27 May 2020

News Flash

कर्करोगाचं सावट उंबरठय़ापाशी

आपल्या देशाला कर्करोगाने  घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतोय.

माणसाच्या जीवनशैलीत जसजसा बदल होत जाणार आहे, तसतसं तसं कर्करोगाचं प्रमाण वाढत जाणार आहे

आरोग्य

शैलजा तिवले

आपल्या देशाला कर्करोगाने  घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतोय. अगदी सहज विचार केला तरी, ओळखीतल्या किमान पाच व्यक्ती तरी आपल्या डोळ्यासमोर येतात ज्यांना या आजाराने ग्रासलं आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अहवालाने ही याला दुजोरा देत कर्करुग्णांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये उत्तरोत्तर वाढत असल्याचं अधोरेखित केलं आहे

माणसाच्या जीवनशैलीत जसजसा बदल होत जाणार आहे, तसतसं तसं कर्करोगाचं प्रमाण वाढत जाणार आहे, हे सत्य आता आपण स्वीकारायला हवं. १९९० ते २०१६ या कालखंडात भारतातील व्यक्तीचं सरासरी वयोमान ४७ वरून ६९ पर्यंत वाढलं आहे. ‘ग्लोबल बर्डन डिसिज’च्या आकडेवारीनुसार, १९९० मध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू हे अतिसार, फुप्फुसाचे विकार, हृदयविकार, श्वसन विकार, नवजात अर्भकातील दोष, क्षयरोग तसंच एचआयव्हीमुळे झाले. यात कर्करोगाचा क्रमांक सातवा होता. संसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण, लसीकरण, नवजात बाळकांची काळजी यावर भर दिल्याने हा क्रमच गेल्या २६ वर्षांत बदलला आहे. २०१६ मध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने झाल्याची नोंद आहे. त्या खालोखाल अतिसार, फुप्फुसाचे विकार, श्वसन विकार आणि कर्करोगाने प्रामुख्याने झाले आहेत. म्हणजे गेल्या २६ वर्षांत भारतात कर्करोग पूर्वीच्या सातव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे.

आयुर्मान आणि कर्करोग

जीवनशैलीमुळे शरीरातील गुणसूत्रांची जी हानी होते, त्यामुळे कर्करोग होतो. मानवी शरीराच्या प्रत्येक अवयवात पेशींनी सतत नव्याने तयार होत असतात. या पेशींचे विभाजन होते आणि पुन्हा तशीच गुणसूत्रे असलेल्या नवीन पेशी तयार होतात. सतत सुरू असलेल्या या प्रक्रियेत एका टप्प्यावर चुकीची गुणसूत्रे समाविष्ट होतात. या बदलाला उत्परिवर्तन (म्युटेशन) म्हटलं जातं. ते दरवेळी हानीकारक असतंच असं नाही. उत्परिवर्तनावर शरीरातील अनेकजैविक यंत्रणांद्वारे नियंत्रण ठेवलं जातं. काही वेळा मात्र या उत्परिवर्तनामुळे पेशींचं अनियंत्रित विभाजन होतं आणि त्या मरत नाहीत. अनियंत्रित वाढणाऱ्या या पेशी या कर्करोगाच्या पेशी होय.

शरीरावर होणारा परिणाम

कर्करोगाचे शरीरावर होणारे परिणाम विस्तृतपणे सांगताना आशियाई कर्करोग संस्थेचे डॉ. रमाकांत देशपांडे सांगतात, एखाद्या अवयवात पेशींची वाढ नियंत्रणापलीकडे होते. सुरुवातीला त्या ठिकाणी गाठ किंवा जखम आढळते. कालांतराने त्यातून रक्तस्राव होतो किंवा गाठ दुखायला लागते. पेशींची ही अनियंत्रित वाढ त्या अवयवाच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करते. उदाहरणार्थ अन्ननलिकेमध्ये गाठ आली तर सुरुवातीला गिळायला त्रास होतो. गाठ अधिक वाढली की पाणीही पिणं शक्य होत नाही. अर्थातच कालांतराने शरीरावर याचे दुष्परिणाम होतात.

मग ही वाढ त्या अवयवापुरतीच मर्यादित राहत नाही. जागा मिळेल तिकडे या पेशी आपले बस्तान बसवायला सुरू करतात आणि अशा रीतीने कर्करोग शरीरात पसरत जातो. केस, नखं वगळता कोणत्याही भागातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कर्करोग उद्भवू शकतो.

पेशींच्या वाढीचा वेग अवयवांनुसार वेगवेगळा असतो. हाडांचा कर्करोग वेगाने पसरत नाही. परंतु हाडामध्ये तो रक्तवाहिन्यांच्या जवळ असल्यास झपाटय़ाने पसरतो. बहुतांश वेळा कर्करोग पसरल्यावरच रुग्ण डॉक्टपर्यंत पोहोचतो आणि मग कर्करोगाचे निदान होते.

कर्करोगाचा प्रसार गेल्या दोन दशकांमध्ये झपाटय़ाने होत असला तरी त्याचे अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे. जनावरांमध्येही कर्करोग आढळतो. सुश्रुत संहितेतही कर्करोगाचा उल्लेख आहे. इजिप्तमधील ममीज्मध्येही कर्करोगाचे पुरावे सापडले आहेत.

कर्करोगाचे मोजमाप

राष्ट्रीय कर्करोग नोंदणीच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार, भारतात सुमारे ११ लाख ५७ हजार नवीन कर्करुग्णांची नोंद झाली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा हा जवळपास सात लाख ८४ हजारांवर पोहोचला आहे. टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे सांगतात की देशात कर्करुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरी दर एक लाख लोकसंख्येमागे हे प्रमाण गेल्या २० वर्षांमध्ये स्थिर राहिलं आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात ४० ते ५०, निमशहरी भागात ६५-८० आणि शहरं किंवा मेट्रोपॉलिटिअन भागांत ९०-१०० असे आहे.

कर्करोगाचं प्रमाण आणि रुग्णसंख्या यांचं गणित याबद्दल टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीपाद बनावली सांगतात, ‘आजाराचं प्रमाण केवळ रुग्णांच्या संख्येवरून नाही तर एकूण लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येच्या सरासरीवरून ठरतं. स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण गेल्या काही वर्षांत बरंच वाढलं आहे तर दुसरीकडे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी होत आहे. पण कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढताना दिसत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत कर्करोगाच्या सरासरी प्रमाणात फार वाढ  झालेली नाही. या अहवालातील आकडेवारीवरून एका इंग्रजी वृत्तपत्राने ३०० पटींनी कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचा दावा केला आहे. ही वाढलेली आकडेवारी रुग्णांची आहे, आजाराच्या प्रमाणाची नाही. त्यामुळे या दाव्यामध्ये तथ्य नसल्याचे डॉ. बनावली स्पष्ट करतात.

प्रामुख्याने आढळणारे कर्करोग

स्त्रियांमध्ये मानसिक ताणतणाव आणि हार्मोन्सच्या बदलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये कर्करोगाचं प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत थोडं जास्त आहे. २०१८ या वर्षांत ५५ टक्के स्त्रिया तर ४५ टक्के पुरुष कर्करुग्णांची नोंद झाली आहे. स्त्रियांमध्ये प्रामुख्याने स्तनांचा, गर्भाशय मुखाचा आणि त्या खालोखाल गर्भाशय, बीजांडकोषाचा तसंच आतडय़ाचा कर्करोग दिसून येतो. पुरुषांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगासह कान, नाक, घसा आणि तोंड यांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक असून यापाठोपाठ पुर:स्थ (प्रोस्टेट) ग्रंथी तसंच मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचं प्रमाण काही अंशी दिसतं.

कर्करोगाची कारणमीमांसा

बहुतांश कर्करोगाच्या वाढीच्या मुळाशी बदलती जीवनशैली असल्याचे वास्तव मांडत डॉ. बनावली सांगतात, गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आहारापासून विहारापर्यंत अनेक बदल झालेले आहेत. हे बदल खूपदा कर्करोगाला कारण ठरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा, मुख किंवा ओठ, घसा, फुप्फुस, आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिकांश दिसून येते.

कर्करोगाच्या इतर कारणांचा आढावा घेताना वोक्हार्टच्या ऑन्कॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मल्लिका तिवारी सांगतात, वाढतं प्रदूषण आणि झपाटय़ाने होणारं शहरीकरणही कर्करोगाच्या वाढीस कारणीभूत आहे. आनुवांशिकतेमुळे काही प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता असते. कुटुंबामध्ये स्तनाचा कर्करोग असल्यास पुढील पिढीमध्येही तो होण्याचा संभव असतो. विषाणूंच्या संसर्गामुळेही कर्करोग होतो. यामध्ये हिपेटाइटिस बी किंवा सीच्या विषाणू संसर्गाने यकृताचा कर्करोग तर शरीरसंबंधातून ह्य़ुमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) विषाणूचा संसर्ग झाल्यास गर्भाशयमुखाचा कर्करोग होऊ शकतो. अलीकडे संसर्गामुळे होणाऱ्या कर्करोगापेक्षा जीवनशैलीशी निगडित कर्करोगाचं प्रमाण तुलनेत वाढलं आहे.

पूर्वी स्त्रियांमध्ये गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक होतं. जनजागृती, रुग्णांची पूर्वचाचणी, एचपीव्ही प्रतिबंधात्मक लस यावर भर दिल्याने प्रमाण कमी झालं असून अलीकडे स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण मात्र वाढत आहे.

यामागील कारणमीमांसा स्पष्ट करताना डॉ. देशपांडे सांगतात, मुलींच्या लग्नाचं वय आता तिशीच्याही पुढं गेलं आहे. त्यामुळे साहजिकच पहिलं मूल होण्याचं त्या पलीकडे सरकलं आहे. तसेच मुलांना स्तनपान देण्याचं प्रमाणही कमी होत आहे. वास्तविक बाळांना स्तनपान देणाऱ्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. पाळी पुढे-मागे ढकलण्यासाठी किंवा गर्भधारणा होऊ नये यासाठी गोळ्या घेण्याचं प्रमाण मर्यादेपलीकडे वाढलं आहे. या सगळ्यामुळे स्त्रियांच्या शरीरात अतिप्रमाणात हार्मोन्स जातात. तसेच स्त्रियांमधील मानसिक ताणतणावही हल्ली खूप वाढला आहे. स्थूलपणा वाढला आहे. या कारणांमुळे स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण जास्त दिसून येतं. तंबाखू, धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषण यामुळे पुरुषांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढते आहे. त्या खालोखाल मुखाच्या, ओठाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह आता आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाणही नोंद घेण्याइतपत आढळून येते.

कर्करोग होण्याचे वय हळूहळू अलीकडे सरकत असल्याचे निदर्शनास आणताना डॉ. तिवारी सांगतात, सर्वसाधारणपणे उतारवयात कर्करोगाची व्याधी जडल्याचे आत्तापर्यंतचे अनुमान आहे. परंतु हल्ली तरुण वर्गामध्येही कर्करोग झाल्याचे आढळून येते. यामागे आनुवंशिकता हे एक कारण असू शकते असा अंदाज आहे. भारतात आढळणाऱ्या कर्करोगातील ५० टक्के कर्करोग प्रतिबंधात्मक आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारपद्धतीसोबतच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणं आवश्यक असल्याचं डॉ. बनावली नमूद करतात. ते सांगतात, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान या घातक सवयी पूर्णपणे बंद केल्या तर फुप्फुस आणि मुखाच्या कर्करोगाचं प्रमाण कमी होऊ शकेल. तसंच संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताणतणावापासून मुक्त राहण्यासाठी योग किंवा अन्य पर्यायांचा वापर, पुरेशी झोप या जीवनशैलीतील सुधारणा कर्करोग रोखण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. जंकफूड पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये पूर्वी धूम्रपान किंवा तंबाखू, मद्य यांच्या अतिसेवनामुळे निर्माण होणाऱ्या कर्करोगाचं प्रमाण सर्वाधिक होतं. परंतु आता त्यापेक्षाही स्थूलपणाशी निगडित कर्करोग हा अधिक गंभीर प्रश्न बनला आहे. भारतामध्येही स्थूलपणाचं प्रमाण हळूहळू वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेसारखीच स्थिती भारतात पुढील काही वर्षांमध्ये निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यकृत किंवा गर्भाशयमुखाचा असे विषाणूंच्या संसर्गामुळे होणारे कर्करोगही प्रतिबंधात्मक लसीकरण किंवा उपायांच्या माध्यमातून टाळणं शक्य आहे.

कर्करोगाविषयीचे गरसमज

कर्करोगाबाबत अज्ञान, भीती आहे. कर्करोगाचं निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बायोप्सी किंवा उपचाराअंतर्गत शस्त्रक्रियांमुळे कर्करोग पसरतो असा समज लोकांमध्ये आहे. उलट वेळेत निदान आणि उपचार न केल्यास कर्करोग शरीरात पसरतो. तेव्हा मात्र उपचार करणं अवघड असतं असं डॉ. तिवारी सांगतात.

कर्करोग पुन्हा होतो का?

कर्करोगावर उपचार केले तरी रक्तामध्ये या पेशींचा अंश राहण्याची शक्यता असते. या पेशींचं निदान करणं शक्य नसतं. त्यामुळे काही काळानंतर पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कर्करोग डोकं वर काढण्याचा संभव असतो. त्यामुळे कर्करुग्णांनी वारंवार तपासणी करणं आणि प्रितबधात्मक उपचार करणं महत्त्वाचं आहे.

कर्करोग हा क्षय किंवा एचआयव्हीसारखा संसर्गजन्य रोग नसूनही समाजात याबाबतची भीती  का वाढते आहे, याचं उत्तर शोधताना अनेक मुद्दे समोर येतात.

कर्करोग म्हटलं की धडकी भरते आणि कारण त्यावरची महागडी उपचारपद्धती.  निदानापासून ते उपचारासाठी लाखो रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने आíथकदृष्टय़ा दुर्बल घटकातील रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणं परवडत नाही. दुसरीकडे कर्करोगावर उपचार करणारी सरकारी रुग्णालयं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असून यातील बहुतांश मोठय़ा शहरांमध्ये आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना या रुग्णालयांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय नाही. रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचार सुविधाच उपलब्ध नसल्याने रुग्ण, त्याचे नातेवाईक यांची फरफट होते.

पाठपुराव्यासाठी अत्यल्प प्रतिसाद

राज्यभरात पूर्वचाचणीवर गेल्या काही वर्षांमध्ये भर देण्यात येत असला तरी निदान, उपचाराच्या सुविधा मर्यादित असल्याने रुग्णांना शहरामध्ये यावं लागतं. सातत्याने पाठपुरावा करूनही आमच्याकडील २० ते २५ टक्के रुग्णच पूर्णपणे उपचार घेत असल्याची चिंता कॅन्सर अ‍ॅण्ड पेशंट एड असोसिएशनच्या नीता मोरे व्यक्त करतात.

राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोग तपासणीसह उपचारांचा स्वतंत्र विभाग विकसित करावा, अशी शिफारस १९५९ साली भोरे समितीने केली होती. ६० वष्रे उलटली तरी अंमलबजावणी झालेली नाही. गेल्या वर्षी सरकारने १० जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सुरू करण्याचं जाहीर केलं होतं. त्याबाबत अद्याप ठोस पावलं उचलेली नाहीत. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टाटा मेमोरियल रुग्णालयामार्फत प्रशिक्षण देण्याची प्रक्रियाही अजून प्रलंबितच आहे.  राज्यभरात मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालय वगळता औरंगाबाद, नागपूर येथे कर्करोग रुग्णालय आहे. त्यांच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला असला तरी हे प्रकल्प रखडलेले आहेत.

भारताने राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम १९८१ साली सुरू केला. मात्र अजूनही सर्व राज्यांचा त्यामध्ये समावेश नाही. बहुतांश नोंदणी ही शहरांमध्ये सक्षमरीत्या होत असून ग्रामीण भागापर्यंत मात्र हा कार्यक्रम फारसा पोहोचू शकलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भारतालील कर्करोगाची परिस्थिती अजूनही ठळकपणे स्पष्ट झालेली नाही.

महागडय़ा औषधांना पर्याय

कर्करोगाची औषधे अत्यंत महाग असून सामान्य रुग्णांना परवडणारी नाहीत. यातील काही औषधांच्या किमतीवर र्निबध आणले असले तरी प्रत्यक्ष याचा फायदा रुग्णांना फारसा झालेला नाही, असे मत ऑल इंडिया ड्रग अ‍ॅक्शन  नेटर्वकच्या मालिनी असोल यांनी मांडले. भारताने २००५ साली जागतिक व्यापार संघटनेच्या दबावाखाली स्वीकारलेला प्रॉडक्ट पेटंटचा प्रस्ताव माघारी फेटाळावा अशी मागणी असल्याचे डॉ. अनंत फडके व्यक्त करतात.  जेणेकरून भारतात या औषधांची वेगळ्या पद्धतीने निर्मिती करणं शक्य होईल. तोपर्यंत भारतामध्ये उत्पादन न करणाऱ्या आणि उत्पादनासाठी परवानगीही न देणाऱ्या कंपन्यावर कम्पल्सरी लायसन्स(सीएल) या तरतुदीखाली भारताने औषधनिर्मिती करण्याचा दबाव आणण्याचा मार्ग उपलब्ध आहे. परंतु नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी परदेशी कंपन्यांसमोर लोटांगण घालत सीएलचा वापर भारत करणार नाही, असे कबूल केल्याने हा मार्ग बंद झाल्याचं डॉ. फडके सांगतात.

औषधांच्या किमतीबाबत दबाव आणल्यामुळे प्रभावी औषधांचा दर्जा घसरल्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात. अनेक कंपन्यांनी भारतामध्ये औषधांचा पुरवठा करणं बंद केलं आहे. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका अखेर रुग्णांनाच बसत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

अविकसित पॅलिएटिव्ह केअर

कर्करोगाच्या उपचारांना मर्यादा असून काही वेळेस रुग्ण बरा होण्याची शक्यता धूसर असते. अशा परिस्थितीमध्ये किमान उर्वरित आयुष्य आनंदाने, दर्जेदार पद्धतीने जगता यावे यासाठी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना पॅलिएटिव्ह केअर दिली जाते. या माध्यमातून रुग्णांसह नातेवाईकांना या आजाराशी लढण्याचं बळ मिळतंच शिवाय रुग्णांची घरच्या घरी सेवा करण्याचं मार्गदर्शन, रुग्णाला कमीतकमी त्रास व्हावा यासाठी वेदनाशामक औषधे इत्यादी अनेक अडचणींमध्ये मदत केली जाते. टाटा मेमोरियल रुग्णालयासह काही मोजक्याच रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत मात्र ही सुविधा अजून पोहोचू शकलेली नाही. राज्य सरकारने काही जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू केली होती. परंतु समुपदेशकांसह औषधांचा तुटवडा असल्यामुळे ही केंद्रं नावापुरती सुरू आहेत.  कर्करोगाच्या उपचारांचा खर्च न परवडणाऱ्या रुग्णांना राज्याच्या महात्मा फुले जीवनदायी योजनेतून आíथक पाठबळ मिळते. परंतु ते कधीकधी अपुरे पडल्याने उपचार अर्धवट सोडले जातात. केंद्र सरकारच्या आयुष्मान योजनेअंतगर्तही आता कर्करुग्णांसाठी उपचाराची सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

एकीकडे इतकी निराशाजनक परिस्थिती असली तरी दुसरीकडे भारतामध्ये कर्करोगातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढल्याचं आशादायक चित्र आहे. त्यामुळे कर्करोगाबाबतची जनजागृती, पूर्वचाचणी, उपचार, पाठपुरावा आणि समुपदेशन यावर भर दिल्यास आपण अमेरिकेप्रमाणे कर्करोगावर ७० टक्क्यांपर्यंतही मात करू शकतो, असं डॉक्टर सांगतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 1:02 am

Web Title: growing cancer rate in india
Next Stories
1 विमानवाहू युद्धनौकांची मोर्चेबांधणी
2 चिनी रेशीमगाठी
3 हसवण्याचा गंभीर धंदा
Just Now!
X