18 February 2019

News Flash

शोभायात्रा आणि आधुनिकतेची (?) गुढी

शोभायात्रेमुळे तो नुसता उत्सव न राहता त्यास धार्मिक उन्मादाचे आणि चिथावणीखोर स्वरूप येते.

अर्ध आकाश
दर वर्षी गुढीपाडव्याला स्त्रियांनी नऊवारी नेसून, गॉगल घालून, बुलेट चालवत शोभायात्रेत सहभागी होणं हे परंपरांचे आधुनिक पाईक असल्याचं लक्षण मानलं जातं. खरंच आहे का ते तसं?

नुकतेच १८ मार्च २०१८ रोजी हिंदूंचे नवीन वर्ष चालू झाले.

महाराष्ट्रात घरोघरी जल्लोषात गुढी उभारून, रस्त्यांवरून शोभायात्रा काढून नववर्षांचे स्वागत झाले. नऊवारी साडी, डोक्याला फेटे, नाकात नथ, डोळ्यांवर गॉगल आणि दिमतीला बाइक; आणि हो.. मागचीच्या हातात भगवा झेंडा अशा थाटातल्या मुलींच्या फोटोंनी त्या दिवशीच्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या ओसंडून वाहत होत्या. इंग्रजी वर्तमानपत्रांनी ‘महाराष्ट्रीयन्स फ्लॉन्ट ट्रॅडिशनल स्वॉग ऑन गुढीपाडवा’ अशा बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यांचा हा आवेश पाहून माझा जीव जरा दडपलाच! तरुण मुलामुलींची देवळाच्या बाहेर वाढणारी गर्दी पाहून दडपतो तसाच!

माझ्या मते आम्ही पुरातन हिंदू संस्कृतीचे अत्यंत आधुनिक (?) पाईक आहोत असे ओरडून ओरडून सांगण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता. गेली अनेक वर्षे तो चालू आहे. त्यातील प्रतीके वर्षांनुवष्रे वापरून विरलेली, संदेश जुनेजर्जर आणि विचार आणि कृतीतील विसंगती तर त्याहून अस्वस्थ करणारी. नथ, नऊवारी लुगडे म्हणजे िहदू परंपरा आणि संस्कृती, गॉगल म्हणजे आधुनिकता आणि बाइक म्हणजे पुरुषार्थ, ज्यात मुलीसुद्धा मागे नाहीत इतके साधे, सोपे, बिनगुंतागुंतीचे पण तितकेच पोकळ असे हे समीकरण. हे समीकरण बदलण्याची गरज गेल्या १५-२० वर्षांत फारशी कुणालाही वाटलेली नाही. विशेष म्हणजे शोभायात्रांचे प्रामुख्याने नेतृत्व करणाऱ्या २० ते ३५ या वयोगटातल्या तरुणाईलाही वाटलेली नाही.

गुढीपाडवा हा िहदू नववर्षांचा आनंदोत्सव. ढोल, लेझीम नृत्य, भव्य रांगोळ्या या सर्वामुळे त्याला एक अत्यंत उत्साही आणि प्रेक्षणीय सोहळ्याचे रूप प्राप्त होते. पण शोभायात्रेमुळे तो नुसता उत्सव न राहता त्यास धार्मिक उन्मादाचे आणि चिथावणीखोर स्वरूप येते. त्याचप्रमाणे अशा शोभायात्रांमधून िहदू संस्कृती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या परंपरा यांचा संकुचित आणि सोयीस्कर अर्थ काढला जातो. या सगळ्या जाळ्यात आजची आधुनिक म्हणवली जाणारी युवा पिढी अडकली आहे याचं दु:ख अधिक.

समाजाला सर्वार्थाने तारून नेणारे ते ‘तरुण’. त्यांच्याकडून जुने, कालातीत झालेले पायंडे मोडून नव्या प्रतीकांच्या मांडणीची अपेक्षा करता येऊ शकते. जुन्या रूढी, परंपरा यांना नवे संदर्भ देऊन त्याचे स्वरूप बदलण्याची ताकद आणि उमेद नव्या दमाच्या पिढीत असते. पण शोभायात्रांमधील बाइकधारी मुली बघून त्याच त्या प्रतीकांना कवटाळण्याचा अट्टहास दिसून येतो.

या अशा शोभायात्रांमधून ज्या आवेशाने प्रादेशिक अस्मिता जपण्याचा प्रयत्न चालू आहे याची आज गरज आहे का? ही सर्व धडपड िहदू धर्माचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी असेल तर खरंच आपली संस्कृती लयाला जात आहे का? तो आपल्यापुढील सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे का? हे प्रश्न तरुण-तरुणींनी स्वत:ला विचारायला हवेत. आणि याचे उत्तर समजा ‘हो’ आलेच तर नथ, नऊवारी आणि भगवे झेंडे फडकवून संस्कृतीचे संरक्षण होऊ शकणार आहे का, हाही मुद्दा आहे.

संस्कृती म्हणजे विशिष्ट भूप्रदेशाचा इतिहास, भूगोल, तिथे राहणारी माणसं, त्यांच्या भाषा, त्यांचे साहित्य, त्यांचे राहणीमान, त्यांची अन्नसंस्कृती, त्यांचे व्यवसाय, तेथील राजकीय परिस्थिती, राज्यकत्रे आणि जनतेच्या समस्या! या सगळ्याचे उचित भान म्हणजे खरं तर परंपरा जतनाची शान! पण आपण आपली अस्मिता अजूनही भगव्या फेटय़ात करकचली आहे, नथीत डकवली आहे आणि तलवारीने केक कापून ती धारदार केली जात आहे.

प्रादेशिक अस्मितेला सतत टोकदार ठेवण्यासाठी ही अशी प्रतीकं खूपच सोयीची असतात. कारण ती लगेच लोकप्रिय होतात आणि वणव्यासारखी झपाटय़ाने पसरतात. आणि मुख्य ही प्रतीकं विनासायास उपलब्ध होतात. नऊवारी नेसायला आणि नथ घालायला कोणतेही कर्तृत्व लागत नाही. पण पुढील अनेक शतके समाज आपले नाव सन्मानाने घेत राहील असे काम करायला मेहनत घ्यावी लागते. वरवरचे संस्कृती-जतन म्हणजे केवळ एक दिवसाची मौजमजा. या उलट स्वसंस्कृतीचा अभ्यास, त्यातील अनिष्ट प्रथांचे निर्मूलन, चांगल्याचा प्रसार हे खरेखुरे संस्कृती-जतन. परंतु आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून शोभायात्रेत सामील होणाऱ्या किती जणांची त्यासाठी वेळ आणि शक्ती देण्याची तयारी असते? नथ आणि फेटेधारी तरुणांपकी किती जण आपला प्रदेश जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील स्वत:चा जिल्हा सोडून शेजारी जिल्ह्य़ांना भेटी देतात? किती जणांना पाच भारतीय इतिहासकारांची नावं सांगता येतील? किती मुलामुलींनी मागील सहा महिन्यांत किमान एक तरी मराठी पुस्तक वाचलं असेल? आपल्यापकी किती जणांना महाराष्ट्राची रब्बी आणि खरीप पिकं सांगता येतील? किती जणांना भारताची इएजी राज्ये (EAG -Empowered Action Group- ज्यांना पूर्वी बिमारू राज्ये म्हणत असत) माहीत असतील? किती शहरी युवकांना चार तरी दलित साहित्यिकाचं नाव सांगता येईल? ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी गोंड की वारली? अनेक क्रांतिकारी निर्णयांसाठी गाजलेल्या काँग्रेस अधिवेशनातील फैजपूर गाव कर्नाटकातील, महाराष्ट्रातील की उत्तर प्रदेशातील? बादल सरकार हे नाटककार होते की शिल्पकार? इस्मत चुगताई नेमक्या कोण होत्या? ‘परंपरा आणि संस्कृती’मध्ये या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. संस्कृतीच्या या अधिक अर्थपूर्ण अंगाकडे आपण कधी लक्ष देणार?

राहिता राहिला प्रश्न आधुनिक असण्याचा!

एकाच वेळी नथ आणि गॉगल घालून तरुणी काय सांगू इच्छितात? आम्ही आधुनिक झालो असलो तरी परंपरेशी असलेले नाते टिकवून आहोत? पण संस्कृतीशी नाते फक्त पेहेरावातूनच टिकवायचे असते का?

तसेच, आपण अंतर्बाहय़ खरंच आधुनिक झालो आहोत का? की त्याचा आभास निर्माण करत आहोत?

आजही लग्नाचा खर्च अर्धा-अर्धा करण्याचा आग्रह धरून प्रत्यक्षात तसे वागणारे तरुण संख्येने नगण्य असतील. हळदीकुंकू समारंभात नवरा हयात नसलेल्या आपल्या सख्या, आत्या किंवा मावशीला बोलावण्याचे धाडस करणाऱ्या फार कमी असतील. (फक्त) वधूपक्षाने वरपक्षाचे दुधाने पाय धुण्याचा मोह आवरणे अनेकांना कठीण जात असेल. सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसताना त्यामागील कथा वाचण्याचे कष्ट फार कमी जणांनी घेतले असतील. परंपरांना प्रश्न विचारण्यामागे खरी आधुनिकता असते. ज्या परंपरा अन्याय्य आहेत, त्यांना सोडचिठ्ठी देण्यात असते. ते करण्याची तयारी दाखवली, तर आपण खऱ्या अर्थाने आधुनिक बनू. मग सक्षमीकरणाचा आभास निर्माण करण्याची गरज उरणार नाही.

आमच्या पिढीला खरंतर िशगावर घेण्यासाठी आव्हानांची थोडीही कमतरता नाही. देशाच्या दुर्दैवाने आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक युवकाच्या सुदैवाने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, समाजकारण या प्रत्येक क्षेत्रात उत्तरांची वाट बघणाऱ्या अनेक प्रश्नांची रांगच रांग लागली आहे. अगदी िहदू धर्माच्या चौकटीतच काम करायचे म्हटले तरी सोडवण्यासारख्या समस्या मुबलक आहेत. समाजात चिरफळी माजवणारी जातीव्यवस्था, खापपंचायत, जातपंचायत यांसारख्या अन्याय्य न्यायव्यवस्था, बुवाबाजी, अंधश्रद्धा, एक ना अनेक! या व्यवस्थांचे शुद्धीकरण म्हणजे खरी आधुनिकता. पण ती प्रत्यक्षात आणायची, तर नुसती बाइकची चाके झिजवून चालत नाही, तर देह झिजवावा लागतो.

नववर्षांचे स्वागत उत्साहात झालेच पाहिजे. पण ही स्वागतयात्रा अधिक सौहार्दपूर्ण आणि अर्थपूर्ण होण्यासाठी आपण आपला अभिनिवेश (Swag) बदलला पाहिजे.
चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com

First Published on March 30, 2018 1:02 am

Web Title: gudi padwa and shobhayatra