03-lp-gudiऋतुराज वसंताच्या आगमनाचा पहिला दिवस हा भारतात सर्वत्र िहदू नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवसाला ‘गुढीपाडवा’ असे म्हटले जाते व त्याची एक खास परंपरा आहे. तो साडेतीन मुहूर्तापकी एक असल्यामुळे शुभकार्याचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे. त्यामागे, ते कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होते, हा श्रद्धाभाव असतो.

आपल्या कुटुंबाचे संकटांपासून संरक्षण करण्यासाठी कुटुंबप्रमुखाने ब्रह्माचे पूजन करणे व सर्व कुटुंबसदस्यांनी कडुिनबाची पाने मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे या गुढीपाडव्याच्या दिवशी पाळण्याच्या प्रथा; पण या व्यतिरिक्त एक खास बाब म्हणजे या दिवशी घरावर उभारलेली गुढी. बांबूच्या टोकावर जरतारी वस्त्र, त्यावर चांदीचा किंवा तांब्याचा गडू उलटा ठेवलेला, आंब्याच्या किंवा कडुिनबाच्या पानाचे लहानसे तोरण व साखरपाऱ्याची माळ अशा गुढय़ा घरोघरी उभारल्या जात असत आणि आजही उभारतात.

Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
Amin Sayani
अग्रलेख: संस्कृतीचे आवाज!
Stupa Architecture
UPSC-MPSC: भारतीय स्थापत्य रचनेतील स्तूपाची परंपरा नेमकी काय आहे?

पौराणिक साहित्यात आनंदप्रसंगी गुढय़ातोरणे उभारल्याचे अनेक उल्लेख आढळतात. महाराष्ट्रात गुढी ही पेशव्यांच्या विजयाचे प्रतीक होतीच, पण त्याबरोबरच नववर्षांचे प्रतीकही होती. आज मोठमोठय़ा शहरांमध्ये तसेच निमशहरी भागांतही अनेक मजल्यांच्या इमारतीमधील सदनिकांमध्ये लोक राहतात. तेथे गुढी उभारायला कुठली जागा? आणि एखाद्या कोपऱ्यात ती उभारली तरी तिचा काही दिमाख राहतो का? हल्ली तयार वस्तूंच्या दुकानात तयार गुढय़ाही मिळतात. वीतभर उंचीची ‘बोन्साय’ गुढी. आपली परंपरा, बदलती परिस्थिती आणि हौस या सर्वाचा समन्वय म्हणजे या तयार गुढय़ा. या सगळय़ा परिवर्तनातून एक चिरंतन गोष्ट मात्र अधोरेखित होते, ती म्हणजे गुढीचे आपल्या संस्कृतीतील स्थान.

पण अचानक एका प्रश्नाचा किडा मन पोखरू लागला. आपले कोळीबांधव गुढय़ा कुठे उभारत असतील? मुंबईसारखे शहर तीन बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. कोळीबांधव हे येथील भूमिपुत्र आहेत, याच संस्कृतीचे पालन करतात; पण त्यांची जीवनशैली बघितली तर त्यांचा भूमीशी काही संबंध नसल्यासारखेच आहे. त्यांचे बरेचसे आयुष्य त्यांच्या बोटींवर व त्यासंबंधित घडामोडींशी निगडित असते. कोळीवाडय़ातील त्यांची घरे म्हणजे आपल्यासारखी घरे नव्हेतच. बरे, ते काही समुद्रात घरे बांधू शकत नाहीत. मग त्यांनी गुढय़ा कुठे उभारायच्या? ‘बोन्साय गुढय़ां’ची निर्मिती करून आपण आपल्या प्रश्नावर तोडगा काढला. पण कोळीबांधवांच्या प्रश्नाचे काय? त्यांना सण साजरा करावा असे वाटत नसेल का? कार्ल मार्क्‍सने जगभरातल्या कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली, त्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘जगभरातल्या कामगारांनो, एक व्हा’ अशी हाक देऊन त्यांना संघटित केले. ‘कसेल त्याची जमीन’ हे तत्त्व रुजवण्याकडे वाटचाल केली. पण या सर्वातून कोळीबांधव वगळलेच गेले. ते संघटितही होऊ शकले नाहीत. कारण कदाचित ते भूमिपुत्र असण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सागरपुत्र आहेत, आणि भूमीवर घडणाऱ्या घटनांपासून तसे अस्पर्शही आहेत. त्यांना शिक्षणाच्या संधी नाहीत. मासेमारी हाच त्यांचा व्यवसाय, आणि फार कुणी पुढे गेले तर त्याच्याशी जोडलेला तस्करीचा धंदा. त्यांनी कायम या अंधारात आणि जमिनीवरील समाजाशी काही संबंध नसल्यासारखेच राहायचे का?

विचारांच्या विवरात शिरल्यावर लक्षात आले की, आपल्या या कोळीबांधवांचा प्रश्न केवळ गुढी उभारण्यापुरता, गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. तो खूप व्यापक आहे. तो प्रश्न आपल्याला आपल्या सागरी संस्कृतीच्या असलेल्या-नसलेल्या परिचयाशी निगडित आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला त्या दिशेने पाऊल टाकायला हवे. नाही तरी नवीन आणि शुभ कार्याचा प्रारंभ करण्याचाच तो मुहूर्त आहे.

आम्ही आमच्या काही स्नेह्यंसमवेत कोळीबांधवांना आमच्या गुढीपाडव्याच्या उत्सवात सहपरिवार सामील होण्याचे आमंत्रण देण्यास गेलो. त्यांनी यायचे मान्य केले. भूमीवरील आपल्या बांधवांशी असे प्रेमाने जोडले जाण्याचा त्यांनाही आनंदच झाला. पण त्यांना आमच्यासाठी काही तरी खास करण्याची इच्छा होती.

आम्ही त्यांना विचारले, ‘‘काही तरी करायचे आहे म्हणजे काय?’’

त्यातले एक अनुभवी गृहस्थ म्हणाले, ‘‘हे पाहा, आम्ही काही शिकलेले लोक नाही. पण समुद्रावरच आयुष्य गेलं. त्यातून आम्हाला असं कळलं की घोळ मासा हा कॅन्सरवर अगदी गुणकारी औषध आहे. त्याचं आम्ही तुमच्यासाठी काही करू का?’’

हे ऐकून आमच्या स्नेह्यंचे विचारचक्र वेगाने फिरू लागले. आमच्या प्रत्येक सणाचा आनंद आम्ही समाजाच्या कुठल्या ना कुठल्या घटकाबरोबर साजरा करतो. त्यांनी ठरवले की, आता गुढीपाडवा आपण कॅन्सरग्रस्त रुग्णांसोबत साजरा करायचा आणि त्यानिमित्ताने त्यांना कोळीबांधवांच्या हस्ते घोळ माशाचे जेवण जेवू घालायचे.

हे ठरल्यावर आम्ही सर्वच जण कामाला लागलो. पण या ‘घोळ’ माशांबद्दलच्या त्यांच्या ज्ञानामुळे आमचे अज्ञान आणखीनच उघडे पडले. खरेच, आपल्याला सागराबद्दल, त्यावर अवलंबून असणाऱ्या आपल्या बांधवांबद्दल काय ठाऊक असते? मासेमारी, स्मगिलग, स्कूबा डाइिव्हग, जलतरण, आरमार आणि क्रूज या पलीकडे आपला समुद्राबद्दलचा विचार जातच नाही. आणि ही अनास्था आजची नाही, फार पूर्वीपासून आहे. समुद्रप्रवास हा आपल्या पूर्वजांनी निषिद्ध मानला होता. काही कारणांनी समुद्र ओलांडावा लागला तर प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. आपल्याला त्याच्या कारणांची मीमांसा करण्याची गरज नाही. इतिहासात इतके राजे महाराजे होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अपवादात्मक द्रष्टय़ा पुरुषाचा अपवाद वगळता समुद्राकडे कोणी गंभीरपणे पाहिलेच नाही. शिवाजी महाराजांचे समर्थ आरमार होते; त्यानंतर बहुधा स्वतंत्र भारतातच आपल्याला आरमार लाभले.

पण हासुद्धा फारच मर्यादित विचार झाला. कारण समुद्राला आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवले आहे, असे यातूनही प्रतीत होत नाही. तज्ज्ञांचे असे भाकीत आहे की, तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यावरून होईल. साहजिकच आहे, पृथ्वीतलावरील पिण्याच्या पाण्याचे मर्यादित स्रोत आपल्या निष्काळजीपणामुळे व गरवापरामुळे लवकरच आटून जातील व ‘ज्याच्याकडे पाणी तो राजा’ अशीच अवस्था होईल. पण आपण आपल्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करत नाही, आणि पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे परवडण्यासारखे तंत्रही शोधून काढत नाही. एवढेच कशाला, सागरी वैद्यकशास्त्र, सागरी अभियांत्रिकी, सागरी जैवतंत्रज्ञान, सागरी संगीत या विद्याशाखा तरी आपण विकसित केल्या का?

आमचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला. मोठय़ा संख्येने कॅन्सरचे रुग्ण हा आनंद लुटायला आले आणि कोळीबांधवांनी त्यांना घोळ माशांपासून तयार केलेले रुचकर व आरोग्यवर्धक पदार्थ पोटभर खाऊ घातले. त्यांच्या आणखी खास शाकाहारी पाककृतीही त्यांनी तयार केल्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रम बसवले होते. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा दूरदूरच्या राज्यांतून रुग्ण येतात. त्यांनी कधी समुद्रही बघितलेला नसतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची सागरी संस्कृतीशी तोंडओळख झाली. एका अर्थी, नागर संस्कृती व सागर संस्कृती यांच्यात प्रेमाचा सेतू बांधला गेला. समाजातील प्रतिष्ठित लोक व आपल्या वेगळय़ाच दुनियेत असणारे कोळीबांधव यांना प्रेमाच्या नात्याने एकत्र आणण्याचा हा कदाचित एकमेव कार्यक्रम असावा. कॅन्सर रुग्णांच्या हृदयात कोळीबांधवांनी प्रेमाची गुढी निश्चित उभारली आणि आम्हाला खात्री आहे, कोळीबांधवांच्या हृदयात प्रेमाची गुढी आम्हीसुद्धा उभारू शकलो.

कॅन्सर रुग्णांसाठीचा हा कार्यक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे, पण यानिमित्ताने सागरी संस्कृतीचे जे वास्तव आमच्यासमोर उभे केले, ते फार महत्त्वाचे आहे. कुठल्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण नसताना, केवळ अनुभवाच्या जोरावर कोळीबांधवांना समुद्राबद्दल बरेच ज्ञान असते. जर त्यांना शिक्षण मिळाले तर या ज्ञानाच्या जोरावर त्यांना नवी क्षितिजे खुणावू लागतील. त्यांचा शिक्षणप्रक्रियेशी संबंध न आल्यामुळे त्यांना याचे महत्त्व समजत नसेल, पण सुशिक्षित समाजाला तर ते समजते ना! आपल्या शिक्षण अधिकाराच्या कक्षेत यांच्या मुलांचा समावेश होतो का? आपल्याला त्यांच्या शिक्षणविषयक गरजा तरी माहीत आहेत का? त्यांच्या शाळेचा व सुट्टय़ांचा काळ आपल्या सर्वसाधारण व्यवस्थेपेक्षा वेगळा असू शकतो, याची आपण कल्पना तरी करतो का?

कोणाला वाटेल, यात काय एवढं? आपल्याकडे किती तरी शाळा आहेत! यांनाच आपल्या मुलांना शाळांमध्ये पाठवायचं नसतं; पण असं म्हणणं हे त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल.

सर्वसाधारण शाळांमध्ये उन्हाळय़ाची दीर्घ सुट्टी असते व त्यानंतर पावसाळ्यापासून शिक्षणसत्राची सुरुवात होते; पण याच काळात कोळय़ांच्या बोटी विश्रांती घेत असतात व त्यांनाही सुट्टी असते. त्यांच्या मुलांना या काळात सुट्टीची गरज असते. पावसाळा संपल्यानंतर ती शाळेत जाऊ शकतात; पण कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या वेळेस. त्यांच्या या जीवनशैलीचा विचार आपल्या शिक्षणपद्धतीत केलेला नाही, हे निश्चित!

आमच्या परिचयातील काही मंडळी आहेत. त्यांनी या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून एका नव्या अनोख्या प्रकल्पावर काम सुरू केले आहे- तरंगशाळा. कोळीबांधवांच्या व एकूणच किनारपट्टीवर राहणाऱ्या मुलांना आपल्यासारखे औपचारिक शिक्षण देण्यापेक्षा सागरविज्ञानाचे शिक्षण द्यायचे व तेसुद्धा त्यांना परिचित व उपलब्ध असलेल्या नसर्गिक वातावरणात. यासाठी त्यांची शाळा बोटीवरच काढायची. अशी संधी मिळाल्यावर त्या मुलांच्यातील उपजत ज्ञान आणखी खुलेल व ती सागरासंबंधित विविध विषयांतील तज्ज्ञ होतील, असा त्यांना विश्वास आहे; पण अशा पाण्यावरच्या शाळेला मान्यता देण्याएवढी आपल्या व्यवस्थेने चाकोरी सोडलेली नाही व ती प्रगल्भही झालेली नाही.

04-lp-gudiही केवळ शिक्षणव्यवस्थेची कथा नाही. एकूणच नावीन्यात, साहसात स्वारस्य नसण्याच्या आपल्या वृत्तीची कथा आहे. आपल्या भारताला किती तरी मोठा समुद्रकिनारा आहे, पण आपल्याला खरोखरच त्याची कदर नाही. आपल्या राष्ट्रगीतात समुद्राचा, अंदमान निकोबार या सागरी बेटांचा उल्लेखही नाही. कोणी म्हणेल, तेव्हा परिस्थिती वेगळी होती. एकदम मान्य; पण आता जर परिस्थिती बदलली आहे तर त्या बदलाचे भान आपल्या व्यवहारात उमटले पाहिजे. आपण ठरवले, तर आपला सागरकिनारा हे आपले बलस्थान ठरू शकते. मात्र त्यासाठी सागरी संस्कृतीबद्दल आस्था, तिच्या वेगळेपणाबद्दल जाणीव व तिचा परिचय करून घेण्याची कळकळ आपल्याला बाळगावी लागेल.

आपल्या सर्वाना हे सागरभान, जलभान यावे, यासाठी ही प्रेमाची, ज्ञानाची गुढी उभारण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या समविचारी मित्रमंडळींच्या साथीने केला आहे. आम्हाला खात्री आहे की, आपल्या सर्वाच्या हृदयात ही गुढी स्थान पटकावेल व अशा अनेक अनोख्या गुढय़ा उभारण्याची प्रेरणा देईल.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com