे. तर २०१८ च्या पावसाळ्यात १३ कोटी व २०१९ च्या पावसाळ्यात ३३ कोटी अशी २०१७ ते २०२० या कालावधी मध्ये एकूण ५० कोटी रोपे लावगडीसाठी ही एक ‘हिरवी लोक चळवळ’ तयार होऊ लागली आहे. यामध्ये वन विभागामार्फत २.२५ कोटी, इतर शासकीय विभागांकडून ७५ लाख आणि ग्रामपंचायतींकडून एक कोटी रोपे लागवड होणार आहेत. या रोपे लागवडीबरोबर ही रोपे जगवण्यावरही भर देणे हा महत्त्वाचा मानस आहे. या सर्व रोपे लागवडीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत, आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्व शासकीय यंत्रणां बरोबरच रोपे लागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग मिळवावा यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे. यामध्ये शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक – आध्यात्मिक संस्था, स्वयंसेवी संस्था, स्काऊट – गाइड, रोटरी, यांचेदेखील सहकार्य घेण्यात येत आहे. यासाठी गावागावांत वातावरण निर्मिती केली जात आहे. वृक्ष लागवडीची घोषवाक्ये, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत, गावात वृक्ष िदडी काढली जाणार आहे. शालेय प्रभात फेरीच्या माध्यमातून गावांमध्ये वृक्ष लागवडीची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. रोपे लागवडीच्या कामात सर्व पक्षीय लोकांचा सहभाग घेण्यात येत असून त्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. वन विभाग हा या कार्यक्रमात सर्वासाठी समन्वयक आहे.

पण फक्त रोपे लागवड करून वन विभाग थांबणार नाही तर त्याबरोबर जल व मृद संधारण कामावरही भर देण्यात येणार आहे.  ठाणे येथील वसुंधरा संजीवनी मंडळ या स्वयंसेवी संघटनेच्या सहाय्याने जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यातील तळवली गावाच्या परिसरात वन विभाग लोकशिक्षण, लोकसहभाग व लोकसक्षमीकरण करत आहे. कनकवीरा नदीच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रमही या पावसाळ्यापासून घेण्यात येणार आहे. तळवली गावाजवळून वाहणारी ही नदी,  त्यात साठलेला गाळ व तीरावरील उजाड प्रदेश यामुळे फेब्रुवारी महिन्यातच ही नदी आटायला लागते.  त्यामुळे नदीच्या दोन्ही तीरावर जरूर त्या ठिकाणी दगडांचा भराव व माती पसरायचे काम सुरू आहे. याबरोबरच नदीच्या दोन्ही तीरांवर बाजूने प्रत्येकी एक किलोमीटपर्यंत जांभूळ, उंबर, वड, करंज, कांचन इ. रोपांची लागवड करण्यात येणार आहे.  तसेच नजिकच्या वनक्षेत्रात पावसाचे पाणी साठवण्यासाठी व ते जमिनीत मुरण्यासाठी सलग समतल चरसुद्धा काढण्यात येणार आहेत.

रोपे लागवड व जल आणि मृद संधारण यातून हरित महाराष्ट्र करण्याचा संकल्प निश्चितच तडीस जाणार, अशी आशा आहे.
सुनील लिमये – response.lokprabha@expressindia.com
(लेखक ठाणे येथे मुख्य वनसंरक्षक आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:04 am

Web Title: grass and bushes are equally important to trees
Next Stories
1 लोकजागर : सायबर हल्ल्याच्या विळख्यात
2 लोकजागर : सायबर हल्ला, व्हायरस, मोल आणि मालवेअर
3 अरूपाचे रूप : #नेपाळफोटोप्रोजेक्ट
Just Now!
X